कावेबाजांची मैत्री

चीन तैवानवरील हक्क सांगतानाच रशियाच्या युक्रेन युद्धाला छुपा हातभार लावत आहे.
vladimir putin visits china america russia china relationship
vladimir putin visits china america russia china relationshipSakal

अमेरिका या एकध्रुवीय सत्तेला धक्का देणे आणि त्याला कडवे आव्हान उभे करत नवी फळी उभी करणे या मनसुब्याने रशिया-चीन यांच्याकडून सातत्याने आणाभाका घेतल्या जात आहेत. २०३० पर्यंतच्या रशियाच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांनी प्रथमच रशियाबाहेर पाऊल ठेवत, चीनचा दोन दिवसांचा दौरा केला.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचे तडाखेबंद स्वागत करून मैत्रीच्या अभेद्यतेची ग्वाही देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर उभय नेत्यांच्या भेटीगाठी आणि त्यांच्या शिष्टमंडळांमधील वाटाघाटींची माहिती देणारे तीन हजारांवर शब्दांचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.

त्याचा एकूणात सूर हा सामरिक, आर्थिक, संशोधनात्मक, तांत्रिक अशा सर्वच पातळ्यांवर अमेरिकी वर्चस्वाला आव्हान कसे देता येईल हाच आहे. अमेरिकेची वर्चस्ववादी ‘घातक’ भांडवलशाही कशी कार्यरत आहे, याकडे अंगुलीनिर्देश करत रशिया, चीन जगाला एकध्रुवीय अंमलाखालून बाहेर काढू इच्छितात, हे पटवून देण्याचा व्यापक प्रयत्न निवेदनात आहे.

माओ त्से तुंग यांना १९४९मध्ये तत्कालीन सोव्हिएत महासंघाचे सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलिन यांनी भेटीसाठी ताटकळत ठेवले होते. त्या मैत्रीत मिठाचा खडा पडला होता. एवढेच नव्हे तर युद्ध भडकले होते.

तथापि, ते सर्व विसरून उभय देशांच्या मैत्रीपर्वाच्या पंच्याहत्तरीत मैत्रीच्या आणाभाका घेत, त्याला मैत्रीचे ‘नवयुगीन पर्व’, ‘दृढतम मैत्री’ अशा शाब्दिक वेष्टनात बांधून त्याच्या नव्या अध्यायाचा पुनरुच्चार पुतीन-शी जिनपिंग यांनी केला आहे.

‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमाद्वारे चीनचे आफ्रिकेसह युरोपात वर्चस्व वाढवणे आणि नौदलासह लष्कराचे वेगाने आधुनिकीकरण करणे, विस्तारीकरण करणे आणि त्याद्वारे हिंद-प्रशांत क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनने कंबर कसली आहे.

अमेरिकेविरुद्ध व्यापारयुद्धही आरंभले आहे. युरोपीय बाजारपेठ चिनी मालाने कशी खचाखच भरेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शी जिनपिंग यांच्या फ्रान्स, हंगेरी, सर्बियाच्या नेत्यांशी भेटीगाठी नुकत्याच झाल्या.

रशियाचे खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, इंधन, कोळसा इत्यादी नैसर्गिक साधनसंपत्ती चीनला सवलतीत देणे आणि त्या बदल्यात चीनकडून लष्करीसामग्री निर्मितीसाठी साहित्य, तंत्रज्ञानापासून इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, जहाजबांधणी, औद्योगिक उपकरणे, अवजड सामग्री खरेदी करणे असा रशियाचा मनोदय आहे.

त्यांचे चीनवरील अवलंबित्व सर्वार्थाने वाढत आहे. चिनी मालाला हक्काची रशियन बाजारपेठ उपलब्ध होत आहे. रशियाने २०१४मध्ये क्रिमिया ताब्यात घेतल्यापासून पाश्‍चात्य देश, अमेरिकेपासून तो दुरावला.

दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरोधातील युद्धानंतर रशियावर लादलेल्या निर्बंधासह अनेक बाबींमुळे ही दरी रुंदावली आहे. त्यातच गाझावरील इस्त्रायली हल्ले, हमासला केलेले लक्ष्य, यानिमित्ताने इराणसह मुस्लिम देशांमध्ये उसळलेला संताप या सगळ्या बाबींचा (गैर)फायदा उठवत अमेरिकाविरोधी रान तापवण्याचा रशिया-चीन दुकलीचा प्रयत्न आहे.

पन्नास वर्षांपूर्वी ज्या सोव्हिएत संघराज्याला दूर सारून अमेरिकेशी मैत्रीचा नवा अध्याय चीनने सुरू केला होता, त्याच अमेरिकेला लक्ष्य करत, त्याच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यासाठी त्याने रशियाच्या कुबड्या घेत कावेबाजपणे ईप्सित साधण्यासाठी पुतीन यांना लाल गालिचा अंथरला आहे.

सोव्हिएत संघराज्याचे पूर्ववैभव पुन्हा आणण्याच्या इच्छेने पछाडलेले पुतीन त्यामुळेच चीनच्या कच्छपी लागले आहेत. शिवाय युक्रेन युद्धाने रशियन संरक्षण यंत्रणेसह अर्थव्यवस्थेला बसणारे हादरे आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांना चीनशिवाय प्रबळ पर्याय नाही, हेही वास्तव आहे. त्यामुळेच अमेरिकी वर्चस्वाला शह देण्यासाठी एकाधिकारशाही राबवणारी ही जोडी एकत्र येताना दिसते. चीन तैवानवरील हक्क सांगतानाच रशियाच्या युक्रेन युद्धाला छुपा हातभार लावत आहे.

आगामी काळात जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू ‘दक्षिण जग’ म्हणजे हिंद-प्रशांत क्षेत्राकडे वळला आहे. म्हणूनच अमेरिकेच्या पुढाकाराने भारताच्या सहभागाच्या ‘क्वाड’सह ‘ऑकस’ ही संबंधित देशांचा मैत्रीचा सेतू आकाराला आणला आहे. त्यालाही उभय नेत्यांनी टिकेचे लक्ष्य केले. जागतिक ध्रुवीकरणाला नवा आयाम देण्याचा हा प्रयत्न आहे.

तथापि, संरक्षणसज्जतेपासून अनेक बाबतीत रशियाबरोबर असलेले आपले मैत्र आणि त्याची चीनशी वाढती निकटता या मैत्रीत बिब्बा घालू शकते. त्यामुळेच या आणाभाका आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या घडामोडींकडे भारताला अत्यंत सजगतेने आणि दक्षतेने पाहावे लागेल.

युक्रेन युद्धानंतरही आपण रशियाबरोबरील मैत्री अभेद्य राखण्याचा प्रयत्न कसोशीने केला. मात्र, लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली होती, तसा प्रसंग आला तर रशिया कितपत मदतीला येईल, कोणत्या मित्रत्वाचा धर्म कितपत निभावेल, हाही प्रश्‍न आहे.

म्हणूनच ‘रशिया-चीन भाई भाई’ नाऱ्याची किंमत आपल्याला मोजावी लागू नये. प्रामुख्याने संरक्षणसज्जेबाबतचे रशियावरील अवलंबित्व वेगाने कमी करणे, लष्कराच्या आधुनिकीकरणात आत्मनिर्भरतेवर भर देत इतर देशांकडून सामग्रीचा आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा वाढवणे यावर भर द्यावा. हाच आपल्याला धडा म्हणावा लागेल.

तुम्ही जसा विचार करता, तसे तुम्ही होता

— गौतम बुद्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com