दुर्दैवी आघात बॉम्बस्फोटांचे...

नॉर्थ आयर्लंडच्या आयर्लंड रिव्होल्यूशनरी आर्मीने १९८२ मध्ये २० जुलैला बकिंगहॅम राजवाड्यानजीक असलेल्या हाईड पार्कमध्ये खुद्द राणीच्याच शरीररक्षकांवर आणि त्यांच्या घोड्यांवर बॉम्बहल्ला
20 July 1982 Irish Revolutionary Army of Northern Ireland bombed Queen bodyguards and their horses Hyde Park Buckingham Palace
20 July 1982 Irish Revolutionary Army of Northern Ireland bombed Queen bodyguards and their horses Hyde Park Buckingham Palacesakal
Summary

नॉर्थ आयर्लंडच्या आयर्लंड रिव्होल्यूशनरी आर्मीने १९८२ मध्ये २० जुलैला बकिंगहॅम राजवाड्यानजीक असलेल्या हाईड पार्कमध्ये खुद्द राणीच्याच शरीररक्षकांवर आणि त्यांच्या घोड्यांवर बॉम्बहल्ला

वेल्ली थेवर

नॉर्थ आयर्लंडच्या आयर्लंड रिव्होल्यूशनरी आर्मीने १९८२ मध्ये २० जुलैला बकिंगहॅम राजवाड्यानजीक असलेल्या हाईड पार्कमध्ये खुद्द राणीच्याच शरीररक्षकांवर आणि त्यांच्या घोड्यांवर बॉम्बहल्ला केला.

सगळ्या जगाचं जास्तीत जास्त लक्ष आपल्याकडे वेधून घेणे हाच या हल्ल्यामागचा मुख्य हेतू होता. अपेक्षेप्रमाणेच जगभरातून या हल्ल्याचा कडाडून निषेध झाला. ब्रिटिश साम्राज्याच्या सर्वश्रेष्ठ प्रतीकावर प्रत्यक्ष त्याच्या आवारात जाऊन बॉम्बहल्ला करून दहशतवादाचा डोळे दिपवणारा चमत्कार आपण जगाला दाखवत आहोत अशीच या संघटनेची भावना होती.

जवळपास दशकभरानंतर १९९३ मध्ये १२ मार्चला टायगर मेमन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अब्दुल रझाक मेमनने मुंबईत नेमका असाच प्रयत्न केला. मूळचा स्मगलर असलेला मेमन दहशतवादी बनला होता. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी, त्याने आणि त्याच्या इकडून तिकडून जमवलेल्या साथीदारांनी मिळून मुंबईच्या सामर्थ्याची सर्वश्रेष्ठ मानचिन्हं निवडली.

यातला पहिला बॉम्बस्फोट जेवणाच्या सुट्टीच्या वेळी मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये झाला. मुंबईच्या आर्थिक प्रभुत्वाच्या महान प्रतीकालाच पहिला हादरा बसला. त्यानंतर काही मिनिटातच एअर इंडियाची इमारत हादरली.

वरळीतील सेंचुरी बाजार जवळ बॉम्बस्फोट होत असताना बेस्टची एक डबल डेकर बस अगदी जवळच उभी होती. क्षणार्धात ती भस्मसात झाली. त्या बसची किंवा तिच्यात बसलेल्या ९० प्रवाशांची नामोनिशाणीसुद्धा राहिली नाही.

न्यू यॉर्कच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटर वरचा तो ७/११ चा हल्ला खूप नंतर झाला. त्यापूर्वी अनेक वर्षे १२ मार्च, ९३ चे हे मुंबई बॉम्बस्फोटच जगातील एक सर्वाधिक भीषण दहशतवादी कृत्य मानले जात होते. या स्फोटांचे प्रमाण आणि तीव्रताच तशी होती. कार आणि स्कूटरमध्ये ठेवलेल्या या बॉम्बमध्ये ३०० किलोपेक्षाही जास्त आर.डी.एक्स. वापरले गेले होते.

प्राची वर्तक नावाच्या मुलीची हृदयविदारक कहाणी मला आठवते. प्राची ईस्ट वेस्ट एअर लाईन्स मध्ये नुकतीच एअरहोस्टेस म्हणून नोकरीला लागलेली होती. विशाखापट्टणमच्या आपल्या पहिल्याच उड्डाणानंतर संध्या नावाच्या दुसऱ्या एका एअरहोस्टेससह ती आपल्या कंपनीच्या कारमधून घरी परतत होती. वरळी येथे झालेल्या स्फोटात तिची कार सापडली.

