अयोध्येतील शीलान्यासाचा अन्वयार्थ

विजय नाईक
Friday, 7 August 2020

दूरदर्शनने प्रसारीत केलेला त्याचा आँखो देखा हाल देश विदेशातील हिंदुंनी डोळे भरून पाहिला. शीलान्यास कार्यक्रमासाठी देशातील 135 नद्यांचे दोन हजार ठिकाणाहून आणलेले पाणी, 1500 ठिकाणाहून आणलेली पवित्र माती, हा एक उच्चांक समजावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्याचा शीलान्यास झाला. दूरदर्शनने प्रसारीत केलेला त्याचा आँखो देखा हाल देश विदेशातील हिंदुंनी डोळे भरून पाहिला. पाच शतकानंतर व 6 डिसेंबर 1992 रोजी भाजप, शिवसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कट्टर हिदूत्ववाद्यांनी बाबरी मशिद पाडली. सर्वोच्च न्यायालयात त्याविषयी आजही खटला प्रलंबित आहे. मंदिर निर्माणासाठी सुमारे तीस वर्ष चाललेल्या मोहिमा व न्यायालयातील दावे प्रतिदावे यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या निकालानंतर खऱ्या अर्थाने वादाला तिलांजली मिळाली. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी वेगळी जमीन देण्यात आली. झफरयाब जिलानींसह काही मुस्लिम नेत्यांना ते मान्य नसले, तरी हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाही. 

याचे आणखी एक कारण म्हणजे, मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात असलेले  भाजप-रालोआचे भक्कम हिंदुत्ववादी सरकार. दरम्यानच्या काळात चार  पी.व्ही.नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी,सरकारे केंद्रात येऊन गेली. तथापि कोणीही हा वाद संपुष्टात आणू शकले नाही. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार होते तेव्हा त्यावेळचे विश्वहिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, आचार्य गिरिराज किशोर, प्रवीण तोगडिया यांनी मंदिर निर्मितीच्या संदर्भात जोरदार मोहीम चालविली. रास्वसंघाचे त्यावेळचे संरसंघचालक सुदर्शन व ज्येष्ठे नेते दत्तोपंत ठेंगडी यांनी वाजपेयी व लालकृष्ण अडवानी यांच्यावर मंदिर निर्माणासाठी कमालीचा दबाव आणला होता. परंतु, त्यांच्या कारकीर्दीतही खटला न्यायपालिकेत प्रलंबित राहिला. नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 2014 ते 2019 या पाच वर्षात जे जमले नाही, ते आता 2024 पूर्वी म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी साध्य होणार आहे. गेल्या निवडणुकीपूर्वी खुद्द भगवान शंकराच्या अमरानाथ येथील लिंगानजिक गुहेत बसून ध्यान करणारे पंतप्रधान मोदी मतदाराला दिसले, आणि मतपेटीत भाजपला भरघोस मत मिळाले. 2024 पूर्वी अयोध्येतील मंदिर बांधून पूर्ण होईल. त्या वेळी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मोदी प्रभुरामचंद्राचे आशीर्वाद घेतील, यात शंका नाही. शिवाय बांधून झालेल्या भव्य मंदिराचे उद्घाटनही त्यांच्या शुभहस्ते होणार, यातही शंका उरलेली नाही. मतदानाची लाट पुन्हा भाजपच्या दिशेने झुकेल. याला राजकीय समीकरण म्हणा, की गणित, पण त्यात बरेच तथ्य आहे, हे नाकारून चालणार नाही.

आजच्या समारंभात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आज इतिहास रचा नही जा रहा है, लेकिन इतिहास खुद को दोहरा रहा है. शरयू नदीच्या तीरावर एक स्वर्णिम अध्याय आम्ही रचित आहोत. ‘सियावर रामचंद्र की जय’ हा उद्घोष साऱ्या विश्वात एकू येत आहे. सारा भारत राममय झाला आहे. प्रत्येक मन दीपमय झाले आहे. पूर्ण भारत भावूक झालाय. शतकांची प्रतीक्षा समाप्त झाली आहे. रामजन्म भूमी आज मुक्त झाली आहे. त्यांचे भाषण प्रभावी होते. तसेच रामभक्तांच्या मनाला शिवणारे. त्यातही मोदी यांनी करोनाच्या काळात पाळावयाची मर्यादा याचा उल्लेख केला. ते स्वतः मुखपट्टी बांधून सर्वत्र वावरले. 
तसेच, हनुमान गढी असो, की राम लल्लाचे मंदिर, त्यांनी प्रत्येक वेळी हात धुवून नंतर प्रवेश केला. प्रत्येक दानपत्रात दान केले व मुखपट्टी असल्याने पुजाऱ्यांनी आचमन करा असे सांगूनही हातातील पाणी त्यांनी पुढे ठेवलेल्या ताटलीत सोडले. राम हा मर्यादा पुरुषोत्तम होता. म्हणूनच करोनाच्या काळात लोकांनी आवश्यक त्या मर्यादा पाळल्या पाहिजे, याकडे त्यांचा संकेत होता.   

