विद्यापीठातील मराठी शिक्षण बहरू द्या

डॉ. केशव सखाराम देशमुख
मंगळवार, 12 जुलै 2016

विद्यापीठ स्तरावरील मराठीचे विद्यार्थी कमी होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र बदलावयाचे असेल, तर ज्ञान, संधी, कौशल्य, विकास ही चतुःसूत्री प्रधान मानून मराठी शिक्षणाची सोय होण्याची गरज आहे.

विद्यापीठ स्तरावरील मराठीचे विद्यार्थी कमी होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र बदलावयाचे असेल, तर ज्ञान, संधी, कौशल्य, विकास ही चतुःसूत्री प्रधान मानून मराठी शिक्षणाची सोय होण्याची गरज आहे.

"मराठी‘ विषय स्वीकारून एमएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पटांवरून रोडावत चालल्याची तक्रार अगदीच खोटी नाही. याची कारणे नवदृष्टीच्या अभावात आहेत. सरळ गुणवत्तेचा पुरस्कार न करता विशिष्ट निवडणुकांद्वारे अभ्यासमंडळे स्थापन होणे; मते वळवून सामान्य कुवतींची माणसे तिथे जाणे; आणि त्यांनीच अभ्यासक्रम ठरविणे, या गोष्टीही मराठीचे विद्यार्थी कमी होण्यास कारणीभूत आहेत. हे असे चित्र सर्वत्र नसले तरी अभ्यासक्रमांच्या निश्‍चितीकरणावर आणि गुणवत्तेवर या निवडणुकांचा परिणाम स्वाभाविकच होतो. यापेक्षा अभ्यास मंडळांवर खरोखर नामवंत चिंतकच विद्यापीठाने घ्यावेत. तसेच बुद्धिमान निवृत्त प्राध्यापक आणि दोन ते चार ख्यातकीर्त लेखकही मराठीचा अभ्यासक्रम तयार करण्याच्या समितीत समाविष्ट करावेत. भाषा किंवा साहित्य या शाखा राजकारण करण्यासाठी नाहीत. अभ्यास मंडळ हे "मित्र मंडळ‘ असू नये. सुमार साहित्य अभ्यासक्रमांत येऊ नये कारण या अराजकामुळे पिढ्या बरबाद व्हायचा धोका वाढतो.
चांगला अभ्यासक्रम म्हटल्यावर त्यात जवळचा - दूरचा असे होता कामा नये. नेमका अभ्यासक्रमांत घुसलेला हा शिळेपणा मराठीकडे मुलांचा ओढा कमी करण्यास ठळक कारण ठरत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की चाकोरी न मोडणारी अभ्यासपत्रिकांची रचना. राज्यात आणि बाहेर नोकरींच्या खूप संधी उपलब्ध असताना त्यात "मराठी‘च्या विद्यार्थ्यांना मात्र नोकरी मिळत नाही. कारण मराठीच्या अभ्यासक्रमाचा बनविलेला मृत ढाचा. यात शिक्षक तर उत्तम हवाच. पण ओढ लावणारा आणि बळ देणारा सिलॅबसही हवाच ना!
तसेच यासाठी भाषा सफाईदारपणे वापरण्याचे कौशल्य मराठीच्या विद्यार्थ्यांना आम्ही बहाल करीत नाही. निवेदन ज्ञानाचा त्यांच्यात अभाव आढळतो. वक्तृत्त्वाकरिता लागणारा जबर विश्‍वास हवा; तोही मुलांमध्ये फार दिसत नाही. व्यथाप्रधान बाब अशी, की याबद्दल एमए मराठी शिक्षणात कोणतीही सोय अभ्यास मंडळांनी केलेली नाही. एखाददुसरेच विद्यापीठ अपवाद आहे. बाकीच्यांनी परंपरेचे शेपूट सोडलेले दिसत नाही. उपयोजित मराठीसारखे नगण्य पेपर सुरू केले आहेत. त्यात मुलाखती, निवेदनकौशल्य, पत्रप्रपंच, पारिभाषिक शब्दज्ञान वगैरे गोष्टी समाविष्ट करून त्या शिकवल्या जातात; आणि परीक्षेतून मांडल्या जातात. परंतु मुलाखती, निवेदन, अनुवाद अथवा प्रसारमाध्यमांसाठी अपेक्षित असे साक्षात (प्रात्यक्षिकरूपांतून) ज्ञान कुठे दिले जाते? वाङ्‌मय प्रकारांचा अभ्यास, रूढ भाषाभ्यास, वाङ्‌मयेतिहास किंवा एखाद्या लेखकांचा अभ्यास अशा जुन्याच ढाच्यातून विद्यापीठीय एमए मराठी अजून पुरती बाहेर पडलेली दिसत नाही. थोडीफार विद्यापीठे नवी दृष्टी आणि संधींचा समकाल पारखून अभ्यासक्रम बदल करतात. पण हा यत्न तोकडाच आहे. याशिवाय, एमए