दुनियादारी : गप्पा पुराण

‘‘ऐक... उद्या संध्याकाळी आपण जेवायला जाऊया. चालेल ना तुला?"
दुनियादारी : गप्पा पुराण
Summary

‘‘ऐक... उद्या संध्याकाळी आपण जेवायला जाऊया. चालेल ना तुला?"

‘‘ऐक... उद्या संध्याकाळी आपण जेवायला जाऊया. चालेल ना तुला?"

वेदने फोन कानाला लावताच पलीकडून मुग्धा म्हणाली.

वेदचा चेहरा ते ऐकून खूप छान खुलला. तो त्याची एक्साईटमेंट फोनवर कळू न देता म्हणाला, ‘‘चालेल मला. पण तुला नक्की चालेल ना? म्हणजे सहज जमत असेल तरच जाऊ. उगाच दगदग नाही ना होणार तुझी?’’

‘‘नाही रे!! उगाच माझ्या दगदगीची काळजी करून समंजसपणा वगैरे दाखवू नकोस आता. तू बाहेरगावी जाणार आहेस, तुझी गडबड असणारे... सो मी तुला उलट विचारते की तुला जमेल ना सहज उद्या? तुझी दगदग तर नाही ना होणार?’’ मुग्धानं विचारलं.

इथं वेद निमूटपणे गोड हसला.

"नाही गं. काही नाही माझी उद्या गडबड. सगळी पॅकिंग झाली आहे. भेटूया."

वेदला त्याच्या उत्तर भारतातील मोठ्या ट्रीपआधी मुग्धाला एकदा भेटून जायचं होतं, पण त्यांच्या दोघांचंही वेळापत्रक सध्या फारच व्यग्र होतं. तरीही वेदनं मुग्धाला रिक्वेस्ट केली. ‘सहज भेटता येतंय का बघ, माझं माहीत नाही, मी परत जिवंत येईन का ॲडव्हेंचर वगैरे करून...’ असं उगाच जास्तीचं आणि गरज नसलेलं इमोशनल काहीतरी बोलून त्यानं अखेर मुग्धाच्या मनातला त्याच्या नावाचा कप्पा अलगद हलवला.

"कसं काय ठरलं पण तुझं अचानक?" वेदनं विचारलं.

"तू गैरफायदा घेतोस ना उठ

सूट माझ्या हळवेपणाचा... त्यामुळं!"

"अगं बाई बाई बाई! असंय का?"

"हो असंच आहे. घेतोसच तू फायदा! ड्रामा नुसता जिथं तिथं..."

हे ऐकून वेद फोनवरच जोरात हसायला लागतो.

"हरकत नाही... हरकत नाही... असं तर असं. तुझी भेट होणार असल्यास तू लावलेला कुठलाही आरोप मी सहन करीन," वेद म्हणाला.

"खरं तर ना... व्हिलन तू आहेस, पण तुझ्या शाब्दिक खोड्यांनी तू बरोबर मला दुष्ट करून टाकतोस आणि मी पण अशी आहे ना, की ही तुझी चाल आहे माहीत असतानाही मी स्वतःला गिल्ट देते आणि तुझं ऐकते," मुग्धा प्रेमळ तक्रारीच्या पण तरी उचकलेल्या स्वरात म्हणते.

"प्रेम कहाणीतल्या दोघं मेन कॅरॅक्टर्स पैकीच कोणीतरी एक व्हिलन?? असं असतं का तरी कधी?" वेद हसत म्हणाला.

"असतं. इथं तरी आहे. आणि ही प्रेम कहाणी कधीपासून झाली शकुनी मामा?"

"कालपर्यंत मला नारद मुनी म्हणत होतीस, आज शकुनी मामा झालो का मी?"

"हो! कारण परवा तू माझ्या मैत्रिणींना माझे वाईट फोटो पाठवून पेटवून दिलं. त्या पुढे तीन तास माझी खेचत होत्या. म्हणून काल तू नारद मुनी होतास. आज चालुगिरी करून मला माझ्या ऑफिसमध्ये खोटं बोलायला लावलंस - म्हणून शकुनी मामा."

"असं होय...नारायण... नारायण... अवघडे!" वेद मिस्कीलपणे म्हणाला.

हे ऐकून तिकडं मुग्धा गालातल्या गालात छान हसली पण तिनं ते फोनवर जाणवू नाही दिलं.

"ठेव आता फोन. भेटू उद्या," ती म्हणाली.

‘‘ऐक ना... अजून एक रिक्वेस्ट आहे."

"अरे देवा! आता काये तुझं अजून? संपतच नाही तुझी मारुतीची शेपूट."

"एकच लास्ट लास्ट... प्लीज!"

"बोला आता काय..."

"तू उद्या तो मी तुला गिफ्ट दिलेला वनपीस घालून ये जमलं तर. खूप सुंदर दिसतेस तू त्यात."

वेद म्हणाला. पुढचे चार पाच सेकंद कोणीच काही बोललं नाही.

"गुड नाईट वेद." असं पुन्हा गालात हसून पण वेदला ते न कळू देता मुग्धा म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला.

इकडे वेदला ती हसल्याचं आणि ती उद्या तोच वन पीस घालून येण्याचं मात्र तरीही कळून गेलं. नारद मुनींकडं टेलिपथी होती असं म्हटलं जातं. आता फक्त ते आजीवन ब्रह्मचारी होते हे फक्त वेदला कोणीतरी सांगायला हवे.

नारायण... नारायण!

mahajanadi333@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com