पाणीयोजना: राजाची आणि रयतेची !

प्रफुल्ल कदम
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

पाणीसमस्येवर मार्ग काढणं महत्त्वाचं असतं. सव्वाशे वर्षांपूर्वी सावंतवाडीच्या राजांनी जनतेसाठी राबवलेली पाणीयोजना आजही टिकून आहे. अमला रुईया या महिलेनं राजस्थानात सिमेंटचे बंधारे स्वतःचे पैसै खर्च करून आणि लोकसहभागातून उभारले आणि ११५ गावांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविला. या दोन पाणीयोजनांचा वेध...

पाणीसमस्येवर मार्ग काढणं महत्त्वाचं असतं. सव्वाशे वर्षांपूर्वी सावंतवाडीच्या राजांनी जनतेसाठी राबवलेली पाणीयोजना आजही टिकून आहे. अमला रुईया या महिलेनं राजस्थानात सिमेंटचे बंधारे स्वतःचे पैसै खर्च करून आणि लोकसहभागातून उभारले आणि ११५ गावांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविला. या दोन पाणीयोजनांचा वेध...

पाण्याच्या समस्येवर मार्ग काढणाऱ्या विविध यशोगाथांवर नेहमीच चर्चा होत असते. तथापि, इथं ज्या दोन यशोगाथा मी सांगणार आहे त्यावर यापूर्वी फारशी चर्चा झालेली नाही. पाणीसमस्येवर मार्ग काढणाऱ्या या दोन यशोगाथा खूपच वेगळ्या आहेत. यातली एक आहे इतिहासातली आणि एक सध्याच्या काळातली. सव्वाशे वर्षांपूर्वी सावंतवाडीचे राजे भोसले यांनी जनतेसाठी एक विशेष पाणीपुरवठा योजना तयार केली होती. ती पाहण्यासाठी मी ‘केसरी’ या सावंतवाडी तालुक्‍यातील एका गावामध्ये गेलो होतो. १२५ वर्षांपूर्वीची ही पाणीपुरवठा योजना विजेच्या वापराशिवाय आजही यशस्वीपणे चालू आहे, हे पाहिल्यावर कुणीही चकीत होईल. या योजनेला समर्पक नाव द्यायचं झाल्यास ही ‘झरे जोड योजना’ आहे.

कोकणातल्या डोंगरांमध्ये पावसाळ्यानंतर भरपूर झरे वाहत असतात. त्या झऱ्यांना शोधणं, त्या झऱ्याच्या ठिकाणी कुंड बांधणं आणि सर्व कुंडातील पाणी पाइपलाइननं एका कुंडात घेणं आणि ते एकत्रित झालेलं पाणी पाइपच्या सहाय्यानं विहिरीत सोडणं आणि तिथून ते गावापर्यंत पोचवणं असा हा उपक्रम आहे. केसरी गावातली ही योजना सहा झऱ्यांची आहे. त्याचवेळच्या राजांनी स्वतः लक्ष घालून ते झरे शोधले आणि त्यावर कुंड बांधले. झऱ्याच्या तोंडाला जाळ्या बसविल्या आहेत. शेवटचे कुंड ते पहिले कुंड यात ३०० मीटरचं अंतर आहे. या योजनेचं दुसरं मोठं आश्‍चर्य म्हणजे या योजनेसाठी लागणारी सर्व पाइपलाइन त्याकाळी फिनलॅंडवरून आणली आहे. संपूर्ण पाइपलाइन बीड धातूची आहे. आजही सर्व पाइपलाइन सुव्यवस्थित आहे.

राजस्थानमध्ये उभारण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांमुळं नद्यांमध्ये पाणी साठलं आणि त्या प्रवाही झाल्या. जलपूजन केल्यावर अमला रुईया यांना स्थानिक महिलांनी कुंकू लावून अभिवादन केलं.

त्याकाळच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ लाकडी दाराचा बंधारा बनविला आहे. तो पावसाळा आल्यानंतर टाकतात. या विहिरीत आलेले पाणी पाइपनंतर सावंतवाडी शहराला दिलं जातं. केसरी ते सावंतवाडी हे अंतर २० किलोमीटर आहे. पाण्याला उताराच्या बाजूनं घेऊन गेल्यामुळं कुठही विजेचा वापर नाही अथवा इंजिन बसवलेलं नाही. परंतु, पाण्याला खूप प्रेशर आहे. पाइप थोडासा जरी फुटला तर पाणी ४० फुटांपर्यंत वर जाईल. बंधारा ते कुंड तारेचे कुंपण आहे, त्यामुळं जनावरांकडून अथवा माणसांकडून कुंड अस्वच्छ होण्याचा अथवा मोडतोड होण्याचा प्रश्‍न नाही. पाणीपुरवठा योजनेच्या शेजारी करलाई मंदिर आहे. या सर्व मंदिर परिसरात घाण करणं, झाडं तोडणं, चोरी करणं पाप आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता आपोआप तयार झाली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा इतर कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेला अद्याप भेट दिलेली नाही. आज गेल्या १२५ वर्षांपासून ही योजना यशस्वीपणानं चालू आहे. काय म्हणावं या यशोगाथेला? राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य नियोजन याचं हे आदर्श उदाहरण आहे. एकीकडं कोकणात पडणारा प्रचंड पाऊस, वाहणाऱ्या नद्या आणि दुसरीकडं पिण्याच्या पाण्यासाठी डोक्‍यावर घागरी घेऊन डोंगरवाटांनी चालणाऱ्या बायका. हे चित्र पाहिल्यानंतर सावंतवाडीच्या त्या थोर राजाला धन्यवाद दिल्याशिवाय राहवत नाही.

