आ जाने जाँ...

पन्नासच्या आणि साठच्या दशकात हिंदी सिनेमातून अशी दृश्यं बघायला मिळत असत. अगदी १९५१ च्या देव आनंदच्या ‘बाजी’ सिनेमात ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’ हे गीत हातात मेंडोलिन घेऊन गीता बाली गाते.
aa jane jaan helen lata mangeshkar intaquam family drama movie song
aa jane jaan helen lata mangeshkar intaquam family drama movie songSakal

- डॉ. कैलास कमोद

आ जाने जाँ...

आ ऽऽ मेरा ये हुस्न जवाँ जवाँ जवाँ

तेरे लिए है आस लगाए

ओ जालिम, आ जाना

विजेच्या दिव्यांचा मंदमंदसा प्रकाश वातावरणाला मादकपणा आणत आहे. एखादं उंची रेस्तराँ आहे किंवा उच्चभ्रू वर्गातला एखादा लहानसा; पण झगमगीत स्वागतसमारंभ सुरू आहे किंवा एखादा क्लब आहे.

त्याच्या एका कोपऱ्यात आकर्षक सजावट केलेलं स्टेज आहे. स्टेजसमोर बैठकीसाठी एका गोल टेबलभोवती चार-सहा खुर्च्या मांडलेल्या...अशी अनेक टेबल्स आहेत. टेबलभोवती बसलेले लोक टेबलवरची ड्रिंक्स, स्नॅक्स, डिनर इत्‍यादीचा आस्वाद घेत आहेत.

सिगारेटच्या धूम्ररेषा अधूनमधून हवेत वर जात आहेत. कोपऱ्यातल्या लहानशा स्टेजवर असलेली गायिका उपस्थितांचं मन रिझविण्यासाठी काही गाणं गात आहे. गाता गाता ती जागेवरच उभ्या उभ्या थोड्याफार हालचाली करते; पण शक्यतो स्टेज सोडत नाही.

पन्नासच्या आणि साठच्या दशकात हिंदी सिनेमातून अशी दृश्यं बघायला मिळत असत. अगदी १९५१ च्या देव आनंदच्या ‘बाजी’ सिनेमात ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’ हे गीत हातात मेंडोलिन घेऊन गीता बाली गाते. सन १९५८ च्या ‘हावडा ब्रिज’ या सिनेमात मधुबाला हातात माईक घेऊन ‘आईये मेहेरबाँ बैठीए जाने जाँ’ हे गाणं गाते किंवा १९६५ मध्ये ‘वक्त’ या सिनेमात ‘आगे भी जाने ना तू...’

यांसारखी गाणी आपण पाहिली-ऐकली. मात्र, त्यातली गायिका अंगभर वस्त्रं असलेली असायची. हा होता कॅबरे. पब, कॅसिनो अशा मनोरंजन करणाऱ्या ठिकाणी होणारा संगीत-गाणी किंवा नृत्य अशा प्रकारचा कार्यक्रम, ज्यात प्रेक्षक प्रत्यक्ष सहभागी नाही अशा अर्थानं ‘कॅबरे’ (Cabaret) हा फ्रेंच शब्द आहे.

सत्तरच्या दशकात सिनेमाची चार पावलं पुढं पडली. ती गायिका गाणं गाता गाता स्टेज सोडून प्रेक्षकांच्या टेबलपर्यंत येऊन गाऊ-नाचू लागली. देहाच्या कमनीय हालचाली करू लागली. अंगावरची वस्त्रं एकेक करून उतरवत अनावृत होऊन तोकड्या कपड्यांनिशी नाचू लागली किंवा मुळातच अल्प वस्त्रं लेऊन ती नाचू लागली. हा होता स्ट्रिप्टीज (Striptease). कॅबरे आणि स्ट्रिप्टीजमध्ये असा जरी फरक आहे तरी आपण हिंदी सिनेमाचे प्रेक्षक त्याला कॅबरे असंच संबोधत असतो.

अनेक कलावतींनी कॅबरे-डान्सरची भूमिका वठवली आहे. शशिकला, मुमताज, तनुजा, मधुमती, बिंदू, पद्मा खन्ना, नीतू सिंग, फरयाल, प्रेमा नारायण ही त्यातली काही ठळक नावं...पण कॅबरे-डान्सर अथवा स्ट्रिप्टीजर म्हणून घट्ट पाय रोवून त्यात आपली मक्तेदारी निर्माण करणारी एकमेव अभिनेत्री होती हेलन.

