वाघाची गोष्ट! (ढिंग टांग)

British Nandi
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

स्थळ : अज्ञात जंगलात.
वेळ : लपून छपून जगण्याची!
प्रसंग : बांका!
पात्रे : मि. जय वाघ आणि मिसेस विजया वाघ.

स्थळ : अज्ञात जंगलात.
वेळ : लपून छपून जगण्याची!
प्रसंग : बांका!
पात्रे : मि. जय वाघ आणि मिसेस विजया वाघ.

सौ. वाघ : (नवरा आरामात बसल्याचे पाहून कुठल्याही पत्नीचे होते, तेच...) अहो, इथे नुसते काय बसलाय पंजावर डोकं ठेवून! जरा हलवा की हातपाय!!
मि. वाघ : (डोळे मिटून) मी दमलोय!
सौ. वाघ : (फणकाऱ्यानं) बसल्या बसल्या दमायला काय झालं? तो चंद्रपूरचा राष्ट्रपती वाघ बघा, पार मध्य प्रदेशात जाऊन हिंडून आला! एखादा कर्तृत्ववान वाघ शिकारीसाठी कुठे कुठे हिंडतो! नाहीतर तुम्ही!! असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!! हुं:!!
मि. वाघ : (सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत) मी खूप चाललोय! येवढी चाल पडली असती, एखाद्या वाघाचं मांजर झालं असतं केव्हाच!!
सौ. वाघ : (हुज्जत घालत) तेवढ्याच क्‍यालरीज जळाल्या! नाहीतरी आशिया खंडातला सगळ्यात माजलेला वाघ म्हणूनच लोक ओळखतात तुम्हाला!!
मि. वाघ : (थिजून जात) मी माजलोय? मा-ज-लो-य??
सौ. वाघ : (थंडपणाने गुर्कावत) नुसतं बसून बसून दुसरं काय होणारे म्हंटे मी? जा जरा शिकार बिकार करून आणा! परवा, तिथं त्या पाणवठ्यापलीकडे मला रानम्हशी दिसल्या होत्या!!
मि. वाघ : (हादरून) रानम्हशी? बाप रे!!
सौ. वाघ : (रोमॅंटिकली गाणं गुणगुणत)... तोडिता हाडे मी सहज पाहिली जाताऽऽऽ...मज आणुनी द्या ती रानम्हैस जयनाथाऽऽऽ...! आणा ना गडे आपल्यासाठी एखादी रानम्हैस!!
मि. वाघ : (हबकलेल्या मनःस्थितीत) रानम्हशीच्या कातड्याची चोळी घालणार आहात का आपऽऽण? च्यामारी त्या एका भयंकर माणसापासून सुटका व्हावी, म्हणून आम्ही इतकी वणवण केली, त्याचं काहीच नाही!! गावं ओलांडली, महामार्ग ओलांडले...ताडोबामधून पार उमरेडला आलो! तिथंही तो माणूस मागावर हजर! (विषण्णतेनं) एखाद्याच्या पायावर चक्री असेल तर नशिबी वणवण येते म्हंटात!
सौ. वाघ : (प्रश्‍नार्थक जबड्याने) पण तुम्ही कोणाला येवढे घाबरला आहात? इतकी वणवण करण्याचं कारण काय? तुम्ही उमरेडच्या जंगलातून गेले तीन महिने गायब आहात, ह्याची नॅशनल न्यूज झाली आहे!! कुणी म्हणतं, तुम्ही चक्‍क तहानेनं व्याकूळ होऊन मेलात! कुणी म्हणतं, तुम्ही दुसऱ्या जंगलात शिफ्ट झालात!! 

मि. वाघ : (समजूत घालत) तुमच्यासमोर हा अखंड वाघ म्हणून बसलोय ना? मग झालं तर!!...
सौ. वाघ : (शहाणपणाचे बोल ऐकवत) वाघाच्या जातीला शोभत नाही बरं असा पळपुटेपणा!! आशिया खंडातला सर्वांत मोठा वाघ अशी तुमची ख्याती, पण मन सशासारखं भित्रं!! आता तर त्या उधोजीसाहेबांनीही तुम्हाला असाल तिथून शोधून काढण्याची आज्ञा दिली आहे!! "जय, तू परत ये, तुला कोणीही काहीही बोलणार नाही‘ अशी जाहिरातही देतायत म्हणे त्यांच्या पेपरात! जा, आणि सरळ बांदऱ्याला त्यांच्या "मातोश्री‘च्या दारात उभे राहा! म्हणावं, हा सूर्य, हा जयद्रथ!! काढा हवे तितके फोटो, पण बदल्यात एखादी रानम्हैस द्या!! काय?
मि. वाघ : (शहारून) भयानक कल्पना आहे!! त्यांच्या घरी ऑलरेडी एक वाघ आहे!! मला तिथं पेंढा भरून घेऊन उभं राहण्याची काहीही इच्छा नाही!!
सौ. वाघ : (प्रेमाने विचारपूस करत) कसलं डिप्रेशन आलंय तुम्हाला? मला नाही का सांगणार, जयनाथा?
मि. वाघ : (हुंदका आवरेनासा होत) त्या मुनगंटीवारसाहेबांना सांग नाऽऽऽ...वाघाच्या मागे किती लागायचं काही लिमिट? हाहाहाऽऽऽऽ भ्याऽऽऽ...हुंहुंहु....!! 

Web Title: Tiger story