काळ बदललाय... दुसरं काय! (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalamkar009@gmail.com
रविवार, 12 मे 2019

लग्न लावताना शेवटचं मंगलाष्टक संपल्याबरोबर मंडपात एकच गदारोळ माजतो. जेवणाची व्यवस्था दुसरीकडं केलेली असेल तर त्या बाजूला जणू माणसांचं धरणच फुटतं! बसल्याजागी व्यवस्था असेल तर लग्न लावतानाच अनेकजण सोईची जागा हेरून बसतात. "आपल्या लोकांना शिस्त नाही' हा आरोप अशा वेळी अगदीच चुकीचा वाटतो! कारण, मंडपात एवढा हलकल्लोळ माजलेला असताना आपले लोक जेवणासाठी किती शिस्तीत रांग करून बसलेले दिसतात. विशेष म्हणजे या ठिकाणी शाळेतल्यासारखे छडीचा धाक दाखवत "रांग करा रे' असं ओरडायला खेळाचे शिक्षक नसतात, तरी दोन्ही बाजूंना सरळ रांगा करून वाढप्याला मधली जागा सोडण्याची शिस्त लोक कशी झटकन दाखवतात.

लग्न लावताना शेवटचं मंगलाष्टक संपल्याबरोबर मंडपात एकच गदारोळ माजतो. जेवणाची व्यवस्था दुसरीकडं केलेली असेल तर त्या बाजूला जणू माणसांचं धरणच फुटतं! बसल्याजागी व्यवस्था असेल तर लग्न लावतानाच अनेकजण सोईची जागा हेरून बसतात. "आपल्या लोकांना शिस्त नाही' हा आरोप अशा वेळी अगदीच चुकीचा वाटतो! कारण, मंडपात एवढा हलकल्लोळ माजलेला असताना आपले लोक जेवणासाठी किती शिस्तीत रांग करून बसलेले दिसतात. विशेष म्हणजे या ठिकाणी शाळेतल्यासारखे छडीचा धाक दाखवत "रांग करा रे' असं ओरडायला खेळाचे शिक्षक नसतात, तरी दोन्ही बाजूंना सरळ रांगा करून वाढप्याला मधली जागा सोडण्याची शिस्त लोक कशी झटकन दाखवतात. लग्नाला आलेलं महिलामंडळ त्यांच्या या शिस्तीनं आपोआप मंडपाबाहेर फेकलं जातं. पूर्वी लग्न मुलीच्या दारातच लावलं जायचं. म्हणजे अगदी निमुळती गल्ली असली तरी तिथंच मंडप टाकला जायचा. लग्नातही तीन नाही तर चार असे मोजकेच पदार्थ असायचे. त्या वेळी गॅस सिलिंडर हा प्रकार अगदीच दुर्मिळ होता. कुठंतरी सोईची जागा पाहून पिंडीच्या आकाराचा खड्डा खांदला जायचा. त्याला "चुलंगण' असं म्हटलं जायचं. त्यावर आचारी दोन पहारी ठेवून भली मोठी कढई मांडायचे. सुकलेल्या लाकडांचा जाळ खालून लावला जायचा. कुणाच्या लग्नाचा स्वयंपाक असेल तर मदतीला आख्खं गाव लोटायचं. काही लोक पाणी आणायचे, काही गुळाच्या ढेपी फोडायचे. कढईत गुळाचा पाक करून त्यात गव्हाचा भरडा सोडला जायचा. यातून "लापशी' नावाचा चविष्ट पदार्थ तयार व्हायचा. नवरीच्या बापाची परिस्थिती चांगली असेल तर त्यात गावरान तूप, खोबऱ्याचे काप मुबलक प्रमाणात टाकले जायचे. दुसरा पदार्थ पांढरा भात आणि सांबर, कढी किंवा आमटी! काळ्या मसाल्याच्या आमटीला "सार' असं म्हटलं जायचं. इकडं पंगती बसल्या की साराच्या कढईजवळ एक जाणता बाप्या माणूस पाण्याची बादली घेऊन सावधपणे उभा असायचा. मोठी पंगत बसली, आता सार पुरणार नाही, याचा अंदाज आल्याबरोबर तो दोन-तीन बादल्या पाणी सारात ओतून द्यायचा. पंगतीत बसलेल्यांना या गोष्टीचा पत्ताही नसे. तरी सार चवीनं भुरकण्याचं काम जोरात सुरू असायचं. आलेलं वऱ्हाड जेवल्याशिवाय गावातल्या इतर कुणी जेवायचं नाही असा शिरस्ता होता. वाढपी मंडळी गावातलीच असायची. कितीही मोठ्या पंगती बसल्या तरी वाढपी कमी पडत नसत. लग्न शक्‍यतो दुपारी असे. त्यामुळे जेवताना कडक ऊन्ह पडून वारा सुटलेला असायचा. सर्वत्र धूळ उडायची. त्यातच वाढपी लापशी, भात यांची घमेली घेऊन पळायचे. कुणाला कुठला पदार्थ मिळाला नाही हे पाहत बाप्यामाणसं पंगतभर फिरायची. सार द्रोणात दिलं जायचं. सार आवडलेलं असायचं. मात्र, द्रोण उचलून साराचा भुरका मारण्याची सोय नव्हती. तरी भुरक्‍याच्या मोहात पडून कुणी द्रोण उचलायलं गेलंच तर त्या लेच्यापेच्या द्रोणाच्या मधल्या फटींमधून साराचं "विसर्जन' व्हायचं आणि सगळं सार खालची माती पिऊन टाकायची! लग्न एकाचं, आग्रह करणारा दुसरा आणि खाणारा तिसराच अशी अवस्था पंगतीत असायची.

