
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा स्वर्ग अशी अनेक वैशिष्ट्य सामावलेला भारतातील भूभाग म्हणजे कच्छचे रण. नभ धरणीचे मीलन व्हावे अशा क्षितीजाचे जिथे तिथे दर्शन घडणाऱ्या ओसाड रणात पर्यटन ही कल्पनाच अनेकांना हास्यास्पद वाटते. पण अनेक पक्ष्यांचं नंदनवन आणि रान गाढव अर्थातच घुडखर चे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या या रणाने गुजरातच्या पर्यटनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुजरात राज्यात स्थित या रणाचे कच्छचे छोटे रण आणि मोठे रण असे दोन भाग पडतात.
यापैकी छोट्या रणात भारतातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे. १९७२ साली निर्मिती झालेल्या हे वन्यजीव अभयारण्य सुमारे ५००० चौ. किमी. क्षेत्रफळात पसरले आहे. घुडखर च्या संरक्षणासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. या अभयारण्यात अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, उभयचर आणि अनेक प्रजातींचे पक्षी आढळतात. घुडखरचे एकमेव आश्रयस्थान असणारे हे अभयारण्य अनेक स्थलांतरीत पक्ष्यांसाठी जणू स्वर्गच.
इथे आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये घुडखर शिवाय चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, तरस, खोकड, वाळवंटातील खोकड, कोल्हा, इ. प्राणी आढळतात. घुडखर हा इथे आढळणारा चित्तवेधक प्राणी. ‘गुजरातचे जंगली गाढव’ किंवा ‘बलुची जंगली गाढव’ म्हणूनही घुडखरला ओळखले जाते. हा प्राणी अंगापिंडाने अत्यंत मजबूत अतिशय वेगाने धावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कमी होत असलेली संख्या पाहून गुजरात सरकारने त्यांना विशेष संरक्षण दिले. १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शेड्युल १ मध्ये या प्राण्याचा समावेश करण्यात आला. २०१६ च्या आकडेवारीनुसार त्यांची संख्या अतिशय कमी असून हा प्राणी लुप्त होणाच्या मार्गावर आहे. त्यामुळे इथल्या वनविभागातर्फे या प्राण्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्राण्याला पळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन लागते. त्यांचा वेगही तशी ७० ते ८० किमी इतका जास्त असतो. ही जमीन कमी होणे हा त्यांच्यासमोर असलेला सर्वात मोठा धोका आहे. इथल्या भागात मिठागरांची संख्या वाढत चालली आहे. लोकांकडून अभयारण्याच्या क्षेत्रात होत असलेले अतिक्रमण या प्राण्याच्या संख्येला मारक ठरत आहे. त्यामुळे ही मिठागरं अभयारण्याच्या बाहेर कशी जातील या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.
पक्षी निरीक्षकांसाठी छोटे रण हे नंदनवनच आहे. शेकडो प्रजातींचे दुर्मिळ पक्षी एका भागात पाहायला मिळणं ही पक्षीप्रेमींसाठी मेजवानीच आहे. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ नावाचा पक्षी. माळढोक पक्ष्याच्या जातीचा हा पक्षी. हा पक्षी हिवाळ्याच्या मोसमात भारतात स्थलांतर करतो. मुख्यत्वे पाकिस्तानात याची वीण होते आणि मग हा पक्षी त्यानंतर रणात दाखल होतो. नेहमीच्या माळढोक पक्ष्यापेक्षा छोटा असणारा हा पक्षी निसर्गप्रेमींना छोट्या रणाकडे अक्षरशः खेचून आणतो. भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात जसे वाघ बघायला निसर्गप्रेमी जातात त्याचं ओढीने ते छोट्या रणात ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ हा पक्षी पाहायला जातात. याशिवाय अनेक पक्षी या भागाला हिवाळ्यात भेट देतात. इथे त्यांची वीणही होते. या भागात अनेक पक्ष्यांची असंख्य घरटी आहेत. इथे नया तालाब नावाचा तलाव आहे. या तलावावर विविध प्रजातींच्या पक्ष्यांची अगदी रेलचेल असते.
