esakal | राज आणि नीती - छद्‌म-पुरोगाम्यांचे उपद्‌व्याप!
sakal

बोलून बातमी शोधा

India

राज आणि नीती - छद्‌म-पुरोगाम्यांचे उपद्‌व्याप!

sakal_logo
By
विनय सहस्रबुद्धे

‘डिसमॅंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर चालू महिन्यात वेबिनार होत आहे. मुळात निष्कर्ष आधी ठरवल्यानंतर होणारी चर्चा, हा देखावाच वाटतो. त्याला व्यापक पाठिंब्याचा दावाही आयोजकांचा पोकळपणा उघड करतो.

भारत आणि भारतीयांची स्थिती कस्तुरी मृगासारखी असल्याचे निरीक्षण अनेकदा अनेक अभ्यासकांनी नोंदविले आहे; पण प्रत्यक्षात ही स्थिती कस्तुरी मृगापेक्षाही अधिक बदतर असल्याचा अनुभव येतो. कस्तुरीमृगाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सामर्थ्याची जाणीव नसते; पण कस्तुरीमृग निदान आत्म-प्रताडनेच्या मोहात तरी नसतो. भारतात मात्र अनेक लब्ध-प्रतिष्ठित भारतीय, भारतीय भाषा, भारतीय आचार-व्यवहार, भारतीय खाद्य-संस्कृती आणि एकूणच भारतीयांचे भारतीयपण ज्या-ज्या गोष्टीत आहे, त्या सर्वांना मागासलेल्या, काल-विसंगत आणि आधुनिकतेच्या विरोधात मानण्यात मोठेपणा मानतात.

अस्मिता नावाच्या गोष्टीचा अतिरेक आणि एकारलेपणा वाईटच; पण म्हणून अस्मिता नाकारण्यात फुशारकी आहे, असे मानणेही तर्कसंगत नाही. संकीर्ण अस्मिता विघटनाला चालना देतात, पण म्हणून त्यांचे अस्तित्वच नाकारणे सैद्धांतिकदृष्ट्या कदाचित योग्य वाटले तरी व्यवहार्य ठरत नाही. संकीर्ण अस्मितांचा पगडा कमी करून, उन्नयनाच्या मार्गाने एका व्यापक, सर्वसमावेशी अस्मितेत त्यांचा विलय घडवून आणणे हेच व्यवहार्य आणि म्हणून शहाणपणाचेही ठरते. अस्मिता ही व्यक्तीच्या परिचयाचा मूलभूत घटक असते. ती समृद्ध, अर्थपूर्ण जीवन जगण्याच्या प्रेरणेचा भाग बनते हे वास्तव समाजशास्त्रज्ञही मान्य करत आहेत.

‘डिसमॅंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’

असे असले तरीही शाश्‍वत सत्य नाकारून आपल्या संकुचित स्वार्थासाठी आणि ती स्वार्थ-साधना ज्यावर अवलंबून आहे ती आपली पुरोगामी प्रतिमा जपण्यासाठी जी मंडळी अहोरात्र आत्म-प्रताडनेतच मग्न राहतात, ही मंडळी देश, परदेशात अद्यापही सक्रिय आहेत. देशात त्यांच्या छद्‌म-पुरोगामित्वाला नरेंद्र मोदी यांनी दिलेले आव्हान त्यांची सर्वव्यापी सद्दी संपुष्टात आणत आहे. त्यामुळेच परदेशातून मायभूमीला वाकुल्या दाखविण्याचे उद्योग त्यांनी उसने आवसान आणून बळेबळे सुरूच ठेवले आहे. ‘डिसमॅंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ हा आता जवळपास ‘डिसमॅंटल’ झालेला या छद्‌म-पुरोगामी मंडळींचा उपक्रम हे त्याचेच उदाहरण!

‘‘कॉल अ डॉग मॅड, अँड देन किल इट’’, अशी इंग्रजी म्हण आहे. ग्लोबल हिंदुत्वाला उद्‌ध्वस्त करू पाहणाऱ्या या चर्चासत्र आयोजकांची भूमिका नेमकी हीच आहे. भारतीय राजकारणात मोदी यांचे पर्व सुरू झाल्यापासून हे वास्तव ज्यांना अजिबातच पचविता आलेले नाही, अशांची अवस्था मुदलातच ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी झालेली आहे. तरीही मधून-मधून ज्यांना हिंदुत्वाचा काठीसारखा वापर करून मोदींवर प्रहार करण्याची उबळ येत असते, त्यापैकीच काही जणांनी मिळून ‘डिसमॅंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या वेबिनारचा घाट घातला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ घातलेल्या या चर्चासत्रात आनंद पटवर्धन, आएशा किडवाई, ख्रिस्तोफर जेफ्रलो, कविता कृष्णमूर्ती ही मोदी-भाजप- रा. स्व. संघ विरोधी फळी बांधणारे नेहमीचे यशस्वी(?) कलाकार आहेत. त्यांची हिंदुत्वविरोधी भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी असे चर्चासत्र आयोजित करण्यात आश्‍चर्यकारक काहीच नाही. तसेच बघायचे तर आक्षेपार्हही नाही; पण ज्याप्रकारे आयोजकांनी अमेरिकेतील ५० विद्यापीठांची बोधचिन्हे वापरून या चर्चासत्राला इतके व्यापक समर्थन असल्याचे खोटे चित्र निर्माण केले ते मात्र सपशेल आक्षेपार्ह ठरले. हार्वड, स्टॅनफर्ड, कॉर्नेल, पिन्स्टन, इलिनॉय अशा ४०-५० विद्यापीठांच्या कुठल्याना कुठल्या विभागाचे सहआयोजकत्व या कार्यक्रमाला लाभल्याच्या संयोजकांच्या दाव्याचे पितळ, हिंदू संघटनांनी विद्यापीठांकडे निषेध नोंदविल्यानंतर आणि विद्यापीठांनी आपला अधिकृत सहभाग नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सपशेल उघडे पडले!

कसली आलीय चिकित्सा?

विद्यापीठांनी कानावर हात ठेवल्यानंतर छद्‌म-पुरोगामी आयोजकांनीही बचावात्मक भूमिका घेतली आहे. आपल्या एका स्पष्टीकरणात्मक पत्रकात आयोजक म्हणतात, ‘‘आमची भूमिका इस्लामद्वेष्टी, द्वेषभावना प्रसारक आणि विविधतेला ‘हिंदूंची मातृभूमी’ या एकारलेल्या शब्दावलीने संबोधणारी अशी जी हिंदुत्व विचारसरणी, तिची चिकित्सा करण्याची आहे’’! म्हणजे ज्या हिंदुत्वाची चिकित्सा करण्याचा आव ही मंडळी आणते, त्याबद्दलचे यांचे निष्कर्ष आधीच तयार आहेत. शिवाय हे ग्लोबल हिंदुत्व ‘डिसमॅंटल’ म्हणजे उद्‌ध्वस्त करण्याचा त्यांचा बेतही आधीपासूनच शिजलेला आहे. अशा स्थितीत कसली आलीय चिकित्सा?

राजीव मल्होत्रा हे जगद्विख्यात लेखक व इंडॉलॉजिस्ट किंवा भारत-विद्येचे जाणकार! त्यांनी या छद्‌म-पुरोगामींनी अमेरिकन अभ्यासक क्षेत्रात हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीसंदर्भात कोणकोणती विकृत प्रमेये प्रस्थापित होऊ दिली, त्याबद्दलचे विस्तृत विवेचन लेखात केले आहे. गणपतीच्या सोंडेबद्दल विकृत प्रतिपादन, भगवद्‌गीतेला ‘अप्रामाणिकतेचे विवेचन’ संबोधून त्या ग्रंथाची निर्भत्सना, प्रभू रामचंद्र आणि सीता यांच्या संदर्भातही आधारहीन आणि तर्कशून्य टिप्पणी करणे असे अनेक उपद्‌व्याप हिंदूविरोधी घटकांकडून अमेरिकन विद्यापीठीय वर्तुळात बरेचदा होतात, हे त्यांचे निरीक्षण उल्लेखनीय आहे.

