स्त्री आणि शक्ती! (आदित्य महाजन)

आदित्य महाजन mahajanadi333@gmail.com
रविवार, 24 जून 2018

एकीकडं स्त्रियांना अजूनही अनेक क्षेत्रांत डावललं जात असताना एक मुलगी स्पेशल फोर्समध्ये सामील होते. कुटुंबातसुद्धा डावलली गेलेली ही मुलगी लष्करातल्या कडक प्रशिक्षणाला उत्तमपणे सामोरी जाते. एका विशिष्ट प्रसंगातून सगळ्यांनाच एक धक्कादायक माहिती समजते आणि त्यातून तिचा कणखरपणा आणखी ठळक होतो. स्त्रीशक्तीची वेगळी कथा सांगणाऱ्या "द टेस्ट केस' या आगळ्यावेगळ्या वेब सिरीजवर एक नजर...

एकीकडं स्त्रियांना अजूनही अनेक क्षेत्रांत डावललं जात असताना एक मुलगी स्पेशल फोर्समध्ये सामील होते. कुटुंबातसुद्धा डावलली गेलेली ही मुलगी लष्करातल्या कडक प्रशिक्षणाला उत्तमपणे सामोरी जाते. एका विशिष्ट प्रसंगातून सगळ्यांनाच एक धक्कादायक माहिती समजते आणि त्यातून तिचा कणखरपणा आणखी ठळक होतो. स्त्रीशक्तीची वेगळी कथा सांगणाऱ्या "द टेस्ट केस' या आगळ्यावेगळ्या वेब सिरीजवर एक नजर...

स्त्री म्हणून जन्म म्हणजे समाजानं लादलेल्या "कमकुवत शक्तीचं' खूप मोठ्ठं ओझं असं अजूनही अनेक जण समजतात. अशा या कथित ओझ्याखाली न झुकता एखादी स्वाभिमानी आणि निर्भीड स्त्री सगळ्यांच्या नाकावर टिच्चून एक महान पद मिळवते, तेव्हा आईनं क्‍लायमॅक्‍सनंतर तिला उठून सॅल्यूट द्यावासा वाटतो तो "द टेस्ट केस' या वेब सिरीजमध्ये. "बोस'पाठोपाठ "अल्ट बालाजी'नं सादर केलेली सुरेख, वेगळ्या विषयाची, उत्तम अभिनयानं सजलेली, प्रेरणादायी आणि "टॉप क्‍लास' निर्मितीमूल्यांची ही वेब सिरीज. स्त्रीशक्तीची अनोखी आणि खिळवून ठेवणारी वाटचाल खिळवून ठेवते.

समर खान लिखित आणि विनय वैकुळ आणि नागेश कुकुनूर दिग्दर्शित ही लष्करातल्या एका आगळ्यावेगळ्या व्यक्तीची एक अविस्मरणीय गोष्ट फक्त दहा एपिसोड्‌समध्ये संपते, आणि नुसती संपत नाही तर एक वेगळीच ऊर्जा आपल्या मनात सळसळत ठेवून संपते. निम्रत कौर हिला आपण नेहमी साध्या, सोज्वळ भूमिकांमधून पाहत आलेलो आहोत. त्यामुळे ती लष्करात सामील होणाऱ्या या दमदार कॅडेटची भूमिका निभावू शकेल का, असा प्रश्न मलाही पडला होता. सिरीजच्या मध्यापर्यंत हा प्रश्न खूपच मागं पडला आणि निम्रत कौरच्या अप्रतिम अभिनयानं; तसंच मेहनतीने संपूर्ण सिरीज खाल्ली आहे, असं मी छातीठोकपणे आता सांगतो.
भारतानं लष्करात मुलींच्या भरतीला परवानगी दिली आणि युद्धातसुद्धा आता एक स्त्री भारताची सेवा करण्यास पात्र झाली होती. मात्र, हे सगळं कागदोपत्री आणि बातम्यांमध्ये ठीक आहे हो! खरंच त्यात सामील व्हायची कोणाच्यात ताकद असते? अशातच श्रद्धा पंडित (जुही चावला) या देशाच्या संरक्षणमंत्री होतात आणि स्पेशल फोर्समध्ये एका स्त्रीला आता घ्यायलाच पाहिजे, असा आपला हट्ट वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसमोर मांडतात. हे अधिकारी एक प्रयोग म्हणून अखेर कसेबसे तयार होतात आणि आर्मी इंटेलिजन्समधून सर्वोत्तम कारकिर्द आणि रॅंकिंग असलेल्या एका महिला ऑफिसरची निवड होते- जिला स्पेशल फोर्सेसमध्ये यायची इच्छादेखील तितकीच असते. तीच ही शिखा शर्मा (निम्रत कौर). हरियानात एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरात जन्म झालेल्या शिखाला तिच्या वडिलांनी नेहमीच "ती मुलगी आहे आणि तिचा सैन्यात काहीही उपयोग नाही,' असंच सुनावलेलं असतं आणि त्याच वेळी तिच्या भावाला मात्र जबरदस्तीनं सैन्यात भरती होण्यासाठी तयार केलं असतं. तणावातून तिचा भाऊ आत्महत्या करतो आणि या दुःखातून सावरून शिखा अजून जोमानं वडिलांच्या विरोधात जाऊन सैन्यात जायची तयारी करते.

