Vice President of India venkaiah naidu
Vice President of India venkaiah naidu

आता लढाई सामाजिक वैगुण्यांशी

महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ आंदोलनातून सामान्य भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध एकत्र केले. आजच्या बदलत्या परिस्थितीत जातीयता, विषमता, महिला अत्याचार, भ्रष्टाचार आदी सामाजिक अपप्रवृत्तींना ‘चले जाव’ म्हणायला हवे.

भा रतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्यदिनाबरोबरच क्रांतिदिनालाही वेगळे स्थान आहे. खरे तर, इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या आणि घटनांची मालिका नसते. त्याचप्रमाणे, आपल्या भूतकाळाकडे पाहण्याचा तो फक्त आरसाही नाही. भूतकाळापासून धडा घेत नव्याने सुरवात करण्यासाठी इतिहास एखाद्या द्वीपगृहाप्रमाणेच मार्ग दाखवितो. आपण सर्वांनीच इतिहासातील पानांपासूनची अशी प्रेरणा अत्यावश्‍यक ठरते. एकसंध वर्तमानकाळ आणि उज्ज्वल, सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येकानेच अशी ऐतिहासिक दृष्टी जोपासायला हवी.

कुठल्याही देशाच्या इतिहासात एखादे तरी निर्णायक वळण येतेच. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्येही ‘छोडो भारत’ आंदोलन ही क्रांतिकारक घटना आहे, हे नि:संशय. या आंदोलनाने भारताच्या स्वातंत्र्याची  चक्रे तर गतीने फिरवलीच, शिवाय संपूर्ण देशाला एकत्र आणले. युद्धांमुळे अवघे जगच एकमेकांपासून तुटण्याचा हा काळ होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची युद्धजन्य वातावरणातही शांततादूत बनून अहिंसेच्या तत्त्वावर अविचल श्रद्धा  होती. त्यातूनच, त्यांनी मुंबईतील गोवालिया टॅंक मैदानावरून ९ ऑगस्ट १९४२ या दिवशी देशवासीयांना ‘करो या मरो’ असे आवाहन केले.  या ऐतिहासिक घटनेमुळेच या मैदानाचे ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ असे नामकरण झाले. ब्रिटिशांविरुद्ध सामूहिक अहिंसक आंदोलन छेडण्याचे हे आवाहन देशभरात एखाद्या विजेप्रमाणे सळसळत गेले. सर्वच सामाजिक, प्रादेशिक स्तरातील नागरिकांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. परकी सत्तेविरुद्ध सर्वसामान्य भारतीयांनी एकमताने आवाज उठविला, तो ‘छोडो भारत’या आवाहनामुळेच. या आवाहनाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध अभूतपूर्व राष्ट्रजागृती केली.

ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह इतर नेते, स्वातंत्र्यसैनिकांनाही अटक केली. ब्रिटिशांनी  ‘छोडो भारत’ आंदोलन निर्दयपणे चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आंदोलनाने ब्रिटिशांची भारत सोडण्याची प्रक्रिया वेगवानच केली. आपल्या ८ ऑगस्ट १९४२ च्या संस्मरणीय भाषणात महात्मा गांधी म्हणाले होते, की ‘जगाच्या इतिहासात कुठल्याही देशात स्वातंत्र्यासाठी ‘छोडो भारत’ इतके अस्सल लोकशाहीवादी आंदोलन झाले नसेल. मी तुरुंगात असताना कार्लाइलचे ‘फ्रेंच रिव्होल्यूशन’ वाचले. पंडित नेहरूंनीही मला रशियन क्रांतीबद्दल माहिती दिली. हे हिंसेच्या जोरावरचे संघर्ष लोकशाही मूल्ये ओळखू शकले नाहीत, अशी माझी धारणा आहे. माझ्या कल्पनेतील लोकशाही अहिंसेच्या पायावर उभारलेली आहे. या लोकशाहीत सर्वांना समान स्वातंत्र्य असेल. प्रत्येक जण स्वत:चा मालक असेल. अशा लोकशाहीसाठी संघर्ष करण्याचे आवाहन मी आज तुम्हाला करतोय. तुम्हाला लोकशाहीचे हे मर्म ओळखल्यावर हिंदू आणि मुस्लिमांमधील भेदांचे विस्मरण होईल. केवळ भारतीय म्हणून स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी व्हाल.’ अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी स्वातंत्र्यहोमात आयुष्य समर्पित केले, ते स्वतंत्र, समृद्ध, समर्थ भारताचे स्वप्न पाहतच. आजच्या काळात त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अविरत संघर्ष करणे, ही आपली जबाबदारी आहे. गेल्या सात दशकांत आपण या दिशेने थोडीफार पावले टाकली. मात्र, देशभरातील प्रगतीचे चित्र असमान असून, सर्व राज्यांमध्ये विकासाची मोठी दरी दिसते. येत्या १५ ते २० वर्षांमध्ये भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर, आपल्याला दारिद्य्र, निरक्षरता, शहरी-ग्रामीण भागातील वाढती दरी, लिंगभाव विषमता, संकटातील कृषिक्षेत्र आणि समृद्धीच्या निवडक बेटांच्या माध्यमातून दिसणारे देशाच्या एकतर्फी प्रगतीचे चित्र अजिबात परवडणारे नाही.  त्यामुळेच, आपण आपला सार्वजनिक आणि सामाजिक दृष्टिकोन बदलायला हवा. त्यातूनच, आपला देश एक नवीन उंची गाठेल. धर्म, जात, प्रदेशापेक्षा देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या नवभारताच्या निर्मितीसाठी दृष्टिकोनातील हा बदलच मदत करेल.

