भाष्य : फॅसिस्टांना पोसण्याचा जुगार

युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी रशियाने चार अटी घातल्या आहेत. पूर्व युक्रेनमधील बंडखोर दन्येत्स्क व लुहान्स्क या प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी. तसेच युक्रेनने तातडीने लष्करी कारवाई थांबवावी, अशा अटी आहेत.
Navnajhi
NavnajhiSakal
Summary

युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी रशियाने चार अटी घातल्या आहेत. पूर्व युक्रेनमधील बंडखोर दन्येत्स्क व लुहान्स्क या प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी. तसेच युक्रेनने तातडीने लष्करी कारवाई थांबवावी, अशा अटी आहेत.

राजधानी बर्लिन वाचविण्याचा शेवटचा उपाय म्हणून हिटलरने लोकांच्या हाती शस्त्रे दिली होती. युक्रेनमधील झेलेन्स्की सरकारने सर्वसामान्य लोकांप्रमाणेच तुरुंगातील गुन्हेगार व ‘इस्लामिक स्टेट''च्या दहशतवाद्यांना मुक्त करून त्यांना शस्त्रे सोपविली आहेत. युक्रेनच्या लष्करात अपहरण, बलात्कार, हत्याकांडे करणाऱ्यांचा समावेश झाला आहे.

युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी रशियाने चार अटी घातल्या आहेत. पूर्व युक्रेनमधील बंडखोर दन्येत्स्क व लुहान्स्क या प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी. तसेच युक्रेनने तातडीने लष्करी कारवाई थांबवावी, अशा अटी आहेत. युक्रेनने `नाटो’च्या सदस्यत्वाचा प्रयत्न कायमस्वरूपी थांबवावा, देशाला तटस्थ घोषित करण्यासाठी घटनेत बदल करावा आणि रशियाने २०१४ मध्ये ताब्यात घेतलेला क्रिमिया रशियाचा भाग आहे हे मान्य करावे, ही अट युक्रेन मान्य करण्याची शक्‍यता नाही. तसे करणे ही रशियापुढे शरणागती ठरेल व अमेरिकादी पाश्‍चात्य देश तशी मुभा देणार नाहीत. अध्यक्ष झेलेन्स्की व त्यांच्या काही पूर्वसुरींनी युक्रेनी राष्ट्रवादाच्या आडून ज्या कडव्या नवनाझीवादी शक्तींना पाठबळ दिले, त्या शिरजोर होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल. रशियन - युक्रेन युद्धाची व्याप्ती युक्रेनपुरतीच मर्यादित आहे. तरीही काहींना त्यातून तिसरे महायुद्ध (अणुयुद्ध)आकार घेईल, अशी भीती वाटते. युरोपमधील तसेच युरेशियातील सत्ता संतुलन हे युद्धाच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. रशियाबरोबरच चीनला अशा संघर्षात ओढण्यासाठी तणावाची व्याप्ती वाढण्याची सध्या तरी शक्‍यता दिसत नाही. तसेच झाले तर युद्धाचे परिमाण वाढेल. त्यात कोणाचेही हित नाही.

दुसऱ्या महायुद्धाचा अंत इटलीचा फॅसिस्ट नेता मुसोलिनी याची हत्या व जर्मनीचा नाझी नेता हिटलरच्या आत्महत्येने झाला. सोविएत फौजांचा बर्लिनमध्ये प्रवेश हाच या युद्धाचा अंत होता. मात्र अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉंब टाकून युद्धसमाप्तीचे सोविएत संघराज्याचे श्रेय नाकारण्याचा प्रयत्न केला. १९४५मध्ये जगात नवी राजकीय व्यवस्था आली. फॅसिस्टांचा नाझीवाद बदनाम झाला होता. न्यूरेंबर्गमधील खटल्यात काही नाझींना शिक्षा झाली; परंतु नाझीवादाचे अवशेष टिकून राहिले. अमेरिकेत ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिलवर झालेला हल्ला, कॅनडात ट्रकचालकांचे कोविड लसीकरणाच्या सक्तीविरोधात झालेले आंदोलन, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जर्मनीत विविध निमित्ताने झालेल्या आंदोलनात नाझीवादाची प्रतीके, स्वस्तिकचे चिन्ह असलेले ध्वज ठळकपणे मिरविण्यात आले. युक्रेनमधील युद्धात तर नाझीवादी प्रतीकांना जणू प्रतिष्ठाच मिळाली. युक्रेनच्या अध्यक्ष व पंतप्रधानपदी ज्यू व्यक्ती असूनही नाझीवादी शक्तींची पाठराखण झाली. युरोपातील ज्यूंचे नाझींकडून शिरकाण झाल्याने इस्राईल अस्तित्वात आले. परंतु इस्राईलचे पॅलेस्टिनी मूळ निवासींबाबतचे वर्तन नाझींप्रमाणेच क्रूर राहिले आहे. युक्रेनमधील युद्धाने नाझीवादी शक्तींना जणू सरकारमान्यता मिळाली आहे.