शीलान्यास कार्यक्रमासाठी देशातील 135 नद्यांचे दोन हजार ठिकाणाहून आणलेले पाणी, 1500 ठिकाणाहून आणलेली पवित्र माती, हा एक उच्चांक समजावा लागेल. दोन वर्षांपूर्वी मी अयोध्येला गेलो होतो. तेव्हा रामलल्ला तुरूंगात असल्याचा भास होत होता. त्याच्या भोवती सुमारे अडीच हजार सशस्त्र पोलिसांचा वेढा तर होताच. परंतु, त्याच्याकडे जाण्याचा साडे तीन किलोमीटरचा मार्ग दोन्ही बाजूंना उंचउंच गजांनी वेढलेला होता. त्यातून एका वेळी एकच माणूस चालू शकेल, एवढीच अरूंद जागा होती. परंतु, अयोध्येच्या विकासाच्या नव्या योजनेकडे पाहता, केंद्र व राज्य सरकारला संबंधित मंदिर हे धार्मिक पर्यटनाचे जागतिक आकर्षण केंद्र बनवायचे आहे, असे दिसते. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अयोध्येला अत्याधुनिक प्रशस्त विमानतळ व रेल्वे स्थानक उभारण्यात येणार असून, रस्ता रुंदीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. 

मोदी यांनी आपल्या भाषणात केलेली महत्वाची घोषणा म्हणजे, देशात आता राम सर्किट तयार करण्यात येणार आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षांच्या वनवासात जेथे जेथे (दंडकारण्य, पंचवटी आदी) गेले, त्यांना पर्यटन स्थळांचा दर्जा देऊऩ त्यांचा विकास केला जाईल. सध्या आपल्या देशात बुद्ध सर्किट आहे. ज्या ठिकाणी गौतम बुद्ध गेले, तपश्चर्या केली, ती स्थळे या सर्किटमध्ये आहेत. तथापि, त्यांचा म्हणावा तसा विकास न झाल्याने जपान, तैवान, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड या बहुतांशी बौद्धधर्मीर्य देशातील  पर्यटक मोठ्या संख्येने येत नाहीत. राम सर्किट खऱ्या अर्थाने पर्यटन सर्किट करावयाचे असेल, तर त्या दृष्टीने आजपासूनच सरकाराला तयारीला लागावे लागेल. 

करोना येत्या काही महिन्यात किंवा वर्षांत कोणते स्वरूप घेणार, याचा कुणीही अंदाज बांधू शकणार नाही. करोनाने जागतिक पर्यटन, हवाई व रेल्वे प्रवास, हाटेल उद्योग, खानपान सारे काही ठप्प केले आहे. ते पूर्ववत व्हावे लागेल.

 येत्या काही महिन्यात येणारे सारे धार्मिक उत्सवही अत्यंत सीमीत प्रमाणात होणार आहेत, अथवा जवळ जवळ रद्द करण्यात आले आहेत. अलीकडे झालेल्या मुस्लिमांच्या इद या सणात मशिदीत नमाझ पढायाला येणाऱ्यांची गर्दीही अत्यंत तुरळक होती. गौवाहाटीतील कामाख्या मंदिर असो, कोल्हापूरची अंबाबाई, मुंबईचा सिद्धी विनायक, महाराष्ट्रातील गणेशोत्सव, तिरूपतीचा बालाजी, शिंगणापूरचे शनिमंदीर, गोव्यातील श्री मंगेश, शांतादुर्ग, दक्षिणेतील गुरूवायूर, पुरीचा जगन्नाथ, जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचे विठोबा-रखुमाई, माहूरची रेणुका, कोलकत्याची दुर्गात्सव गुजराथेतील सोमनाथची यात्रा, श्रवणबेळगोळ्यातील जैनांचा बाहुबली, पालिथाण्यातील महावीर, शबरीमलातील अय्यप्पन हे सारे काही करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. 

देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण आपल्याकडे आहे, त्याच धाटणीत बोलायचे झाले, तर करोना मारी, त्याला कोण तारी, असे म्हणावे लागेल. देव भक्तांच्या प्रतीक्षेत आहेत, असे आजवर झाले नव्हते. प्रत्येक देवस्थान, मग ते गिरिशिखरावर असो की, डोंगरदऱ्यात असो, भाविकांची गर्दी तिथं असणारच, अशी स्थिती होती. कुंभ मेळ्यात तर चेंगरून अनेक लोकांचे बळी गेले आहेत. यंदाच्या मोसमात लक्षावधी शिवभक्तांची उत्तरेतील कावड यात्रा बंद झाली. हाजच्या यात्रेसाठी सौदी अरेबियात मक्का मदीनाला जाणाऱ्यांची संख्या सीमीत होती. ख्रिश्चनांचे एकमेव धर्मस्थळ इटलीतील व्हॅटिकनयेथील गर्दी ओसरली आहे. जणूकाही सर्व ठिकाणी परमेश्वराचाच संदेश असावा, की स्वतःला वाचवायचे असेल, तर माझ्या मंदिरात गर्दी करू नका. 

अयोध्येतील मंदिर 2024पूर्वी बांधून व्हावयाचे आहे. त्याला व्हॅटिकन, अथवा मक्का मदीना सारखे सर्व सोयींनी उपयुक्त केल्यास त्यास हिदूंच्या जागतिक देवस्थानाचे स्वरूप येईल. येत्या चार वर्षात करोनाचा प्रभाव कमी होईल, अशी आशा करावयास हरकत नाही. 2021 अखेर करोनाची लस, इंजेक्शन बाजारात उपलब्ध झाली, की करोनाचे भय तितके राहाणार नाही. तोवर देवांना थोडी विश्रांती घेऊ द्यावयास हरकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran journalist vijay naik writes analysis about ram mandir bhumi pujan