अग्रलेख : कलासक्‍त भाष्यकार

Girish Karnad
Girish Karnad

माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा प्रतिभावंतांची केवढी तरी मोठी यादी सांगता येईल. म्हणूनच की काय, सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार पटकावणारे सर्वाधिक प्रतिभावंत कलाकार इथूनच प्रकाशमान झाले. गिरीश कार्नाड हे अशातलेच नाव. अर्थात, कार्नाडांचा जन्म महाराष्ट्रातल्या माथेरानसारख्या गर्द वनराजीतल्या गावात झाला असला आणि शालेय शिक्षण पुण्यात झाले असले, तरी त्यांची पुढली कारकीर्द बंगळूर आणि धारवाडमध्येच बहरली. त्यांच्या प्रतिभेला कुंपण असे नव्हतेच. नाट्यलेखन, अभिनय, ललित लेखन, चिंतनशील लेखन, परखड विचारवंत, बेजोड चित्रपट-दिग्दर्शक अशा कितीतरी भूमिकांनिशी तब्बल अर्धशतक गाजवणारा हा प्रतिभावान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या देहावसानाने नेमक्‍या कुठल्या क्षेत्राचे नुकसान अधिक झाले, याची मोजदाद करणे कठीण.

प्रतिभावंतांच्या मांदियाळीतल्या एखाद्या अलौकिक कलावंताच्या प्रतिभेने स्तिमित होऊन नवोदितांचा ओघ आपापली वृद्धी साधत असतो. प्रेक्षक आणि वाचकांची वाढही अशा अढळपदी पोचलेल्या कलाकाराकडे पाहूनच साधता येते; किंबहुना तेच त्यांचे प्रेरणास्थान असते. गिरीश कार्नाड हे कलावंताच्या किमान तीन-चार पिढ्यांची ‘मंझिल’ बनून गेलेले व्यक्‍तिमत्त्व होते. विलक्षण प्रतिभा, ललितकलांची असामान्य जाण आणि कुशाग्र बुद्धिमत्ता, या त्रिगुणांचा संगम कार्नाडांच्या ठायी होता. एरवी गणितासारख्या रुक्ष विषयात गती असलेल्या कार्नाडांनी आपली बुद्धी पुढे ललितकलांसाठी खर्ची घालावी, हेच एक मोठे गणिती कोडे होते. प्रतिभेची भरारी असावी तर कार्नाडांसारखी. विद्वत्तेची उंची असावी, तर तीदेखील कार्नाडांसारखीच, अशी प्रगल्भतेची दुहेरी झळाळी त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाला होती. साठोत्तरी काळात भारतीय उपखंडामध्ये सर्वच कलाप्रांतांमध्ये उलथापालथ होत होती. फाळणीतल्या हजारो शोकांतिका पचवून कलाक्षेत्रे नव्याने मांडणी करत होती. त्याच काळात कार्नाडांचा उदय झाला. १९६१ मध्ये त्यांचे ‘ययाति’ हे नाटक लक्षवेधी ठरले. पाठोपाठ आलेल्या ‘तुघलक’ने तर प्रस्थापित कलाविष्कारांना मोठाच धक्‍का दिला. ‘तुघलक’ हे तर काळाची मिती ओलांडून पुढे आलेले नाटक मानायला हवे. त्यात, अर्वाचीन इतिहास आणि वर्तमानाचे धागे त्यांनी असे काही विणले होते, की ‘तुघलक’ने रसिकांना आणि विचारवंतांनाही भुरळ घातली. आजमितीस या नाटकाचे जगभरातील अनेक भाषांमध्ये प्रयोग झाले आहेत आणि होतही आहेत. त्यानंतर त्यांच्या ‘हयवदन’, ‘नागमंडल’, ‘अग्नि मत्तुमळे’, ‘ओदकलु बिंब’, ‘मा निषाद’ अशा अनेक नाट्यकृतींनी नाट्यक्षेत्राला नवी परिमाणे दिली. सत्तरीचे दशक सुरू होता होता कार्नाडांना चित्रपटकलेने आकर्षिले होते. ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटाची पटकथा लिहून त्यांनी सुरवात केली. नंतर लगेचच ‘वंशवृक्ष’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. कन्नड, तमीळ, तेलुगू, हिंदी आणि मराठी अशा पाच भाषांमध्ये त्यांचा कलासंचार चालत असे. कार्नाडांना मराठी नाटके आणि साहित्य, याबद्दल विशेष आस्था होती. ‘उंबरठा’ या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेकांच्या लक्षात राहील. समांतर चित्रपट प्रवाहात ज्याला ‘आर्ट फिल्म’ असेही संबोधले जाते; त्यात कार्नाडांचा अभिनय लक्षवेधी ठरला. वानगीदाखल त्यांच्या ‘गोधुली’ या नितांतसुंदर चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. विचक्षक बुद्धिमत्ता आणि प्रतिभेचे देणे लाभूनही कार्नाडांनी कधी मुख्य प्रवाहातील चित्रपटांना नाके मुरडली नाहीत. ‘अपने पराये’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘शिवाय’ अशा तद्दन मसाला चित्रपटांमधूनही त्यांनी चोख भूमिका केल्या. अर्थात, ती काही त्यांची ओळख मानता येणार नाही.

पौराणिक मिथके, इतिहास आणि वर्तमानाचे ताणेबाणे यांचा थक्‍क करणारा मिलाफ साधत प्रचलित व्यवस्थेवर परखड भाष्य करणारे ते एक कलासक्‍त भाष्यकार होते. त्यांच्या कलाकृतींमधून डोकावणारे वर्तमानाचे भान बऱ्याच वेळा वादग्रस्तही ठरले. परंतु, कार्नाडांनी असल्या वादांची फार पर्वा केली नाही. आपला आविष्कार आणि मते, यावर त्यांचा ठाम विश्‍वास असे. लेखक किंवा कलावंताला ‘पाठकणा’ नावाचा अवयवही असायलाच हवा, अशी त्यांची आग्रही भूमिका आयुष्यभर राहिली. प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, संगीत नाटक अकादमी सन्मान आदी सन्मानही मिळाले. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’चे ते सत्तरीच्या काळात संचालक होते. संगीत नाटक अकादमीचेही ते अध्यक्ष राहिले. पण, त्यांची प्रतिभा या सरकारी पदांमध्ये आणि सन्मानांमध्ये कधीही अडकून राहिली नाही. नभांगणात अनेक ग्रहगोल आणि तारका असतात. खगोलाच्या अभ्यासाच्या सोयीसाठी त्यांची प्रतवारीही ठरवली जाते. नक्षत्रलोकाच्या भाषेत सांगायचे झाले तर गिरीश कार्नाड हा एक उच्च प्रतीचा स्वयंप्रकाशित तारा होता व आहे. त्यांच्या जाण्यामुळे हळहळ नक्‍कीच वाटेल. पण, त्यांचे अढळपद मात्र कायम राहील. अढळ ताऱ्याचे काम दिशा दिग्दर्शनाचे असते. गिरीश कार्नाड यांनी आयुष्यभर तेच केले. पुढेही तेच चालू राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com