Lesser Whistling Duck, Bar Headed Goose, Common Shelduck, Ruddy Shelduck, Red-Crested Pochard, Common Pochard, Garganey, Gadwall, Eurasian Wigeon, Great Crested Grebe, Lesser Flamingo, Greater Flamingo, Eurasian Thick-knee, Greater Thick-knee, Great White Pelican, Sarus Crane, Demoiselle Crane, Common Crane सारखे असंख्य पक्षी तुम्हाला इथे दिसू शकतील. Lesser Flamingo आणि Greater Flamingo यांची लक्षणीय संख्या हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. यातल्या काही जोड्या इथे रणातच वास्तव्याला आहेत. तर काही आफ्रिकेतून येतात. या पक्ष्यांची वीण मात्र इथेच होते. याशिवाय शिकारी पक्ष्यांची संख्या हेही रणाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Black-wing Kite, Short-toed Eagle, Griffon Vulture, Cinereous Vulture, Indian Spotted Eagle, Greater Spotted Eagle, Imperial Eagle, Steppe Eagle, Tawny Eagle, Golden Eagle, Bonelli’s Eagle, Booted Eagle, Western Marsh Harrier, Hen Harrier, Pallid Harrier, Montagu’s harrier, Osprey, Shikra, Eurasian Sparrow hawk, Black Kite, White-eye Buzzard, Eurasian Buzzard, Long-legged Buzzard, Common Kestrel, Red-necked Falcon, Laggar Falcon, Saker Falcon, Merlin, Eurasian Hobby, Peregrine Falcon असे अनेक शिकारी पक्षी इथल्या परिसंस्थेत समतोल राखून ठेवतात. बजाना खाडी नावाचे रणातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी हे शिकारी पक्षी लक्षणीय संख्येने आहेत. या भागात असलेल्या मोकळ्या मैदानावर हे शिकारी पक्षी मोठ्या संख्येने बसलेले आढळतात. यातले काही शिकारी पक्षी खासकरून काही गरुड जातीचे पक्षी हे स्थलांतरित आणि अतिशय दुर्मिळ आहेत.
याशिवाय रात्रीचे पहारेकरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घुबडांची आणि रातव्यांची संख्याही इथे मोठ्या प्रमाणावर आहे. Grey Nightjar, European Nightjar, Syke’s Nightjar, Indian Nightjar, Savana Nightjar या रातव्यांच्या प्रजाती तर Barn Owl, Spotted Owlet, Eurasian Eagle Owl, Rock Eagle Owl तसेच Short-eared Owl, Pallied Scops Owl सारख्या दुर्मिळ घुबडांच्या प्रजातीही आढळतात. याशिवाय Pied Avocet, Northern Wryneck, Black-rumped Woodpecker, Yellow-crowned Woodpecker, Coppersmith Barbet, Green Bee-eater, Blue-tailed Bee-eater, Blue-cheeked Bee-eater, Common Kingfisher, Pied Kingfisher, Black-capped Kingfisher, Common Woodshrike, Black Drongo सारखे अनेक प्रजातींचे पक्षी रणाचं सौदर्य वाढवतात.
मी गेल्या दहा-बारा वर्षात इथे अनेक पक्षी निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यातले दोन प्रसंग मला आवर्जून नमूद करावेसे वाटतात. बरेचसे शिकारी पक्षी रणात मोकळ्या सपाट भागात तर काही रणातील खडकाळ भागात दिसतात. एकदा आम्ही शिकारी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी खडकाळ भागाजवळ बसलो होतो. समोरचा काही भाग मोकळा सपाट होतं. इथे काही गायबगळे होते. एक गायबगळा मला निपचित पडल्यासारखा वाटला. म्हणून मी डोळ्याला दुर्बीण लावली. माझ्या लक्षात आलं की हा बहुदा जखमी झाला आहे. तेवढ्यात त्याच्या पलीकडे काहीतरी हललं. नीट निरखून पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की पलीकडे एक Peregrine Falcon बसला आहे. आणि मग सगळा प्रकार आमच्या लक्षात आला. या गायबगळ्याला Peregrine Falcon ने जखमी केलं होतं. आणि झालेल्या झटापटीनंतर थोडा दम खायला तो बाजूलाच बसला होता. त्याने आपली शिकार अचूक साधली होती. गायबगळा कोणत्याही क्षणी मरेल अशी स्थिती होती. त्याची अक्षरशः तडफड सुरु होती. त्याने एकदा उडण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पहिला. पण Peregrine Falcon ने त्याला जागचं हलू दिलं नाही. तेवढ्यात आमच्या उजव्या बाजूला मला हालचाल दिसली. जवळच्या मिठागरात काम करणारी चार पाच माणसं त्याच दिशेने येत होती. समोरचा प्रसंगच असा होतं की माझं त्यावरून लक्ष विचलित झालं नव्हतं. त्यामुळे ही माणसं मला जरा उशीरानेच दिसली. त्यामुळे मला त्यांना अगोदर काहीच सांगता आलं नाही. आणि ज्या वेळी मी त्यांना पाहिलं त्यावेळी बराच उशीर झाला होता. ही माणसं गायबगळ्याच्या खूपच जवळ पोचली होती. हा समोरचा प्रसंग त्यांच्या ध्यानीमनीही नव्हता. समोरचे गायबगळे नेहमीचेच याच थाटात त्यांची चाल पुढे पडत होती. माणसं जवळ आल्यावर Peregrine Falcon एकदम दचकला आणि गायबगळ्याला सोडून तो जरासा मागे सरला. याच संधीचा फायदा त्या गायबगळ्याने उचलला आणि होता नव्हता जोर लावून जीवाच्या आकांताने त्याने हवेत झेप घेतली. Peregrine Falcon च्या हातून शिकार निसटली. तिथून निघून जाण्याशिवाय त्या बिचाऱ्याच्या हातात काही नव्हतं.
