रंजक स्मरणरंजन (आदित्य महाजन)

aaditya mahajan
aaditya mahajan

नव्वदीच्या दशकात लहानपण गेलेल्या पिढीशी संबंधित अनेक गोष्टींचा वापर असलेली आणि त्या काळातल्या सहजसोप्या जगण्याची आठवण करून देणारी "ये मेरी फॅमिली' ही वेब सिरीज धमाल आहे. खुसखुशीत संवाद, स्मरणरंजन करणाऱ्या अनेक गोष्टी, उत्तम अभिनय अशी अनेक वैशिष्ट्यं असलेल्या या सिरीजविषयी...

एकीकडं आयुष्य भराभर बदलत चाललं असताना नव्वदीतल्या पिढीनं जुन्या आणि नवीन गोष्टींचा एकत्र आस्वाद घेतला. म्हणूनच आजही या दशकात लहानपण जगलेली मुलं तो काळ आठवून भावूक होतात. समीर सक्‍सेना दिग्दर्शित आणि सौरभ खन्ना लिखित "ये मेरी फॅमिली' ही वेब सिरीज खूप सुंदरपणे आणि सहजतेनं त्या दशकातलं जगणं पुन्हा आपल्यासमोर मनमोहकपणे ठेवते.

"द वायरल फिवर' अर्थात "टीव्हीएफ'नं वर्षानुवर्षं बनवलेल्या वेब सिरीज विशेषकरून तरुण मंडळींसाठी आणि बऱ्याचदा वायफळ आणि विशिष्ट प्रकारच्या विनोदांनी भरलेल्या आहेत. मात्र, या पार्श्‍वभूमीवर अचानक 1998 या वर्षी घडलेली एक साध्या कुटुंबाची रंजक गोष्ट, ही संकल्पना घेऊन टीव्हीएफनं आणलेली ही वेब सिरीज वेगळी ठरते. गुप्ता परिवाराची ही गोष्ट. या गोष्टीचा नायक हर्षल गुप्ता (विशेष बन्सल) म्हणजेच हर्षू. तीन भावंडांपेकी मधला. आठवीत शिकणारा, खोडकर, अभ्यासात साठ टक्के मिळवून निवांत राहणारा, आपल्या मोठ्या आणि हुशार भावाच्या तुलनात्मक वादांना कंटाळलेला, आई आणि शिक्षकांचा ओरडा खाणारा, शाहरुख खान स्टाईल केस आणि गोल गुबगुबीत चेहऱ्याचा हर्षू. उन्हाळा चालू झाला असतो आणि हर्षूचा मोठा भाऊ डब्बू (अहान निर्बान) याची आयआयटीच्या परीक्षेची तयारी सुरू असते. त्यामुळं यंदा गुप्ता परिवार कुठंही बाहेरगावी जाणार नसतो. त्यामुळं ही सुटी कशी बोअर होणार या विचारात हर्षू अडकलेला असतानाच भरीस भर म्हणून त्याची आई हिंदीत मार्क्‍स कमी पडल्यानं उन्हाळी शिकवणी लावते.

आता हर्षू काय करणार? त्याची सुट्टी मजेत जाईल का? नव्वदीतल्या किशोरवयीन मुलांचं आयुष्य काय होतं, त्यांची विचारसरणी काय होती आणि त्यांच्या राहणीमानातल्या वेगवेगळ्या वस्तू काय काय होत्या, या सगळ्याचा उलगडा हळूहळू करत गोष्ट धमाल करत पुढं जाते. "शक्तिमान'पासून "रुह अफजा', "फॅंटम कॉमिक्‍स'पासून "चंदामामा', "स्लॅम बुक'पासून सायकल आणि आकाशवाणीपासून वॉकमन कम कॅसेट प्लेअरपर्यंत अनेक गोष्टींची आठवण ही सिरीज करून देते. हर्षूचा वाढदिवस, त्याची झालेली तयारी, घरी येणारे शाळेतले आणि सोसायटीतले मित्र आणि त्याच्या आजूबाजूचं ते टिपिकल वातावरण यावर एक मजेशीर एपिसोड आहे. त्या काळातले हर्षूचे वडील (आकर्ष खुराना) यांची त्यांच्या मुलांवर असलेली सकारात्मक छाप, त्यांचं सगळी "सिच्युएशन्स' शांतपणे सांभाळणं यावरचा एक सुरेख एपिसोड आपल्याला मध्येच बघायला मिळतो.

