दुनियादारी : कधी ट्रॅफिक ‘जाम’ आवडलाय?

‘किती नेहमी उशीर? कसं जमतं तुला? कुठून आला हा टॅलेंट?’
Couple
Couplesakal
Summary

‘किती नेहमी उशीर? कसं जमतं तुला? कुठून आला हा टॅलेंट?’

‘किती नेहमी उशीर? कसं जमतं तुला? कुठून आला हा टॅलेंट?’

अभिनवनं गाडीत बसणाऱ्या जान्हवीला आल्या आल्या टोमणा मारला.

‘माझं असंचे... मी सगळीकडं उशिरा पोहोचण्यासाठी फेमस आहे,’ जान्हवी अभिनवच्या टोमण्यांची पूर्ण सवय असल्यासारखी निवांत हसऱ्या धुंदीत म्हणाली.

‘फेमस म्हणे... काय कौतुकाची बाब आहे का ही,’ अभिनव म्हणाला. जान्हवी काही न बोलता फक्त फिदीफिदी हसली.

अभिनव गल्ल्याबोळांमधून कार फिरवत त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी कार नेत होता.

‘काये ह्या ट्रॅफिकचं...!’ अभिनव गाडी चालवताना पुटपुटला.

‘पोहचू रे आपण... ट्रॅफिक तर असणारच. त्यावर कितीवेळा चिडचिड करणारेस?’ जान्हवी नेहमीसारखं म्हणाली.

तेवढ्यात एका सिग्नलला एक दुचाकीवर पन्नाशीतला माणूस, डोक्यावर टोपलं ठेवल्यासारखं हेल्मेट घालून, त्यांच्या गाडीच्या समोर ओव्हरटेक करून थांबला.

‘अरे ए...’

जोरजोरात हॉर्न वाजवणाऱ्या अभिनवनं तोंडावर आलेले शब्द शेजारी जान्हवीला पाहून गिळले. जान्हवीनं अलगद त्याच्या गाडी चालवणाऱ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, ‘‘जाऊदे रे... ते काका मस्त त्यांच्या धुंदीत आहेत, ते काय सिग्नल सुटल्याशिवाय आपल्याला डावीकडं वळू देणार नाहीत.’

जान्हवीच्या हाताचा स्पर्श होताच अभिनव थोडा शांत झाला.

‘अगं, पण हे काये? असं कोण सरळ जायचं आहे तरी डाव्याबाजूला थांबवतं गाडी?’

‘असू दे रे... आपल्याला कुठं घाई आहे... गप्पाच तर मारायला चाललोय आपण. पोहोचू ५ मिनिटं उशिरा...’

‘अगं, ती ५ बहुमूल्य आहेत माझ्यासाठी. जी मला तुझ्यासोबत मिळणारेत... आणि हे तुला माहीत आहे. असं त्याला ‘गप्पाच तर मारायला चाललोय’ म्हणून किंमत कमी नको करू तू त्याची...!’

जान्हवी गालातल्या गालात छान हसते. मग त्याच्या हातावरचा हात काढते आणि तिला गोड लाजताना तो बघणार नाही ह्याची खबरदारी म्हणून कारच्या खिडकीतून बाहेर बघायला लागते.

‘कधी कधी आपण आयुष्याच्या गडबडीत आणि ह्या सगळं इन्स्टंटच्या जमान्यात स्लो व्हायचं विसरूनच जातो नाही का रे? कधी कधी सिग्नलला पण पूर्ण वेळ थांबावं, बाहेरची गार हवा थोडी आपल्या चेहऱ्यावर फील करावी, काळ्या केशरी ढगांकडं एक टक पाहावं, काचेवरचे ओघळ हळूवार सरकताना पाहावेत आणि त्या काचेवरच्या वाफेवर अलगद काहीतरी नाव लिहावं...’ जान्हवी बोलता बोलता काचेवरच्या वाफेवर ‘अभि’ असं अभिनवचं अर्ध नाव लिहिते.

अभिनव सिग्नलला इतका वेळ न कंटाळता थांबलाय, हे विसरून तिच्याकडं एक छान आणि कौतुकाची स्माईल देत बघत बसतो. ती त्या खिडकीवर नावासोबत खाली एक अर्ध गोलाकार स्माईल काढते आणि मग तिच्याकडं बघणाऱ्या अभिनवकडं तीही स्माईल देऊन बघते. ह्या नादात सिग्नल लालचा हिरवा होतो आणि अभिनवच्या गाडीला मागून हॉर्न बरसतात. अभिनव ब्रेकवरचा पाय उचलून स्पीड घेतो.

‘तुला माहितीये... माणूस नेहमी आपल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीकडून काही ना काही रोज शिकत असतो...’ अभिनव कार चालवताना म्हणाला.

‘अच्छा? मग काय शिकलास तू आज माझ्याकडून? सिग्नलला शांत राहायला?’ जान्हवी कौतुकानं त्याच्याकडं बघत उत्तराची वाट बघत विचारते.

‘नाही नाही... मी शिकलो की वेळेच्या मागं धावण्यापेक्षा, आहे त्या वेळात खूप सुंदर काहीतरी हाती लागू शकतं. जसं आज तुझ्यासोबत झालेलं बेस्ट कॉन्व्हरसेशन सिग्नलला घाई न केल्यानं मला मिळालं...’’

जान्हवी हे ऐकून तशीच गोड स्माईल चेहऱ्यावर घेऊन त्याच्याकडं बघत बसते.

‘...आणि हे सुद्धा शिकलो की...’ तो एक पॉझ घेऊन पुढे म्हणतो.

‘की...??’

‘...‘की कोणाचं अक्षर कितीही वाईट असलं तरी काचेवरच्या वाफेवर लिहिताना ते जरा बरं दिसतं कागदापेक्षा!’ अभिनव म्हणतो आणि त्याचं हसणं ओठात अडवतो.

जान्हवी त्याला बसल्या बसल्या हलका कोपरा मारते आणि पुन्हा स्माईल घेऊन खिडकीतून बाहेर बघायला लागते. पुन्हा ते दोघं मनातल्या ट्रॅफिक जॅममधून अलगद सुटतात... नवीन रस्त्यांच्या शोधात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com