आपल्या भांडवलशाही धोरणांसाठी प्रसिद्ध अमेरिकेतील ही काही निवडक अभ्यासक मंडळी काही छद्‌म-पुरोगामी भारतीय प्राध्यापकांना हाताशी धरून भारत आणि भारतीय संस्कृतीच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र राबवीत आली आहेत. अशा कारस्थानी प्राध्यापकांनी काही वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठात योजलेल्या चर्चासत्राचे शीर्षक भयावह होते-‘‘ब्राईड बर्निंग अँड सन प्रेफरन्स ट्रॅडिशन्स इन इंडिया’’. जगातील सर्व उपासना पद्धतींमध्ये काळाच्या ओघात काही विकृत चालीरीती निर्माण झाल्या हे सार्वकालिक वास्तव आहे; पण या उपासना पद्धतींमधील विकृतींबद्दलची चर्चा करण्याची हिंमत अमेरिकन विद्यापीठांकडे नाही. भारत, भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म ही त्यांची सॉफ्ट टार्गेट्‌स आहेत. त्यामुळेच इस्लाममधील ‘कुफ्र’ सिद्धांत असो वा जिहादच्या नावाखालील हिंसाचार असो, अफगाणिस्तानातील नरसंहार असो अथवा अन्य इस्लामी देशांतील दडपशाही असो, हे विषय चर्चेसाठी घेण्याची हिंमत अमेरिकन विद्यापीठांनी अपवादानेच दाखविली. अशा वातावरणात अमेरिकन विद्यापीठे ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडून अनेकदा जोगिणींवर होणारे अन्याय वा लहान मुलांचे लैंगिक शोषण अशा संवेदनशील विषयांची खुली अभ्यासपूर्ण चर्चा करतील अशी अपेक्षा ठेवणेही गैर.

या पार्श्‍वभूमीवर हिंदू धर्मावर चार हिंदू प्राध्यापकांकडूनच टीकेचे आसूड ओढणे हे सर्वांत सोपे. हिंदू धर्मावर विवेकहीन आणि निंदा-नालस्तीकारक, विकृत टीका-टिप्पणी करणे हा पुरोगामित्वाच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा पासपोर्ट आहे. भारतात राहणाऱ्या कित्येक बुद्धिवंतांनी तर या प्रदेशाचे इथेच राहून ‘ग्रीन कार्ड’ घेतले आहे. आत्मप्रताडनेच्या प्रवृत्तीचे इतके प्रच्छन्न उदात्तीकरण अन्य देशात क्वचितच होत असेल. मानवतेच्या नावाने गळे काढणाऱ्या अनेक छद्‌म-पुरोगाम्यांच्या ‘डिसमॅंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’च्या या प्रकल्पाचे बोधचिन्हही हिंसक आहे. रा. स्व. संघ स्वयंसेवकांचे निर्मूलन त्यांना अभिप्रेत आहे. अशा बोधचिन्हांमुळे संघाची कोणतीही हानी होणार नसली तरी या सर्व घटनाक्रमामागची व्यापक रणनीती लक्षात न घेणे प्रामाणिक पुरोगाम्यांनाही परवडणार नाही. भरतनाट्यम्‌ असो की रवींद्र संगीत; गणेशोत्सव असो की पुरीची रथयात्रा; बैसाखी असो की ओणम ही सर्व उत्सवी प्रतिके भारतातील सांस्कृतिक भावजीवनाचे अविभाज्य अंग आहे. या सर्वांना काय संबोधायचे त्याबद्दल मतभेद असू शकतात; पण म्हणून या परंपरांचे विकृत प्रतिपादन सहन करणे ही स्वा. सावरकरांनी सांगितलेली ‘सद्‌गुण विकृती’च ठरते. अस्मितेच्या अतिरेकाला आत्मप्रताडनेचा अतिरेक हा उतारा ठरत नाही!

vinays57@gmail.com

loading image
go to top