esakal | संयमाने मिळवलेला विजय : तमिळनाडू
sakal

बोलून बातमी शोधा

MK Stalin

संयमाने मिळवलेला विजय : तमिळनाडू

sakal_logo
By
वॉल्टर स्कॉट

अण्णा द्रमुकची चुकलेली हॅटट्रिक आणि त्यांच्याऐवजी तमीळ जनतेने एम. के. स्टॅलिन यांना लोकसभेप्रमाणे अग्रक्रमाने दिलेल्या पसंतीने त्यांचे सरकार सत्तेवर आलेले आहे. द्रविडी पक्षांना पर्याय देण्याची भाषा करणारे तीनही विरोधी पक्ष अस्तित्वही दाखवू शकले नाहीत.

तमिळनाडूत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पुन्हा एकदा दोनच पक्षांभोवती राज्याचे राजकारण फिरत असल्याचे सिद्ध झाले आहे. मक्कल निधी मय्यम (एमएनएम), नाम तमीझर काची (एनटीके) आणि आम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (एएमएमके) हे पक्ष रिंगणात उतरले तरी हे चित्र बदललेले नाही. या तीन पक्षांच्या रिंगणात उतरण्याने वरकरणी पंचरंगी लढती दिसल्या तर दोन्हीही प्रमुख द्रविडी पक्षांच्या नेत्यांनीच बाह्या सरसावलेल्या होत्या. द्रमुकचे एकेकाळी सर्वेसर्वा राहिलेले करुणानिधी आणि अण्णा द्रमुकच्या नेत्या जे. जयललिता यांच्याभोवती नेहमी राज्याचे राजकारण फिरायचे. त्यांच्या गैरहजेरीत पहिल्यांदाच राज्य विधानसभेची निवडणूक झाली.

राज्यावर १९६७ पासून दोन प्रमुख द्रविडी पक्षांनी राज्य केले, आता परिवर्तनाची वेळ आहे, असे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न ‘एमएनएम’चे कमल हसन, ‘एनटीके’चे प्रमुख अभिनेते सीमन आणि अण्णा द्रमुकचे बंडखोर टी. टी. व्ही. दिनकरन यांनी आपल्या प्रचारांमध्ये केला. तथापि, त्यांचा प्रभाव दिसला नाही. या दोन्हीही द्रविडी पक्षांनी पाच दशके राज्यावर राज्य केले. त्या दोन्हीही पक्षांना पर्याय तसेच अत्यंत चांगले सरकार आणि प्रशासन देण्यासाठी आम्हाला मत द्या, असा जोगवा विरोधकांनी मागितला. तथापि, या लढतीत हे तीनही पक्ष एका टोकावर फेकले गेले. अखेर दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर द्रविड मुन्नेत्र कळघमने (द्रमुक) राज्यात सर्वाधिक जागा पटकावल्या आणि स्टॅलिन, करुणानिधींचे पुत्र, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

द्रमुकचा विजयाचा वारू

तमिळनाडू विधानसभेच्या २३४ पैकी १५९ जागा पटकावून द्रमुक आणि त्याचे मित्रपक्ष सत्तेवर आले. द्रमुकने १३३ जागा पटकावल्या, यात त्यांच्या उगवता सूर्य चिन्हावर मित्रपक्षाच्या उमेदवारांनी लढवलेल्या जागाही आहेत. २०१९मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत द्रमुकच्या पारड्यात तमिळ जनतेने सर्व जागा टाकल्या होत्या, त्यानंतर दोनच वर्षांत विधानसभाही त्यांच्याकडे गेली आहे. करुणानिधींच्या निधनानंतर झालेल्या या लोकसभेच्या निवडणुकीत द्रमुकने राज्यातील सर्व म्हणजे ३९ लोकसभा मतदारसंघांत विजय संपादला, शिवाय पुदुच्चेरीचीही जागा पटकावली होती. निवडणुका या मुद्दे, सत्ताधारी पक्षाच्या सरकारची कामगिरी आणि आघाडीची बलस्थाने यावर लढल्या जातात. या तिन्हीचेही मिश्रण या निवडणुकीत दिसले.

द्रमुकचा वाढला पसंतीचा टक्का

निवडणुकीसाठी जागावाटप करताना द्रमुक १७०जागा लढवेल, अशी दक्षता स्टॅलिन यांनी घेतली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुकला ३२टक्के मते मिळाली होती, विधानसभा निवडणुकीत यावेळी ३७.७ टक्के मते मिळाली आहेत. डिसेंबर २०१६मध्ये जयललितांचे निधन झाल्यानंतर, सहा महिन्यांत अशी चर्चा सुरू झाली होती की, मुख्यमंत्री इडापल्ली पलानीस्वामी यांचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करू शकेल का? ते त्यांना जड जाईल. शशिकला यांचे पुतणे, टी.टी.व्ही. दिनकरन यांनी अण्णा द्रमुकच्या १८ आमदारांना घेऊन बंडाचे निशाण रोवले होते. तथापि, शंभरवर आमदार सोबत असतानाही द्रमुकने सत्तांतरासाठी हालचाली केल्या नाहीत.

