पारंपरिक ज्ञानाला पेटंटचे अधिष्ठान

लोकसभेमध्ये १७ ऑगस्ट २०२२ रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला
Turmeric
Turmeric sakal

लोकसभेमध्ये १७ ऑगस्ट २०२२ रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्याद्वारे भारतातील पारंपरिक ज्ञान साठविण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ‘ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी’ (टीकेडीएल) खुली करण्यात आली. ‘टीकेडीएल’च्या जन्माची कहाणी एक अद्भुत अशीच आहे आणि ती भारतीयांना बऱ्यापैकी माहीत आहे. ती म्हणजे अमेरिकेतील हळदीच्या पेटंटची कहाणी. जवळपास वीस वर्षांपूर्वी दास आणि कोहली या भारतीय मंडळींनी अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठाच्या माध्यमातून हळदीच्या विशेष घटकांसाठी पेटंट मिळवले होते. त्यानंतर या पेटंट विरोधात मोठी मोहीमच भारतात उभी राहिली होती.

आणि विशेष करून प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने सदर पेटंटच्या विरोधात यशस्वी लढा दिला आणि. अखेरीस ते पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसमधून रद्दबातल करण्यात आले. या पेटंटच्या लढाईत भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागली. सदर हळदीचे पेटंट अमेरिकेला का मिळाले, याची विशेष कारणमीमांसा करण्यात आली आणि त्या वेळेला एक महत्त्वाची बाजू समोर आली ती म्हणजे भारतात हळदीचा वापर शेकडो वर्षांपासून होत असला तरीसुद्धा त्याच्या नोंदी नसल्या कारणाने किंवा त्याला यथोचित शास्त्रीय स्थान नोंदणीकृत नसल्यामुळे अमेरिकेमध्ये त्याच्या पेटंटला दारे उघडी झाली होती. थोडक्यात हळदीच्या गुणधर्माची आणि वापराची यथोचित शास्त्रीय नोंदणी भारतात असणे गरजेचे होते, हा निष्कर्ष हळदीच्या पेटंटवरून उद्भवलेल्या वादानंतर काढण्यात आला. या समस्येवर तोडगा म्हणून ‘टीकेडीएल’च्या निर्मितीची मुहूर्तमेढ झाली. हळदी बरोबर भारतातील कडुलिंब, बासमती तांदूळ आणि भारतीय कलिंगडाच्या एक्सट्रॅक्शनच्या पेटंटच्या घटना समोर येऊ लागल्या. मग ‘टीकेडीएल’ने आपला विस्तार वाढवला आणि त्याला एक मूर्त रूप दिले गेले.

पारंपरिक ज्ञानाचा खजिना

पेटंट मिळविण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ज्या वस्तूसाठी किंवा वस्तू बनविण्याच्या प्रक्रियेसाठी पेटंट घ्यावयाचे आहे ती वस्तू अथवा प्रक्रिया याची जगभरात कुठेच नोंद नसली पाहिजे. जर अशा प्रकारची नोंद कुठल्याही स्वरूपात जगात सापडली तर त्या वस्तूला किंवा प्रक्रियेला पेटंट दिले जाणार नाही. थोडक्यात नवीन वस्तू किंवा नवीन प्रक्रियेलाच पेटंट दिले जाते, हा जगभरातील नियम कायम आहे.

पारंपारिक ज्ञानाचा स्त्रोत भारतात हजारो वर्षांपासून आयुर्वेद, युनानी किंवा अनेक भागातील जमाती, समाज घटकांत पारंपरिक पद्धती पिढ्यानपिढ्या कार्यान्वित आहेत. आयुर्वेदाचा विशेष परिचय करून देणाऱ्या चरक संहितेपासून पतंजली आणि त्यानंतर अनेक ज्ञानी आणि महात्म्यांनी रोगमुक्तीपासून उत्तम आरोग्य पद्धतीचे ज्ञान विकसीत केले, त्याची एक परंपरा निर्माण झाली आहे. त्यात केरळातील साधन समृद्धीपासून हिमालयातील औषधी वनस्पतींचाही समावेश होता. सदर ज्ञान विशेष करून संस्कृत आणि तत्सम प्राचीन भारतीय भाषांमध्ये संकलीत केले गेले होते. वैद्यक शास्त्रात, विशेष करून आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये या पारंपरिक ज्ञानाचा काही प्रमाणात समावेश केला गेला, परंतु पारंपरिक ज्ञानाचा साठा भारतीय साहित्यात एका महासागरासारखा उपलब्ध असल्याने प्रत्येक घटकाचा समावेश मर्यादित अभ्यासक्रमात केला जाऊ शकला नाही.

