चालणे... नव्हे, ध्यान करणे

विश्‍वास सहस्रबुद्धे
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

चालणे ही गोष्ट माणसाच्या जीवनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. दुर्दैवाने सध्या आपण वाहनाच्या आहारी गेलो आहोत. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात चालणे ही गोष्ट आपण आहोत तिथून वाहनापर्यंत आणि वाहन पुढे जाऊच शकत नाही अशा जागेपासून ते इच्छित स्थळापर्यंत, इतपतच उरली आहे. चालण्याचे फायदे सर्वांनाच ठाऊक आहेत. पण चालणे हा ध्यान करण्याचा एक मार्ग आहे.

चालणे ही गोष्ट माणसाच्या जीवनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. दुर्दैवाने सध्या आपण वाहनाच्या आहारी गेलो आहोत. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात चालणे ही गोष्ट आपण आहोत तिथून वाहनापर्यंत आणि वाहन पुढे जाऊच शकत नाही अशा जागेपासून ते इच्छित स्थळापर्यंत, इतपतच उरली आहे. चालण्याचे फायदे सर्वांनाच ठाऊक आहेत. पण चालणे हा ध्यान करण्याचा एक मार्ग आहे.

एखादी दिशा धरावी आणि सटसट चालत सुटावे. पाच-दहा मिनिटांतच चालण्याची लय अंगात भिनते. आपले लक्ष आजूबाजूला असते, नाही असे नाही. पण समोरून येणाऱ्या वाहनांची, रस्त्यातल्या अडथळ्यांची दखल आपण यांत्रिकपणे घेत असतो. हा अनुभव शक्‍यतो कमी रहदारीच्या मार्गावर घेणे श्रेयस्कर. आपले लक्ष आस्तेआस्ते आपोआप आत आत वळते. आपल्या मनात अनेक विचारांच्या झुळुकी येत राहतात आणि जात राहतात. हे घडते ते आपल्या नकळत. आपल्याला त्याची जाणीव होत नसतेच असे नाही; पण गणिताचा पेपर सोडवताना आपण जसे एका गणितावर लक्ष केंद्रित केलेले असते तसे होत नाही. आता मी हा अनुभव तुमच्याशी शेअर करतोय ते मागे वळून पाहताना. आठवून आठवून, विचारपूर्वक. पण त्या वेळी? पाणी जसे वाट मिळेल तिकडे वाहते तसे काहीसे होत असते. चालताना एकेक खुणेची ठिकाणे मागे पडतात. हा सिग्नल गेला, ही बॅंक आली... पण तेवढ्यापुरतेच. हळूहळू अंगावर घामाची कणी फुटायला सुरवात होते. मस्तक सुखद भावनेने भरून जाते.

पावलांमध्ये, पोटऱ्यांमध्ये ‘मीठा मीठा दर्द’ जाणवू लागतो. असे वाटते की हे चालणे संपूच नये. पण दिनक्रमाची बंधने असतात. अमुक वाजता तमुकला भेटायचे असते. पावले माघारी फिरतात. ट्रेकला जातो तेव्हा तर चालणे हा एककलमी कार्यक्रम असतो. तोही अनुभव ध्यानासारखाच. पण त्याची जातकुळी थोडी निराळी. पहिले काही तास केवळ सुख आणि सुखच. ट्रेक हिमालयातला असेल, तर मग विचारायलाच नको; पण थोड्या वेळाने चढणीच्या वाटांमुळे दमछाक व्हायला लागते. आजूबाजूच्या निसर्गसौंदर्यावरची नजर पायवाटेवर खिळते आणि पुन्हा एकदा लक्ष आतमध्ये वळते. चढण संपता संपत नसते. हिमालयात चढण संपणे हा प्रकारच नसतो. एक संपली की दुसरी सुरू. पाय, गुडघे, पाठ, खांदे... सर्वांग बोलायला लागते. पण गंमत अशी की, आतल्या विचारांच्या झुळुकींचे येणे-जाणे सुरूच असते. खरे म्हणजे शारीरिक थकव्याचा सामना करण्याचा तोच एक मार्ग असतो. पण या अवस्थेतही वेगळ्याच सुखाचा एहसास होत असतो. पाना-फुलांचा संमिश्र गंध रुंजी घालत असतो, आकाशाशी स्पर्धा करणारी डोंगरशिखरे माणसाच्या क्षुद्रतेची जाणीव करून देत असतात आणि आपण चालत असतो, बस्स... अशा वेळी कोणाचीही साथ संगत नको असते. आपण आणि फक्त आपण...! ध्यानमग्न...!

Web Title: Vishwas Sahastrabuddhe write on social issue