इंटरनेट ऑफ थिंग्ज (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'सुद्धा होत असतं; पण त्यातसुद्धा त्यांच्या संवादाकरता एक वेगळं स्टॅंडर्ड असावं लागतं. त्यावर सध्या काम चालू आहे. त्यांच्यातली सुरक्षितता वाढावी यासाठीसुद्धा खूप प्रयत्न चालू आहेत.

इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) बहुतांशी उपकरणं "हुशार (Intelligent)' असल्यामुळं त्यांना दिलेली कामं ती स्वत:हून करतात. स्मार्ट डिव्हायसेसना एकदा आपण कुठल्या वेळी काय काम करायचं आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, हे प्रोग्रॅम करून ठेवलं, की त्या त्या वेळेला ती कामं ते आपल्याला करून देतात. एवढंच नव्हे, तर परिस्थिती बदलल्यास स्मार्ट डिव्हायसेस आपले निर्णय स्वत: घेतात. म्हणजेच ती एक्‍स्पर्ट सिस्टिमप्रमाणंही काम करू शकतात. म्हणजे ठराविक सूचनांप्रमाणं ठराविक रिझल्ट्‌स देणं यापेक्षा ती आजूबाजूच्या वातावरणातून आणि परिस्थितीतून शिकतात; त्याप्रमाणं ती आपले प्रोग्रॅम्स बदलतात आणि त्याप्रमाणं कृतीही करतात. त्यामुळे दरवेळी त्यांची कृती आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणं आणि वातावरणाप्रमाणं बदलूही शकते.

इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे पूर्वी ज्या कित्येक गोष्टी आपण करू शकत नव्हतो, त्या करणं आता आपल्याला शक्‍य होतंय. घरच्या सीसीटीव्हीतून घरचा व्हिडिओ सतत आपल्या मोबाईलवर येत असल्यामुळे आपण ऑफिसमध्ये असलो, तरी आपल्या घरी काय चाललेलं आहे, घरात चोर शिरलेला आहे का, हे आपण पाहू शकतो आणि मग घरी खरंच चोर शिरला असेल, तर आपण पोलिसांना फोन करू शकतो. आपण कुठूनही आपल्या घरातली किंवा ऑफिसमधली आपली उपकरणं किंवा डिव्हायसेस चालू किंवा बंद करू शकतो आणि नियंत्रित करू शकतो; आपण न्यूयॉर्कला असलो तरीसुद्धा आपल्या मुंबईतल्या घरातला कॉम्प्युटर चालू/बंद करू शकतो; घरातला हीटर किंवा एसी, गॅस, पंखा अशी उपकरणं चालू/बंद करू करू शकतो, त्यांचा वेग कमी/जास्त करू शकतो.

"इंटरनेट ऑफ थिंग्ज' हा शब्द पहिल्यांदा "प्रॉक्‍टर अँड गॅंम्बल'मध्ये काम करणाऱ्या केव्हिन ऍश्‍टन यानं सन 1999 मध्ये पहिल्यांदा वापरला असं म्हटलं जातं. आज जगात अक्षरश: अब्जावधी उपकरणं इंटरनेटला जोडलेली आहेत आणि दरवर्षी लाखो उपकरणं नव्यानं जोडली जात आहेत. ही सगळी उपकरणं एकमेकांशीसुद्धा जोडलेली असतात आणि प्रत्येकाची सुरक्षेची पातळी वेगवेगळी असते. त्यामधून प्रचंड माहिती निर्माण होत असते. या सगळ्यासाठी लागणारं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हा इंटरनेट ऑफ थिंग्जचाच एक भाग आहे. ही उपकरणं आपल्याला आणि एकमेकांना कित्येक वेळा क्‍लाऊडच्या माध्यमातून संदेश पाठवतात. ही उपकरणं क्‍लाऊडमधल्या सर्व्हर्सना माहिती पाठवतात; ती माहिती तिथं एकत्र केली जाते; तिचं विश्‍लेषण केलं जातं आणि नंतर त्यावर कृती केली जाते. आत्तापर्यंत साधारण दीड ते अडीच हजार कोटी उपकरणं एकमेकांना जोडलेली आहेत, असा एक अंदाज आहे. सन 2020 पर्यंत हा आकडा 5,000 ते 21,200 कोटींपर्यंत जाईल, असं अनेक अभ्यासकांना वाटतं.
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात M to M म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'सुद्धा होत असतं; पण त्यातसुद्धा त्यांच्या संवादाकरता एक वेगळं स्टॅंडर्ड असावं लागतं. त्यावर सध्या काम चालू आहे. त्यांच्यातली सुरक्षितता वाढावी यासाठीसुद्धा खूप प्रयत्न चालू आहेत.