स्पेशल फोर्सच्या खडतर प्रशिक्षणासाठी एक मोठी तुकडी ट्रेनिंग सेंटरला पोचते आणि आल्याआल्या त्यांना उस्ताद भट्टी पुशअप्स मारायला लावतात. पूर्ण पुशअप्स होण्याआधीच जेव्हा शिखा दमते, तेव्हा त्या अकादमीमधल्या पहिल्या पावलापासूनच "पुरुषांच्या तुलनेत तू कशी काय या प्रवासात टिकणार?' असा डिवचणारा प्रश्न शिखाला सारखा विचारला जातो. कधी शाब्दिक माऱ्यातून, कधी वागण्यातून, तर कधी थेट! या सगळ्यांना खूप सरळ चेहऱ्यानं, कित्येकदा टोचत असतानासुद्धा हसतमुखानं आणि कित्येकदा उत्तम शाब्दिक परतफेड करून शिखा तिचं प्रशिक्षण चोखपणे पार पाडत असते. यातच तिचे काही मित्र बनतात, तर काही शत्रू. कॅप्टन बिलाल सिद्दीकी (अक्षय ओबेरॉय) हा तिचा सगळ्यात चांगला आणि जवळचा मित्र बनतो, तर कॅप्टन रोहन राठोड (भुवन अरोरा) हा तिला सगळ्यात जास्त मानसिकरीत्या छळणारा साथीदार. वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक परीक्षा या कॅंपमध्ये घेतल्या जातात आणि प्रत्येक परीक्षेनंतर या सगळ्या कॅडेट्‌सचे कार्य बघून त्यांना गुण दिले जातात, ज्यावरून त्यांची क्रमवारी ठरत असते. शिखा नेहमीच पहिल्या पाचांत असल्यानं बऱ्याच "मर्दां'चा जळफळाट होत असतो. त्यातला एक कॅप्टन रोहन, तर दुसरा असतो कॅप्टन मानित वर्मा (सुहेल नय्यर). हे दोघं हात धुवून शिखाला खाली खेचायचा प्रयत्न करत असतात.

अचानक एका रात्री परीक्षा म्हणून सर्व कॅडेट्‌सना एका मिशनवर पाठवलं जातं. त्याचं नाव असतं "दोझक' म्हणजे "नरक.' यात काही संघ पाडले जातात आणि एका जंगलात वेगवेगळ्या भीषण परिस्थितींमध्ये त्यांची चाचणी होणार असते. एका संघाचं नेतृत्व शिखाला मिळतं. तिच्या संघात असतात रोहन, मानीत, बिलाल आणि विष्णू. मिशनदरम्यान संघात बरेच वाद होतात आणि बऱ्याच दुखापतीसुद्धा. संघातले कॅडेट्‌स परत येतात तेव्हा बिलाल आणि शिखा यांना खूपच लागल्याचं आणि ते दोघंही बेशुद्ध पडल्याचं सगळ्यांना दिसतं. बिलालची दुखापत इतकी असते, की त्याला स्पेशल फोर्सेसचं प्रशिक्षण सोडून द्यावं लागतं. मात्र, खरं गूढ असतं शिखाच्या दुखापतींबद्दल. शिखा तंदुरुस्तीकडे वाटचाल करत असते; पण कुठंही नक्की काय झालं ते सांगत नसते. अशातच आर्मी कंमाडंटला एक अनोळखी पत्र येतं, ज्यात शिखावर "दोझक'च्या दरम्यान बलात्कार आणि मारहाण झाली आहे, असं लिहिलेलं असतं. तपास करण्यासाठी कर्नल इम्तियाज (अनुप सोनी) यांना नेमलं जातं. ते त्या कॅंपमध्ये येऊन सगळं सत्य चातुर्यानं शोधून काढतात. मात्र, पुरावा नसतो आणि शिखा ते मान्यही करत नसते. यातून कोण खरं ठरतं? शेवट काय होतो? "दोझक'मध्ये नक्की काय होतं? शिखा काय लपवत असते?... हे सगळं उलगडताना बरेच धक्के आपल्याला बसतात आणि शिखा अजून भावते.