या एका छोट्या प्रसंगाने मला विचारात पाडलं. मानवी हस्तक्षेप हा रणाला असलेला खूप मोठा धोका आहे. पुरेसे खाद्य, पुरेसे पाणी आणि सुरक्षित जागा याच गोष्टी वन्यजीवांना हव्या असतात. त्याही आपण त्यांच्यापासून हिरावून घेत चाललो आहोत. या गोष्टी नसतील तर स्थलांतरित पक्षीही रणात येणार नाहीत. यावर आपल्यालाच वेळीच उपाययोजना करायला हव्यात.
दुसरा प्रसंग नुसता आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभं राहतो. इथे मेढक नावाची एक जागा आहे. अतिशय दुर्मिळ पक्षी आपल्याला या जागी हमखास बघायला मिळतो. माझ्या अगदी अलीकडच्या रणाच्या भेटीत मी या मेढकला पहिल्यांदा गेलो. हा अत्यंत दुर्मिळ पक्षी म्हणजे Greater hoopoe-lark. उडताना Common Hoopoe ची आठवण करून देणारा पक्षी म्हणून या पक्ष्याला hoopoe-larkअसं नाव पडलं. आमच्या गाईडनी मला या भेटीत हा पक्षी एकदा बघाच अशी गळ घातली. झैनाबाद या आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून मेढक खूप अंतरावर आहे. तरीही हा स्थलांतरित दुर्मिळ पक्षी पाहण्याच्या मोहिमेवर आम्ही निघालो. बरोबर मुसा आणि इक्बाल नावाचे दोन अतिशय निष्णात गाईड होते. सुरवातीला रणातून जाताना माणसं दिसत होती, मिठागरं दिसत होती. अनेक गावं आम्ही मागे टाकली. आणि त्यानंतर मात्र सर्व दिशांना रण दिसायला लागलं. माणसं नावालासुद्धा दिसत नव्हती. वस्तीची आणि रहदारीची बातच नको. आपण कोणत्या दिशेने आलो याचाही मला विसर पडायला लागला. भीतीची लहर शरीरातून एकदा वाहून गेली. दोन्ही गाईडकडे पाहून मी मनाशीच म्हटलं, “नशीब हे दोघं आपल्याबरोबर आहेत.” त्या दोघांचं आपापसात काहीतरी चालू होतं. दोघेही खुसपुसत होते. असंच थोडं पुढे गेल्यावर अचानक मुसाने गाडी थांबवली आणि माझ्याकडे मोर्चा वळवून तो म्हणाला, “साहब हम रास्ता भटक गये हैं | आगे का रास्ता हम दोनोंको याद नही आ रहा |” ते ऐकल्यावर क्षणभर मला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. आळीपाळीने मी दोघांकडेही पाहिलं. माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता. भीतीने शरीरातून वाहणाऱ्या रक्ताची जाणीव करून दिली. मला एकदम सरफरोश चित्रपटातला सुलतानाचा प्रसंग आठवला. चहूकडे वाळवंट आणि उंटावरच्या सुलतानचं मुंडकं उडवणारा जावेद अब्बास माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागले. मी माझ्या थरथरत्या वाणीवर ताबा ठेऊन फक्त एकच शब्द उच्चारला, “अब?” माझी एकंदर स्थिती बघता इक्बालला फार वेळ राहवलं नाही. एकदम हसून तो म्हणाला, “साहब, आप चिंता मत करो, हम मजाक कर रहे थे | हमे रास्ता मालूम हैं |” दोघांनाही खाऊ का गिळू असं मला झालं होतं. ड्रायव्हरला पुढे चलण्याची खुण इक्बालने केली आणि आम्ही पुढे निघालो. पुढच्या प्रवासात मी अनेकदा त्या दोघांकडे संशयाने पाहत होतो. या दोघांना नक्की रस्ता माहित आहे ना या संशयाने. अनेक वर्षांची ओळख आणि स्नेह असल्यामुळे हे दोघेही स्वभावाने अत्यंत गरीब आणि अतिशय विश्वासू आहेत हे मला माहित होतं.
