श्रद्धांजली : सर्जनप्रेरणेचा संशोधक

रजनीश जोशी
सोमवार, 3 जून 2019

"साहित्य परंपरा पचवल्यावर कवी-कलावंतांच्या कलाकृतीला अर्थवत्ता लाभते. तो परंपरेत लिहितो आणि परंपरा निर्माण करतो,'' असे प्राचार्य मधुकर तथा म. सु. पाटील यांनी म्हटले आहे.

"साहित्य परंपरा पचवल्यावर कवी-कलावंतांच्या कलाकृतीला अर्थवत्ता लाभते. तो परंपरेत लिहितो आणि परंपरा निर्माण करतो,'' असे प्राचार्य मधुकर तथा म. सु. पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच विधानाचा वापर करून म्हणायचे, तर "समीक्षेची परंपरा पचवल्यानंतर पाटील यांनी स्वतःची समीक्षा परंपरा निर्माण केली आहे.' आदिबंधात्मक समीक्षा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पाटील यांनी प्रामुख्याने कवितेची समीक्षा केली. कवितेमध्ये सर्वाधिक महत्त्व आशयाला असे मानले जाते, पण आशयाप्रमाणेच तिच्या रूपालाही महत्त्व आहे; इतकेच नव्हे तर "रूपाशिवाय आशय नाही आणि आशयाशिवाय रूप नाही,' असा सिद्धांत त्यांनी मांडला.

रायगड जिल्ह्यातल्या खाड्यांच्या टापूत असलेल्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. खारेपाटाच्या खाजण किंवा खाऱ्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनावर उदरनिर्वाह होणे कठीणच. मग मुंबईतल्या गिरणीत दिवसा काम करून रात्रशाळेत त्यांनी शिक्षण घेतले. कोळीवाड्यातल्या टीचभर खोलीत अभ्यास करून मॅट्रिकला ते रात्रशाळेतून पहिले आले.

लहानपणापासूनच त्यांना वाचनाचे अतोनात वेड. विक्रीकर विभाग, शिक्षक अशा नोकऱ्या करीत ते शिकले आणि मनमाडला प्राचार्य म्हणून स्थिरावले. कलानिर्मितीच्या आदिम प्रेरणेबद्दल त्यांच्या मनात कुतूहल होते. सर्जनशक्तीचे विकसन कशा पद्धतीने होते ते त्यांनी नेमकेपणाने सांगितले आहे. भरतमुनीपासून साठोत्तरी कवींपर्यंत त्यांनी उमाळ्याने लिहिले. लेखकाचा आत्माविष्कार धुंडाळण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत होती. कालातीत आणि कालसापेक्ष कृतींबाबत त्यांचे स्वतःचे निरीक्षण होते. बालकवी, सदानंद रेगे आणि दलित कवितेचे सौंदर्यशास्त्र त्यांनी उलगडून दाखवले.

संतसाहित्याचा त्यांचा व्यासंग थक्‍क करणारा होता. संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकारामांवरचे त्यांचे ग्रंथ याची साक्ष देतात. "ज्ञानदेवांच्या सृष्टीत एकदा जे निर्माण झाले, त्याला जीर्णत्व नाही आणि नाशही,' असे त्यांनी म्हटले आहे. "ज्ञानेश्‍वरी'चा तृष्णाबंध त्यांनी मांडला. "लांबा उगवे आगरी' हे त्यांचे आत्मकथन. "लांबा' म्हणजे वेळेआधी पक्व होणारा भात. कष्टप्रद आयुष्यानं त्यांना वेळेआधी प्रौढ केल्याचं ते द्योतक आहे. "अनुष्टुभ'सारख्या नियतकालिकाच्या जडणघडणीतील त्यांचं योगदान मोठं आहे. "स्मृतीभ्रंशानंतर' या त्यांनी केलेल्या अनुवादाला आणि "सर्जनप्रेरणा व कवित्वशोध' या समीक्षाग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. त्यांच्या निधनामुळे अलिप्त राहून व्यासंग आणि चिंतनात मग्न असणाऱ्या समीक्षकाला मराठी साहित्यविश्‍व मुकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribute : The researcher of the surgeon