काँग्रेसची बरी कामगिरी

वडील करुणानिधींप्रमाणे राजकीय कौशल्य दाखवत नसल्याबद्दल स्टॅलिन यांच्यावर कडवी टीका झाली. अण्णा द्रमुकचे सरकार बडतर्फ करायला लावून सत्तेवर का आला नाही, अशी विचारणा केली गेली. तथापि, आपण मागच्या दाराने सत्तेवर येणार नाही, संयमाने सत्ता मिळवू, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलाच हादरा बसला होता, त्या तुलनेत या पक्षाने तमिळनाडूत चांगली कामगिरी करून दाखवली, वाट्याला आलेल्या २५ पैकी १८ जागा काँग्रेसने पटकावल्या, त्यामुळे राज्य काँग्रेसमध्ये समाधान आहे. द्रमुक आघाडीतील व्हीसीके, एमडीएमएल आणि डाव्या पक्षांनीही चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

भाजपशी आघाडी भोवली

तमिळनाडूत अण्णा द्रमुक तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असतानाच, त्यांची हॅटट्रिक कशी होणार नाही, यासाठी द्रमुकने व्यूहरचना राबवली. अण्णा द्रमुकने कोरोना साथीवर मात करण्यासाठीचे प्रयत्न, शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर दिलेली कर्जमाफी, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या प्रवेशात ७.५ टक्के जागा राखीव ठेवणे या निर्णयांना घेऊन जनतेसमोर गेले. तथापि, त्याचा जनतेवर प्रभाव पडू शकला नाही.

अण्णा द्रमुकने भारतीय जनता पक्षाशी केलेली आघाडी त्यांना महागात पडली. केंद्रातील भाजप सरकारसमोर या पक्षाने सपशेल शरणागती पत्करल्याची टीकाही झाली. त्याची काहीशी तीव्रता कमी करण्यात पलानीस्वामींना यश आल्यामुळेच त्या पक्षाला ६६ जागा मिळाल्या. त्यांच्या आघाडीतील ‘पीएमके’ला पाच, तर भाजपला चार जागा मिळाल्या.

सीमन तिसऱ्या क्रमांकावर

विद्यमान पक्षांना पर्याय देण्याची भाषा करत रिंगणात उतरलेल्या तीन पक्षांनी पर्याय देण्याचे आश्वासन दिले, तरी त्यांची फारशी दखल मतदारांनी घेतली नाही. सीमन यांच्या नेतृत्वाखालील ‘एनटीके’ने बऱ्यापैकी कामगिरी करून दाखवली आहे. लढवलेल्या २३४पैकी १७२ मतदारसंघांत त्यांच्या पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते (६ टक्के) मिळाली, तथापि ते एकही जागा जिंकू शकले नाहीत. पक्षाला ३०.४७ लाख मते मिळाली, लोकसभेवेळी १६.६४ लाख मते मिळाली होती. ते स्वतः ४८ हजार मते मिळवून चेन्नईतील थिरुवत्रीयूर मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले. जात, पात, धर्म भेदापलीकडे जाऊन विशेषतः तरुणांचीही मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे आगामी काळात ते धोरणे आणि आघाड्या कशा करतात, यावर त्यांच्या पक्षाची वाटचाल असेल. अर्थात, कामकाजात सातत्य महत्त्वाचे आहे.

कमल हसन, दिनकरन अंधारात

अभिनेते कमल हसन यांच्या पक्षाचे उमेदवार ३४ मतदारसंघांत तिसऱ्या स्थानी होते. कोईम्बतूर दक्षिणमधून ते स्वतः रिंगणात होते, ते दुसऱ्या स्थानी राहिले. येथून त्यांना भाजपच्या महिला आघाडीच्या वनाथी श्रीनिवासन यांना हरवले. टी.टी.व्ही. दिनकरन यांचा ‘एएमएमके’ पाचव्या स्थानावर फेकला गेला. २२ मतदारसंघांत पक्ष दुसऱ्या, तर एका मतदारसंघात तिसऱ्या स्थानी राहिला. दिनकरन यांच्या चुलत्या शशिकला काय भूमिका घेतात, यावर त्या पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.

आश्वासनपूर्तता सुरू

स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकचे सरकार आपल्या आशा, आकांक्षा पूर्ण करेल, दिलेल्या आश्वासनांप्रमाणे तमिळनाडूत कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आणेल, स्टॅलिन यांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल केले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला खूप काही मिळेल, असा विश्वास व्यक्त होतो आहे. कोरोनाच्या साथीवर मात करणे हे स्टॅलिन यांच्यासमोर आव्हान आहे. कोरोनाग्रस्त गरिबांना एकाचवेळी ४,००० रुपयांची मदत आणि महिलासाठी एक हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी सत्तेवर येताना दिलेले होते. त्याची कार्यवाही त्यांनी केली आहे.

loading image