मराठीत एकापेक्षा जास्त भाषाज्ञान साध्य करण्याची संधी विद्यार्थ्यांना खुली ठेवली पाहिजे. अनुवादविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करून त्याबद्दलचे प्रत्यक्ष काम विद्यार्थ्यांकरवी केले पाहिजे. गणेश देवी, उमा कुलकर्णी, विष्णू खरे, भालचंद्र नेमाडे अशी महत्त्वाची राष्ट्रीय लेखक मंडळी विद्यापीठांत अधिकवेळ बोलण्याची संधी विद्यापीठांनी घ्यायलाच हवी. फक्त पुस्तकी राहून ज्ञानाचे आत्मसातीकरण वाढवायला हा काळ नाही. मोठे, श्रेष्ठ साहित्यिक यांची ऊठबैस विद्यापीठांत वाढली पाहिजे. काळाचा झपाटा लक्षात घेता रटाळ अभ्यासक्रमाला फाटा दिला पाहिजे, तरच विद्यापीठांतील मराठी शिक्षण बहरू शकेल! यासंदर्भात काही लक्षणीय घटक यानिमित्त सुचवता येतील; ज्यामुळे विद्यापीठीय स्नातक मराठी अभ्यासक्रमांची स्थिती उद्‌बोधक आणि संधीपूरक होईल. उदाहरणार्थ - 1) बोलींचा अभ्यासक्रम आणि त्यात सक्तीचे सर्वेक्षण करणे.
2) साहित्य अकादमीची मदत घेऊन भारतीय साहित्यविषयक कार्यात मराठीच्या विद्यार्थ्यांना उतरविणे व कार्य करून घेणे. 3) आकाशवाणी आणि एमए मराठी विद्यार्थी यांच्यात साक्षात कार्य करण्याची व्यवस्था निर्माण करून देणे; याप्रमाणेच महत्त्वाची वर्तमानपत्रे, दूरदर्शन आणि विद्यापीठीय एमए मराठी शिक्षण यांच्यात अभ्यासक्रमपूरक सौहार्द वाढविणे. 4) भाषणांचे, निवेदनांचे आवाज विकसित करणे.
5) गाणी आणि चित्रपट, कथा आणि चित्रपट, कादंबरी आणि चित्रपट, कविता आणि संगीत यांचा विचार हा प्रत्यक्ष एमए मराठीचा अभ्यासघटक बनविणे. 6) नोकऱ्या आणि नवसंधी यांना विचार करूनच अभ्यासक्रम बनविणे आणि त्यासंबंधीचे प्रत्यक्ष शिक्षण तज्ज्ञांमार्फत द्यायची सोय करणे.
वर्गात कवितासंग्रह - कथा - कादंबऱ्या शिकवून एखादेवेळी लेखक घडवायला साह्य होईल. पण त्यातून विश्‍वास व भाकरप्राप्तीची हमी मिळायची शक्‍यता फार दिसत नाही. म्हणून भाषाशिक्षण हवेच, साहित्य परंपरा ठाऊक असाव्यातच, वाङ्‌मयप्रकार ज्ञात असू द्या, लेखकांचा अभ्यास करण्यास हरकत नाहीच; पण एवढे म्हणजेच एमए मराठी, असे म्हणायची गोष्ट उपयोगाची नाही. जागतिकीकरणाने तर प्रदेश अभ्यासाला फेकून दिले आहे. खिशातल्या मोबाइल नावाच्या वस्तूने जागतिक ताकद विद्यापीठांशिवाय या नवपिढीला बहाल केली आहे. ज्ञानाची सगळी दारे सगळ्यांना आता सताड उघडी झाली आहेत. नोकऱ्या ऑनलाइन पदरामध्ये पडत आहेत. आंतरविद्याशाखांचा पुरस्कार करत एकावेळी अनेक भाषाशिक्षणाची सोय उपलब्ध होत आहे. याचा विचार आज एमए मराठीसाठी विद्यापीठांना करावा लागेल! एमए, एमफिल (मराठी) असणारा नागराज मंजुळे हा तरुण जगण्यातला अनुभव, आयुष्यातील संघर्ष आणि परिवर्तनाचा विचार घेऊन सिनेमांत क्रांतिकारक पाऊल ठेवतोय. आयुष्यालाच विद्यापीठ समजणाऱ्या कविहृदयाच्या नागराजने "सिनेमा‘ माध्यम निवडले; आणि लोकपरिवर्तनच हाती घेतले! विद्यार्थ्यांना स्पष्ट बोलण्याची व ते मांडण्याची अशी संधी आमच्या शिक्षणात किती आहे? पण तशी सुरवात मात्र एव्हाना आता झाली आहे. "प्रतिष्ठासंपन्न करिअर‘ बनविण्यासाठी ठराविक पेपर्समध्ये जखडलेले शिक्षण थांबविले जावे. ज्ञान, संधी, कौशल्य, विकास ही चतुःसूत्री प्रधान मानून विद्यापीठीय मराठी शिक्षणाची सोय व्हावी. मराठीचा ढाचा मोडावा; आणि आत्मविश्‍वास वर्धित करणारे आनंददायक शिक्षण मराठीचे बनावे! 

Web Title: University education let Marathi