कोरोनामुळे हरवली माणुसकी

कोरोनामुळे हरवली माणुसकी

कोरोनामुळे आपण माणुसकीला विसरतोय काय, असं विषण्ण करणारं चित्र देशात अनेक ठिकाणी दिसतय. ज्याला कोरोनाची बाधा झाली, त्याला वाळीत टाकण्याचे, तो बरा झाला, तरी त्याच्यापासून दूर राहण्याचे, त्याच्याकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी दुर्लक्ष करण्याचे, कोरोना झालाच नाही, अशा रुग्णांना सरकारी व खाजगी रूग्णालयात अत्यावश्‍यक औषधोपचारासाठी प्रवेश न देण्याचे प्रकार दिवसेंदिवस इतके वाढत आहेत, की गेल्या दोन महिन्यात माणूस अधिकाधिक निर्दय होत असल्याचे प्रत्ययास येत आहे.

कोरोनाच्या देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

गेल्या आठवड्यातील काही घटना पहा. 29 एप्रिलच्या "द टाईम्स ऑफ इंडिया"च्या अंकात त्यांचा तपशील आहे. आग्र्यातील 12 वर्षाचा पाचव्या यत्तेतील मुलगा निहाल सिंग याला पोटाचा त्रास होत होता. त्याला त्याचे वडील लखन सिंग यांनी 24 एप्रिलला एका पाठोपाठ सहा खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले असता या रुग्णालयांनी प्रवेश नाकारला. बातमीनुसार, निहालला जानेवारीपासून पोटाचा त्रास होत होता. औषधोपचारही चालू होते. परंतु, 24 एप्रिल रोजी पोटात अतिशय दुखू लागल्याने लखन सिंग यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. त्याच्या दुखण्यावर इलाज करण्याऐवजी त्याला कोरोना झाला आहे, की नाही, याची शहानिशा न करताच केवळ कोरोनाचा संशय आल्याने त्याला प्रवेश नाकारण्यात आला. अखेर लखन सिंग यांनी त्याला सरकारी एस.एन.मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तेथेही डॉक्‍टरांनी प्रथम त्याला कोरोनाच्या रुग्णांसाठी असलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यास सांगितले. एव्हाना, लखन सिंग पुरतेच हताश झाले होते. त्यांनी डॉक्‍टरांना समजावण्याचा प्रयत्न केला.त्याचा काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी लखन सिंग यांनी (सहाव्या) खाजगी रूग्णालयात नेले. तेथेही डॉक्‍टरांनी मज्जाव केला. लखन सिंग यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी निहालला पुन्हा एस.एन. मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. तोवर वेळ निघून गेली होती. कॉलेजच्या मार्गावर निहालचा दुःखद मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. लखन सिंग यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार नोंदविली. अद्याप काही कारवाई करण्यात आलेली नाही.

दुसरी घटना पठाणकोटची. उपिंदर जोशी यांनी स्वतःच्या 7 वर्षाच्या मुलाला (कृष्णा) श्‍वसनाचा त्रास असल्याने चार खाजगी व दोन सरकारी रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवल्या. या सर्व रूग्णालयांनी त्याच्यावर औषधोपचार करण्यास नकार दिला. त्याचे डॉक्‍टर धीरज सिंग यांनी सांगितले, की कृष्णावर औषधोपचार करूनही लाभ होईना, म्हणून त्याला रू ग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. सातव्या रुग्णालयात नेत असताना कृष्णाचा मृत्यू झाला. या मुलांच्या नाहक मृत्यूंची भरपाई कोण करणार? त्यांच्या वडिलांना एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात जाताना करावी लागलेली धावपळ, क्षणाक्षणाला आलेली घोर निराशा, जीवन मरणाशी लढा देणाऱ्या मुलांबाबत वाटणारी काळजी, तो जगतो की नाही, याची पडलेली धास्ती, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यांना व त्यांच्या कुटुंबाना झालेल्या दुःखाला पारावार नाही. मुंबईत 52 वर्षाच्या खालीद अली शेख याचा असाच शनिवारी दुर्देवी मृत्यू झाला. त्याला श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. प्राणवायूची गरज होती. पण, पाचही रूग्णालयांनी त्याला दाखल करून घेतले नाही. बीएमसीच्या 1916 या हेल्पलाईना फोन करूनही काही उत्तर मिळाले नाही. अखेर, कसाबसा सेन्ट जॉर्ज रूग्णालयात प्रवेश मिळाला. पण, चार तासातच त्याचा मृत्यू झाला. शेख याला कोरोनाची लागण झाली असावी, या भयाने रूग्णलयांनी प्रवेश नाकारला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आग्रा येथे साठ वर्षांची महिला व पंचावन्न वर्षांचा कापड विक्रेता अत्यवस्थ झाल्याने त्यांना एस.एन.मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यांनाही ""डॉक्‍टरांनी कोविद-19 ची तपासणी करून घ्या,"" असे सांगून "आयसोलेशन वा ॅर्ड"मध्ये हलविले. परंतु, त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मुंबईत डायलॅसिसच्या रूग्णाला,"" प्रथम कोविद-19 ची तपासणी करून घ्या"", असे सांगण्यात आले, त्यामुळे डायलॅसिसला सात तास उशीर झाला.

