esakal | राज आणि नीती : एल्लाराम एन्नाटू मक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

Students

राज आणि नीती : एल्लाराम एन्नाटू मक्कल

sakal_logo
By
विनय सहस्रबुद्धे

श्रेष्ठ तमीळ कवी, लेखक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक आणि बहुभाषाप्रवीण आणि प्रखर देशभक्तींचा समुच्च्य असलेल्या सुब्रह्मण्य भारतींनी देशाच्या एकात्मतेवर पारतंत्र्यकाळी भर दिला होता.

गेल्या वर्षी म्हणजे, २०२०मध्ये लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी होती. मोजके कार्यक्रम वगळले तर सरकारी आणि बिगरसरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ठरलेल्या या महामानवाच्या स्मृती शताब्दीची काहीशी उपेक्षाच झाली. वस्तुतः लोकमान्यांचा स्वदेशीचा विचार असो, स्वभाषेचा आग्रह असो अथवा स्वराज्यप्राप्तीचा दृढ संकल्प असो; त्यांच्या कालजयी विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच लख्ख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आत्मनिर्भर भारताची हाक असो अथवा मातृभाषेतून शिक्षणासंदर्भात नव्या शैक्षणिक धोरणातून स्पष्ट झालेला सरकारचा दृष्टिकोन असो, लोकमान्यांचे विचार आणि त्यांची भूमिका आज शंभर वर्षांनंतरही आपले संदर्भ हरवून बसलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. असे असतानाही लोकमान्यांची स्मृती शताब्दी त्यांच्या लोकोत्तर कार्य-कर्तृत्वाला न्याय मिळेल, अशा पद्धतीने साजरी झाली नाही हे खरेच!

काहीसा असाच उपेक्षाभाव ज्यांच्या वाट्याला आला ते म्हणजे विख्यात तमीळ महाकवी सुब्रह्मण्य भारती! या प्रतिभाशाली कविराजांची स्मृती शताब्दी रविवारी, १२ सप्टेंबरला झाली. त्यांच्याही वाट्याला काहीशी उपेक्षाच आली; पण ती कशी हे समजून घेण्यासाठी आधी त्यांच्या कार्य-कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाचीही ओळख करून घ्यायला हवी. ‘महाकवी भारती’ या नावाने सुविख्यात सुब्रह्मण्य भारतींचा जन्म ११ डिसेंबर १८८३चा! श्रेष्ठ तमीळ कवी, लेखक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक आणि बहुभाषाप्रविण ही झाली त्यांची औपचारिक ओळख. पण आधुनिक तमीळ वाङ्‌मय-व्यवहारांमधील सुब्रह्मण्य भारतींची कामगिरी इतकी अजोड आहे, की पारतंत्र्य काळात त्यांनी मांडलेल्या भूमिका, विचार आजही कालसंगत आहेत. तमीळ भाषा जशी प्राचीन, तसे तिच्यातील वाङ्‌मयही! त्याची पाळेमुळे तमीळ लोकजीवनाच्या प्राचीनतेत घट्ट रुतलेली. सुब्रह्मण्य भारतींनी भूतकाळाचा संदर्भ झिडकारला नाही; पण त्याला कधी कवटाळूनही बसले नाहीत. प्राचीनतेच्या भरभक्कम पायावर उभ्या राहिलेल्या पारंपरिक तमीळ साहित्याच्या इमारतीमागे समकालीन आधुनिकतेचा पट उभा करण्याचे मोठे योगदान महाकवी सुब्रह्मण्य भारतींच्या खात्यावर जमा आहे! पारतंत्र्य काळात होणारे आक्रमण सर्वव्यापी असते. वसाहतवादाची गडद छाया जे जे एतद्देशीय आणि स्वदेशी, त्या सर्वांना झाकोळते. या जाचक झाकोळाची वेदना सुब्रह्मण्य भारतींच्या काव्यातून उत्कटतेने व्यक्त झाली!

त्यांच्या काव्यातील या उत्कटतेचे मूळ अर्थातच त्यांच्या निस्सीम देशभक्तीत होते. स्वातंत्र्याचा ध्यास त्यांच्या चैतन्यमय कवितांच्या ओळी-ओळींमधून व्यक्त होई. कवी या नात्याने सुब्रह्मण्य भारतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वापरलेली साधी, सरळ भाषा व त्यांची सुटसुटीत काव्यरचना. काव्यरचनेसाठी जे छंद वापरले जातात त्यात सुब्रह्मण्य भारतींनी ‘नोंदी चिंदू’ नावाच्या नव्या छंद रचनेची भर घातली. भारतींच्या काव्यरचनेत सोपेपणा होता; पण त्यामुळे त्यांच्या काव्याच्या आशयाची प्रगल्भता कमी झाली नाही. त्याचा परीघही व्यापक होता. देशभक्ती, स्वातंत्र्याची आस, राष्ट्रवाद यांच्या जोडीला सामाजिक सुधारणा, जातीभेद व उपासमारीचे निर्मूलन अशा अनेक विषयांचा समावेश त्यांच्या काव्यरचनांमधून दिसतो. स्वातंत्र्य-आकांक्षेच्या उर्मीने भारलेल्या त्या वातावरणात सुब्रह्मण्य भारतींनी स्वातंत्र्यवीरांचा गौरव करणारी गीतेही लिहिली. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी श्री अरविंद, स्वामी विवेकानंद आणि लोकमान्यांच्या गाजलेल्या भाषणांचा तमीळमध्ये अनुवाद केला. सुब्रह्मण्य भारती यांना ‘भारतीयार’ असेही संबोधले जाते. त्यांच्या ‘पांचाली सबाथम’ या काव्याचा औपचारिक विषय जरी महाभारताच्या कथानकाचा असला तरी मुदलात पांचालीच्या जागी ते भारतमाता पाहत होते. त्या रूपबंधात भारतीय समाज पांडवांच्या रूपात तर कौरव हे एक प्रकारे ब्रिटिश राज्यकर्ते होते. कुरूक्षेत्रावरील युद्ध हे स्वातंत्र्ययुद्धासारखे होते.