सव्वाशे वर्षांपूर्वी सावंतवाडी संस्थानात तत्कालीन रघुजीराजे भोसले यांनी झऱ्यांचा शोध घेऊन त्यांवर अशी कुंडं बांधली होती. अशा कुंडांच्या शृंखलेद्वारे ते पाणी विहिरीत साठवण्याचा प्रकल्प राबवण्यात आला होता.

आता दुसरी यशोगाथा आहे मुंबई शहरात राहणाऱ्या एका श्रीमंत महिलेची. त्या महिलेचं नाव अमला रुईया. पाण्यासाठी पार मोठं काम केलेली ही व्यक्ती. या व्यक्तीच्या कार्यासंदर्भात मोठा अन्याय झाला असं मला वाटतं. साम्यवाद, समाजवाद, भांडवलशाही हे सामाजिक शास्त्रातील रूढ शब्द श्रीमती रुईया यांच्या कामाकडं पाहताना मला गंमतीचे वाटतात. कारण या श्रीमंत महिलेनं पाण्यासाठी केलेले काम कुठल्याही साम्यवादी किंवा चळवळीतल्या कार्यकर्त्यापेक्षा कमी नाही. स्वखर्चातून आणि लोकसहभागातून त्यांनी राजस्थान व इतर ठिकाणी उभारलेले सिमेंट बंधारे अत्यंत उपयोगी आहेत. श्रीमंतांच्या समाजसेवेत प्रकार आहेत. बऱ्याचवेळा मोठी रक्कम दान करण्यापुरती आणि प्रसंगी त्याची जाहिरात करण्यापुरती अशी समाजसेवा केली जाते. पण स्वतः कामात झोकून देऊन प्रसिद्धीपासून दूर राहून या महिलेनं केलेलं पाण्याबद्दलचं काम अनेक उदार मंडळींना दिशादर्शक आहे. सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाचा परिणाम आणि यशोगाथा पावसानंतर मी स्वतः राजस्थानमधल्या अनेक गावागावांत जाऊन पाहिली आहे. रुईया यांनी राजस्थानमधील भूस्तरांची अनुकूलता लक्षात घेऊन राजस्थानमध्येच ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचं काम केलंय. फेब्रुवारी २०१६ पर्यंत २१६ मोठे बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. यातील प्रत्येक बंधारा खूप मोठ्या पाणीसाठ्याची क्षमता असणारा आहे. काही बंधारे तर महाराष्ट्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापेक्षा (KT weir) खूप मोठ्या क्षमतेचे आहेत. महाराष्ट्रातील कृषी व जलसंधारण विभागानं बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांपेक्षा हे बंधारे नक्कीच मोठ्या क्षमतेचे व चांगल्या गुणवत्तेचे आहेत. हे सर्व बंधारे स्थानिक लाभधारकांच्या प्रत्यक्ष सहभागातून व सहकार्यातून उभारले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये रुईया व देणगीदारांचा सहभाग आठ कोटी रुपयांचा तर लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग २.७५ कोटी रुपये इतका आहे. १०.७५ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या बंधाऱ्यातून केवळ २०१४-१५ या एकाच वर्षामध्ये ४७० कोटी रुपये गावकऱ्यांच्या पदरी पडले आहेत. ही फलनिष्पत्ती अविश्‍वसनीय वाटत असली तरी मी पाहिलेली वस्तुस्थिती आहे. रुईया यांच्या पाण्याच्या कामातून पाऊस पडल्यानंतर ११५ गावांतील १ लाख ५७ हजार लोकसंख्येवर चांगला परिणाम झाला आहे. त्यांचं जीवन समृद्ध झालं आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या कृष्मावती, सोट्टा नदी, रूपारेल, साबी, सरसा, अरवरी, मासुनी, देवती, भागानी, सानवा, जहाजवाली, बसाई, खारंदी, सानवा यासारख्या १६ नद्यांच्या क्षेत्रातील लोक याचा लाभ घेत आहेत. रुईया यांचं जलसंधारणाचं काम मोठ्या प्रमाणात राजस्थानमध्ये असलं तरी त्यांनी महाराष्ट्रात १६ बंधारे, बुंदेलखंडामध्ये २ बंधारे, बिहारमध्ये २ बंधारे आणि हरियानामध्ये १ अशाच पद्धतीने बांधलेले बंधारे आहेत. आज ज्या भागात त्यांनी हे काम केलंय त्या भागात पाऊस पडल्यानंतर पशुधनासाठी आणि शेतीसाठी चांगला फायदा होत आहे. या सर्व कामात रुईया यांना काशिनाथ बिरवडकर, भूपेंद्रसिंह, ललितकुमार, विनोद गुर्जर, रवि भारती, सियाराम मिना, हिरालाल गुर्जर या मंडळींनी चांगली साथ दिली आहे. त्यांपैकी काही प्रकल्पांचे प्रत्यक्ष केलेले मूल्यमापन आणि फलनिष्पत्ती निश्‍चितच कौतुकास्पद आहे. रुईया यांच्यासारख्या व्यक्ती मोठ्या संख्येनं पुढं याव्यात आणि त्यांना काम करण्यासाठी पोषक वातावरण सरकारी यंत्रणाकडून मिळावं, हीच अपेक्षा.

Web Title: Water scheme: the king and the villagers!