युक्रेनमध्ये स्टेपन बंडारा या युक्रेनियन नाझीचे देशभर पुतळे आहेत. दुसऱ्या महायुद्धात त्याने हिटलरशी हातमिळवणी करून पोलंड, तसेच युक्रेनमध्ये ज्यू व अन्य वांशिक गटांच्या शिरकाणात भाग घेतला होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर बंडारा पश्‍चिम जर्मनीत स्थायिक झाला. पाश्‍चात्य देश व त्यांच्या गुप्तचर संघटनांशी सहकार्य करीत त्याने सोविएतच्या नेतृत्वाखालील ‘वॉर्सा गटा’विरुद्ध कारवाया केल्या. त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. रशियाविरुद्धच्या ताज्या लढाईत युक्रेनमधील कडवे राष्ट्रवादी, नवनाझीवादी यांचा बंडारा हा स्फूर्तिदाता ठरला आहे. २०१४मध्ये सी.आय.ए.च्या कारस्थानातून युक्रेनमध्ये सत्तांतर झाले. पूर्व युक्रेनमधील रशियाधार्जिण्या टापूतील जनतेवर हल्ले करण्याचे कंत्राट या बंडाराच्या अनुयायांना मिळाले. अझोव्ह ही या नवनाझींची संघटना. तिचे स्वरूप लष्करी. ऑन्ड्रियी बिलेन्स्की हा तिचा नेता. त्याने २००५ मध्ये पॅट्रियट ऑफ युक्रेन स्थापन केली. बिलेन्स्कीने,‘अंतिम धर्मयुद्धात जगातील गोऱ्या वंशाचे नेतृत्व हे युक्रेनचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे,’असे म्हटले होते. २०१४ मध्ये तो युक्रेनच्या संसदेवर निवडून गेला. ‘बेली वोझ्द’ हे त्याचे टोपणनाव. त्याचा अर्थ गोरा शासक. त्याने ऑक्‍टोबर २०१६मध्ये कडव्या उजव्या ‘नॅशनल कोअर पार्टी’ची स्थापना केली. नवनाझींच्या अझोव्ह बटालियनचा हा पक्ष कणा आहे. युक्रेनमधील रशियाविरोधी सरकारने अझोव्हचा लष्कराचा घटक म्हणून स्वीकार केला. रशियन समर्थक विभाजनवाद्यांशी लढण्यास युक्रेनचे लष्कर समर्थ नाही म्हणून ही तडजोड झाली होती.

पाश्‍चात्यांचा पक्षपातीपणा

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत १६ डिसेंबर २०२०रोजी रशियाने नाझी उदात्तीकरणाचा निषेध करणारा ठराव मांडला होता. अमेरिका व युक्रेनने त्यावर विरोधी मत नोंदविले, तर जर्मनीसह युरोपातील अन्य अमेरिकासमर्थक असे ५१ देश तटस्थ राहिले होते. पूर्व युक्रेनमधील यादवीत नवनाझी गट प्रामुख्याने सक्रिय होते व त्यांना अमेरिकेकडून शस्त्रे व पैसा दिला जात होता. नवनाझीवाद, वांशिक पक्षपात व असहिष्णूता या मुद्द्यांवर पाश्‍चात्यांचा पक्षपातीपणा त्यातून स्पष्ट झाला. जर्मनीत सध्या सोशल डेमोक्रॅट्‌सच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी या पक्षाने कम्युनिस्टांच्या विरोधात हिटलरशी हातमिळवणी केली होती. महायुद्धानंतर हा पक्ष सी.आय.ए. पुरस्कृत असाच राहिला आहे.

