भाष्य : ‘तोडो’ राजनीतीविरुद्ध ‘जोडो’ यात्रा

कॉंग्रेस पक्षाच्या पुढाकाराने सात सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली असून ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on
Summary

कॉंग्रेस पक्षाच्या पुढाकाराने सात सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली असून ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे.

- विनायक देशमुख

कॉंग्रेस पक्षाच्या पुढाकाराने सात सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली असून ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. ‘या यात्रेचे नेमके उद्दिष्ट काय’, असा प्रश्न माधव भांडारी यांनी ‘दृष्टिकोन’ सदरातील लेखात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतानाच या यात्रेमागची पक्षाची भूमिका विशद करणारा लेख.

काँग्रेसच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ५० दिवसांच्या ‘भारत जोडो पदयात्रे’मध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह ११८ पूर्णवेळ काँग्रेस पदयात्री सहभागी झाले आहेत. राज्याराज्यांत हजारो लोक उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी होत आहेत. एकूण पदयात्रींपैकी एक तृतीयांश महिला भगिनी आहेत. त्यांचे सरासरी वय ३८ वर्षे असून त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पदयात्री पूर्णवेळ सहभागी आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्थांचे अनेक प्रतिनिधी आणि नागरी संघटनांचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले आहेत. ही काही काँग्रेस पक्षाची पदयात्रा नाही. मात्र आर्थिक, सामाजिक व राजकीय पातळीवर देशाला तोडणाऱ्या शक्तींविरुद्ध जनमत जागृत करणाऱ्या या यात्रेत समविचारी व्यक्ती आणि संस्था सहभागी झालेल्या आहेत. दीडशेपेक्षा जास्त दिवस चालणाऱ्या या यात्रेत हे पदयात्री ३५७०पेक्षा जास्त किलोमीटर अंतर चालणार आहेत.

यात्रेला कन्याकुमारीपासून मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून भाजप व त्यांच्या समर्थक अंधभक्तांचे धाबे दणाणले आहे. आयोजकांनी देशापुढील बेरोजगारी व महागाई या समस्यांवर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची भूमिका घेतल्याने आता अंधभक्तांकडून व परिवाराकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘कोणता टी शर्ट घातला’ आणि ‘कोणते शूज घातले’, असे बालीश प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘तुम्ही काँग्रेसवाले ही भारत जोडो यात्रा काढताय; मग आत्ता हा देश तुटलाय का? असा प्रश्न एकाने खोचकपणे विचारला. अशा प्रश्नांना कार्यकर्त्यांनी ठणकावून उत्तर द्यायला हवे. हो, सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि सत्तालोलुपतेमुळे हा देश तुटलाय आणि तोदेखील तीन प्रकारे.

१) देश आर्थिकदृष्ट्या तुटला आहे. २०१४मध्ये भाजपने अनेक खोटी स्वप्ने दाखवून सत्ता हस्तगत केली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, अशी लोणकढी थाप मारली. गोरगरीब जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांची एवढी राष्ट्रव्यापी फसवणूक प्रथमच झाली. प्रचारात अशा गोष्टी बोलाव्या लागतात, असे म्हटले तरी २०१४ ते २०२२ काळातील देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती, नोटबंदीसारखा अविवेकी निर्णय, लहान व्यापारी, व्यावसायिक यांना भरडून टाकणारा जीएसटी यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. २०१४मध्ये ४५० रुपयांना मिळणारा घरगुती वापराचा गॅस. आज त्यासाठी १०५० रु.पेक्षा जास्त पैसै मोजावे लागतात. २०१४मध्ये ६२ रु.लिटर दराने मिळणाऱ्या पेट्रोलदराने शंभरी पार केलीय.

