
‘चल पळू का? मला जाता जाता भाजी घ्यायची आहे घरी घेऊन जायला.’
दुनियादारी : थोडा भाव पण खाऊया...
‘चल पळू का? मला जाता जाता भाजी घ्यायची आहे घरी घेऊन जायला.’
‘हे हे हे!’
‘हसण्यासारखं काये त्यात?’
‘तयार भाजी आणणार असशील! आणि म्हणे भाजी आणायची आहे...’ दिव्या हसत हसत म्हणाली.
‘कणभर पण माझ्या बोलण्याची किंमत नसते ना तुला...’ इशांत तिला चिमटा काढायची भीती दाखवत खोटं चिडल्यासारखं करत म्हणाला.
दिव्यानं एका हातानं त्याचा हात ढकलला आणि दुसऱ्या हातानं तोंडावर हात ठेऊन हसणं कंटिन्यू केलं.
‘भाजीच घेणारे साधी. आणि येते मला घेता,’ तो पुढं म्हणाला.
‘पण करता येते का तरी?’ दिव्यानं चावटपणा सुरूच ठेवला.
इशांतनं तिला लुक दिला, ‘इतकी नाही. नाहीतच जमा आहे खरं तर. म्हणजे चिरता येतात भाज्या, भात-आमटी येते, पोळ्यापण येतात करता. हां पनीर वगैरे येतं, ते तयार मसाले घालून.’
‘वाटलंच मला!’ दिव्या परत खोडी काढण्याच्या सुरात म्हणाली.
‘अगं ए आगाऊ! पोळ्या मला एकदम गोल करता येतात. ते बघ! तुलाही येत नाहीत इतक्या गोल.’
‘गोल पोळ्यांचं काय कौतुक? उगाच मुलगी म्हटलं की तिला गोल पोळ्या यायलाच पाहिजेत का?’ दिव्यानं सूर बदलला.
‘अगं हो हो! कुठून कुठे चालली आहेस? इथं कुठं मुला-मुलीचा विषय आला?’ इशांतनं वाहवात जाणाऱ्या दिव्याला पुन्हा थोडं हलकं मागं खेचलं.
दिव्यानं नुसते खोट्या रागात ओठ इकडून तिकडं हलवलं. दिव्या पुढं काहीच बोलत नाहीये हे पाहून ईशांतनंच विषय थोडा जास्त खेचला.
‘मला भाजी येत नाही किंवा कधीच येणार नाही, ह्यावरचं तुझं हसणं सुद्धा एक प्रकारे पुरुषप्रधान संस्कृतीला खतपाणी घालण्यासारखंच आहे बरंका... जस्ट फॉर युवर इन्फर्मेशन!’ तो म्हणाला.
दिव्यानं फक्त भुवई वर केली आणि काहीच बोलली नाही. ते पाहून इशांतला थोडंसं हसू आलं.
‘हरकत नाही, तूच मला शिकव कशी करायची चांगली भाजी. ठीके?’ तो म्हणाला.
‘का मी कशाला शिकवू तुला?’ ‘का नाही शिकवू शकत पण? तूच मोडून काढ ना ही पुरुषप्रधान संस्कृती!’ ‘मी काय ठेका घेतलाय सगळ्या पुरुषांना सुधारायचा?’
‘तुझ्या बोलण्यावरून तरी तसंच वाटतंय!’ इशांत खुदकन हसत म्हणाला.
‘हट!" दिव्या डोळे बारीक करून म्हणाली, ‘मी नाहीच शिकवणारे आता. यू-ट्यूब नावाचा एक छान प्रकार आहे, तुला माहीत असेल तर. त्यावर बघ आणि शिक स्वतःचं स्वतः!’
‘अगं असं कुठं शिकता येतं? पर्सनलाइज्ड शिकवणी हवी आहे.’
‘जा रे नौटंकी. अख्खं जग शिकतं यू-ट्यूबवरून तू कोण शहंशाह लागून गेलास? निघ आता, भाजीवाले जातील नाहीतर घरी.’
दिव्यानं शेवटपर्यंत इशांतची मागणी काही ऐकली नाही. पुढच्या दिवशी एकत्र डबा खाताना भरपूर डब्यांमध्ये आणि सगळ्यांच्या हात घालण्यामध्ये दिव्याला एका डब्यातली भाजी खूप आवडली. तिनं ते १-२ वेळा बोलूनही दाखवलं.
‘माझा डबा आहे अगं तो,’ इशांत तोंडातला घास चावताना म्हणाला.
‘अरे सही झालीये भाजी! काकूंना सांग नक्की आवर्जून. आणि जमल्यास त्यांच्याकडून माझ्यासाठी ह्याची रेसिपी पण मागाव,’ दिव्या तंद्रीत म्हणाली.
इशांतनं नुसत्या भुवया उडवून होकार दिला. नंतर डबे उरकल्यावर ती शेजारी मोबाईल चाळत असताना त्यानं तिला मेसेज केला.
‘कसली लिंक पाठवली आहेस?’ ती पचकली.
‘रेसिपीची! यू-ट्यूबवरची,’ इशांत म्हणाला आणि अचानक दिव्याला आदल्या दिवशीचं संभाषण आठवलं.
‘आयला! म्हणजे तू केली होतीस भाजी?’
‘हो... पुरुषप्रधान संस्कृतीला मोडत,’ इशांतनं एका हातानं कॉलरला हात लावला आणि स्टाईलमध्ये म्हणाला. त्या दोघांनीही एकमेकांना स्माईल दिली.
‘आता नेक्स्ट काय करणार मग?’ दिव्यानं विचारलं.
‘नेक्स्ट ना... मी तुला गोल पोळ्या करायला शिकवणारे. यू-ट्यूबची लिंक काढून ठेवली आहे मी!’ इशांत म्हणाला आणि लगेचच दिव्याची खांद्यावर साट्कन चापट त्यानं तिथल्या तिथं खाल्ली.
प्रत्येक कोपऱ्यावरचं ओळखीचं अणि आवडीचं भांडण। दावत-ए- इश्क़!
mahajanadi333@gmail.com
Web Title: Aaditya Mahajan Writes Pjp78
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..