या डिव्हायसेसनी एकमेकांशी बोलावं, म्हणून स्टॅंडर्डस्‌ निर्माण करण्याकरता "क्वालकॉम', "सॅमसंग', "सिस्को' अशा अनेक कंपन्या काम करताहेत. यामध्ये एक तांत्रिक प्रश्‍न आहे तो असा; की ही सगळी डिव्हायसेस जर एकमेकांना जोडली; तर प्रत्येक डिव्हाइसला एक ऍड्रेस लागेल. या इंटरनेटवरच्या ऍड्रेसला आयपी ऍड्रेस असं म्हणतात. हा आयपी ऍड्रेस म्हणजे प्रत्येक डिव्हाईसची एक स्वतंत्र ओळख असते. सन 1981 मध्ये हे आयपीचं व्हर्जन 4 सुरू झालं. आयपीव्ही 4 मध्ये म्हणजे इंटरनेट व्हर्जन 4 मध्ये हा ऍड्रेस 32 बिट्‌सचा असतो; पण त्यामुळे आयपीव्ही 4 मध्ये एकूण उपलब्ध ऍड्रेसेस 232 किंवा साधारणपणे 429.5 कोटी एवढेच असू शकतात. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, इंटरनेटला जोडले गेलेले कॉम्प्युटर्स आणि डिव्हायसेस ज्या वेगानं वाढत आहेत, त्या वेगानं सन 2015मध्येच हे ऍड्रेसेस त्या वेळच्या अस्तित्वात असलेल्या डिव्हायसेसना पुरणार नाहीत आणि त्यामुळे नवीन कॉम्प्युटर्स आणि डिव्हायसेस इंटरनेटला जोडणंच जवळपास अशक्‍य होईल असं वाटायला लागलं. त्यामुळे आयपीव्ही 6 म्हणजे आयपी व्हर्जन 6 चा विचार चालू झाला. यातला आयपी ऍड्रेस 128 बिट्‌सचा असतो. त्यामुळे त्यामध्ये 2128 म्हणजे साधारणपणे 340 वर 36 शून्यं एवढे ऍड्रेसेस आपल्याला निर्माण करता येतात. त्यामुळे यापुढची अनेक वर्षं किंवा दशकं हे ऍड्रेसेस नवीन कॉम्प्युटर्स आणि डिव्हायसेस जोडण्यासाठी पुरतीलस असा एक अंदाज आहे. याचा विचार करून कंपन्यांनी नवीन डिव्हायसेस किंवा इक्विपमेंट्‌स आयपीव्ही 6 लाच कंपॅटिबल बनवायला सुरवात केली आहे.
या आयओटीचे काय फायदे होतील? वैयक्तिक बाबींमध्ये ऍपल वॉच किंवा पेबलसारखी स्मार्ट वॉचेस, फिटनेस ट्रॅकर्स, हार्ट मॉनिटर्स; तसंच आपल्या शरीरावर आणि कपड्यांवर अनेक सेन्सर्स आपल्या अनेक गोष्टी नियंत्रित करत असतील आणि त्याचे रिपोर्टस्‌ सतत आपल्याला दाखवतील आणि त्यात काही गडबड झाली, तर आपल्या डॉक्‍टरलाही कळवतील आणि खूपच गंभीर प्रश्न असेल, तर हॉस्पिटल किंवा ऍम्ब्युलन्स यांनाही आपणहूनच कळवतील!

सार्वजनिक गोष्टींचा विचार करायचा झाला, तर आपल्या घरातल्या गॅस पाईपलाईन किंवा विजेच्या मीटर्सची रीडिंग्ज घ्यायला प्रत्यक्ष कोणी यायची गरज लागणार नाही; मीटरला लावलेले सेन्सर्स आपोआपच विजेच्या किंवा गॅसच्या ऑफिसेसना ही रीडिंग्ज ठराविक तारखेला पाठवतील आणि त्यामुळे आपोआप बिलं तयार होऊ शकतील, आणि आपले पैसे बॅंकेमधून आपोआप कापले जातील. रस्त्यावर कुठं अपघात झाला, तर ते चटकन्‌ कळू शकेल. अपघात टळावा म्हणूनही हे सेन्सर्स आपल्याला मदत करतील, वाहतुकीची कोंडी कुठं आहे हे आपल्याला कळू शकेल. ट्रॅफिक लाईटस्‌ इंटेलिजंट असतील आणि ट्रॅफिक सिग्नलमधला वेळसुद्धा या सेन्सर्सद्वारे नियंत्रित होईल. कचरा गोळा करायची वेळ होईल तेव्हा किंवा कचराकुंडी भरल्यावर इंटेलिजंट कचराकुंड्या महानगरपालिका आणि कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांनाही संदेश पाठवतील. एखाद्या ठिकाणी पोचताना पार्किंग कुठं उपलब्ध आहे याची माहिती आधीच मिळू शकेल. आता प्रत्यक्ष इमारती आणि वास्तूंमध्ये उदाहरणार्थ, सिमेंटमध्ये/बिल्डिंगमध्ये सेन्सर्स लावण्याचे पयत्न चालू आहेत. अनेक वर्षांनी बिल्डिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला, ती तकलादू झाली, तरीसुद्धा त्यातल्या सेन्सर्समुळे त्याविषयी आपल्याला आधीच कळू शकेल. त्यामुळे पूल कोसळणं किंवा घरं पडणं असे प्रसंग खूपच कमी होतील.

