काही नेत्यांचे ‘कॉँग्रेस छोडो’... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vikas jhade writes gujrat Hardik Patel leave congress party Sunil Kumar Jakhar join bjp
काही नेत्यांचे ‘कॉँग्रेस छोडो’...

काही नेत्यांचे ‘कॉँग्रेस छोडो’...

उदयपुरातील कॉँग्रेसच्या नव संकल्प शिबिराचे त्वरित फलित काय? तर, गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेलचा राजीनामा! हार्दिकचे वय वर्षे २८. पंजाब कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनीही गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. वय वर्षे ६८. भारत जोडण्याचा संकल्प केलेल्या कॉँग्रेसला मात्र, पक्षातील नेत्यांना-पदाधिकाऱ्यांना जोडून ठेवण्याचे जमले नाही, असा त्याचा अर्थ. कॉँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांना वयाचे बंधनही नाही. गेल्या आठ वर्षात कॉँग्रेसमधून असे आऊटगोर्इंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जे कॉँग्रेसला रामराम ठोकतात त्यातील बहुतांश लोक हे भाजपात जाऊन ‘शुद्ध’ होताना दिसतात. त्यातील काहींना सत्तेचा मोह आहे तर काहींना तुरुंगात जाण्याचे भय. परंतु ज्यांनी कॉँग्रेसला सोडले त्यांची पक्षासाठी उपयुक्तता किती होती, हाही चिंतनाचा विषय आहे. जे गेलेत त्यातील बहुतांश राजकारणातून संपले हा इतिहास आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे याचे अलीकडचे उदाहरण.

सत्ता आणि पद उपभोगलेले जे नेते काँग्रेसमधून बाहेर पडतात, ते मुकाट्याने मार्गक्रमण करतात असेही नाही. काल परवा जो मंत्री होता, प्रदेशाध्यक्ष होता, वाटेल तेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या बैठकीत उठबस असणारा कोअर टीमचा सदस्य होता, इतकी निकटता असूनही एका क्षणातच आपल्यावर खूप मोठा अन्याय झाल्याचे त्याला जाणवते. त्यानंतर तो ‘कॉँग्रेसमध्ये जराही लोकशाही नाही. नुसतीच घराणेशाही आहे’, असे हातातली स्क्रिप्ट वाचून काहीबाही बरळताना दिसतो. ज्याने स्वत:च्या उज्ज्वल भविष्यापलीकडे राजकारणात कोणतेही दिवे लावले नाहीत, स्वत:च्या समुदायाचा, जातीचा उपयोग हा केवळ स्वत:ला नेता म्हणून आकार देण्यासाठी करवून घेतला, त्यास मोदी समर्थक मीडिया क्षणातच राष्ट्रीय नेता बनवतो. गंमत अशी आहे की, नेता लहान असो की मोठा, जे कॉँग्रेसला सोडून बाहेर पडले त्यांचे दोन दिवसानंतर वृत्तपत्राच्या कोपऱ्यात शोधूनही नाव सापडत नाही आणि टीव्हीचे कॅमेरेही त्यांच्याकडे फिरकत नाहीत. हार्दिक पटेल नावाचं भारुडही त्यातीलच एक.

गुजरातमध्ये पाटीदारांच्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या हार्दिक पटेलला दोन वर्षांपूर्वी कॉँग्रेसने थेट कार्यकारी प्रदेशाध्यक्ष केले होते. ज्या गुजरातने सरदार वल्लभभाई पटेल या देशाला दिले, त्यांच्यापेक्षा आपण तसूभरही कमी नाही, असा समज कॉँग्रेस प्रवेशानंतर हार्दिकचा झाला. पक्षात कोणतेही योगदान नसलेल्या हार्दिकला ‘आपली नसबंदी करून पदावर बसविण्यात आले’, असा साक्षात्कार झाला. लहान वयात पक्षाबाबत महान शब्दप्रयोग करणारा हार्दिक पटेल हा पहिलाच नेता असेल. कॉँग्रेसला माणसं चांगली ओळखता येतात. हा टिकाऊ प्राणी नाही, याची खात्री पटल्यावर त्याच्या प्रत्येक वक्तव्याकडे दुर्लक्ष करीत त्याला बाहेरची वाट मोकळी करून दिली. पटेलच्या डोक्यावर ३२ लहान-मोठे गुन्हे आहेत. डोक्यावरील गुन्ह्यांचे ओझे कमी करून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात डुबकी मारण्याचा हार्दिकचा विचार असू शकतो. गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच्या या सर्व घडामोडी आहेत. नऊ मे रोजी हार्दिक पटेलवर असलेला गुन्हा राज्य सरकारने मागे घेतला, यावरून त्याच्या भविष्याचा वेध घेतला जाऊ शकतो.

