दुनियादारी : देखावे ते नवलच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhol Tasha

‘मला? अम्... मला ती गुहा आवडली. छान दोन्ही बाजूनं पाणी पडतंय आणि मग समोर गणपतीचं दर्शन होतं ती. पण मला ना ॲक्चुली हलते देखावे जास्त आवडतात.

दुनियादारी : देखावे ते नवलच!

‘काय मग, कुठला देखावा आवडला?’

‘मला ना ते हंपीचं मंदिर उभारलेलं होतं ना, ते खूपच आवडलं. तुला?’

‘मला? अम्... मला ती गुहा आवडली. छान दोन्ही बाजूनं पाणी पडतंय आणि मग समोर गणपतीचं दर्शन होतं ती. पण मला ना ॲक्चुली हलते देखावे जास्त आवडतात. मोठे राक्षसांचे पुतळे आणि देवांचे अवतार, त्याला जोड खणखणीत आवाजाची. अगदी माझे आजोबा मला गोष्टी सांगायचे तसंच. कमी झालेत पण आता असे देखावे,’ स्वप्नील म्हणाला.

ईशा हे ऐकून नुसती हसते.

‘काय गं, काय झालं हसायला?’

‘काही नाही रे... सगळीकडच्या फँटसी वर्ल्डमध्ये असलेला तुझा इंटरेस्ट आहे ना... तो फारच इंटरेस्टिंग आहे,’ ईशा आइस्क्रीमचा ओघळ जिभेने टिपत म्हणाली.

‘हे बरंय! तू ते अव्हेंजर्स आणि बाकी काय काय सुपरहिरोजचे सिनेमे पॅशनने बघते, ते चालतं. पण पौराणिक कथा आणि देवदेवता कोणाला आवडत असतील तर लगेच - काय तुमचं फँटसी वर्ल्ड... नाही का!’ स्वप्नील आइस्क्रीमकडं दुर्लक्ष करून म्हणाला.

‘असं काही नाहीये रे!’’ ईशा पुन्हा हसली आणि म्हणाली, ‘‘सो तुला देखावे आवडतात, पण तुला ही गर्दी आवडत नाही... असा कसा रे तू??’ गर्दीतून मार्ग काढत दोघं चालले असताना ईशानं विचारलं.

‘मला लहानपणी ना... सगळे देखावे बघायचे असायचे. पण इवल्याशा पायात तेवढा जोर कुठं होता? मग बाबा खांद्यावर बसवून न्यायचे. आता पायात त्राण सुद्धा आहेत सगळे देखावे चालत जाऊन बघायचे...पण इच्छा कहीं पे थोडी थोडी हर साल दगा दे रही है... और फिर इस साल...’

स्वप्नीलनं बोलता बोलता एक छोटा पॉज घेतला.

ईशानं त्यानं बोलता बोलता मराठीतून हिंदीमध्ये वाक्य बदलल्यानं पुन्हा गोड स्माइल दिली आणि गोड पद्धतीने विचारलं, ‘और?... और इस साल क्या हुआ?’

‘और इस साल किसीने बड़े प्यार से पूछ लिया - के माझ्यासोबत गणपती बघायला येशील का?’’ स्वप्नील म्हणाला आणि दोघंही चालता चालता हसायला लागले.

‘म्हणून आलास होय आज?’

‘हो. कारण तुझा जास्त विश्वास नसला तरी माझी खात्री आहे की काही फँटसी खऱ्या होतात.’

‘अस्सं? जसं की?’

‘जसं की... गर्दीत आपुलकीनं एका सुंदर मुलीचा हात घट्ट धरून मग गणपतीतले देखावे बघायची...’

ईशा स्वप्नीलकडं मान वळवून बघते तेवढ्यात स्वप्नील तिचा हात धरतो आणि ते रस्ता क्रॉस करतात. ईशाला काही समजेपर्यंत हे सगळं घडूनही जातं आणि तिला त्यावर काय रिॲक्ट करायचं हेही कळत नाही. ती तशीच अर्धवट लाजून चालत राहते, दुसऱ्या हातातलं आईस्क्रीम संपवत. काहीवेळ ते तसेच काही न बोलता हात धरून चालत राहतात.

‘चल ह्या निमित्तानं का होईना, तुझी एक तरी फँटसी पूर्ण झाली आज. नाही का?’ असं म्हणत ईशा शांतता मोडते.

‘एक, एक मिनिट...! म्हणजे तू स्वतःला सुंदर मुलगी वगैरे समाजतीयेस की काय??’ स्वप्नील मिश्कीलपणे म्हणतो. हे ऐकून ईशा त्याच्या हातात घेतलेल्या हाताला जोरात नख टोचते. स्वप्नील हसता हसता हळूच ओरडतो. ह्या सगळ्यात देखावे बघत, ते कॅमेरात टिपत, आपल्या आजूबाजूस गर्दी आहे हेच स्वप्नीलला जाणवत नाही. अगदी एखाद्या फँटसी जगासारखं. आणि ह्याच विचारात तो म्हणतो,

‘तुला माहितीये... आज बहुतेक मला माझी इरिटेट न होणारी गर्दी पुन्हा मिळाली.’

‘...आणि बहुधा मला एक गर्दीतला दर्दी मिळाला!’ ईशा म्हणते आणि हसायला लागते. ह्यावेळी स्वप्नील तिच्या हातात घेतलेल्या हाताला नख टोचतो, पण तिच्यापेक्षा हळूच.

दोघं तसेच गप्पा मारत, हात घट्ट धरून, गर्दीतून वाट काढत चालत राहतात. नव्या फँटसी जगाच्या शोधात.

mahajanadi333@gmail.com

Web Title: Aaditya Mahajan Writes Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang