दुनियादारी : लक्ष आहे का?

टेबलावर पडलेला माधुरीचा फोन तिसऱ्यांदा सलग वाजायला लागतो.
दुनियादारी : लक्ष आहे का?

टेबलावर पडलेला माधुरीचा फोन तिसऱ्यांदा सलग वाजायला लागतो.

‘कोण कटकट करतंय रविवारचं... एक दिवस शांतता नाही डोक्याला!’ ती उतरत्या दुपारी आठवडाभराच्या दगदगीचा त्रागा नकळत फोन करणाऱ्यावर काढत स्वतःशीच पुटपुटते आणि फोन उचलून स्क्रीनवर नाव बघते.

‘अमर?? इतके का फोन करतो आहेस? कोण मेलं का?’ ती अर्धवट राग दाबत अमरचा फोन घेत म्हणते.

‘तू ताबडतोब खाली ये. काहीही विचारू नकोस,’ अमर पलीकडून म्हणतो.

‘खाली?? माझ्या घराखाली?’

‘नाही शाहरुख खानच्या घराखाली! ऑब्वियस्ली तुझ्या घराखाली येऊनच तुला मी खाली ये असं म्हणणार ना बावळट!’

‘पच! तू इथे आला आहेस? आज? पण का?’ ती चौथ्या मजल्यावरून पडदा सरकवून घराच्या खिडकीतून खाली अमरला त्याच्या कार सोबत उभा असलेला बघते.

‘तू प्रश्न विचारणं थांबव आणि खाली ये लगेच,’ अमर असं म्हणून फोन ठेवतो.

अमरचं असं तिच्या रविवारच्या दिनक्रमात घुसणं माधुरीला थोडं इरिटेट करतं. पण अमरचं येणं म्हणजे काहीतरी आयुष्याला चव देणारं लोणचं, हे सुद्धा तिला मनातून थोडं थोडं माहीत असतं, त्यामुळं ती खूप इरिटेटही होत नाही. एकदा आरशात अवतार ठीक करून ती पायऱ्या उतरते आणि त्याचा कारपाशी येते.

‘आलात! या या... तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे,’ अमर एक्साईट होऊन म्हणाला.

‘तू रविवारी दुपारी मला छळतोयस... हे खरंच वर्थ असलं पाहिजे!’ माधुरी हातातल्या फोन सकट हाताची घडी घालते आणि अमरकडं सरळ चेहऱ्यानं बघत म्हणते.

‘तुझ्या चेहऱ्यावर आत्ता छान हासू आणतो.. ढण-ट-ढाण! हे बघ काये!' असं म्हणत अमर त्याचा कारची मागची डिक्की उघडतो. माधुरी जवळ येऊन बघते. आत एक जुनी झालेली पण तरी छानशी अशी एक पेटी असते.

‘ही पेटी...?’ माधुरी अर्धवट विचारते.

‘माझीच आहे जुनी. आणली मी बहिणीकडून. तिच्या माळ्यावर पडली होती धूळ खात. आता ही तुझी,’ अमर सहज म्हणून टाकतो.

‘अरे माझी काय माझी? मी नाही अशी घेऊ शकत इतकी मोठी वस्तू.’

‘प्लीज यार! आज तुझा हा ड्रामा नको हां! पडूनच होती इतके वर्षं, कोणीच वापरत नव्हतं. त्यापेक्षा तुला दिली तर तू आनंदनं वाजवशिल तरी...’ अमरनं माधुरीचं वाक्य खोडून काढलं.

‘पण मलाच का देतो आहेस ही पेटी?’

‘परत ड्रामा सुरू तुझा? दोन आठवड्यांपूर्वी इंटर्नशिपला ओव्हरटाइम करत होतो, तेव्हा जुनी गाणी आपण लावली असताना कोण म्हणालं होतं, की माझ्याकडं सुद्धा लहानपणी पेटी होती जी मी नेहमी वाजवायचे... खूप छान वाटायचं?’

अमर ह्यावेळी तिच्याकडे एक टक बघत म्हणाला.

‘...आणि तू हे लक्षात ठेवलं?’ माधुरी त्याच्याकडं बघणं टाळत म्हणाली.

‘तेच फक्त नाही, हे पण...’ अमर म्हणाला आणि त्याने तिच्या हातात एक छोटी पुस्तिका दिली, ‘तू ज्या पुस्तकात वाचून पेटीवर गाणी वाजवायची ते पुस्तक. अजूनही बाजारात इतकं सहज मिळेल मला वाटलं नव्हतं.’

माधुरी ते पुस्तक हातात घेऊन थोडी नॉस्टॅल्जिक होते आणि कौतुकानं म्हणते, ‘तू हे ही लक्षात ठेवलस?’

‘काही गोष्टी लक्षात ठेवाव्या नाही लागत, त्या राहतात...’ अमरच्या ह्या वाक्यावर माधुरी त्याला एक छान स्माईल देते.

‘पण ही माझी नाहीये रे पेटी. मी कशी ठेऊ माझ्याकडं?’ ती पुन्हा म्हणते.

‘पच! झाली का परत सुरू...’ असं म्हणत अमर त्याच्या एका बोटानं त्या पेटीवरच्या धुळीत तिचं नाव लिहितो ‘माधुरी ड्रामेबाज.’

‘घे झाली ही पेटी आता तुझी!’ तो चिडवत म्हणतो.

माधुरी भुवया उडवत त्याला लुक देते. अमर मिस्कील हसतो. आता हा प्रसंग मात्र दोघांनाही लक्षात ठेवावा नाही लागणार, तो आपोआप लक्षात राहील. कायमचा.

mahajanadi333@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com