संवेदनशीलता जागविणारे साहित्यकार

वि.स. खांडेकर हे मराठीतील पहिले ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते साहित्यिक. जीवनासाठी साहित्य ही भूमिका घेणाऱ्या खांडेकर यांची आज (ता. ११ जानेवारी) सव्वाशेवी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण.
VS Khandekar
VS Khandekarsakal

वि.स. खांडेकर हे मराठीतील पहिले ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते साहित्यिक. जीवनासाठी साहित्य ही भूमिका घेणाऱ्या खांडेकर यांची आज (ता. ११ जानेवारी) सव्वाशेवी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण.

नैतिकदृष्ट्या चांगल्या वर्तणुकीची कुचेष्टा करण्याचे दिवस सध्या आले आहेत. कुणी नैतिकतेनं वागत असेल तर त्याला अव्यवहारी ठरवायचं, कुणी अहिंसेमध्ये असणारी ताकद समजावण्याचा प्रयत्न केला तर त्याला भित्रा ठरवून त्याची हेटाळणी करायची, अशी वृत्ती हळूहळू तरुणाईमध्ये वाढते आहे.

प्रौढत्वाकडे झुकलेल्या माणसांनासुद्धा हा जो काही बदल घडतो आहे तो वावगा आहे, असे वाटत नाही. खांडेकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना त्यांनीच वेळोवेळी व्यक्त केलेले विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या विचारांपासून दूर जाणं समाजहिताचं नाही, हे कळेल.

खांडेकरांमध्ये एक शिक्षक, आई, समुपदेशक, समाजसेवक, राष्ट्रप्रेमी, इतिहासाचा अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ अशी अनेक रूपं दडलेली होती. त्यांनी कथा, कादंबरी, लघुनिबंध, नाटक, रूपक कथा, स्वप्ने झाली अशी साकार अनेक साहित्यप्रकारांमध्ये मुशाफिरी केली होती. चित्रपटांसाठी पटकथेबरोबर त्यांनी काही गीतंही लिहिली होती. त्यांच्या साहित्यातून, भाषणांतून जीवनविषयक चिंतनच समोर आलं.

जीवनासाठी कला हीच त्यांची भूमिका होती. ‘ययाती’ या कादंबरीला १९७४ साली ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला. त्यानंतर आपले विचार मांडताना ते म्हणाले होते की, आपल्या भोवतालचा समाज भौतिक समृद्धीच्या एकांगी कल्पनेनं भारून जाऊन परंपरागत नैतिक मूल्यांचा चोळामोळा करायला प्रवृत्त होत आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये सत् आणि असत् , पाप आणि पुण्य यातल्या सीमारेषा अधिकाधिक पुसट होत चालल्या आहेत.

दुसऱ्याच्या दु:खाच्या बाबतीत माणसाला स्वाभाविकपणे जाणवणारी संवेदनशीलता बधीर होत चाललेली आहे. अनिर्बंध लोभ समाजमनावर आपला पगडा बसवतो आहे आणि पूर्वीची श्रद्धास्थानं उद्ध्वस्त होत आहेत. याच जाणीवेतून मी ‘ययाती’सारखी पौराणिक कथा कादंबरीच्या रूपानं मांडण्यास प्रवृत्त झालो!

डोळस धर्मश्रध्दा

खांडेकरांनी ‘ययाती’ ज्या परिस्थितीनं अस्वस्थ होऊन लिहिली ती परिस्थिती आज बदलली आहे का? की आणखी टोकाची वाईट झाली आहे? सध्या देशभर खरं हिंदुत्व कोणतं आणि धर्मश्रद्धा कशी हवी, याबद्दल ठिकठिकाणी विचारमंथन होत आहे. कर्मकांडालाच धर्म मानणाऱ्या प्रवृत्तींचा वरचष्मा आहे. हिंदुत्वाचं मूळ तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांची अधिकाधिक फारकत होते आहे.

खांडेकरांना याची १९३७ मध्येच जाणीव झाली होती. कोकणातील कुडाळ येथे अखिल हिंदू सहभोजन प्रचार सभेत बोलताना २८ मे १९३७ रोजी खांडेकर म्हणाले होते,‘‘मला हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान मान्य आहे. कर्मकांड मान्य नाही. धर्माचं अंतिम कार्य समाजधारणा करणे हे आहे; पण तसं होताना दिसत नाही. स्पृश्यास्पृश्य भेद अद्यापही आहेत.