सप्लाय चेनमध्ये आयओटीचा खूप उपयोग होईल. आयओटीमुळे आरएफआयडी टॅग्जना आपल्याला दुकानात किंवा एखाद्या मॉलमध्ये किती माल शिल्लक राहिला आहे यावर लक्ष ठेवता येतं. माल एका ठराविक पातळीपेक्षा कमी झाल्यावर पुन्हा नवीन माल घेण्याकरता आपल्याला त्याची माहिती तत्काळ त्या मालाच्या सप्लायरला दिली जाईल. आयओटीमुळे कुठं माल पाठवण्यापूर्वीच त्या मार्गाची परिस्थिती, त्या गोडाऊनपर्यंत लागणारा वेळ, त्या गोडाऊनमध्ये तो माल ठेवायला पुरेशी जागा आहे का नाही, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ आहे का नाही, तिथं पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे की नाही ही सर्व माहिती तो माल पाठववणाऱ्याच्या मोबाईलवर आल्यामुळं ट्रक्‍स, मनुष्यबळ, गोडाऊन्स, वाहतुकीचं कार्यालय या सगळ्यांमध्ये सुसंवाद होऊन चांगलं नियोजन होऊ शकतं. सप्लायर वेगवेगळ्या ट्रक्‍समधून आणि ट्रेन्समधून आपल्या ग्राहकांना वस्तू पुरवतो, तेव्हा सप्लायरचं गोडाऊन, ट्रक्‍स, ट्रेन्स, ग्राहकांचं वेअरहाऊस हे सगळेच इंटरनेटला जोडले असल्यामुळे माल कुठपर्यंत आला आहे, तो केव्हा पोचेल, अशा अनेक गोष्टींवर ग्राहकाला आणि सप्लायरला दोघांनी नियंत्रण ठेवता येईल.

आयओटी शेतीमध्ये पाणी कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, कुठं खतांची गरज आहे, हे तिथं बसवलेले सेन्सर्स आपल्याला पाठवत असलेल्या संदेशांमुळे कळू शकतं. आत्ताची हवामानाची स्थिती काय आहे, त्यामुळे कुठली पिकं, केव्हा घ्यावीत हे सर्व आपण ठरवू शकतो.

सेन्सर्समुळे जोखीम कुठं जास्त आहे हे आणि आरोग्यापासून, आग लागण्यापासून ते अनेक संकटं येण्यापर्यंत, या सगळ्या संकटांची चाहूल लागणं आणि त्यांची शक्‍यता तपासणं, हे शक्‍य होणार आहे. त्यामुळे इन्श्‍युरन्स कंपन्यांना याचा मोठा फायदा होईल. आयओटी दूध, भाज्या अशा गोष्टी योग्य वेळी वापरल्या गेल्यामुळे खराब होऊन वाया जाणं टळेल. कच्चा माल जेवढा पाहिजे तेवढाच स्टोअरमध्ये ठेवला जाईल किंवा उत्पादन करताना जो माल वाया जातो तो कमी होईल; मशीन्स आणि सिस्टिम्सच्या ब्रेक डाऊनविषयी अगोदरच अंदाज आलेला असेल. या सगळ्यामुळे कंपन्यांचा नफा खूप वाढेल; पण या सगळ्यामुळे स्टोअरमध्ये प्रत्यक्ष जाऊन माल मोजणारे लोक किंवा उत्पादन कसं चाललंय यावर देखरेख ठेवणारे लोक, युटिलिटी मीटर्स घरोघरी जाऊन मोजणारे लोक, मोटार चालवणारे ड्रायव्हर्स असे हजारो, लाखो जॉब्ज यामुळे उद्याच्या जगात नष्ट होतील.

थोडक्‍यात म्हणजे आयओटीचे असंख्य उपयोग आहेत; पण हे सगळं करत असताना सिक्‍युरिटी (सुरक्षितता) आणि प्रायव्हसी (गुप्तता) यांची काळजी घेणं आवश्‍यक आहे. कारण, उदाहरणार्थ आपण एखादं क्रेडिट कार्ड वापरतो, तेव्हा आपण आपली माहिती स्वत:हून देत असतो; पण उद्याच्या आयओटीमध्ये आपल्या नकळत अनेक सेन्सर्स आपल्याविषयीची माहिती क्‍लाऊडमध्ये देत असतील. त्यामुळे ती इतर कोणी वाईट हेतूसाठी वापरत नाही ना याची काळजी घेणं गरजेचं असतं.

इंटरनेट ऑफ थिंग्जची बाजारपेठ एप्रिल 2015 मध्ये नव्वद हजार कोटी डॉलर इतकी होती. ती सन 2024 पर्यंत 4.3 लाख कोटी डॉलर डॉलर्स असेल, असा एक अंदाज आहे. काही लोकांच्या अंदाजानुसार, ही किंमत कित्येक देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नांपेक्षा जास्त आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com