गोरगरीब, शेतकरी, महिला, ग्रामीण कारागीर, युवक आदींच्या सक्षमीकरणाशिवाय आपल्या प्रगतीची चाके वेगाने कशी फिरू शकतील? प्रत्येक समाजघटकाला आर्थिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त करण्याची शिक्षण हीच खरी गुरुकिल्ली आहे. लाखो मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत. महिलांमधील मोठा वर्ग आजही निरक्षरच आहे. विविध क्षेत्रे सर्वसामान्यांसाठी खुली झाली पाहिजेत. सर्वच क्षेत्रांमध्ये नीतिमूल्यांचा होणारा ऱ्हासही रोखायला हवा. खरे तर शिक्षणानेच व्यक्तीमध्ये सामाजिक जाणिवेची मूल्ये रुजवून सहजीवनाची क्षमताही प्रदान करायला हवी. केंद्र सरकारने समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांच्या सशक्तीकरणासाठी  विविध योजनांची सुरवात केली आहे.  स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांनी प्रत्येक भारतीयाच्या सर्वसमावेशक विकासाचे कल्पनाचित्र रंगविले होते. हे चित्र प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आज आपण प्रयत्नशील होऊयात. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील व्यापक जागृतीची खरी गरज आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आपण भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा निश्‍चय केलाय. राज्यघटनेला अभिप्रेत असलेली सर्व नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाबरोबरच, विचार व अभिव्यक्ती, तसेच श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य आणि संधी आणि दर्जांमधील समानताही जपायला हवी. राज्यघटना अस्तित्वात येऊन ६८ वर्षे पूर्ण होऊनही, दैनंदिन जीवनात या मूल्यांचा अंतर्भाव करण्याच्या बाबतीत आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. राज्यघटनेतील ही मूलभूत तत्त्वे नाकारण्याचा सध्याचा ‘ट्रेंड’ खेदकारकच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४९ मध्ये संविधान सभेला उद्देशून केलेल्या आपल्या शेवटच्या भाषणाचे स्मरण होते. ते म्हणाले होते, ‘स्वातंत्र्याने आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिलीय, याचे आपल्याला विस्मरण होऊ नये. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यापासून कुठल्याही चुकीच्या गोष्टीला ब्रिटिशांना जबाबदार धरण्याची सबबही चालणार नाही. यापुढे काही चुकीच्या गोष्टी घडल्यास त्यासाठी आपल्याला स्वत:लाच दोष द्यावा लागेल.’

आपण वसाहतवादी शक्तींचे देशातून यशस्वी उच्चाटन केले. आता, विविध सामाजिक अपप्रवृत्तींविरुद्धचा लढा सुरू ठेवला पाहिजे. आपण जातीयवाद, सांप्रदायिकता, भ्रष्टाचार, धर्मांधतेविरुद्ध सामुदायिकरीत्या आवाज उठवायला हवा. आज या सर्व अपप्रवृत्तींना ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपल्याला हवा असलेला भारत घडविण्याची हीच खरी वेळ आहे. आर्थिकदृष्ट्या सशक्त, सामाजिक सौहार्द जोपासणारा आणि सांस्कृतिकदृष्ट्या चैतन्यशील असा भारत. शाश्‍वत व गतिमान विकासासाठी प्रचंड मनुष्यबळ आणि साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करायला हवा. आपल्याला वारसाहक्काने लाभलेल्या अफाट बुद्धिमत्तेचेही संवर्धन केले पाहिजे. आपण ग्रंथांबरोबरच संविधानातील मूल्ये प्रत्यक्षातील जगण्यात उतरवायला हवीत. सध्या देश अर्थशास्त्र आणि लोकसंख्याशास्त्र आपल्या बाजूने असण्याचा इतिहासातील दुर्मीळ क्षण अनुभवतोय. ही संधी गमावता कामा नये. जीवनमानात आमूलाग्र बदल घडविण्याची सर्व क्षमता आपल्यात आहे. आजच्या क्रांतिदिनी ‘करा’ आणि ‘अधिक चांगले करा’, हा निश्‍चय करूयात. सामुदायिक प्रयत्नातून हे शक्‍य होईल. गुरजडा अप्पा राव या तेलुगू कवीची पंक्ती आठवते,
‘नुसत्या निष्क्रिय चर्चा पुरे झाल्या,
चला, काहीतरी ठोस काम करूयात’

या काव्यपंक्तीप्रमाणेच आपणही सामाजिक दृष्प्रवृत्तींविरुद्ध लढा पुकारूयात. त्यांना निडरपणे ‘छोडो भारत’ म्हणूयात.

(अनुवादः मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com