युक्रेनवरील आक्रमणानंतर जर्मन सरकारने संरक्षण खर्चात तिप्पट वाढ केली आहे. अँजेला मर्केल चॅन्सेलर असताना नवनाझीवादी कडके उजवे गट व त्यांना सहानुभूती असलेल्या राजकीय नेत्यांवर पाळतीचा कायदा झाला होता. इटली, फ्रान्स व जर्मनीत फॅसिस्ट शक्तींची जुळवाजुळव चालू आहे. त्यात जर्मनी लष्करीदृष्ट्या ताकदवान झाला तर रशियाला जे भय वाटते आहे, त्याच दिशेने युरोपात चित्र उभे राहील. युक्रेनमधील नवनाझींच्या अझोव्ह बटालियनला अमेरिकेचे पाठबळ आहेच, शिवाय त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकी माजी सेनाधिकारी तैनात आहेत. ब्रिटन व कॅनडाही गुप्तता पाळून अशा प्रशिक्षणात सहभागी आहे. अफगाणिस्तानात १९७९ मध्ये आलेल्या सोविएत फौजेविरुद्ध जशी मुजाहिदांची फौज उभी करण्यात आली व त्यातून सोविएत सत्ता खिळखिळी झाली, तसाच प्रयोग युक्रेनमध्ये रशियाविरोधात चालू आहे. सीरियातील अल् तान्फ या अमेरिकी लष्करी तळावर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन युक्रेनमध्ये पाठविण्यात येत आहे. पश्‍चिम आशिया, उत्तर आफ्रिकेतील दहशतवादी गटांमधून भरती करून पोलंडमार्गे युक्रेनमध्ये पाठविण्याची मोहीम २०२१ च्या अखेरीस चालू झाली.

युक्रेन ‘नाटो’चा सदस्य नसल्याने युक्रेनच्या मदतीस थेट फौजा पाठविता येत नाहीत म्हणून हा मार्ग पत्करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील अल्‌ कायदा, तालिबानचा भस्मासूर अमेरिकेवरच उलटला. परंतु सोविएत संघराज्याप्रमाणेच रशियाला धडा शिकविण्यासाठी हा जुगार खेळला जात आहे. युरोपात १६, १७ व १८ व्या शतकातील युद्धात भाडोत्री मारेकरी वापरले जात होते. व्यापार व साम्राज्याचा विस्तार अशा युद्धांचे कारण असे. १९४५ नंतरच्या ७७ वर्षांत प्रथमच युरोपातील दोन देश (युक्रेन व रशिया) थेट भिडलेले दिसले. युगोस्लाव्हियातील यादवीतून अपेक्षित नवी राजकीय व्यवस्था आणण्यासाठी अमेरिका व ‘नाटो’ने निर्णायक भूमिका बजावली होती. कोसोवोमध्ये स्वातंत्र्य जाहीर करण्याआधी कोणतेही सार्वमत झाले नव्हते. तरी अमेरिकेने या नव्या देशाला मान्यता दिली होती. युक्रेनमधील दोन फुटीर प्रांतांना रशियाची मान्यता मात्र आक्षेपार्ह ठरली. रशियाला युक्रेनमधील सापळ्यात अडकविण्यासाठी फॅसिस्टांची मदत घेताना पुढील धोक्‍याचा विचार झालेला नाही. आर्थिक संकटात पिचलेला मध्यमवर्गीय सहजपणे फॅसिस्टांच्या जाळ्यात अडकतो. आपल्या शोषणकारी व्यवस्थेविरोधातील रोषाला वळण देण्यासाठी पाश्‍चात्य धनाढ्यांनी पुन्हा एकदा फॅसिस्टांना पोसण्यास सुरवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com