कोरोना नव्हता, तेव्हाही मुलींची छेडखानी चालू असेल, तर ते पाहूनही दुर्लक्ष करणारे अनेक. अपघात झालेल्याला मदतीचा हात देऊन रूग्णालयात नेणारे विरळाच होते. सामाजिक संवेदना अपवादाने दिसत असे. पण, कोरोनाची बाधा झालेली व्यक्ती अथवा तिला बाधा झाली आहे, अशी यत्किंचितही शंका आल्यास ती व्यक्ती जणू अस्पृश्‍य आहे, असे आपण वागू लागलोय. त्यात रूग्णालयांचा आकडा वाढतोय. कुंटुंबात अशा व्यक्तीला काय साह्य मिळत आहे, त्यांच्याकडे व विशेषतः वृद्धांना काय वागणूक दिली जाते, याच्या अनेक दर्दभऱ्या घटना रोज घडत आहेत. काही ठिकाणी, तर मृतदेहाकडे पाहाण्यासही लोक घाबरत आहेत.

राजस्तानात अस्थमा झालेल्या वडिलाना रूग्णावहिका न मिळाल्याने हातगाडीवर घेऊन जाणाऱ्या मुलाच्याही नशिबी निराशा आली. त्यांच्यापवर उपचार होण्यास दिरंगाई झाल्याने 27 एप्रिल रोजी कोटा येथे त्यांचे (वडिलाचे) निधन झाले. उत्तर, प्रदेश, तामिळ नाडू, मध्य प्रदेश आदी राज्यातून क ोरोनाची बाधा नसलेल्या परंतु, अन्य व्याधी असलेल्या रूग्णांवर काय बेतले, याची आपण कल्पना करू शकत नाही. डॉक्‍टरांनी त्यांना का परतून लावले, याला कोणतेही समाधानकारक उत्तर नाही. उलट, अधुनमधून कोरोनाचे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्‍टर्स व नर्सेसना होणारी व झालेली मारहाण, याबाबत देशाने पणत्या लावून सहानुभूती दर्शविली होती. काल नौदल व वायूदलाने सराव करून त्यांना सलामी दिली. त्यांची देश सेवाही हुतात्मासम आहे, असे विचार व्यक्त करण्यात आले. पण, वर उल्लेखिलेल्या घटना रूग्णालयाबाबत दुसरी बाजू दर्शवितात. या मानसिकतेमागे दिसते, ते कोरोनाविषयी निर्माण झालेलं प्रचंड भय आहे.

भयगंडाचा सर्वाधिक फटका बसलाय तो शहरातून गावांकडे परतणाऱ्या असंघंटित कामगारांना. त्यातील अनेकांची वाताहात झाली. ना पुरेसे अन्न, ना निवारा, ना कपडा की सुरक्षा. भारत सरकारने परदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना परत आणण्यासाठी खास विमानांची व्यवस्था केली. त्यांच्या कोरोना विषयी तपासण्या केल्या,त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल्स, क्रीडा संकुले वापरली. परंतु, रोजंदारीवर पोट असणाऱ्या लाखो लोकांना घरी नेण्याची व्यवस्था करण्यात इतकी दिरंगाई केली, की त्यातील अनेकांनी घराकडे जाताना हजारो मैल चालून जीव टाकले. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी एका लेखात दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे,की 2011 च्या शिरगणतीनुसार, 2 कोटी स्थलांतरित असंघटित कामगार हे फक्त बिहार व उत्तर प्रदेशातून येतात, त्यापैकी 1 कोटी कामगार केवळ दिल्ली व मुंबई या दोन शहरात कामासाठी जातात. त्यांना स्वतःच्या घरी जाण्यासाठी निदर्शने, आंदोलने करावी लागतात, यावरून, लॉकडाऊनच्या काळात त्यांचे काय होईल, याचा ना केंद्राने ना राज्यांनी साधा विचारही केलेला दिसला नाही.

