पाश्‍चात्त्य शहरांमधील ढेकूणपीडा, लंडन पॅरिसमध्ये उद्रेक !

माद्रिद, बार्सेलोना आणि लंडन अशा इतर देशांतल्या शहरांमध्येही ढेकणांचा उद्रेक झाला आहे.
house bug
house bugesakal

माद्रिद, बार्सेलोना आणि लंडन अशा इतर देशांतल्या शहरांमध्येही ढेकणांचा जणू उद्रेक झाला आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२४च्या जुलैमध्ये होणाऱ्या उन्हाळी ऑलिंपिकचे यजमानपद पॅरिसकडे आहे. अवघ्या आठ-नऊ महिन्यांवर या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आलेल्या असताना अशा उपद्रवी कीटकांचा उद्रेक ही पॅरिससाठी विशेष डोकेदुखी ठरली आहे.

गेल्या महिनाभरापासून पॅरिस या जगातल्या एका श्रीमंत शहराला वेगळ्याच समस्येनं ग्रासलं आहे. निवासी वसाहतींखेरीज रेल्वे, मेट्रो आणि बसेससारखी सार्वजनिक वाहतुकीची साधने, विमानतळ, चित्रपटगृहे, हॉटेल आणि रुग्णालये अशा अनेक ठिकाणी सापडलेल्या ढेकणांचे व्हिडिओ आणि फोटो सामाजिक माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आणि पॅरिस आणि फ्रान्समधल्या इतरही शहरांमध्ये भीतीची लाट पसरली.

माद्रिद, बार्सेलोना आणि लंडन अशा इतर देशांतल्या शहरांमध्येही ढेकणांचा उद्रेक झाला आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ च्या जुलैमध्ये होणाऱ्या उन्हाळी ऑलिंपिकचे यजमानपद पॅरिसकडे आहे. अवघ्या आठ-नऊ महिन्यांवर या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आलेल्या असताना अशा उपद्रवी कीटकांचा उद्रेक ही पॅरिससाठी विशेष डोकेदुखी ठरली आहे.

जास्त लोकसंख्या असलेल्या उष्ण कटिबंधीय देशांत ढेकूण या कीटकाची संख्या आणि वाढीचा वेग जास्त असतो. पण गेल्या दोन दशकांमध्ये शिकागो, न्यूयॉर्क, पॅरिससह जगातल्या जवळपास प्रत्येक शहरात ढेकणांचा त्रास वाढतच गेला आहे. ‘अॅन्युअल रिव्हयू’ या अमेरिकेतल्या एका वैज्ञानिक नियतकालिकामध्ये अलिकडेच प्रकाशित झालेल्या एका अहवालात या कीटकाचा इतिहास आणि सद्यस्थितीचा तपशीलवार आलेख मांडला आहे.

या अहवालानुसार, बिनपंखांचा हा कीटक गेली हजारो वर्षं आपल्यासोबत आहे. प्राचीन इजिप्तमध्ये हा कीटक असल्याचे पुरावे सापडले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लंडनमध्ये ढेकणांची संख्या इतकी वाढली होती की चक्क ‘मद्य प्या आणि झोप मिळवा,’ असा सल्ला काही हॉटेल आपल्या पाहुण्यांना देत होती.

काही इमारतींमध्ये तर ढेकणांचा संसर्ग इतका झाला होता की, संपूर्ण इमारतींना आग लावूनच या संसर्गाचा बंदोबस्त करावा लागला होता. ढेकणांचा त्रास इतका प्राचीन आहे की, आपल्याकडच्या संस्कृत सुभाषितातही उमटलेला आहेच.

कमले कमला शेते हर: शेते हिमालये क्षीराब्धौ च हरि: शेते मन्ये मत्कुणशङ्कया ढेकणांच्या शंकेने तर लक्ष्मी कमळात, शिव हिमालयात आणि विष्णू क्षीरसागरात राहात नाहीत ना, अशी विनोदनिर्मिती इथे सुभाषितकारांनी केली आहे.

विसाव्या शतकाच्या मध्यात डी.डी.टी. या प्रभावी कीटकनाशकाचा वापर सुरू झाला आणि ही परिस्थिती बदलली. दुसऱ्या महायुद्धात हिवतापासारख्या रोगांचा प्रसार करणारे डास आणि उवांसारख्या कीटकांना मारण्यासाठी जसा डी.डी.टी.चा उपयोग झाला, तसा तो ढेकूण मारण्यासाठीही झाला. इतर काही नव्याने विकसित झालेली जंतुनाशके आणि डी.डी.टी. यांनी मिळून ढेकणांची संख्या निदान बऱ्याच श्रीमंत राष्ट्रांमध्ये तरी आटोक्यात आणली.

पुढची काही दशकं ढेकणांपासून इथल्या नागरिकांची बव्हंशी सुटका झाली. पुढे १९७२च्या सुमारास डी.डी.टी.चे माणूस आणि वन्यजीवांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे या कीटकनाशकावर बंदी आली, तरीही माणसांचं जगणं मुश्किल व्हावं, इतका ढेकणांचा सुळसुळाट निदान या देशांमध्ये तरी झाला नव्हता. मात्र एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला पुन्हा एकदा ढेकणांनी सगळं विश्व व्यापलं.

