राज आणि नीती : लिंबाळेंची ‘अवार्ड नो-वापसी’!

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना, त्यांच्या ‘सनातन’ या 2018 मध्ये प्रकाशित कादंबरीसाठी के. के. बिर्ला फाउंडेशनचा "सरस्वती सन्मान'' हा मानाचा पुरस्कार मिळाला.
Dr Sharankumar Limbale
Dr Sharankumar LimbaleSakal

‘सनातन’ कादंबरीसाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना मिळालेला सरस्वती सन्मान ही आनंदाची घटना आहे. पण या सन्मानाचे थंडे स्वागत व्हावे, ही खेदाची बाब. खरे तर समाजातील सर्वच घटकांनी समन्वयवादी, समरसतेची, व्यक्तीस्वातंत्र्याच्या आदराची भूमिका घेतली पाहिजे.

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना, त्यांच्या ‘सनातन’ या 2018 मध्ये प्रकाशित कादंबरीसाठी के. के. बिर्ला फाउंडेशनचा "सरस्वती सन्मान'' हा मानाचा पुरस्कार मिळाला. याला जवळपास दोन महिने झाले. या निमित्ताने प्रथमच एका दलित साहित्यिकाच्या कादंबरीला सरस्वती सन्मान मिळाला, हे या घटनेचे वैशिष्ट्य. तो जाहीर करतांना फाऊंडेशनने ‘कादंबरीच्या कथानकाच्या काल्पनिकतेचे धागे समकालिन इतिहासाशी अतिशय प्रगल्भतेने विणल्याबद्दल' डॉ. लिंबाळे यांचा गौरव केला आहे.

लिंबाळेंची आतापर्यंतची साहित्यसेवा आणि खुद्द ‘सनातन’ चे वाड्‌मयीन मूल्य, हे दोन्ही पाहता फाऊंडेशनने योग्य निवड केल्याचे दिसते. लिंबाळे हे ‘अक्करमाशी‘ या त्यांच्या पहिल्या आत्मपर लेखनामुळे चर्चेत आले. नंतर कथा, कादंबरी, समिक्षा आणि कविता अशा विविध वाड्‌मय प्रकारांमधील त्यांची साहित्यसेवा उल्लेखनीय आहे. महत्त्वाचे म्हणजे मिळालेली किर्ती, सन्मान यामुळे स्व-संतुष्टतेच्या कोशात गुरफटून न जाता त्यांनी उपेक्षित समाजातील गुणी, होतकरू लेखकांना हात दिला. त्यांचे ‘मेंटरिंग’ केले. प्रोत्साहन दिलेल्या अशा लेखकांमध्ये सर्व समाजघटकातील मंडळी होती. किशोर शांताबाई काळे, भगवान इंगळे, बाळासाहेब गायकवाड, इब्राहिम खान ही वानगीदाखल त्यातली काही नावे! नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्राध्यापक व विभागप्रमुख या नात्याने त्यांनी चांगली कामगिरी केली. अन्याय, अपमान आणि अत्त्याचार सहन करीत वर आलेला दलित साहित्यिक स्वतः मोठा होत असतांना इतरांनाही मोठं करतो, धडपडीला हातभार लावतो, संस्थेच्या बांधणीत वाटा उचलतो हे लिंबाळेंचे कर्तृत्व आहे.

नाकारलेल्या इतिहासाचे उत्खनन

लिंबाळेंची साहित्य संपदा खरोखरच विपुल आहे. त्यांच्या 55पुस्तकांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या वाड्‌मयावर संशोधन प्रबंध लिहिले आहेत. ‘सनातन’ तिची विषयवस्तू आणि मनाची पकड घेणारी शैली या दोन्हीमुळे गाजली. ‘नाकारलेल्या इतिहासाचे उत्खनन’ असे या कादंबरीचे वर्णन केले आहे. आयुष्यभर माणुसकीचा वसा घेऊन परिवर्तनासाठी धडपड केलेल्या एका निरंतर अस्वस्थ लेखकाने अन्याय, अत्याचार व अपमान झुगारून वर येऊ पाहाणाऱ्यांची उत्थान यात्रा या कादंबरीतून मांडली आहे. महत्वाचे म्हणजे धर्मांतर न केलेले महार, मुस्लिम व ख्रिश्‍चन झालेले महार आणि श्रमिक म्हणून परदेशात गेलेले महार अशा सर्वांच्या विलक्षण विदारक संघर्षाची ही वाचकाला हलवून सोडणारी कहाणी आहे. महारांबरोबरच आदिवासींच्या पिढ्यान् पिढ्या सुरूच असलेल्या जगण्याच्या संघर्षाचे आकलनाची क्षितिजे विस्तारणारे आणि मनाच्या खोल तळात जाणिवेचा लख्ख प्रकाश पसरविणारे हे लिखाण आहे.

प्रस्थापित दलित साहित्याला नवी मिती मिळवून देणाऱ्या लिंबाळेंची वाड्‌मयीन कामगिरी व ‘सनातन’च्या निमित्ताने झालेला सन्मान ही विशेष आनंदाची घटना. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर मराठी साहित्य विश्‍वात (या घटनेचे) थंडपणाने स्वागत झाले. दलित लेखकांनी मौन पाळले. काही उत्साही लोकांनी ‘सरस्वती’ सन्मानाविषयी निषेध केला. हे असे का घडले? याचे विश्‍लेषण करतांना यशवंत मनोहरांनी ''सरस्वती''च्या प्रतिमेच्या साक्षीने विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिल्याची घटना आणि लिंबाळेंनी सातत्याने मांडलेली समन्वयाची समंजस भूमिका हे दोन मुद्दे लक्षात घ्यावे लागतात.