आपल्या पोटाला नेमकं किती अन्न लागतं याचा अंदाज आजही भारतीय माणसाला येत नाही. ताटात भरभरून घेतलं जातं आणि ते तसंच उष्टं ठेवून माणसं उठतात. बहुतेक स्त्रिया घरूनच ताट, थाळा आणि तांब्या घेऊन जेवायला यायच्या. शक्‍यतो पंगतीच्या तिथं न जेवता थाळ्यात लापशी, भात आणि तांब्यात सार घेऊन ताट पदराखाली व्यवस्थित झाकून घरी घेऊन यायच्या. लापशी उरली तर ती कापडावर पसरून उन्हात वाळत घातली जायची. लापशीत अपवादानंच दिसणारा खोबऱ्याचा एखादा तुकडा खायला आमची झुंबड उडायची. लग्नात शिरा-पुरी आणि भाजी केल्यावर "सैपाक लई भारी व्हता' असं वाक्‍य कानी पडायचं. इतक्‍या मोठ्या वऱ्हाडासाठी पुऱ्या लाटणं हे जिकिरीचं काम असायचं. मग गावातल्या स्त्रिया एकत्र यायच्या. पिठाचा उंडा गुडघ्यावर ठेवून त्यावर जोरात तळहात मारला की पुरी तयार! पोळपाट-लाटण्याचा वापर न करता शेकडो पुऱ्या अशा जलदपणे तयार करण्याचा हा अफलातून शोध गरजेतून लागला असावा. नंतर लापशीची जागा साखरेच्या शिऱ्यानं घेतली. संगतीला पुरी-भाजीही आली. पुढच्या काळात शिऱ्याला खो देऊन पिवळ्या बुंदीनं पत्रावळीत जम बसवला. हळूहळू पत्रावळीत खो खोचा खेळच जणू सुरू झाला आणि पदार्थांची रेलचेल दिसू लागली. जेवणात पदार्थ किती आहेत याचा संबंध वधूपित्याच्या प्रतिष्ठेशी जोडला गेला. "गावात कुणीच दिलं नाही असं जेवण मी देणार' असं म्हणत पोरीचा बाप शिरावर जास्तीचे कर्ज घेऊन आणि वरकरणी प्रतिष्ठेची झूल घेऊन फिरू लागला. कोण आलं, जेवून गेलं, किती अन्न वाया गेलं याचा हिशेब राहिला नाही. भरपेट जेवणारे तृप्तीचा ढेकर देऊ लागले, तर अन्नदात्याला कर्जांच्या हप्त्यांचे ढेकरावर ढेकर येऊ लागले. आजही या परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. दिवस सरत गेले तशा जेवणाच्या बैठकीच्या पद्धती मात्र बदलत गेल्या. पूर्वीच्या काळी दिसेल त्या जागी ऐसपैस बसून माणसं पंगत धरून जेवायची. नंतर टेबल-खुर्ची आली. मला आठवतंय, आमच्या गावचं वऱ्हाड एकदा शहरात गेलं होतं तेव्हा "जेवणासाठी टेबल-खुर्च्या असतात' हे आम्हाला पहिल्यांदा समजलं. आम्ही सारे मंगलकार्यालयात टेबलाच्या दोन्ही बाजूंनी खुर्च्या मांडून बसलो. शेवटी, आमच्या रांगेला उठावं लागलं तेव्हा आम्ही खुर्च्या बुडाला चिकटल्यासारख्या धरून कार्यालयात मोकळं टेबल शोधत बराच वेळ इकडं-तिकडं धावत होतो. नंतरच्या काळात "बुफे' आलं. काटे-चमचे आले. सवय नसल्यानं काट्यानं जेवायचं म्हणजे अंगावर काटा उभा राहू लागला. उभ्यानं जेवण्याची पद्धत सुरू झाली. पूर्वी "आमच्या लग्नात इतक्‍या पंगती उठल्या' असं म्हणायची सोय होती. आता उभ्यानंच पंगती सुरू झाल्यानं तसं म्हणायची सोय राहिली नाही. चेष्टा-मस्करी, आग्रह करणाऱ्या पंगती मोडल्या. जो प्रेमानं वागायचा त्याच्या लग्नात मदतीला गाव धावायचं. माणसांना माणसांची गरज होती. नंतर भाडोत्रीयुग आलं. सारं भाड्यानं मिळू लागलं.
परवा एका लग्नाला गेलो होतो तेव्हा एक मुलगा प्रवेशद्वाराजवळ उभा होता. गंध लावण्याचं काम त्याच्याकडं होतं. कपाळाला जणू काही छिद्र पाडायचंय अशा आविर्भावात त्यानं माझ्या कपाळावर एकदम जोरात गंधाचं बोट टेकवलं. त्या गंध लावण्यात आपुलकी, आदर, स्वागत अशी कुठलीच भावना नव्हती. त्याचा तरी काय दोष म्हणा! तो बिचारा भाडोत्री होता. आजकाल असं सारंच भाडोत्री तत्त्वावर मिळतं. काही माणसं लग्नकार्यापुरती नातलगांशी, समाजाशी संबंध ठेवतात. कार्य आटोपलं की पुन्हा स्वतःच्या कोषात जातात. कुणाला कुणाच्या कसल्याही मदतीची गरज राहिलेली नाही. काही दिवसांनी असंही घडेल की मुलीला वाटे लावताना खोटं खोटं का होईना रडण्यासाठी मुलीही भाड्यानं आणाव्या लागतील! सुस्कारा सोडत आपण फक्त म्हणायचं ः "काळ बदललाय...दुसरं काय!'