एकसंधतेचा जप

‘नव संकल्प’ च्या नावाने चिंतन करण्यात आलेल्या उदयपूरमधील कॉँग्रेसच्या बैठकीत कोणतेही नवे विषय नव्हते. यापुढे आपल्या सगळ्यांना एकसंघ होऊन लढायचे आहे, असे गावातला सरपंचही म्हणतो. त्यापेक्षा इथे दुसरे काही सांगण्यात आले नाही. सोनिया, राहुल आणि प्रियांका असे सगळे गांधी इथे होते. ‘या परिवाराचीच कॉँग्रेस’ म्हणून पत्र लिहित स्वत:च्याच पक्षाचा तमाशा करणारे जी-२३ मधील शूरवीर या शिबिरात होते. मात्र, या सगळ्यांचीच जणू तेथे दातखीळ बसली होती. कोणीही राहुल गांधी यांच्या विरोधात ‘ब्र’ही उच्चारला नाही. त्या सगळ्यांनी सोनियाजींच्या आवाहनाला तालासुरात होकार दिला. थोडक्यात होयबागिरी केली. गांधी परिवारच आपली राज्यसभेवर वर्णी लावतील, अशी त्यातील काहींना आस आहे. जे जे राज्यसभेच्या बाहेर होतील त्यांची टोळी पुन्हा गांधी परिवाराविरोधात एकवटलेली दिसेल. या शिबिराने देशाला जो संदेश द्यायचा तो दिला आहे. मैदानात येऊन दंड थोपटण्यात आले.

भाजपच्या विरोधात कॉँग्रेस हा पहेलवान अजून जिवंत आहे आणि केवळ जिवंतच नाही तर तयारी करून दंड थोपटतो, असे सांगण्यात गांधी परिवार यशस्वी झाला आहे. केवळ पत्र लिहून गांधी परिवार घाबरेल, असा समज करून बसलेल्या या नेत्यांना या परिवाराची शक्ती माहिती आहे. त्यांच्यामुळेच यांना नेते म्हणून मान्यता आहे. पार्श्वभूमी असल्याने गांधी परिवार कोणालाही घाबरत नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे. संधिसाधूंनी कॉँग्रेसला सोडल्यानंतर कोणासही बाहेर कीर्तीवान होता आले नाही. अनेक जण राजकारणातूनच बाद झालेत. याला ममता बॅनर्जींचा अपवाद म्हणता येईल. प. बंगालमध्ये डावे आणि कॉँग्रेस एवढ्यापुरतेच राजकारण मर्यादित होते. काँग्रेसची जागा ममता बॅनर्जी यांना घेता आली. प. बंगालात भाजप हातपाय पसरू लागले, तेव्हा डाव्यांनीही ममता बॅनर्जी यांना मदत केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात हे राज्य गेले तर चांगले राज्य नासवले जाईल म्हणून डावे आणि ‘तृणमूल’ने जुळवून घेतले. शक्ती असलेल्या भाजपला त्यांच्याच भाषेत ठोसे हाणताना ममता बॅनर्जी पुरून उरल्यात. एकहाती सत्ता मिळविली. परंतु प्रत्येकालाच ममता बॅनर्जी होता आलेले नाही. भाजपला थोपविण्यासाठी आता राज्याराज्यात प्रादेशिक पक्षांना आपली ताकद वाढवावी लागेल. परंतु याचे नेतृत्व करायला कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही.

गेल्या काही वर्षात कॉँग्रेसची घसरण खूप मोठ्या प्रमाणात झाली हे स्पष्ट दिसते. कॉँग्रेस कोणताही निर्णय तातडीने घेत नाही हेही खरे आहे. तरीही आज कॉँग्रेसचे लोकसभेत ५३ खासदार, राज्यसभेत ३६ खासदार, विधानसभेत ६९१ आमदार आणि परिषदेत ४६ आमदार आहेत. अलीकडेच पाच राज्यांतील निवडणुका झाल्यात. उत्तरप्रदेशात प्रियांका गांधी आणि अन्य राज्यात राहुल गांधी यांच्याशिवाय कॉँग्रेसचा कोणता नेता ताकदीने प्रचारात दिसला? गांधी परिवाराशिवाय कॉँग्रेसमध्ये असलेल्या कोणत्या नेत्यांमध्ये हजार लोक सभेला जमवण्याची क्षमता आहे? एकाही नाही. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला, कोरोनाने देशात ४७ लाख लोक मरण पावलेत असे अनेक विषय रोखठोकपणे मांडून मोदी सरकारला जाब विचारणारे एकमेव राहुल गांधीच आहेत. कॉँग्रेसमधील असंख्य नेत्यांनी आपापली संस्थाने तयार केलीत. वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये अशी दुकाने थाटली. करोडो रुपये कमवत आहेत. सोनिया गांधी म्हणतात, पक्षाने तुम्हाला खूप दिले; आता तुमची वेळ आहे. यावर कोणाचाही हात खिशात जात नाही. अंतर्गत लाथाड्या करणे हा एकमेव धंदा कॉँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष अद्याप निवडला जात नाही. दिल्लीतून नावावर शिक्कामोर्तब होत नाही. यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? कॉँग्रेस ‘भारत जोडो’ अभियान सुरू करेलही;, परंतु तोपर्यंत अनेक जणांनी ईडी, सीबीआयच्या भीतीने ‘छोडो कॉँग्रेस’ केलेले असेल. अशा बला ‘शुद्ध’ व्हायला जाणे कॉँग्रेससाठी चांगले आहे. तेव्हाच कॉँग्रेस बळकटीने पुढे येईल. धर्मांध शक्तीविरुद्ध लढण्यासाठी कॉँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे देश जाणून आहे. आता गरज आहे एकजुटीची.‘

- विकास झाडे

Web Title: Vikas Jhade Writes Gujrat Hardik Patel Leave Congress Party Sunil Kumar Jakhar Join Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top