तिचा डान्स सिनेमात समाविष्ट करायचा ही बाब समोर ठेवून सिनेमांच्या कथा लिहिल्या गेल्या हे विशेष. तिचं हे स्थान अढळ राहिलं ते तिच्या अंगभूत कलाकारीनं. कमनीय बांधा, लवचीक-चपळ हालचाली, बारीकशा नेत्रांमध्ये कायमच एक मादक असा भाव, दोन्ही ओठ किंचितसे विलग करून बोलण्याची खास लकब, पुरुषांना आव्हानात्मक अशी चेहऱ्यावर कायम असलेली एक्स्प्रेशन्स आणि अंगी असलेलं नृत्यलालित्य असं भरपूर भांडवल तिच्याकडं होतं.

या बळावर तिनं हे अढळपद प्राप्त केलं होतं. केवळ क्लबमधला कॅबरे नव्हे तर, राजदरबारात ‘हॅंसता हुआ नूरानी चेहेरा, काली जुल्फे रंग सुनहरा’ असं गात नाचणारी राजनर्तकी, ‘घुंगरवा मोरा छमछम बाजे’ असं गात पोटासाठी रस्त्यावर नाच करणारी बंजारन, ‘इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात’ असं सांगत समुद्रकिनाऱ्यावर उच्छृंखलपणे नाचणारी आधुनिक तरुणी, ‘पिया तू अब तो आजा’ अशी साद घालत प्रियकराच्या मीलनासाठी उत्सुक अभिसारिका, ‘मुंगळा मुंगळा...

मैं गुड की डली’ असं गात दारूच्या गुत्त्यावर धुमाकूळ घालणारी मदनिका, कोठीवर नाचणारी तवायफ आणि ‘ये मेरा दिल यार का दीवाना’ असं म्हणत नायकाला एकांतात भुलवणारी मदालसा असे नृत्यातले सगळे प्रकार आणि प्रसंग लीलया हाताळणारी हेलन एकमेवाद्वितीय होती.

‘आया तुफान’ किंवा ‘चा चा चा’ यांसारख्या काही दुय्यम दर्जाच्या सिनेमांतून हेलन ही नायिका म्हणूनही दिसली; पण नृत्य हेच तिचं कर्तृत्व होतं, नृत्य हीच तिची नियती होती. आणि, तिनं ती नियती स्वीकारत आपली जबाबदारी अशी पार पाडली की, हेलनच्या आधी तर तशी कुणी नव्हतीच; पण तिच्यानंतरही तशी कुणी अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही.

‘आ जाने जाँ...’ हे तिच्या स्ट्रिप्टीज-नृत्यांतल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक गाणं आहे असं म्हणायला हरकत नाही. एक काळाकभिन्न रांगडा प्रियकर एका पिंजऱ्यात जेरबंद आहे. आपली प्रेयसी समोर दिसत असूनही आपण तिला भेटू शकत नाही म्हणून तो पिंजऱ्यात हिंस्रपणे आवाज करत बुभुक्षित नजरेनं तिच्याकडं पाहत येरझरा घालतो आहे. कामेच्छा ही नाजूक, कोमल अशी भावना आहे. ती जीवनावश्यकसुद्धा आहे; पण तिला वाट न मिळता दीर्घ काळ दाबून ठेवली गेली तर प्रसंगी माणूस हिंस्र होतो.

त्याच्या भेटीसाठी तीही आसुसलेली आहे. तो पिंजऱ्यात असल्यानं त्यांची भेट होत नाही व ती गाऊ लागते. ‘आ ऽ ऽ जाने जाँ ऽ ऽ’

आँख से मस्ती टपके है

टपके है, तू देखे ना

दिल का सागर छलके है

छलके है, तू समझे ना

आ ला ला ला ला ला ला

क्यूँ तडपाए, तू क्यूँ तरसाए

ओ जालिम, आ जा ना...

कॅबरे तथा स्ट्रिप्टीज-गीतांतली शब्दरचना काहीही असली तरी त्यातलं म्युझिक आणि नर्तकीचा डान्स हेच त्याचं मुख्य अंग असतं. तरीही गीतकार राजेंद्रकृष्ण यांनी तिची आतुरता, व्याकुळता चांगली शब्दबद्ध केली आहे.

संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी इंट्रोला वाजवलेलं सिग्नेचर-ट्यूनचं म्युझिक जबरदस्त आहे. एक मिनिट आणि पंचवीस सेकंदांच्या त्या ट्यूनमध्ये कितीतरी वाद्यं स्वतंत्रपणे वाजवली आहेत. त्या प्रत्येकाचा सूर त्या ट्यूनची रंगत वाढवतो. ट्रम्पेट-सॅक्सोफोनसारख्या वाद्यांच्या दीर्घ सुरांनी इंट्रो म्युझिक सुरू होत सिंबलच्या ‘ढॅण्...’

अशा ध्वनीवर संपतं आणि अतिशय हळुवारपणे गाण्याचे शब्द येतात. इंटरल्यूडला ट्रम्पेट, सॅक्सोफोन, ड्रम, बोंगो, सिंबल अशा अनेक आधुनिक वाद्यांचा मेळ साधून म्युझिकचा मस्त पीस येतो. पुढं गाण्याचा वेग वाढतो. गाणं संपतानासुद्धा तशाच प्रकारचा म्युझिक-पीस आहे.

या सगळ्या म्युझिक-पीसेसमधल्या अनेक वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन इतकं झकास जमलं आहे की, रसिकांनी खास सिग्नेचर-ट्यूनवर आणि इंटरल्यूडवर लक्ष केंद्रित करून पुन्हा गाणं ऐकलं तर त्यातलं सौंदर्य लक्षात येईल. गाण्याची चालही आकर्षक आहे. लक्ष्मीकांत-प्यारेलाल ने कमाल का संगीत दिया है इस गाने के लिए!

एरवी, कॅबरे-गीत म्हणजे आशा भोसले किंवा फार तर गीता दत्त यांची मक्तेदारी समजली जाते; पण, आपण कॅबरे-गीत गाऊ शकत नाही, अशा सर्वसामान्य समजाला लता मंगेशकर यांनी, हे गाणं गाऊन, मोठाच छेद दिला आहे. ‘आऽऽ जाने जाँ ऽऽ’ अशी अगदी हळुवारपणे सुरुवात करून आपला स्वर उंच उंच नेत ‘ओ जालिम आ जाना’ असं म्हणताना स्वर झोकून देत गाण्याला वेगळाच पैलू त्यांनी दिला आहे.

आपण हेलनसाठी गात आहोत याचं पूर्ण भान राखून लता मंगेशकर यांनी असा काही सूर लावला की, त्यांच्यामध्ये हेलन संचारलीय जणू! खरोखर एखाद्या विरहिणीचा स्वर आपण ऐकत आहोत असा हा खास परफॉर्मन्स त्यांनी हेलनसाठी दिला आहे आणि हेलननंही तो तितक्याच उत्तमपणे पेलला आहे.

लता मंगेशकर यांचं त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतलं कदाचित् हे एकमेव कॅबरे-गीत असावं. (लक्ष्मीकांत)-प्यारेलाल यांनी रेडिओवरच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं : ‘इतर कुणाही संगीतकारासाठी लतादीदींनी कॅबरे-गीत गायिलेलं नाही; पण आमच्या विनंतीवरून आमच्यासाठी त्यांनी हे गीत स्वीकारलं.’

...आणि हेलन! लांब अशा केशसंभारावर लखलखणारे अलंकार, नेत्रांच्या पापण्यांचा हलकासा रंग, हातात पिसांचा पांढरा फुलोरा... स्ट्रिप्टीजर-नृत्यांगनेला शोभतील अशी तोकडी वस्त्रप्रावरणं असा तिचा गेट अप दिलखेचक आहे. तिच्या मादक हालचाली आणि मुद्राभिनय खास बघत राहावा असा आहे. उसासे टाकतानाच्या तिच्या ॲक्शन्सही खास.

गाण्यातलं पुढचं नृत्य नेहमीच्या चपळाईनं तिनं रंगवलं आहे. तिचं चापल्य वर्णनातीत वाटतं. पिंजऱ्याबाहेरचे तिचे हावभाव फारच आकर्षक. लाकडी पिंजरा आणि अतिशय भव्य आकर्षक सेट्स हे या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य. हेलनच्या सगळ्या ॲक्शन्सना त्या भव्य नेपथ्यामुळं रंगत येते. पिंजऱ्यात अडकून हेलनसाठी झुरणारा तो काळाकभिन्न माणूस आहे अभिनेता आझाद इराणी.

सन १९६९ मधल्या ‘इंतकाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. के. नय्यर यांनी या स्ट्रिप्टीज-गीतासाठी पाश्चात्य शैलीचा विशेष अंगीकार केला होता.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com