भाई, स्कोअर क्या है...?

yashashree pachlag
yashashree pachlag

खरेतर आमच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेदरम्यान दरवर्षी ‘आयपीएल’चे सामने होतात; पण तरीही टीव्हीवर ते पाहिल्याशिवाय राहवत नाही. त्यात जाणारा वेळ गृहीत धरून मग अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागतं. या वेळी ‘आयपीएल’ संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आठवडाभराने देशभर फक्त आणि फक्त क्रिकेटचाच फीव्हर असणार आहे.

भारताला क्रिकेट आणि बॉलिवूड एक करतं असं म्हणतात. खरंतर फक्त क्रिकेटच. कारण बॉलिवूड दक्षिणेत फारसं चालत नाही. क्रिकेट मात्र गल्ली ते दिल्ली आणि काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वच लोकांना आवडतं. गेल्या काही वर्षांत ‘आयपीएल’मुळे नकळत एक वेगळंच सामाजिक अभिसरण देशात घडून आल्याचं दिसतं. आज कोल्हापूर- पुण्यात ‘चेन्नई सुपर किंग्ज’चे फॅन आहेत, तर पंजाबमध्ये ‘मुंबई इंडियन्स’चे. आपापल्या राज्याच्या अस्मितांची धार त्यामुळे कमी होताना दिसते. शिवाय, त्या त्या संघांमुळे त्या त्या भागाची वैशिष्ट्यं देशातील इतर भागांना समजू लागली आहेत. भारत हे संघराज्य आहे. येथे प्रत्येक भूभाग स्वतःची वैशिष्ट्यं, भाषा घेऊन येतो. या सगळ्यांना जोडणारा समान धागा म्हणून गेल्या काही वर्षांत ‘आयपीएल’ महत्त्वाची भूमिका बजावू लागले आहे, असे वाटते. ‘आयपीएल’ हा खेळ आहे की मनोरंजन आहे, यावर वाद होऊ शकेल; पण त्याचा इफेक्‍ट मान्य करायलाच हवा.

यावेळचे ‘आयपीएल’चे सामने पाहताना आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली, ती म्हणजे जवळपास एक- दोन कोटी क्रिकेटप्रेमी मोबाईलमधील ॲपवर या सामन्यांचा आनंद लुटत होते. याचा अर्थच असा की आता देशात ‘डिजिटल रिव्होल्युएशन’ सर्वत्र पोहोचली आहे. लोकांना मोबाईलवर कंटेन्ट पाहायची नवी सवय लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या वेळी ‘आयपीएल’चे सामने ऑनलाइन पाहणं फुकट नव्हतं. याचा अर्थ असा, की लोकांना क्रिकेट बघायला पैसे द्यावे लागतात, ही नवी वस्तुस्थिती माहिती झाली आहे. यामुळे एक महत्त्वाचा फायदा होईल तो म्हणजे ‘ओव्हर द टॉप‘ कंटेन्ट लोकांना पाहायची व त्यासाठी पैसे द्यायची सवय लागेल आणि भविष्यात अनेक नवे स्टार्टअप्स जन्माला येतील. टीव्हीवर कंटेन्ट पाहणं कमी होऊन मनोरंजन करण्याची जबाबदारी मोबाईलवर येऊन पडेल. अनेक जागतिक प्लॅटफॉर्म आज भारतात आले आहेत. पण, ते प्रामुख्याने शहरी भागात मर्यादित आहेत. क्रिकेटचा आसरा घेऊन भारताच्या कानाकोपऱ्यात अगदी खेडोपाडी ऑनलाइन मनोरंजनाची साधनं आता पोहोचली आहेत आणि यापुढेही ती विस्तारत जातील. त्यामुळे समाजाच्या एकूण सोशिओ- पोलिटिकल मांडणीत मोठाच फरक पडणार आहे. गावातील माणूस जास्त अपडेटेड असणार आहे, त्याच्या आकांक्षा वाढणार आहेत. देशात एवढी मोठी ‘लीप ऑफ फेथ’ बदल होण्यास क्रिकेट उपयोगी ठरतंय, ही खरी त्याची ताकद.

परवा ‘आयपीएल’ संपल्यानंतर एक फोटो व्हायरल झाला होता, - ‘आता मुंबई, चेन्नई असे भांडलो असलो, तरी दोन आठवड्यांनी सगळ्यांनी ‘इंडिया इंडिया’ म्हणत एक व्हायचं आहे.’ तो फोटो संपूर्ण देशाच्याच भावना बोलून दाखवत होता. ‘आयपीएल’ मनोरंजन असेल, तर ‘वर्ल्ड कप’ इमोशन आहे. मला ‘वर्ल्ड कप’ म्हणजे इक्वलायजर वाटतो. आपल्या आजूबाजूला जात-पात, धर्म, पैसे यानुसार समाजाची उतरंड ठरवली जाते. पण सामना पाहताना मात्र सगळे फक्त भारतीय असतात. हजारो कोटींचा मालक आणि एखादा गरीबही एकाच पातळीवर येऊन आपला देश जिंकावा म्हणून प्रार्थना करतो. शेजारच्याला ‘स्कोअर क्‍या है’ विचारताना तो कोणत्या जातीचा आहे, यामुळे काही फरक पडत नाही आणि हे महत्त्वाचे आहे. निवडणुकीच्या कालावधीत आपण सगळे एवढे ‘पोलराईज्ड’ झाले आहोत की या सगळ्यांवर उतारा म्हणून आणि देश म्हणून पुन्हा एक होण्यासाठी ‘वर्ल्ड कप’ची गरज आहेच. आपल्या देशातील दुरावलेली मनं जोडण्याची ताकद क्रिकेटमध्ये नक्कीच आहे. या सगळ्यांसाठी क्रिकेट तुझे मन:पूर्वक आभार!
(लेखिका कोल्हापूरमधील अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com