साहित्य संमेलन आणि मूल्यसंघर्ष

साहित्य संमेलन आणि मूल्यसंघर्ष

नयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या बंडखोर लेखिका आहेत. भारताचे संविधान डोक्‍यात घेऊन त्या संघ-भाजपच्या विरोधात सतत लेखन करीत आहेत. मूलभूत मानवाधिकाराच्या प्रस्थापनेसाठी त्या आपल्या ज्वलंत साहित्याची निर्मिती करीत आहेत. स्वातंत्र्य ही त्यांच्या साहित्याची केंद्रप्रतिमा आहे. "सेक्‍युलर भारत' या स्वप्नाची रचना त्या आपल्या साहित्यातून करतात. भारत हा बहुधर्मी देश आहे आणि या सर्व धर्मांना संविधानाने परस्परांचा सन्मान करण्याच्या अटीवर स्वातंत्र्य दिलेले आहे. या सर्व सामंजस्याची गळचेपी करणाऱ्या धर्मांध राजकारणाविरुद्ध सहगल यांची भूमिका आहे. हिंदूराष्ट्रवादाच्या प्रस्थापनेसाठी ज्या हिंस्र असहिष्णुतेने देशभर थैमान घातलेले आहे; त्याच्या मूलभूत प्रतिकाराचे साहित्य सहगल यांनी लिहिले आहे. या सर्व प्रखर मूल्यसंघर्षात त्या संविधानाच्या, लोकशाहीच्या, स्वातंत्र्याच्या आणि सेक्‍युलॅरिझमच्या बाजूने उभ्या आहेत.

यवतमाळ संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून त्यांना निमंत्रित करणे, हा मराठी साहित्याचा गौरव वृद्धिंगत करणाराच भाग होता. पण, निमंत्रण रद्द करणे ही बाब वाङ्‌मयीन असभ्यपणाची परमावधी आहे. हा केवळ सहगल यांचा नाही, तर साहित्यातील संवर्धनशीलतेचाही अपमान आहे. आणि "ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्यांच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्या खुशीने वा उघडपणे देववत नाहीत व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थांनी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही. आता यापुढे आम्ही शूद्र लोक, आम्हास फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापांवर भूलणार नाहीत. सारांश, यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादिअतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही; याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे,' असे म्हणाऱ्या जोतिराव फुलेंच्या क्रांतिदृष्टीचाही अपमान आहे. प्रत्येक नागरिकाला समान आणि न्याय्य-हक्क देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानदृष्टीचाही हा अपमान आहे. आंबेडकरवादी, स्त्रीवादी, मुस्लिम, आदिवासी, भटकेविमुक्त, ग्रामीण अशा सर्वच संविधाननिष्ठ साहित्यप्रवाहांचा अपमान आहे. परिवर्तनासाठी गोळ्या झेलणाऱ्या पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश या सर्व शूर प्रज्ञावंतांच्या कार्याचाही अपमान आहे. नव्याने जागृत झालेल्या प्रत्येक समूहाचा हा अपमान आहे.

हा अपमान करण्याचा उद्धटपणा यवतमाळ संमेलनाचे आयोजक, पालकमंत्री आणि महामंडळ यांनी केला आहे. यामुळे महामंडळाचे वैचारिक दारिद्य्र आणि वाङ्‌मयीन अप्रगल्भपणा याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. वाङ्‌मयीन जबाबदारीचा आणि नैतिकतेचा जो दुष्काळ या सर्वच प्रकरणात जाणवतो, तो भयंकरच आहे. आणि गंभीर मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीचे तो अतोनात नुकसान करणारा आहे. साहित्यक्षेत्राला असे केवळ सत्तानंदी नेतृत्व मिळाले, तर साहित्याचा चेहरा विद्रूप होण्याच्या प्रक्रियेलाच फक्त वेग मिळू शकतो. ते मागल्या अनेक वर्षांपासून लोकांना दिसत आहे. या नेतृत्वाचा पोकळपणा आणि दास्यवृत्ती हे लोक स्वतःच जाहीर करीत आहेत. या निमित्ताने कणा नसलेले शब्द, कृती आणि माणसेही देशाला पाहायला मिळाली आणि सत्तेच्या ताटाखालची मांजरेही सर्वांनाच जवळून पाहता येण्याची संधीही मिळाली. 

सहगल यांचे निमंत्रण रद्द का आणि कोणी केले? वा कोणत्या राजकीय दबावामुळे केले गेले? नयनताराजींचे भाषण सर्वांनाच आता माहीत झालेले आहे आणि ते बीजेपी-संघ यांच्या पायाभूत धोरणाच्या विरोधात आहे. मागील चार-पाच वर्षांपासून मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन आणि स्त्रिया यांच्या संदर्भात जो उच्छाद धर्मांधांनी चालवलेला आहे, इतिहास बदलण्याचे, शहराची -संस्थांची नावे बदलण्याचे जे धर्मनिष्ठ कारस्थान इथे सुरू आहे, ते भारताच्या विविधांगी जीवनधारणेला उद्‌ध्वस्त करणारे आणि मनूप्रामाण्यवादीच आहे.

राजसत्ता धर्माची बटिक झाली आणि साहित्यिक राजसत्तेचे मिंधे झाले की जीवनाचाही आणि साहित्याचाही चेहरा परतंत्र, परावलंबी कसा होतो, तेच केवळ या संमेलनामुळे महाराष्ट्राला दिसले असे नाही, तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रकाशन समितीची रचना शासनाने केली, त्यावरूनही दिसले. सर्वसमावेशकता मोडीत निघत आहे आणि संघनिष्ठा हा कर्तृत्वाचा निकष ठरत आहे, हे संविधानाला अभिप्रेत राजकीय वा सामाजिक आरोग्याचे लक्षण नव्हे.

साहित्यिकांनीही आपला वापर कोणाला करू देऊ नये. प्रतिभेच्या स्वातंत्र्याचे मोल त्यांनीही वृद्धिंगत केले पाहिजे. गंभीर झाले पाहिजे. साहित्यिक धंदेवाईक झाले, ते सांगकामे आणि कणाहीन झाले, तर साहित्यिक कोणाला म्हणावे, असा प्रश्‍न लोकांना पडेल. राजसत्तेच्या पालख्या वाहणाऱ्या आयोजकांच्या गोंधळात खऱ्या साहित्यिकांनी जाऊ नये. हे गोंधळी आदेशानुसार गोंधळ घालीत असतात, त्यामुळे साहित्याचेही आणि जीवनाचेही नुकसान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com