मैत्री, नाती, शाळेतली आवडती मैत्रीण, त्या वयातलं निरागस प्रेम, शिक्षिकेवर असणारा क्रश, ज्याच्यासोबत आपण सगळं बालपण "शेयर' करायचो असा तो एक खास जवळचा मित्र, आपली लाडकी छोटी बहीण, आई-वडिलांची अधूनमधून होणारी नोकझोक, त्या काळातले चित्रपट आणि त्यातले डायलॉग या सगळ्या छोट्यामोठ्या बाबींवर ही सिरीज खूपच अलगद प्रकाश टाकत पुढं सरकते. 30-35 मिनिटांचे प्रत्येकी एकूण फक्त सात एपिसोड्‌स एवढीच ही सिरीज; पण जणू आपल्या लहानपणीची संपूर्ण उन्हाळ्याची सुटीच आपण पुन्हा जगून गेलो, असं वाटावं इतका आनंद ती देते.
सिरीजची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे यातला बालकलाकारांचा अभिनय. हर्षू साकारणारा विशेष बन्सल धमालच. त्या खोडकर वयातला, आयुष्य हळूहळू समजणारा, आपल्याच धुंदीत असणारा आणि शाळेतल्या मैत्रिणीच्या प्रेमात पडलेला तेरा वर्षांचा मुलगा म्हणून त्याची निवड उत्तमच आहे. त्यातसुद्धा त्यानं केलेला अभिनय सुरेख- खासकरून शेवटच्या दोन एपिसोड्‌समध्ये. त्याच्यापाठोपाठ भाव खाऊन जातो तो प्रसाद रेड्डी. हर्षूच्या "शॅन्की' नावाच्या जिवलग आणि अतिसमजूतदार आणि दुनियादारीची ओळख असणाऱ्या मित्राची भूमिका प्रसाद रेड्डीनं खूप जबरदस्त केली आहे. त्याला असलेले उत्तम संवाद त्याच्या खास एका शैलीतल्या आणि "पोकर फेस'मुळं आणखी मजा आणतात. हर्षूला वेळोवेळी खतरनाक उदाहरणांच्या मदतीनं सल्ले देणं, लागेल तिथं विशेष टिप्पणी करणं असं करणारा हा शॅन्की गंमत आणतो.

प्रेमळ; पण तरी टिपिकल, मुलांना सांभाळणारी, हळूच कुठंकुठं मुलांच्या भल्यासाठी जीवाचं रान करणारी, चिडल्यावर मात्र बेदम बदडून काढणारी आणि वेळोवेळी हळवी होणारी मोनासिंहनं साकारलेली आई प्रत्येकाला आपल्या आईची आठवण करून देते. आकर्ष कुराना यांचा भल्या मोठ्या ढेरीचा, शांत-निवांत-बलवंत बाप खूपच सही. हर्षूची निरागस आणि गोंडस, सात वर्षांची लहान बहीण "ध्वनी' ही भूमिका साकारणारी रुही खान परफेक्‍ट. गोड आणि तरी अभिनयात आणि अदाकारीमध्ये माहीर. गोष्टीच्या सुरवातीपासून हर्षूला आवडणारी त्याची हुशार वर्गमैत्रीण "विद्या' दाखवली गेली आहे. तिच्यावर आधारित एक एपिसोड खूपच मस्त आहे- ज्यात हर्षू त्याचं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो आणि त्यात त्याला शॅन्की आणि त्याची आई मदत करत असतात. तोंडातून शब्द न फुटणं, विद्याला त्याची परिस्थिती समजणं, त्यांचं बोलणं, एकत्र ट्यूशनला येणं आणि हर्षूच्या एका अवघड परिस्थितीत विद्याचं त्याला सांभाळून घेणं हे अगदीच मनात कोपरा करून बसणारे प्रसंग. विद्याच्या भूमिकेत रेवती पिल्लई ही गोड मुलगी छान काम करते. अहान निर्बानच्या "डब्बू'ची भूमिका पहिल्या एपिसोडपासून शेवटच्या एपिसोडपर्यंत फारच बदलून जाते. या भावांमधलं अबोल; पण तरी हवंहवंसं भांडकुदळ नातं शेवटच्या एपिसोडच्या शेवटच्या दहा मिनिटात खूपच भावूक करतं.

ही सिरीज बनवताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली गेली आहे. नव्वदीचं दशक परफेक्‍ट पद्धतीनं उभं राहतं. सुंदर; पण टिपिकल दोन मजली बंगला, त्याला असणारी टिपिकल गच्ची, शाळा, जुन्या सायकली, खेळणी, व्हिडिओ गेम्स, पोस्टर्स, कपड्यांची फॅशन, बोलण्यातले शब्द, घरात असणारी मारुती 800, गाडीत लागणारी त्या काळातली रेडिओ स्टेशन्स आणि त्यावरची गाणी, हॉटेलिंगचं सुरू झालेलं नवीन फॅड, कॉर्डलेस फोन, त्या काळातले चर्चेचे विषय, त्या काळातली करिअरची ओढ असे सगळे तपशील मजा आणतात. स्लो मोशन कॅमेरा इफेक्‍ट्‌सचा उपयोग "टीव्हीएफ'च्या सिरीजमध्ये नेहमीच होत असतो. "ये मेरी फॅमिली'मध्येसुद्धा हे इफेक्‍ट्‌स अप्रतिम आणि नेमक्‍या पद्धतीनं वापरण्यात आले आहेत. शेवटचा एपिसोड तर ज्या स्लो मोशनमध्ये संपतो, की आपला जीव आपण मुठीत धरून मनातल्या मनात "हर्षू धाव' असं ओरडायला लागतो. त्या काळाला साजेशी उत्तम गाणी या सिरीजमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात आणि अलगद चालणारं पार्श्वसंगीत आपल्याला अगदी त्या काळातल्या आवडत्या "धारा ऑईल'च्या जाहिरातीसारखं आपलंसं करतं. ही अतिशय साधी तुमच्याआमच्या घरातली गोष्ट आपल्याला अतिशय भावून जाते. सिरीज बघताना यातली ओपनिंग टायटल्स आवर्जून बघा. खूप वेगळ्या पद्धतीनं आणि कल्पक व्हिडिओजचा वापर करून "ये मेरी फॅमिली कितनी ऐसी वैसी है, थोडी तेढी मेढी है' असं गाणं त्याला जोडून प्रत्येक एपिसोडची सुरवात होते, तेव्हा आपल्या गालांवर नकळत हास्य फुलतंच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com