अनुबंध मनुष्य-प्राणी सहजीवनाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elephant

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय लघुपटाला ऑस्कर पारितोषिकाने गौरवले याचा अभिमान आहे. सध्याच्या मनुष्य-प्राणी संघर्षात उभयतांमधील सहजीवनाला खतपाणी घालणाराच हा लघुपट आहे.

अनुबंध मनुष्य-प्राणी सहजीवनाचा

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय लघुपटाला ऑस्कर पारितोषिकाने गौरवले याचा अभिमान आहे. सध्याच्या मनुष्य-प्राणी संघर्षात उभयतांमधील सहजीवनाला खतपाणी घालणाराच हा लघुपट आहे. हे भावानुबंध अधिक दृढ करण्यासाठी पावले उचलली तर त्याच्या निर्मितीचे चीज झाले, असे म्हणता येईल.

सोमवारची सकाळ उजाडली तीच ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित लघुपटाने ऑस्कर पारितोषिक जिंकल्याचे शुभ वर्तमान घेऊन. माणूस व वन्यजीव यांनी सहअस्तित्व व सहजीवन मान्य केले तरच या पृथ्वीला आणि जैवविविधतेला संरक्षण मिळू शकेल, अशी सकारात्मक जाणीव समाजामध्ये पेरण्याचा केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे हा लघुपट. यामुळेच ऑस्कर पारितोषिकाचा स्वीकार केल्यानंतर कार्तिकीने हा पुरस्कार आपला परिवार व मातृभूमीला समर्पित करत असल्याचे सांगण्याबरोबरच भारतात प्राणीजीवन व मनुष्यजीवन यांच्यामध्ये पूर्वापार चालत आलेल्या भावनिक बंधांचा आवर्जून उल्लेख केला.

मोहविणारा आपलेपणा

कार्तिकी मूळची तमिळनाडूतील उटी येथील रहिवासी. निसर्गविषयक जिव्हाळा तिच्याकडे जणू आजी व वन्यजीव छायाचित्रकार असलेल्या वडिलांकडून वारशाने आला. अठरा महिने इतकेच वय असल्यापासून जंगल व वन्यजीव यांच्याशी परिचित असलेली कार्तिकी स्वतःदेखील वयाची तिशी गाठेपर्यंत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्रकार बनली, यात नवल नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी उटी परिसरातील जंगलातून जाताना तिला एक तीन महिन्यांचे हत्तीचे पिल्लू एका माणसाबरोबर मजेत निघालेले दिसले.

गंमत वाटून कार्तिकीने ‘रघू’ नावाचे हत्तीचे पिल्लू घेऊन निघालेल्या बोम्मनचा पाठलाग केला. कार्तिकीला बोम्मनची जोडीदारीण बेल्लीही भेटली. जखमी आणि मरणप्राय अवस्थेत सापडलेल्या ‘रघू’ला जीव लावून या जोडप्याने त्याचे संगोपन केले हे समजले. विकासाच्या नावावर सध्या ज्या गतीने वन्य प्राण्यांच्या अधिवासावर मानवी अतिक्रमण होत आहे आणि त्यातून प्राणी विरूद्ध माणूस असा संघर्ष तीव्र होतो आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कार्तिकीला हत्ती आणि त्या जोडप्यातील आपलेपणा मोहविणारा आणि काही सकारात्मक सुचविणारा वाटला.

पाच वर्षे, ५६० तास

कार्तिकीने बोम्मन, बेल्ली आणि रघू यांच्या कथेला लघुपटाचे रूप देण्याचा निर्णय घेतला. ‘गॅंग्ज्‌ ऑफ वासेपूर’ ‘लंचबॉक्‍स’सारखे चित्रपट निर्मिती म्हणून देणाऱ्या गुनीत मोंगा यांना कार्तिकीने लघुपटासाठी निवडलेला विषय पटला. यातून सुरू झाला ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मितीचा प्रवास! तब्बल पाच वर्षांचा कालावधी आणि पाचशेसाठ तासांची मेहनत यातून हा एक्केचाळीस मिनिटांचा लघुपट बनू शकला, असे कार्तिकी सांगते. शक्‍य तितका नैसर्गिक प्रकाशच चित्रीकरणाच्यावेळी वापरायचा हा कार्तिकीचा अट्टाहास होता. चित्रीकरणासाठी मुख्यतः डीएसएलआर कॅमेरे आणि काही प्रमाणात ड्रोनचा वापर करण्यात आला. ‘रघू’ जखमी अवस्थेत मिळाला त्यावेळच्या काळातील चित्रीकरणाचे फुटेज उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रमाणामध्ये वन खात्याचे सहकार्यही मिळाले.

कधी काळी ‘गांधी’ चित्रपटाच्या वेषभूषेसाठी भानू अथय्यांनी ऑस्कर पटकावून भारतीयांसाठी सुरू करून दिलेला ऑस्करचा प्रवास आता भारतीय निर्मिती असलेल्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ आणि राजामौलीच्या ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गीताला ऑस्कर मिळण्यापर्यंत येऊन पोचला आहे.

ऑस्कर पारितोषिक तर मिळाले. पण मायावी विकासासाठी वन्य प्राण्यांचे अधिवास नष्ट करणे थांबणार का? अपरिहार्य असेल तेथे वन्य प्राणी आणि मनुष्य यांच्या शांततामय सहअस्तित्वासाठी आपण काही निसर्गाशी मैत्रीपूर्ण जीवनशैली स्वीकारणार का? तसे घडले तरच या लघुपट निर्मितीचा हेतू साध्य होणार आहे!

जपा हत्तींचा नैसर्गिक अधिवास

कार्तिकीने आशियाई हत्तींविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक माहिती होती. आशियाई हत्ती ही Elephas वंशातील एकमेव जिवंत प्रजाती आहे. १९८६ पासून आशियाई हत्तीला लुप्तप्राय जीवांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये, म्हणजे हत्तींच्या गेल्या तीन पिढ्यांमध्ये या हत्तींची संख्या पन्नास टक्‍क्‍यांनी घटलेली आहे. नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, त्यांचा ऱ्हास होणे आणि चोरटी शिकार ही या मागील प्रमुख कारणे आहेत. आशियाई हत्ती प्राणिसंग्रहालयांमध्ये बंदिस्त केले तर ते लवकर मरतात आणि त्यांचा जन्मदरही कमी आहे. अशा स्थितीत ही प्रजाती टिकवायची तर एकीकडे हत्तींचा नैसर्गिक अधिवास जपायचा आणि सहजीवन स्वीकारायचे, याला पर्याय उरत नाही.