दिवसभर कर्मकांड करण्यापेक्षा लोकोपयोगी कार्य हेच श्रेष्ठ धर्मकार्य आहे असं मी मानतो. अनेक ऋषीमुनींच्या विचारातून आपला धर्म निर्माण झाला. समाजस्थैर्यासाठी व प्रेमासाठी त्यांनी जे विचार मांडले तेच पुढे धर्म म्हणून ओळखले जाऊ लागले. कोणत्याही धर्माचा उपयोग समाजाच्या स्थैर्यासाठी आणि अंतिम विकासासाठी व्हायला हवा.

सद्गुण फुलवणं हे धर्माचं काम आहे आणि म्हणूनच धर्म नीतिमूल्ये सांगतो; पण हिंदूच नव्हे तर सर्व धर्मांनी आपल्या मूळ तत्त्वज्ञानापासून फारकत घेऊन व्यवहार सुरू ठेवल्याचं आढळत आहे. धर्मश्रद्धा हवी; पण ती डोळस हवी आणि त्यासाठी धर्माच्या तत्त्वज्ञानाचा आपण अभ्यास करायला हवा.’’

माणुसकीचा जागर

नव्यानं उदंड लेखन करणाऱ्या लेखकांनी खांडेकरांच्या निकषावर आपलं लेखन स्वत:च तपासलं तर हाती काय लागेल?-की न खपणारं साहित्य लिहिण्यापेक्षा तात्कालिक हसवाहसवी करणारं, थोडे गुलाबी चिमटे काढत शृंगारिक भावना जागवणारं साहित्य लिहिणं अधिक चांगलं हाच निष्कर्ष निघेल?असंच साहित्य लिहिलं आणि वाचलं गेलं तर समाजाची नैतिक जडणघडण कशा प्रकारची असेल?-आठदहा दिवसांपूर्वीच एक बातमी आली.

आभासी जगात नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे मश्गुल तरूण पिढीतील एका अल्पवयीन मुलीवर आभासी जगातच सामुदायिक बलात्कार होण्याचा प्रकार उघड झाला. हा प्रकार कोणत्या मानसिकतेचं आणि समाजाच्या कशा प्रकारच्या नैतिकतेचं दर्शन घडवतो?

विज्ञानाशी माणसाचं सख्य असलंच पाहिजे; पण विज्ञानाच्या वादळात माणूस माणुसकीपासून दूर जाता कामा नये, असं खांडेकर मानत असत. नोव्हेंबर १९७१ मध्ये खांडेकरांचा कोकणातील शिरोडे या गावात नागरी सत्कार झाला होता. सत्काराला उत्तर देताना खांडेकर म्हणाले होते, ‘विज्ञानाच्या झंझावाताने अंत:करणातील माणुसकीचा दिवा विझू देऊ नका.

आपले सगळे शिक्षण, आपल्या सगळ्या संस्था, आपली सगळी प्रगती या सर्वाचा अर्थ एकच आहे की, आपण माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला माणूस व्हायचे आहे आणि त्यासाठी प्रसंगी मला दुसऱ्यासाठी त्रास सहन करावा लागला किंवा त्याग करावा लागला तरी माझी तयारी असेल, हे प्रत्येकाने आपल्या मनात बाणवायला हवे!’

खांडेकरांचे हे विचार कालबाह्य झाले आहेत, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे या विचारांचे स्मरण आवश्यक ठरते.

स्वप्ने झाली अशी साकार

शिवाजी विद्यापीठानं खांडेकरांना सन्मानानं ‘डी. लिट.’ प्रदान केली. त्यावेळी सन्मानाला उत्तर देताना खांडेकर म्हणाले होते, ‘‘माझी लहानपणी तीन स्वप्नं होती. मध्यरात्रीच्या वेळी गस्तवाल्याची ‘हुश्यारऽऽ’ ही आरोळी ऐकून मला गस्तवाला व्हावेसे वाटे, पण मी साहित्यातला गस्तवाला झालो. सांगलीतील डॉ. हरी कृष्ण देव यांच्या साधुतुल्य वर्तनामुळं डॉक्टर व्हायचं असं माझं दुसरं स्वप्न होतं, पण आज मी डॉक्टर झालो तो वाङ्मयाचा.

माझं तिसरं स्वप्न लेखक व्हायचं होतं. सुरुवातीला कल्पनेनं लिहायचो. पुढे त्याला भावनेची जोड मिळत गेली. तिला विचार येऊन मिळणं आवश्यक होतं, हे कळलं. लेखक केवळ जीवनाचा साक्षीदार होऊन चालणार नाही, तो जीवनाचा भाष्यकारही व्हायला हवा, तरच त्याचं लेखन श्रेष्ठ होणार,याची जाणीव झाली.’

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com