माझ्या मनात चालू असलेली खळबळ मुसाने ओळखली. आणि तो म्हणाला, “साहब आप बिलकुल बेफिकर रहिये | हम सच में मजाक कर रहे थे |” त्याचे हे शब्द ऐकल्यावर माझ्या मनावरचा ताण कमी झाला आणि माझ्या जीवात जीव आला. आणखी थोडं पुढे गेल्यावर आम्हाला वेणूदादाचं मंदिर लागलं. हे कृष्णाचं मंदिर आहे. एवढ्या लांबवर मंदिर कुणी बांधलं आहे आणि इथे कोण येतं हेच मला समजेना. तिथे अनेक बैल मात्र दिसत होते. मुसाने मला मंदिराची माहिती दिली. हे बैल देवाला सोडलेले होते आणि इथे त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पाण्याची चोख व्यवस्था ठेवलेली आहे. तिथून आणखी पुढे गेल्यावर आम्हाला मेढकची टेकडी लागली. आम्ही सरळ त्या टेकडीवर गाडी घातली. इथे आम्हाला दोन hoopoe-lark बघायला मिळाले. अतिशय देखण्या, ऐटबाज पक्ष्याने आमचे सहा तासांचे प्रवासाचे श्रम आणि थरकाप उडवणारा प्रसंग आम्हाला विसरायला लावला. आमच्या परतीच्या प्रवासात मुसा आणि इक्बाल या दोघांनीही पुन्हा झाल्या प्रसंगाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी तो प्रसंग विसरूनही गेलो होतो. पण आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर रोम अन् रोम उभे राहतात.
गेली अनेक वर्ष मी रणात पक्षीनिरीक्षणासाठी जात आहे. मला नेहमीच भुरळ घालणाऱ्या जागांपैकी ही एक जागा. अहमदाबाद पासून सुमारे १०४ किमी अंतरावर असणाऱ्या झैनाबाद या गावात धनराज मलिक नावाच्या माणसाचे ‘डेझर्ट कोर्सर’ नावाचे हॉटेल आहे. इथे पर्यटन चालू करणाऱ्यात धनराज च्या वडिलांचा म्हणजेच शब्बीर यांचा सिंहाचा वाटा आहे. अत्यंत उबदार झोपड्यांच्या स्वरूपातील इथल्या खोल्या आहेत. या हॉटेलच्या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते आणि संपूर्ण हॉटेल पाण्याखाली जाते. त्यामुळे दरवर्षी खोल्यांची डागडुजी करावी लागते. कधी कधी तर काही खोल्या पूर्णपणे बांधाव्या लागतात. खोल्यांच्या भिंती माती आणि शेण यांनी तयार केल्या जातात. या भागातली बहुतेकशी घरं अशीच शेण आणि माती यांनी बनवली जातात. या घरांना ‘बुंगा’ म्हणतात. आमीर खानच्या लगान चित्रपटाचं चित्रीकरण रणाच्या भागातलं आहे. या चित्रपटात दाखवलेली घरं याच पद्धतीने बनवली होती. बाकी दुर्लक्षित राहिलेल्या रणाचं सौंदर्य चंदेरी दुनियेने मात्र अचूक टिपलं. रेफ्युजी, लगान, मगधीरा अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं चित्रीकरण रणात केलेलं आहे.
कासवासारख्या आकारामुळे नावं मिळालेल्या या कच्छच्या रणाचं सौंदर्य अफलातून आहे. अनेक प्रजातीचे पक्षी; सपाट मोकळी जमीन; घुडखर सारखा प्राणी; आपलं अस्तित्व दाखवून देणारे तरस, कोल्हा, खोकड यांसारखे इतर सस्तन प्राणी; hoopoe-lark सारखा दुर्मिळ पक्षी; मॅक्विन्स बस्टर्ड सारखा स्थलांतरीत माळढोक; लक्षणीय संख्येने असलेले शिकारी पक्षी आणि धनराज सारख्या पक्षीवेड्या माणसाचं आदरातिथ्य या सर्वांनी रणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या सगळ्याची सुरक्षा आपल्यावर अवलंबून आहे. या सर्वावर मोठ्या प्रमाणावर अभ्यास होणे गरजेचे आहे. नाहीतर केवळ ओसाड जमीन शिल्लक राहील. पौर्णिमेच्या रात्रीत तर रणाचं सौंदर्य अधिकच खुलतं. चंद्रप्रकाशात चमकणारी पांढरी शुभ्र जमीन पहिली की असं वाटतं की चंद्रच जमिनीवर उतरला आहे. आयुष्यात एकदा तरी कच्छला भेट द्यायलाच हवी. अमिताभ बच्चन यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, “आपने कच्छ नही देखा तो कुछ नही देखा! कुछ दिन तो गुजारो गुजरात में !!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.