ट्रम्प महाभियोगाच्या भोवऱ्यात

विजय साळुंके
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

महात्मा गांधींचे, ‘हर सफलता की नींव असत्य और पाप होता हैं,’ हे विधान अतिव्याप्त असले, तरी राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या राजकारण्यांना ते लागू होते. सत्ताप्राप्तीसाठी केलेले गुन्हे झाकून ठेवण्यासाठी सत्ता टिकविण्याच्या गरजेपोटी त्यांच्याकडून आणखी अपराध होत राहतात. डोनाल्ड ट्रम्प हे त्यातलेच एक उदाहरण.

महात्मा गांधींचे, ‘हर सफलता की नींव असत्य और पाप होता हैं,’ हे विधान अतिव्याप्त असले, तरी राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या राजकारण्यांना ते लागू होते. सत्ताप्राप्तीसाठी केलेले गुन्हे झाकून ठेवण्यासाठी सत्ता टिकविण्याच्या गरजेपोटी त्यांच्याकडून आणखी अपराध होत राहतात. डोनाल्ड ट्रम्प हे त्यातलेच एक उदाहरण.

हिंदी-उर्दूत ‘हमाम में सब नंगे’ अशी म्हण आहे. हमाम म्हणजे सामुदायिक स्नानाचा हौद. या म्हणीत थोडा बदल करून, ‘राजनीतिक हमाम में कमोबेश सारे नंगे,’ असे म्हणता येईल. कारण सत्तेच्या राजकारणाचा तो पूर्वापार गाभा आहे आणि आता जगभरच त्यात वेगाने घसरण होत आहे. निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी जनतेच्या जीवनात सर्व क्षेत्रांत सकारात्मक बदल करू शकेल असा कार्यक्रम घेऊन उतरण्याऐवजी चारित्र्यहनन, भूतकाळातील मढी उकरून चिखलफेकीलाच प्रचार म्हणावे, असे त्याचे स्वरूप झाले आहे. अमेरिकेत २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीचे पंधरा महिने उरले असले, तरी त्यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे आपली उमेदवारी जाहीर करून डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यावर जाळे टाकले आहे. परंतु ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची टांगती तलवार असल्याने हा डाव उलटण्याची लक्षणे आहेत. राजकारण मग ते देशी असो वा विदेशी, त्यात धुतल्या तांदळासारखे नेतृत्व आज तरी अभावानेच आढळेल. ‘राजकारण हे बदमाशांचे अखेरचे आश्रयस्थान,’ या उक्तीशी जवळचे नाते सांगण्याऱ्या ट्रम्प यांचा इतिहास अनेक गुन्ह्यांनी भरलेला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात असा माणूस निवडला जातो आणि अध्यक्षीय कारकीर्द वादग्रस्त ठरलेली असतानाही पुन्हा जिंकण्याची उमेद बाळगतो, याचे आश्‍चर्य वाटण्यासारखी परिस्थिती नाही. त्यांना विरोध करणाऱ्या हिलरी क्‍लिंटन यांनी खासगी संगणकावर सरकारी कामकाजाच्या ई-मेलची देवाणघेवाण केली होती, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार व देशाचे माजी उपाध्यक्ष ज्यो बायडन यांच्या मुलावरील युक्रेनमधील चौकशी दडपण्याचे प्रकरण उकरून काढताना ट्रम्प हेच अडचणीत आले आहेत. परिणामी निवडणूक प्रचाराची पातळी घसरत जाणार आहे.

