शहाणपणाचे विसर्जन नको...! 

शहाणपणाचे विसर्जन नको...! 

जवळपास संपूर्ण शहर एकाच विचाराने अन आचाराने भारून जाईल, अशी कोणती गोष्ट आहे, असा प्रश्‍न पुण्यात विचाराल तर एकचएक उत्तर येईल... गणेशोत्सव. शहराला उत्साहाने न्हाऊन टाकणाऱ्या या उत्सवाची सांगताही तेवढ्याच जल्लोषी मिरवणुकीने व्हावी, हे उचितच. मात्र गेल्या काही दशकांतील मिरवणुकांकडे नजर टाकली तर या मिरवणुकीतून बहुसंख्यांचा आनंद पाझरण्याऐवजी चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे आणि मिरवणुकीच्या खऱ्या आनंदापासून पुणेकर वंचित राहात असल्याचेच दिसून येते. त्यामुळेच विसर्जन होते आहे ते गणेशमूर्तींचे नव्हे तर शहाणपणाचे...! 

दिवसा खेळांची-देखाव्यांची आरास तर रात्री विद्युतरोषणाई अपेक्षित असते आणि रोषणाईचा खरा आनंद लुटण्यासाठी दुसऱ्या दिवसाचा सूर्य उजाडायच्या आत मिरवणूक संपावी लागते. प्रत्यक्षात मात्र अठ्ठावीस ते तेहतीस या दरम्यानचे तास मिरवणुकीला लागू लागले. मिरवणुकीचा 1951 पर्यंत एकच मार्ग होता, त्या वर्षी दोन मार्ग करण्यात आले तर नंतर लक्ष्मी, केळकर रस्त्याबरोबरच कुमठेकर, टिळक या रस्त्यांवरूनही स्वतंत्र मिरवणूक सुरू झाली. लष्कर, कर्वे रस्त्यावरील मिरवणूक याबरोबरच उपनगरांतील विसर्जन त्या त्या भागातील तळ्यांमध्ये-हौदामध्ये होऊ लागले. तरीही मिरवणुकीचा वेळ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

मिरवणुकीचा प्रचंड वेळ ही आनंद कमी करणारी गेल्या काही दशकांतील महत्त्वाची बाब ठरली. त्यामुळे मिरवणूक नेमकी कधी सुरू करायची, यावरही चर्चा झाली. इतिहासात पाहिले तर दुपारी दोन, तीन, सकाळी अकरा अशा विविध वेळी मिरवणूक सुरू झाली आहे. चार तासांपासून ते साडेतेहतीस तासांपर्यंतचा वेळ वेगवेगळ्या वर्षी या मिरवणुकीला लागलेला आहे. 

मिरवणुकीत 'डॉल्बी'चा अतिरेक होऊ लागला. ध्वनिवर्धकांच्या भिंती रचल्या जाऊ लागल्या. त्यामुळे कानठळ्या बसविणारे आवाज येऊ लागले. ध्वनिप्रदूषण वाढत होते. एकूणच उत्सवातील आवाजाबाबत काही नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली. 'ध्वनिवर्धक वापरताना काटेकोर निर्बंध पाळावेत', असा आदेश उच्च न्यायालयाने 1996 मध्ये दिला होता. त्यानंतर उत्सवात रात्री दहानंतर ध्वनिवर्धकांना बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याविरोधात राज्य सरकारच न्यायालयात गेले आणि रात्री बारापर्यंत ही परवानगी द्यावी, अशी मागणी केली, मात्र 2 सप्टेंबर 2005 ला न्यायालयाने सरकारचा अर्ज फेटाळला. त्यानुसार केवळ गणेशोत्सवच नव्हे तर मोकळ्या जागा, बंदिस्त सभागृहांतही रात्री दहानंतर ध्वनिवर्धक लावता येणार नव्हते. त्याचे तीव्र पडसाद उमटून त्या वर्षी मिरवणुकीत जाळपोळ, दगडफेक झाली. पोलिसांच्या लाठीमारानंतर मिरवणूक काही तास बंद पडली. वर्षातील उत्सवांपैकी काही दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्याचा अधिकार वापरून राज्य सरकार विसर्जन मिरवणुकीसह काही दिवस बारापर्यंतची परवानगी देऊ लागले. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाही रात्री बारानंतर परवानगी नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची दखल घेत रात्रभर पारंपरिक वाद्ये वाजविण्यास सरकारने 2012 च्या सप्टेंबर महिन्यात परवानगी दिली. यांमुळे डॉल्बीचा धुमाकूळ रात्री बारापर्यंत होई आणि सहा तासांच्या 'विश्रांती'नंतर पहाटे सहाला पुन्हा सुरू करण्यात येई. 

केवळ लक्ष्मी किंवा त्या जोडीला असणाऱ्या कुमठेकर, केळकर आणि टिळक रस्त्यांवरील मिरवणुका गणपती मंडळांच्या वाढत्या संख्येला पुरत नाहीत. त्यामुळे प्रत्येक भागातील प्रमुख रस्त्यावर त्या त्या भागातील मिरवणुका काढण्याची वेळ कधीच येऊन उभी ठाकली आहे. प्रश्‍न आहे त्यात पुढाकार कोण घेणार ? लोकमान्यांची पगडी पेलू शकणारे एकही डोके सध्या अस्तित्त्वात नाही, हीच खरी शोकांतिका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com