चार दिवसांपासून राजधानी दिल्लीचा धसका घेतलाय तो उत्तर प्रदेश, हरियाना या दोन राज्यांनी. त्यांच्या सीमा दिल्लीला लागून आहेत. दिल्लीत काम व नोकऱ्यांसाठी हजारो लोक रोज ह रियानातील फरिदाबाद, गुडगाव व उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून दिल्लीत ये जा करतात. दोन्ही राज्यांनी आपल्या सीमा दोन दिवसांपूर्वी बंद केल्याने सीमेवर कमालीचा गोंधळ व तणाव निर्माण झालाय. कुंटुंबे विभागली गेली. ""सीमा बंद असल्याने लोकांनी दिल्लीत हवी तेथे राहाण्याची व्यवस्था करावी,"" असे दोन्ही राज्यांनी सांगितले. कारण काय, तर दिल्लीतून येणारे लोक हरियाना व उत्तरप्रदेशात कोरोना आणीत आहेत. दिल्लीत आजवर 4122 जणांना बाधा झाली असून, मृतांची संख्या 64, हरियानात 360 जणांना बाधा, तर 4 मृत्यू व उत्तर प्रदेशात 2487 जणांना बाधा व 43 मृत्यू झाले आहेत. 4 मे पासून पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. परिस्थिती सुधारेल,अशी फारशी आशा नाही.

गेल्या आठवड्यात मी दिल्लीचा फेरफटका मारण्यासाठी प्रमुख बाजारपेठ कॅनॉट प्लेस, जनपथ, संसद भवनाचा परिसर, रफी मार्ग, इंडिया इंटर नॅशनल सेन्टर (लोधी रोड), हॅबिटॅट सेन्टर, बारापुल्ला मार्ग असा तीस पस्तीस कि.मी चा फेरफटका मारला. तेव्हा राजधानी "डेड सिटी" असल्याचा भास झाला. रस्त्यांवर श्‍वानांशिवाय कुणीही दिसत नव्हते. कॅनॉट प्लेसच्या एका चौकात दृकश्‍याव्य वाहिनीचे एक पत्रकार व दोन कॅमेरामेन दिसले. बारापु ल्लाच्या पुलाखाली ग्रामीण भागातील काही कुटुंबे उघड्यावर स्वयंपाक करताना, त्यांची मुले रस्त्यावर धावपळ करताना दिसली. रस्त्यावर दोन चार वाहने वगळता, काही नव्हते. त्यामागे कोरोनाचा भयगंड व लॉकडाऊन आहे. लोकांवर त्याचे काय काय मानसिक परिणाम होत असावे? अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका लेखात मनोशास्त्रज्ञ डॉ संजय चुघ यांनी म्हटले आहे, की ओसीडी ( ऑबसेसिव्ह कम्पलिसीव डिसऑर्डर) च्या केसेसचे प्रमाण वाढत आहेत. एखादी व्यक्ती आधी दिवसातून 20 वेळा हात धूत (पाणी व साबणाने) असेल, तर आता ती तब्बल 50 ते 100 वेळा हात धूत आहे! अगदी टोकाचे म्हणजे ओसीडी असलेल्या व्यक्ती वॉश बेसीन पासून दूर जाण्यासही नकार देत आहेत! आणखी काय क ाय घडत असेल, हे सांगणे कठीण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "स्वच्छ भारत" मोहिमेच्या अंतर्गत देशात शौचालये बांधण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी कोट्यावधी रूपयांचे साह्य देण्यात आले. ती मोहीम बऱ्याच अंशी सफल झाली. पण, त्या काळात घरी टॉयलेट नसेल, तर लग्न न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अमिताभ बच्चन पासून विद्या बालनपर्यंत अभिनेते जाहिरातीतून संदेश देत होते. येथून पुढे ज्याच्या घरात ""बेसीन, पाणी व साबण नसेल, त्याच्याशी विवाह करू नका,"" असाही संदेश दिला जाईल. कोरोनाने जीवनात कोणकोणते बदल होतील, हे कालमानानुसार कळेल.

कोरोनाबरोबर राहण्याची तयारी व संवय आपल्याला करावी लागणार आहे.. कारण, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तो वर्षानुवर्ष येत राहाणार. त्यावरील लस (व्हॅक्‍सीन) तयार होत नाही, तोवर धोका कायम राहील. परंतु, वरील चिंताजनक घटनांकडे पाहता माणुसकीला सोडचिठ्ठी न देणे हाच खरा मानवधर्म ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com