दुनियादारी : बुकमार्क vs फेवरेट्स

‘हे घे, तुझ्यासाठी! बिलेटेड हॅपी बर्थ डे!’
Bookmark
Bookmarksakal
Summary

‘हे घे, तुझ्यासाठी! बिलेटेड हॅपी बर्थ डे!’

‘हे घे, तुझ्यासाठी! बिलेटेड हॅपी बर्थ डे!’

‘धन्यवाद! काये पण ह्यात? पुस्तक?’ समीर गिफ्टरॅप केलेल्या कागदाला हात लावताच विचारतो.

‘होय पुस्तक! माझं आवडतं आहे हे, तुलाही आवडेल अशी आशा!’ वर्तिका म्हणाली.

‘अगं पण पुस्तक?? मी कधी वाचलंय का पुस्तक? चुकीचा निर्णय घेतलाएस तू मला गिफ्ट द्यायचा, असं तुला वाटत नाही?’ समीर कुचकट चिडवल्यासारखं म्हणाला.

‘चांगलीच चूक करत आहे मी माहिती आहे मला... तू आणि पुस्तक वाचणं म्हणजे चंद्र दुपारी तीनला दिसण्यासारखं अवघड आहे.’

‘असं काही नाही, मी मेघालयात गेलो असता आम्ही ३.३० ला दुपारी चंद्र रोज पाहिला आहे!’

‘ज्ञान नको पाझळू फालतूचं...’

समीर मोठी स्माईल देतो, ‘अगं तसं नाही गं... छानच असेल हे पुस्तक, पण एका जागी बसून असं वाचन करणं हा माझा पिंड नाहीच!’

‘काय हरकत आहे ना पण इतकं आपुलकीने कोणी दिलंय पुस्तक तर वाचायला एकदा पिंड बाजूला ठेऊन?' वर्तिका खुनशी डोळे करत समीरला विचारते.

‘अच्छाsssssssss! असं म्हणतेस... हरकत नाही. वाचायचा नक्की प्रयत्न करणार हो!’

समीर पुन्हा त्याच चिडवण्याच्या सुरात म्हणाला.

‘प्रयत्न? प्रयत्न फक्त? दे इकडे ते पुस्तक परत!’ वर्तिका खोटी खोटी चिडून समीरच्या हातून पुस्तक ओढायला लागते.

‘अगं ए!! क्या बच्ची हो क्या? पुस्तक काय ओढतिये?’

‘हो आहे मी बच्ची! दे परत पुस्तक ते!’

ते दोघं तिथेच कॉलेजच्या ग्राउंडवरील झाडाखालच्या पारावर बसून भांडायला लागतात.

‘अगं बाई वाचतो म्हणालो ना मी!’

‘नाही नाही नको... इतके उपकार कशाला? तू तुझे ते फालतू कॉमेडी शो किंवा टॉक शोच बघत बस रात्रभर!’

ते तसेच ओढाओढीमध्ये वाद घालत असतात.

‘अबे... तुला पुस्तकातून आनंद मिळतो, मला इतर शोज बघून. अगं प्रत्येकाचं वैचारिक खाद्य वेगळं असतं...’

‘वैचारिक खाद्य??? असले साहित्यिक शब्द कुठून शिकलास रे? अजिबात वापरायचे नाही आमचे शब्द तुम्ही!’

हे ऐकून समीर भांडता भांडता खुदकन हसू लागतो. त्याला बघून वर्तिका पण पुस्तकावरची तिची पकड सोडते.

‘ह्यात आम्ही तुम्ही कुठून आलं गं? तुमची जमात काय कधी विनोदी व्हिडिओ बघून हसलीच नाही जणू की! उगाच समाजात फूट पाडू नकोस... आधीच एकीची ऐशी की तैशी आहे समाजात, त्यात अजून फाळणी काय करतीये तू!’’ समीर अर्धं कुत्सित आणि अर्धं चिडवल्यासारखं वर्तिकाला झापतो.

‘हंह!’’ ती नुसतं नाक उडवून खोटा रागीट आवाज करते.

समीर पुस्तक चाळायला घेतो. दोन मिनिटं त्यांच्यात शेजारी बसूनही शांतताच असते. ग्राऊंडवर खेळणाऱ्या मुलांचा आवाज लांबून कानावर पडत असतो.

‘ही तर प्रेम कहाणी दिसतीये...’ समीर म्हणतो.

‘हो... खूप छान आहे... आणि इमोशनल. ऑफकोर्स तू पूर्ण वाचलीस तर कळेल तुला...’ वर्तिका अजूनही चिडल्याचं दर्शवत म्हणते.

‘अरे विषय! वाचणार ना मी नक्की... पण एक अट आहे माझी...’ समीर पुस्तक बंद करून वर्तिकाकडं बघत म्हणाला.

‘कसली अट?’

‘मी पूर्ण पुस्तक वाचणार, पण तू सुद्धा फ्रेण्ड्सचा एक सीझन पूर्ण बघायचा आणि कसा वाटला सांगायचं. अट मंजूर?’

‘अरे, ही अट आहे का माझ्याविरुद्ध कट?'

‘आता तू अतिसाहित्यिक बोलू नको, डिल करणार का सांग?’

‘चल डन डिल!’’ ती त्याच्या हातात हात देऊन म्हणते, ‘पण मला फ्रेण्ड्स इतकं आवडलं नाही आणि मी त्या सिरीजला अजून शिव्या घालायला लागले तर?’

‘तर... तर काही नाही, आपण ह्या पुढे फ्रेण्ड्स नाही राहणार... इतकंच!’ समीर खांदे उडवून म्हणाला आणि ते ऐकताच वर्तिकानं पुन्हा त्याच्यासोबत धक्काबुक्की सुरू केली.

काही भांडणं आपण आयुष्यात लाईफटाईम सबस्क्रिप्शनसकट बुकमार्क करून ठेवत असतो... हवं तेव्हा आनंद घ्यायला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com