त्यातून सर्वच वस्तूंची महागाई वाढली. देशाच्या प्रगतीचा दावा सरकार करते. पण देशाची प्रगती म्हणजे सामान्य माणसाची प्रगती. प्रत्यक्षात सरकारच्या काही निवडक मित्रांचीच प्रगती झाली आहे! दुसऱ्या बाजूला देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या मात्र २७% पर्यंत पोहचली आहे. आणि म्हणूनच देशातील आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली असून सामान्य नागरिक हा आर्थिक दृष्ट्या तुटला गेला आहे. गरिबातल्या गरीब माणसाकडून देखील सरकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराद्वारे त्याच्या उत्पन्नापैकी ३०% पेक्षा जास्त रक्कम कर म्हणून वसूल करत आहे. त्यामुळे गरिबांचे शोषण करून श्रीमंतांचे खिसे भरणाऱ्या सरकारची ही कृती ब्रिटिश सत्तेच्या शोषणापेक्षाही गंभीर आहे. गरिबीमुळे तुटून पडलेल्या सामान्य माणसाला जोडण्यासाठी ही यात्रा आहे. सरकारने दरवर्षी अडीच कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागील आठ वर्षात नव्या नोकऱ्या तर सोडाच, पण दरवर्षी ४० लाखापेक्षा जास्त लोक बेरोजगार होत आहेत. एकीकडे महागाईचा भस्मासूराने प्रचंड अक्राळविक्राळ रुप धारण केले असतानाच दुसरीकडे बेरोजगारीदेखील ४१% पर्यंत वाढली आहे. अशा परिस्थितीत गरिबांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना,आदिवासी, मागासवर्गीय अशा सर्वांना जोडण्यासाठीच हा ‘भारत जोडो’चा प्रयत्न.

२) स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात प्रथमच देश सामाजिकदृष्ट्याही तुटला आहे. सामाजिक असहिष्णुतेचे वातावरण उच्चतम स्तरावर असून विविध जाती-धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. देशासमोरील मूलभूत ‘बेरोजगारी व महागाई’ यांसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून धार्मिक वादाचे विषय मुद्दाम उकरून काढले जात आहेत. अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या हिंदू ,मुस्लिम, शीख, ख्रिस्ती यांच्यात परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न केला जात आहे. सरकारला असे वाटते, की लोक ‘बेरोजगारी व महागाई’बाबतच्या अपयशाकडे दुर्लक्ष करतील. परंतु या यात्रेद्वारे मोठी जनजागृती होत आहे. त्याच उद्देशाने यात्रेची मार्गक्रमणा सुरू आहे.

३) कधी नव्हे तो आपला देश राजकीयदृष्ट्यादेखील तुटला आहे. खरे तर जगात सर्वात भक्कम लोकशाहीचा मोठा देश म्हणून भारत परिचित आहे. मात्र मागील काही महिन्यांत देशाची घटना आणि घटनात्मक संस्था यांना धक्का देऊन सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. मग सर्वोच्च न्यायालय असो, निवडणूक आयोग असो, प्राप्तिकर खाते असो, ईडीसारखी यंत्रणा असो, वा सीबीआय असो; या सर्वांचा गैरवापर करुन सरकार विरोधकांत दहशत व भय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रसार माध्यमांनाही दडपशाहीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न, लोकांच्या भावना या ना संसदेत मांडता येतात, ना वर्तमानपत्रात मांडता येतात, ना आंदोलनाद्वारे मांडता येतात. ही हुकूमशाहीसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रश्न घेऊन जनतेच्या दारात जाण्याचा एकमेव मार्ग भारत जोडो यात्रेद्वारे स्वीकारला गेला आहे. तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे ही यात्रा देशाच्या दृष्टीने एक परिवर्तनकारी घटना ठरणार आहे.

ही भारत जोडो यात्रा २०२४च्या दृष्टीने Game Changer ठरली तर आश्चर्य वाटू नये. त्यामुळे अंधभक्तांनी आणि त्यांच्या पगारी सोशल मीडियाने कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी देशातील सुजाण नागरिकांनी आता मंदिर, मशीद, धर्म , जात यापेक्षा ‘बेरोजगारी आणि महागाई’बाबत सरकारला प्रश्न विचारण्याचा निर्धार केला आहे. भारताचे सुजाण नागरिक या नात्याने जर आपण आता असे प्रश्न विचारले नाहीत तर पुढील पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त होईल.आजच सामान्य माणसाला, मग तो व्यापारी असो, शेतकरी असो, विद्यार्थी असो, सामान्य नागरिक असो, यांना दैनंदिन जगणे अत्यंत अवघड झाले आहे. महिनाभराच्या उत्पन्नात स्वत:चे कुटुंब चालविताना त्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे आता जागे व्हा आणि देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक अशा ‘भारत जोडो यात्रे’त आपल्या क्षमतेप्रमाणे सहभागी व्हा. अन्यथा भावी पिढी आपणास माफ करणार नाही.

(लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com