esakal | मनस्वी अन् तपस्वी नेता

बोलून बातमी शोधा

Madhu Limaye

मनस्वी अन् तपस्वी नेता

sakal_logo
By
विजय नाईक

सम्यक विचार, मूल्यांची बूज राखण्याचा आग्रह आणि त्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती हे मधू लिमये यांचे वेगळेपण होते. ते तितकेच व्यासंगी, अभ्यासू आणि संसदीय कामकाजातले मोठे जाणकार होते. त्यांच्या जन्मशताब्दीस १ मेपासून प्रारंभ होत आहे.

राजधानीत इंडिया गेटनजिक पंडारा पार्क भागात प्रसिद्ध संसदपटू (कै.) मधू लिमये यांचं घर होतं. तळमजल्यावर असल्यानं दोन पायऱ्या चढल्या की घरात प्रवेश मिळे. मधूजींना भेटण्यास येण्याची पूर्वकल्पना नेहमी द्यावीच लागे, असे नाही. राजकारणातील धागेदोरे समजून घेण्यासाठी आम्ही काही पत्रकार त्यांना नेहमी भेटायचो. त्यामुळे, दिवसा केव्हाही त्यांचा दरवाजा आमच्यासाठी खुला असे. दरवाजा उघडताच उजव्या हाताला दिसे ते छताला पोहोचेल इतके मोठे लोखंडी शेल्फ आणि त्यावरील महात्मा गांधी यांच्या लिखाणाचे शेकडो ग्रंथ. गांधीजी त्यांना मुखोद्गत होते.

मधूजी हे भारतीय राजकारणातील एक उत्तुंग, लढवय्ये आणि विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्त्व होते. राज्यघटना, संसदीय नियम, राजकारणाचा इतिहास, त्यातील व्यक्तींचे गुणदोष, त्यांचे महत्त्व यांचा त्यांचा इतका गाढा अभ्यास होता, की त्यांना सभापटलावर आव्हान देणे म्हणजे आफत ओढवून घेणे, असे असे. त्यामुळे त्यांच्याशी वागताना राजकीय नेते जरा वचकून वागत.

प्रत्यक्षात मात्र मधूजी मृदू, विनोदी स्वभावाचे, शास्त्रीय संगीताचे जाणाकर व दर्दी होते. त्यांच्या दिवाणखान्यात एक रेकॉर्डप्लेयर होते. त्यावर ते भीमसेन, कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर आदी नामवंत गायकांचे शास्त्रीय गायन ऐकण्यात रमून जायचे. अनेक दिवस चंपाताई दिल्लीत नसत. तेव्हा ते स्वतः स्वयंपाक बनवायचे. त्यांच्या हातची लाजवाब खिचडी मी अनेक वेळा खाल्ली आहे. अन्य राजकीय नेत्यांची आजची छानछोकीची राहणी पाहिली, की मधूजी किती वेगळे व साधे होते, याची जाणीव होते.

‘लायन ऑफ द पार्लमेन्ट रोअर्स

त्यांच्याकडे टेलिव्हिजन सेट नव्हता, की रेफ्रिजरेटर. पाण्यासाठी तिपाईवर ठेवलेला माठ, त्यावर एक डोंगा व पेला ठेवलेला असे. तहान लागल्यास उठावे व ज्याने त्याने त्यातून पाणी घ्यावे. लाडली मोहन निगम, कर्पूरी ठाकूर, जॉर्ज फर्नांडिस, मुलायम सिंह यादव, देवीलाल आदी अनेक नेते त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी येत, तासन्‌तास चर्चा करीत. कृष्णकांत, मधू दंडवते, प्रेम भसीन, चंद्रशेखऱ आदी समाजवादी नेत्यांशीही त्यांचा संवाद चाले. आणिबाणीनंतर केंद्रात पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघाच्या नेत्यांच्या दुहेरी निष्ठेचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे राजकारणात एकच वादळ उठले होते. जनसंघाच्या नेत्यांची पहिली निष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी व दुसरी जनतापक्षाशी. हे त्यांना मान्य नव्हते. अखेर जनता सरकार याच मुद्द्यावरून कोसळले.