ट्रम्प यांच्या कुटुंबाचा इतिहास  फारसा गौरवास्पद नाही. २०१६ च्या प्रचारात ट्रम्प यांनी कायद्यातील पळवाटांचा लाभ घेत करचोरी केल्याची कबुली दिली होती. अध्यक्षपदी आल्यावर त्यांनी २०२०च्या निवडणुकीत विरोधकांच्या हाती करचोरीचा तपशील लागू नये, म्हणून संबंधित कागदपत्रे बंदिस्त केली. ‘अध्यक्षपदी असताना आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही,’ या त्यांच्या दाव्याला आव्हान देणाऱ्यांनी ‘अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या कंपन्या यांना एकच नियम लागू होत नाही, त्यांच्या कंपन्यांचे गैरव्यवहार कायद्याच्या कक्षेत येतात,’ असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या अनेक भानगडी आहेत. २०१६ च्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी हिलरी क्‍लिंटन आणि डेमोक्रॅटिक पार्टीच्या व्यूहनीतीचा छडा लावण्यासाठी, तसेच त्यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी करण्यासाठी रशियाची मदत घेतल्याचे प्रकरण ठोस पुराव्याअभावी बारगळले. अध्यक्षीय निवडणुकीसाठी जमा झालेल्या पक्षनिधीतून काही रक्कम ही ट्रम्प यांच्याबरोबरचे ‘संबंध’ उघडकीस आणू पाहणाऱ्या स्रियांना देऊन त्यांचे तोंड बंद करण्यात आले. ट्रम्प यांनी त्याचा इन्कार केला, तरी त्यांच्या वकिलांनी चौकशीत तसे कबूल केले. अमेरिकी निवडणूक कायद्यात निवडणूक निधीच्या अशा वापराला बंदी आहे. निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपाची चौकशी करणारे खास वकील रॉबर्ट म्युलर यांचा अहवाल संधिग्ध होता. त्यामुळे ट्रम्प बचावले. अमेरिकी निवडणुकीत परदेशी हस्तक्षेप वा कोणत्याही स्वरुपाची ‘रसद’ घेण्यास मनाई आहे. बायडन आणि त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्या युक्रेनमधील संशयास्पद व्यवहाराचे प्रकरण उकरून काढण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेन अध्यक्षांवर दबाव आणला. त्यांचे २५ जुलै २०१९ रोजीचे दूरध्वनीवरील संभाषण एका ‘जागल्या’ने उजेडात आणले. डेमोक्रॅटिक पक्षाला त्यामुळे आयतीच संधी मिळाली. रशियन हस्तक्षेपाच्या मुद्‌द्‌यांवर ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची कारवाई हुकली होती. आता युक्रेन प्रकरणात ती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 ट्रम्प यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांचे प्रशासन किती खिळखिळे झाले आहे, याचा गौप्यस्फोट करणारा लेख ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित झाला होता. लहरी ट्रम्प यांच्याबरोबर न पटल्याने अनेक मंत्री, अधिकारी स्वतःहून बाहेर पडले वा ट्रम्प यांनी त्यांची हकालपट्टी केली. रशियाकडे अमेरिकेच्या बरोबरीने अण्वस्त्रसाठा असल्याने अमेरिका व्लादिमीर पुतीन यांना ‘शत्रू’ समजते. मात्र, ट्रम्प हे रशियाशी जुळवून घेण्याचे धोरण रेटत असतात. युक्रेनच्या अध्यक्षांबरोबरचे संभाषण प्रकाशात आल्यानंतर ट्रम्प यांच्या ‘व्हाइट हाउस’ कार्यालयाने ट्रम्प-पुतीन संभाषणाचे रेकॉर्ड कुलूपबंद केले आहे. ट्रम्प यांचे वर्तन अमेरिकेच्या सुरक्षेला धोकादायक असल्याचा आरोप करून डेमोक्रॅटिक पक्षाने हे संभाषणाचे रेकॉर्ड चौकशीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी मोहीम उघडली आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार अजून ठरलेला नाही. अनेक इच्छुकांपैकी माजी उपाध्यक्ष ज्यो बायडन एक आहेत. त्यांचा मुलगा हंटर हा युक्रेनमधील गॅस कंपनीत संचालक होता. या कंपनीची करचोरी, भ्रष्टाचार व अन्य प्रकरणातील चौकशी दडपण्यासाठी उपाध्यक्ष असताना बायडन यांनी युक्रेन सरकारवर दबाव आणताना शंभर कोटी डॉलरची मदत रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी ट्रम्प यांनी २५ जुलै रोजी झालेल्या संभाषणात या प्रकरणाचे धागेदोरे मिळविण्यासाठी दबाव आणला. युक्रेनची ४० कोटी डॉलरची मदत रोखली. आपले वकील रुडी गिलियानी यांना युक्रेनला पाठविले. ‘व्हाइट हाउस’मध्ये विश्‍लेषक म्हणून नियुक्तीवर असलेल्या गुप्तचर अधिकाऱ्याने या संभाषणाचे प्रकरण उघडकीस आणले. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहात बहुमत असल्याने ट्रम्प यांना पदावरून हटविण्यासाठी महाभियोगाची कारवाई हाती घेण्यात आली आहे. सभापती नॅन्सी पेलोसी त्यासाठी आग्रही होत्या. महाभियोगाची चौकशी प्रदीर्घ काळ चालणार असून, सिनेटमध्ये दोनतृतीयांश मताधिक्‍क्‍यानेच ट्रम्प यांना काढता येईल. तेथे रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. मात्र महाभियोगाच्या प्रक्रियेत अनेक भानगडी उजेडात येतील, तसे ट्रम्प उघडे पडतील आणि ट्रम्प यांच्या पाठीराख्यांमध्ये घट होईल, असे दिसते.

ट्रम्प यांचे सध्याचे वर्तन बुडत्याचा पाय खोलात, असेच आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षेला धोकादायक वर्तन केल्याचा आरोप गंभीर आहे. चौकशीत अडथळे आणण्यासाठी ट्रम्प यांनी ‘एफबीआय’च्या संचालकांवर दबाव आणला होता. विशेष वकील म्युलर यांना जेरबंद करण्याचा यांचा प्रयत्न प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या बहुमतामुळे फसला. आता युक्रेन प्रकरणातील ‘जागल्या’ला धमकावण्यास ट्रम्प धजावले आहेत. हिलरी क्‍लिंटन यांचे ई-मेल प्रकरण उकरून काढून डेमोक्रॅटिक पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठीही ट्रम्प यांनी चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेत कायद्यापुढे अध्यक्षच नव्हे, तर कोणीही श्रेष्ठ नाही हे तत्त्व रुजले आहे. देशद्रोह, लाचखोरी वा अन्य मोठ्या गुन्ह्यांबद्दल अध्यक्षांना महाभियोगाद्वारे घालविता येते. ही कारवाई कायद्याच्या नव्हे, तर राजकीय कक्षेत येते. त्यामुळे आगामी काही महिने तेथे भरपूर चिखलफेक होईल, यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay salunke write demonstrations in support of impeachment on Donald Trump