राजन नावाचा कारचा ड्रायव्हर जागीच ठार झाला. कार तर ओळखूच येणार नाही अशी छिन्नविच्छिन्न झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी परळच्या किंग एडवर्ड इस्पितळात प्राचीने अखेरचा श्वास घेतला. संध्या मात्र आश्चर्यकारकरित्या बचावली. तिला किरकोळ दुखापती

वगळता फारसे काही झाले नव्हते. वरळीतील प्रादेशिक पासपोर्ट कचेरीजवळचा हा स्फोट या बारा स्फोटात सर्वाधिक प्राणघातक ठरला. त्यात ११३ जण बळी गेले तर २२७ लोक जखमी झाले.

दहशतवादी कृत्यांमुळे ज्यांना आपले प्रियजन गमवावे लागतात त्या कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ्य या मरणतांडवामुळे उलटेपालटे होऊन जाते. गेल्या तीन दशकांत १२ मार्च , ९३ च्या बॉम्बस्फोटाबद्दल खूप काही लिहिले आणि बोलले गेलेले आहे. तरीही त्यासंदर्भात मी भेटू शकलेल्या एका कुटुंबाबद्दल आज इथं सांगावंच असं मला वाटतं.

या कुटुंबातील मुलांचे आईवडील एअर इंडिया इमारतीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडले होते. दक्षिण मुंबईतील विविध उद्योगांचे केंद्र असलेल्या परिसरात, सागरकिनारी उभी असलेली एअर इंडियाची इमारत ही एके काळी नरिमन पॉईंटमधील महत्त्वाची खूण मानली जात असे.

त्या दिवशी शकुंतला आणि तुकाराम सोरटे हे दाम्पत्य अशोक चतुर्वेदी या आपल्या जुन्या कौटुंबिक मित्राला भेटण्यासाठी एअर इंडिया इमारतीच्या समोरच्या आवारात आले होते. त्याचवेळी बॉम्बस्फोट झाला आणि हे तिघेही त्यात गंभीर रित्या जखमी झाले. आसपासच्या भांबावलेल्या माणसांनी त्यांना उचलले आणि जवळच असलेल्या एका ॲम्बॅसेडर कारमध्ये आणून ठेवले.

बराच काळ ते तिथे त्या कारमध्येच विव्हळत, तडफडत पडून राहिले. कारचा ड्रायव्हर सैरभैर होऊन नुसत्याच येरझाऱ्या घालत होता. तेव्हढ्यात क्लिफर्ड नावाचा एक माणूस देवदूतासारखा तिथे आला. नरिमन पॉईंट वरील एअर इंडिया इमारतीच्या शेजारीच असलेल्या ओबेरॉय हॉटेल मध्ये हे क्लिफर्ड कामाला होते.

वेळ न दवडता श्री. क्लिफर्ड या सोरटे दाम्पत्याला बॉंबे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांचा फोन नंबरही त्यांनी टिपून घेतला. मृत्यूच्या दाराशी उभे असतानाही तुकाराम सोरटे यांनी प्रसंगावधान दाखवत क्लिफर्डना आपल्या कुटुंबीयांचीही नावे आणि फोन नंबर्स लिहून घ्यायला सांगितलं.

सत्तावन्न वर्षांचे तुकाराम सोरटे मुंबई महापालिकेत नोकरी करत होते. त्यांच्या पत्नी शकुंतला याही सॉल्ट डिपार्टमेंट मध्ये क्लार्क म्हणून काम करत होत्या. त्यांची सर्वांत मोठी मुलगी नम्रता वीस वर्षाची होती तर सर्वांत धाकटी मुलगी किशोरवयीन होती.

मुलगाही थोडा मोठा पण किशोरवयीनच होता. त्या १२ मार्चला नम्रताला क्लिफर्ड यांचा फोन आला तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. बॉम्बस्फोटात तिचे आईवडील जखमी झाल्याचे ऐकून ती सुन्नच झाली. कानावर पडलेल्या गोष्टीचा नीट अर्थच तिला लावता येईना. तरीही मृत्यूची शंका काही तिच्या मनाला शिवली नाही. तिच्या शेजाऱ्यांनी शहाणपणा दाखवला.