काँग्रेस व भाजपचे नेते सर्वसाधारणतः पक्षाच्या पंतप्रधानांवर संसद पटलावर टीका करीत नाहीत. परंतु, लिमये यांनी मात्र पंतप्रधान मोरारजी देसाई यांनाही सोडले नाही. देसाई यांचे पुत्र कांती देसाई यांचे डॉडझल कंपनीशी असलेले संबंध आणि त्यातून झालेल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न त्यांनी लोकसभेच्या पटलावर उपस्थित केला, तेव्हा सभागृह अवाक झाले. कांती देसाईंवर आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाचा दुरुपयोग केल्याबद्दल पंतप्रधान देसाई यांच्यावर लिमये यांनी जोरदार हल्ला चढविला. त्याचे वृत्त दिल्लीच्या ‘हिंदुस्तान टाइम्स’ने पहिल्या पानावर छापले होते. बातमीचा आठ कॉलम मथळा होता, ‘लायन ऑफ द पार्लमेन्ट रोअर्स’. त्यामुळे सत्तारूढ पक्ष आणि राजकारणात बरीच खळबळ माजली होती. लिमये हे निस्पृह, सरकारी भ्रष्टाचारावर घणाघाती हल्ला करणारे आणि संसदीय नियमांचे पालन करणारे नेते होते. त्यांचे व्यक्तिमत्व पारदर्शी होते. त्यांचं वाचन व व्यासंग दांडगा होता. महाराष्ट्राचे असूनही त्यांनी लोकसभेच्या चार निवडणुका लढविल्या; त्या मात्र बिहारमधील मुंगेर व बांका या मतदार संघातून. आणीबाणीच्या काळात त्यांना मिसा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. ते 20 महिने अटकेत होते.

राजकीय प्रवासात मधूजींनी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतून साठ राजकीय पुस्तकांचे लिखाण केले. ‘प्राईम मूव्हर्स- रोल ऑफ द इंडिव्हिज्यूअल इन हिस्टरी’ या पुस्तकात त्यांनी भारत व जगाला प्रभावित करणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना, वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, बिस्मार्क, न्यायाधीश वेन्डेल होम्स आणि प्रा. हॅरॉल्ड लास्की या दहा महान व्यक्तींबाबत लिहिले आहे. हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध समाजवादी नेते आचार्य नरेंद्र देव आणि युसूफ मेहेरअली यांना अर्पण केले आहे. प्रस्तावनेत लिमये म्हणतात, की 1981-82 मध्ये मला अनेक शारीरिक व्याधींनी गाठले. त्यामुळे सक्रिय राजकारणातून मला मागे व्हावे लागले. त्यावेळी मी या पुस्तकाचा विचार करू लागलो, की व्यक्तीची इतिहासातील भूमिका काय असावी. मी व्यक्तिपूजक नाही. त्यामुळे, लिहिताना माझा दृष्टिकोन सम्यक टीकारूप आहे.

‘पत्नीशीही ते याच आवाजात बोलतात’

लोकसभेतील एक आठवण अशी. एकदा मधू लिमये यांना शून्य प्रहरात एक विषय उपस्थित करावयाचा होता. त्याविषयी त्यांनी काहीशी दटावणी देणारे पत्र सभापतींना पाठविले होते. त्यात इशारा होता, की सभागृहातील कामकाज सुरळीतपणे चालावे, असे तुम्हाला वाटत असेल, तर मला विषय उपस्थित करण्याची परवानगी द्या! प्रश्नकाल संपताच बरोबर बारा वाजता ते उभे राहिले आणि आपल्या घोगऱ्या आवाजात आपला मुद्दा मोठमोठ्याने मांडू लागले. तथापि, सभापती परवानगी देण्यास तयार होईनात. त्यावरून दोघांत बरीच गरमागरमी झाली. वातावरण एव्हाना बरेच तापले. लिमये घोगऱ्या आवाजात मोठमोठ्याने बोलून आपला अपमान करीत आहेत, अशी टिप्पणी सभापतींनी केली. त्या वेळी मधू दंडवते उभे राहिले आणि उद्गारले, ‘डू नॉट मिसअंडरस्टँड द लाऊड व्हॉइस ऑफ लिमये, एट होम, इव्हन विथ हिज वाईफ, ही स्पीक्स इन द सेम टोन.’ या वाक्यावर एकच हास्यलाट उसळली. तीत सभापती, लिमये व सारे सभागृह सामील झाले. अखेर सभापतींनी लिमये यांना विषय उपस्थित करण्याची परवानगी दिली.