सुब्रह्मण्य भारती पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले तरी त्यांनी कधीही उच्चनीचता मानली नाही वा जातीभेदाच्या संकल्पनांचा पुरस्कार केला नाही. वेद, उपनिषदे आणि भगवद्‌गीतेचाही भेदभावपोषक गैर अर्थ लावणाऱ्यांवर त्यांनी अनेकदा बोचरी टीका केली. भारतीयार यांचे स्त्री-पुरुष समानतेबद्दलचे विचारही क्रांतदर्शी होते. महिलांमुळेच संस्कृतीचे सातत्य टिकते असे मानणाऱ्या या महाकवीने कायदे निर्मितीत महिलांच्या सहभागाच्या आवश्‍यकतेवर भर दिला होता.

एकात्मतेलाच छुपे आव्हान

सुब्रह्मण्य भारतीयार त्यांच्या पांढऱ्या फेट्यासाठी व टोकदार, अक्कडबाज मिशांसाठी प्रसिद्ध होते. लोक त्यांना प्रेमाने ‘मुंडासू कविगनार’ म्हणजे मुंडासे वा फेटा बांधलेला कवी या नावाने संबोधत. बहुआयामी प्रतिभेच्या या कवीच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक मिती होत्या. त्यांना काय येत नव्हते? मार्शल आर्ट, व्यंगचित्रकला, कर्नाटक संगीत, भरतनाट्यम्‌ इत्यादींसह अनेक लोककलांमध्येही ते प्रविण होते. हिंदी, संस्कृत, तेलगू व कानडीबरोबरच त्यांना फ्रेंच, ग्रीक, अरेबिक व उर्दू या भाषाही चांगल्या अवगत होत्या. अशा या प्रतिभाशाली कवीराजांचा मूळ पिंड काहीसा अध्यात्मवादीच होता. त्यामुळे उमेदीच्या काळात जेमतेम चार दशकांच्या जीवनयात्रेतील दहा वर्षे त्यांनी पुदुच्चेरीला व्यतीत केली. याच काळात त्यांचा महर्षी अरविंद, कुल्ला सामी, कुवलाई कन्नन, गोविंद ज्ञानी, यझापना स्वामी आदी आध्यात्मिक साधकांशी संबंध आला. पुदुच्चेरीला त्यांनीही अध्यात्माच्या मार्गावरून काही वाटचाल केली खरी; पण याच दशकात त्यांच्या गाजलेल्या काव्यरचनाही निर्माण झाल्या.

इतकी बहुआयामी प्रतिभा आणि दमदार वाङ्‌मयीन कामगिरी, त्याचबरोबर सामाजिक न्यायाचे लख्ख भान असतानाही त्यांना सहन कराव्या लागलेल्या उपेक्षेमागे पूर्वग्रह आणि ‘पोलिटिकल करेक्‍टनेस’ हीच दोन मुख्य कारणे आहेत. १९२१मध्ये या महाकवीचे महाप्रयाण झाले, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी १५-२० माणसे उपस्थित होती. त्यांचे समकालीन रामस्वामी नायकर यांनी सुब्रह्मण्य भारतींनी तमीळ भाषेचे ‘संस्कृतची भगिनी’ असे वर्णन केले होते त्याला प्रखर आक्षेप घेतला होता, ही वास्तविकताही लक्षात घ्यावी. तमीळ अस्मितेच्या श्रेष्ठत्वाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून एकप्रकारे राष्ट्रीय एकात्मतेलाच छुपे आव्हान देण्याचे प्रयत्न तमिळनाडूत नेहमीच होत असतो. प्रादेशिक अस्मितेच्या अतिरेकासाठी जातीय अस्मितांचा निखारा फुलविण्याचे प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात आजही घडत असताना तमिळनाडूत अस्मितेच्या राजकारणापायी ‘भारतीयार’ विस्मृतीत ढकलले जावेत यात आश्‍चर्यकारक काहीच नाही. आजच्या संदर्भात विशेष महत्त्वाचे ठरते ते भारतीयारांचे द्रष्टेपण! तमीळ अस्मिता ही भारतीय अस्मितेचा अविभाज्य घटक आहे. भारतीयतेच्या कोंदणातच तमीळ प्रादेशिक, भाषिक अस्मिता सुरक्षित राहू शकते आणि, शोभायमान होते हे महाकवी भारतींनी स्वतः जाणले होते. ते स्पष्टपणे सांगण्याची हिंमतही त्यांच्याकडे होती. त्यामुळेच ‘एल्लाराम एन्नाटू मक्कल’ म्हणजेच ‘‘भारतातील सर्व लोक, प्रत्येक जण, माझा देशबांधव आहे’, हे सत्य बिंबवण्याचे प्रयत्न सरकारी प्रतिज्ञा येण्याआधी किती तरी दशके भारतीयारांनी केले होते. त्यांच्या स्मृती शताब्दीप्रसंगी ही आठवण जनमनात नीट रुजायला हवी! तीच त्यांना खरी श्रद्धांजली!

vinays57@gmail.com

loading image
go to top