वैचारिक अस्पृश्‍यतेचा पुरस्कार

यशवंत मनोहर यांनी सरस्वतीच्या मुर्तीला घेतलेला आक्षेप सर्वांना पटण्याजोगा नसला तरी तो त्यांच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा विषय आहे. परंतु त्यांनी तो नाकारला म्हणून डॉ. लिंबाळेंनीही सरस्वतीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार नाकारावा, अशी अपेक्षा बाळगणे तर्कविसंगत आहेच, पण व्यक्‍ति स्वातंत्र्याच्याही विरोधात आहे. शिवाय तो ‘वैचारिक अस्पृश्‍यतेचा’ प्रच्छन्न पुरस्कारही आहे. खुद्द लिंबाळे यांनी आपल्या या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचा दृष्टिकोन दलितांचे हक्क, त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन आणि एकूणच सामाजिक न्यायासंदर्भात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका इ. मुद्यांबाबत आंबेडकरी चळवळीतील इतर सर्वांसारखीच विलक्षण आग्रहाची आहे. पण म्हणून त्यांना दलित चळवळीने इतरांपासून नेहमीच फटकून राहावे, नेहमीच नकार आणि विद्रोहाच्या पायावर चळवळ उभी करावी, हे मान्य नाही.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने अलीकडेच सन्मानाबद्दल त्यांचा सत्कार केला, त्याला उत्तर देतानाचे त्यांचे मनोगत मोठे मनोज्ञ आहे. ते म्हणतात, ‘आत्मकथा शब्दामध्ये आत्मा येतो म्हणून त्याला विरोध करा. त्या ऐवजी स्वकथन शब्द वापरा. व्यासपीठ शब्दामध्ये व्यास येतो, म्हणून त्याला विरोध करा आणि त्या ऐवजी विचारमंच हा शब्द वापरा असे इशारे दिले गेले. या आक्रमकतेमुळे आपण एकाकी आणि वेगळे पडू, वेगळे पडणे परवडणारे नाही. आपण मित्र वाढविले पाहिजेत’.

लिंबाळे पुढे म्हणतात, ‘सार्वजनिक जीवनात नकाराचे हत्यार सावधपणे वापरले पाहिजे. कोणी सन्मान करणार असेल, मदतीचे हात येत असतील, कोणी मैत्रीचा हात पुढे करत असेल तर त्या विषयी शंका घेणे गैर आहे. समन्वय आणि सामंजस्याची भूमिका गरजेची आहे. आपण एकत्र येण्याचा विचार करूया’. मला वाटते, हीच समाजक्रांतीची पायवाट होईल. लिंबाळेंची ही सामंजस्याची भूमिका गंगाधार पानतावणे यांची आठवण करून देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही जाती संस्थेच्या निर्मूलनासाठी सामाजिक अभिसरणाचाच पुरस्कार केला होता. लिंबाळेंचा मार्गही तोच आहे. दलितांनी राज्यकर्ती जमात व्हावे, नोकरी मागणारे न राहाता नोकरी देणारे व्हावे, शिकावे, संघटित व्हावे व संघर्षही करावा, हा बाबासाहेबांचा विचार दलितांनी अन्य समाज घटकांपासून फटकून राहावे, असे सांगणारा क्‍वचितच नव्हता.

एकत्वाची धारणा

समता आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्‍नांवर लिंबाळेंनी कधीच बोटचेपी भूमिका घेतली नाही, ते योग्यच. हे सूत्र सांभाळतांना आदिवासी, भटके विमुक्‍त आणि तत्सम सर्व उपेक्षितांनाही बरोबर घेतले पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका. टोकाची आक्रमकता तात्कालीक लोकप्रियता मिळवून देत असली तरी शेवटी सामंजस्यच समाज हित साधते, हा धडा सर्वच विचारसरणींना मिळाला आहे. त्यामुळे साने गुरुजी, राम मनोहर लोहिया इ. भारतीय संस्कृतीच्या उपासकांच्या अनुयायांनी तरी लिंबाळेंच्या या सामाजिक एकात्मतावादी, समंजस भूमिकेचे मौन राहून नव्हे, तर मुखर होऊन स्वागत करावे. त्यांनी धीरोदात्तपणे आणि स्वविचारांशी एकनिष्ठ राहून उघडपणे जी सौहार्दपूर्ण भूमिका घेतली, तिचे स्वागत करतांनाच सर्वच दलितेतर समाज घटकांनी उपेक्षितांच्या वेदनांबद्दलची आपली संवेदना आणि सामाजिक न्यायाबद्दलची निष्ठा मधून मधून बोथट तर होत नाही ना? हेही तपासणे गरजेचे आहे. 'सनातन' कादंबरी या वास्तवाकडेही लक्ष वेधते. डॉ. आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटले आहे, 'जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो तेव्हा त्याविषयी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते. सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दीष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही समाज या एककाची गुण वैशिष्ट्ये असतात.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com