ग्रंथसंपदेशिवाय कुटुंबनिहाय पारंपरिक ज्ञानही पुरातन भारत वर्षात महत्त्वाचे होते. आजही त्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्यपूर्णता कायम आहे. अनेक कुटुंबीयांकडे त्यांच्या पूर्वजांकडून औषधी वनस्पतींचे ज्ञान संक्रमित झालेले आहे. आजही अनेक गावात कावीळ, मूळव्याध यासारख्या व्याधींवर बऱ्याच कुटुंबांकडे असलेल्या मुळ्यांच्या सहाय्याने रोगमुक्ती साधली जाते, असे पारंपरिक कुटुंबनिहाय ज्ञान आणि त्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म हेसुद्धा पारंपरिक ज्ञान (ट्रॅडिशनल नॉलेज) म्हणून गृहीत धरले जाते. पण त्याचा लेखाजोखा दस्तावेज नसल्याने त्यावर पेटंट सारख्या बौद्धिक संपदा घेण्यात आल्या.

या पेटंटच्या विरोधात बायोपायरीसिस या मथळ्याखाली बेकायदेशीररित्या चालू असलेल्या जैवविविधतेच्या चोऱ्यांबाबत उठाव करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणूनही ‘टीकेडीएल’ अस्तित्वात आले. या ‘टीकेडीएल’ने भारतीय परंपरागत ज्ञान डिजिटल स्वरूपात एकत्र करण्यास सुरुवात केली. त्यात संस्कृत कोशापासून ते अनेक परंपरागत समूहाकडून माहिती संकलित करण्यास सुरुवात

झाली. ‘टीकेडीएल’ने अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात माहिती संकलित केली.

का केली ‘टीकेडीएल’ खुली!

‘टीकेडीएल’ हा भारत सरकारचा उपक्रम असल्याने त्यांच्याकडील संकलीत केली गेलेली कोणत्याही स्वरुपाची, प्रक्रियेची माहिती अधिकृत मानली जाते. याच मुद्द्याला धरून भारत सरकारने आपल्या ‘टीकेडीएल’मध्ये नोंदणी असलेल्या पदार्थ किंवा प्रक्रियेला जगात कुठेच पेटंट मिळता कामा नये म्हणून जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजेच ‘डब्ल्यूटीओ’च्या सभासद राष्ट्रांना विशेष करून अमेरिका, युरोप आणि चीन या देशांत आणि आंतरराष्ट्रीय पेटंट देताना ‘टीकेडीएल’मध्ये सर्वप्रथम पाहणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे परदेशात भारतीय पारंपरिक औषधे किंवा वस्तूंवर सर्रास देण्यात येणाऱ्या पेटंटला आळा बसेल. पण आजतागायत भारताची ही मागणी मान्य झालेली नाही.

ही मागणी करीत असताना भारताला समांतर यंत्रणा निर्माण करणे आवश्यक होते. ती समांतर यंत्रणा म्हणजे ‘टीकेडीएल’ खुली करण्याची. ‘टीकेडीएल’ जरी तयार करण्यात आली होती तरी ती सर्वांना खुली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशातच नव्हे तर देशातही पारंपरिक ज्ञानाधारित पेटंट देण्यात येत होते. यामध्ये खास करून योगाविषयी शेकडो पेटंटचा समावेश होऊ शकतो. अशावेळी सदर ‘टीकेडीएल’ सर्वंकष खुली करण्याचा भारत सरकारचा निर्णय हा अनेक अर्थाने उपयोगी ठरणारा आहे. एक तर या खुलेकरणामुळे फसवणूक करून भारतीय पारंपरिक ज्ञानाचे पेटंट घेणाऱ्यांना चपराक बसेल. तसेच या पारंपरिक ज्ञानाचा वापर भारतीय वैद्यक शास्त्रात तसेच इतर गरजेच्या क्षेत्रात वाढीस लागेल. त्याचबरोबर या पारंपरिक ज्ञानावर अधिक संशोधन करणे, अभ्यास करणे अशा बाबींना चालना आणि प्रोत्साहन मिळेल.

याचा मुख्य परिणाम अनेक प्रकारची औषधे आणि आरोग्यवर्धक पदार्थ यांच्या निर्मितीला चालना मिळण्यामध्ये होईल. त्यामुळेच लोकसभेत सरकारने ‘ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी’ खुली करण्याचा जाहीर केलेला निर्णय हा तमाम भारतीयांना अतिशय उपयुक्त, नवनव्या संशोधनाला चालना देणारा ठरणारा आहे. त्याशिवाय, आपल्या परंपरागत ज्ञानाचे महत्त्व, त्याची उपयुक्तता लक्षात घेवून त्याचे संवर्धन करणे, त्याला शास्त्रीय परिभाषेत बसवत त्याला वैधानिक अधिष्ठान मिळवून देणे अशा बाबींना चालना मिळू शकते. सहाजिकच पेटंट घेण्यामधला भारतीयांचा टक्कादेखील वाढायला मदत होवू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com