या सिरीजमध्ये उत्तम संवाद आहेत. रोखठोक, आजच्या काळातली भाषा, शिवीगाळ आणि बोल्ड शब्द असले, तरी ते वास्तववादी वाटतात. लष्कराची शिस्त आणि भाषासुद्धा खूप बारकाईनं दाखवली आहे. शूटचं लोकेशन आणि एकूणच संपूर्ण लष्कर आणि त्यांचं राहणीमान दाखवणाऱ्या सर्व गोष्टी खूप उत्तमपणे कॅमेऱ्यामध्ये येतात. पात्रांची निवड आणि अभिनयाचा दर्जा दाहीच्या दाही एपिसोडमध्ये चोखपणे पाळला गेला आहे. निम्रत उत्तम आहेच; पण त्याचबरोबर कर्नल अजिंक्‍य साठेच्या भूमिकेतला अतुल कुलकर्णी, सुभेदार क्रिपाल भट्टीच्या भूमिकेतला राहुल देव आणि अनुप सोनी हे "बडे' अभिनेते त्यांच्या अभिनयकौशल्यानं रंगत आणतात. सुमित सुरीनं साकारलेला कॅप्टन रणजित सुरजेवाल छान आणि लक्षात राहणारा. कॅप्टन रोहनची चिडचिड, प्रयत्न आणि तरीसुद्धा त्याच्यात असलेली करुणा भुवन अरोरा चांगलीच निभावतो. थोडासा कमी पडतो तो "निगेटिव्ह शेड' असलेल्या कॅप्टन मानीत वर्माच्या भूमिकेतला सुहेल नय्यर.

कॅमेरा अँगल्सचा पुरेपूर चांगला उपयोग करत, खूप विचार करून मांडलेलं कथानक आणि त्याचा क्रम आपल्याला प्रत्येक एपिसोड विलक्षण एकाग्रतेनं बघायला भाग पडतो. कर्नल इम्तियाज आणि शिखा यांच्यातले काही प्रसंग आणि संवाद खूप उद्बोधक आहेत आणि गरजेचेसुद्धा. "मी महिला आहे म्हणून त्याचा मला काहीही फायदा मिळायला नको,' या वाक्‍याचा जाणीवपूर्वक उच्चार करणाऱ्या शिखानं घेतलेले काही निर्णय दर्शवणारे प्रसंगसुद्धा तितकेच दमदार. नुकतीच आमिर खाननंसुद्धा ही सिरीज बघितली आणि त्यानं गहिवरून त्याबद्दल सोशल मीडियावर आवर्जून लिहिलं. आयएमडीबीनं या सिरीजला दहापैकी 8.8 रेटिंग दिलं आहे. हीच या "टेस्ट केस'ची सगळ्यात मोठी पावती आहे. ही वेब सिरीज स्त्री असाल तर नक्की बघा. पुरुष असाल तर आवर्जून बघा. माणूस म्हणून बघाल, तर त्यातले विचार हिमतीनं पुढं घेऊन जाल. देशप्रेम लिंगभावनिरपेक्ष असतं, हे शिखा उत्तमरीत्या तुम्हाला दाखवून देते. लष्करातलं राजकारण, वृत्ती, अपेक्षा, नैराश्‍य आणि अशा बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकणाऱ्या या कथेत शेवटच्या एपिसोडमध्ये तिरंग्याला सलाम देणाऱ्या शिखाला आणि नंतर तिला सॅल्युट करणाऱ्या तिच्या वडिलांना पाहून डोळे किंचित पाणावणार हे नक्की.

Web Title: aaditya mahajan write article in saptarang