या मुलांना बरोबर न घेताच ते हॉस्पिटलकडे धावले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ तारखेला नम्रता हॉस्पिटलवर गेली तेव्हा तिचे वडील या जगात राहिले नव्हते. वडिलांच्या मृत्यूची बातमी आईला कळली तर ती कोलमडून पडेल या भीतीपोटी त्या दिवशी नम्रता आईसमोर गेलीच नाही. तिला वाटलं की आई यातून बरी झाली की मगच ही दुष्ट वार्ता तिच्या कानी घालावी.

नंतर नम्रता मला सांगत होती, "ज्या दिवशी वडिलांना अग्नी दिला त्याच दिवशी ते आईच्या स्वप्नात आले होते." शकुंतला शुद्धीवर होत्या. आपले सगळे दागिने अंगावरून काढून सुरक्षित रहावेत म्हणून ते तिथल्या नर्सकडे देताना त्या तिला म्हणाल्या होत्या , “ मला माहीत आहे माझे पती गेलेत. ते माझ्या स्वप्नात आले होते. मी इथंच राहणार की आपल्याबरोबर येणार असे ते मला विचारत होते.”

दुसऱ्या दिवशी आईला भेटण्याचं धैर्य नम्रतानं एकवटलं. त्या दिवशी तिच्या आईवडिलांच्या विवाहाचा वाढदिवस होता आणि तिच्या छोट्या बहिणीचा वाढदिवसही होता. नम्रता आठवणी सांगत होती. त्या आय.सी.यु.मध्ये तिने तिच्या आईला धड ओळखलं सुद्धा नाही.

तिच्या चेहऱ्यावर सर्वत्र जखमा होत्या. तो खूप सुजलेलाही होता. तिच्या तोंडात नळ्या घातलेल्या होत्या. तुला आईशी बोलायचंय का असं नर्सनं विचारलं तिला. पण तिला वाटलं आईला त्रास नको द्यायला. आईशी बोलण्याची संधी हुकली याची नंतर तिला खंत वाटत राहिली. कारण त्याच दिवशी आई कायमची निघून गेली होती.

आपल्या आयुष्यात एकाएकी झालेल्या या उलथापालथीने तिन्ही मुलांना जबर धक्का बसला होता. पण आईवडिलांच्या मृत्यूच्या या आघातातून सावरायला त्याच दिवशी वाढदिवस असलेल्या धाकटीला बराच काळ लागला.

ही कोवळी मुलगी आघातोत्तर तणाव विकार ( पोस्ट-ट्रामॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ) नावाच्या मनोविकाराने ग्रस्त झाली आणि तिचे मन ताळ्यावर यायला पुढे बरीच वर्षे लागली. दहा वर्षे उलटल्यावर मी पुन्हा या कुटुंबाच्या भेटीस गेले.

त्यावेळी मला कळलं की नम्रताचा भाऊ विनोद याला सॉल्ट खात्यात आईच्या जागी नोकरी मिळाली होती आणि नम्रता बाबांच्या जागी महापालिकेत काम करू लागली होती. ती रहायची त्याच कॉलनीतल्या एका मुलाशी तिनं लग्नही केलं होतं. त्या दिवशी देवदूतासारखे धावलेले क्लिफर्ड , दरवर्षी १२ मार्चला, सोरटे कुटुंबातील या मुलांना भेटायला न चुकता येत असतात.

एअर इंडियाची इमारत, वरळीचे पासपोर्ट ऑफिस, काथा बाजार येथील धान्य बाजार, सी रॉक हॉटेल, जुहू आणि एअर पोर्ट जवळचे सेंटॉर हॉटेल, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, दादरच्या शिवसेनाभवनाजवळचा लकी पेट्रोल पंप आणि प्लाझा थिएटर अशा ठिकाणांना त्यांनी लक्ष्य केलं.

१९९३ च्या १२ मार्चला शुक्रवार होता. दुपारी एकामागोमाग एक १२ स्फोट झाले आणि सगळी मुंबई हादरून गेली. २५७ माणसे ठार झाली आणि जखमींचा आकडा हजारावर गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com