सन २००० ते २००६ या काळात ऑस्ट्रेलियामध्ये ढेकणांचा संसर्ग तब्बल ४,५०० टक्क्यांनी वाढला असल्याचं ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’च्या एप्रिल २०११मध्ये प्रकाशित झालेल्या अंकातल्या एका निबंधात म्हटलं आहे. ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ ही सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात संशोधन करणारी अमेरिकन संस्था आणि ‘एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी’ यांनी एक संयुक्त निवेदन जाहीर करून ढेकणांची संख्या बेसुमार वाढल्याचा इशारा दिला होता.

२०१७ ते २०२२ या काळात फ्रान्समधल्या दर दहा घरांपैकी किमान एका घराला ढेकणांचा वेढा पडला होताच. २०२३च्या जून ते ऑगस्ट या काळात कीटकनाशकांची फवारणी गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी वाढली असल्याचं जंतुनाशकांची फवारणी करणाऱ्या फ्रेंच कंपन्यांनी म्हटलं आहे. शिकागो, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया या शहरांची स्थितीही याहून वेगळी नाही.

फ्रान्समध्ये सध्या माध्यमांनी या विषयावरून निर्माण केलेला उन्माद, ढेकणांच्या संसर्गाचा प्रश्न आणखी मोठा करून राजकीय पक्षांची एकमेकांवर उडवली जाणारी राळ, ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धांवर या संसर्गामुळे सावट येईल का, अशी सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झालेली शंका, असं एकूण चित्र आहे.

मोठी उपद्रवशक्ती

‘‘हा संसर्ग थोपवण्यासाठी आम्ही सर्व आघाड्यांवर पावलं उचलतो आहोत,’’ यासारख्या खास राजकारण्यांच्या विधानांपासून ‘‘हे जग आता ढेकणांचं आहे आणि आपल्याला त्यांच्यासह जगायला शिकलं पाहिजे’’, यांसारख्या वेगवेगळ्या टिप्पण्या फ्रान्समध्ये सध्या ऐकू येताहेत. पण मुळात ढेकणांचा प्रश्न का वाढतो आहे, याचा विचार करून दीर्घकालीन उपाय राबवण्याची मानसिकता कुठेच दिसत नाही.

हा कीटक मलेरियाच्या डासासारखा कुठलाही आजार पसरवणारा नसला तरी त्याची उपद्रवशक्ती फारच मोठी आहे. त्याचा चावा, त्यामुळे मोडणारी झोप आणि साहजिकच दिवसाच्या कामांवर आणि कार्यक्षमतेवर होणारा प्रतिकूल परिणाम या गोष्टी दुर्लक्ष करण्याजोग्या नाहीत. अनेक कीटकनाशकांच्या फवारणीचा उपयोग आता ढेकणांच्या बाबतीत होईनासा झाला आहे, कारण ढेकणांनी स्वत:मध्ये तशी प्रतिकारशक्ती निर्माण केली आहे.

काही औषधांच्या धुराचा उपयोग संसर्ग कमी करण्यासाठी होतो, असं आढळलं असलं तरी ती इतकी महाग आहेत की गरीब वर्गाला ती परवडणारी नाहीत. आपत्तीला कारणीभूत वर्ग कोणताही असला तरी प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत हा वर्ग नेहमीच भरडला जातो, हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होतं आहे.

ढेकूण हा कीटक अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी, म्हणजे मुख्यतः शहरी वस्तीत वाढतो. त्यामुळे वाढत्या शहरीकरणाबरोबर हा संसर्ग वाढणार हे निश्चित. उबदार हवेत त्यांची वाढ जास्त होते. हवामानबदलांमुळे जगभरात बहुतेक ठिकाणी तापमानात झालेली वाढ आणि त्यामुळे थंड हवेच्या प्रदेशांतही वर्षभरात जास्त काळ राहणारा उन्हाळा ही ढेकणांचा संसर्ग वाढण्याची मोठी आणि महत्वाची कारणं आहेत.

शिवाय जागतिकीकरण, व्यापार-उद्योगात झालेली वाढ, जगभरात वाढलेलं पर्यटन, कोविडच्या महासाथीनंतर एकदम वाढलेला आंतरराष्ट्रीय प्रवास, विविध कारणांनी होणारे आणि अलीकडच्या काळात वाढलेले स्थलांतर, जुने फर्निचर विकत घेण्याची वाढलेली हौस यांसारख्या इतरही काही कारणांनी ढेकणांची व्याप्ती वाढली आहे.

सध्याची जागतिक वाटचाल आणि विकासाची दिशा बघता, यातल्या कुठल्याच कारणांवर एकमताने उपाय शोधला जाईल, असे चित्र नाही. पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या अनेक मोठ्या पर्यावरणीय समस्या जर दुर्लक्षिल्या जात असतील, तर ढेकणांचा संसर्ग ही अगदीच किरकोळ बाब आहे. त्यामुळे हा उद्रेक आपल्याला येऊन भिडत नाही, तोवर (तोवरच!) स्वतःला भाग्यवान समजायचं इतकंच!

(लेखिका पर्यावरणविषयक प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com