दुनियादारी : शेवटी काय?

‘काय गं, कोणाला प्रेमपत्र लिहिती आहेस इतक्या मनापासून? अगं मी समोरच आहे तुझ्या, डायरेक्ट सांग... इतकं प्रेमपत्र नको लिहूस मला!’
Love Letter
Love LetterSakal
Summary

‘काय गं, कोणाला प्रेमपत्र लिहिती आहेस इतक्या मनापासून? अगं मी समोरच आहे तुझ्या, डायरेक्ट सांग... इतकं प्रेमपत्र नको लिहूस मला!’

‘काय गं, कोणाला प्रेमपत्र लिहिती आहेस इतक्या मनापासून? अगं मी समोरच आहे तुझ्या, डायरेक्ट सांग... इतकं प्रेमपत्र नको लिहूस मला!’

आदित्य उगाच शब्दाला शब्द लावून शांभवीला उचकवायला म्हणाला.

‘प्रेमपत्रच लिहित आहे, पण तुझ्यासाठी नाहीये. उगाच फालतू स्वप्न बघू नकोस!’

शांभवीच्या ह्या कुचकट उत्तरावर आदित्य फिदीफिदी हसतो आणि तिच्या कागदात डोकावून विचारतो, ‘मग कोणासाठी आहे हे?’

‘मी ना माझ्या आवडत्या लेखकासाठी हे पत्र लिहितीये.’

‘म्हणजे कोण?’

‘अरे, तुला मी त्या ‘जगातभारी’ नावाच्या सदरातील २-३ गोष्टी पाठवल्या होत्या बघ मध्ये... त्याच कॉलमच्या लेखकाला.’

‘आवरा! इतकी काय तू वेडी झाली त्याचं वाचून?’

‘काय प्रोब्लेम आहे रे तुला? मला आवडतं त्याचं लिखाण.’

‘काहीही आऊट ऑफ द बॉक्स लिहीत नाही तो. मी पण वाचले आहेत ४-५ लेख, त्यात अर्धे तर इंग्लिश शब्द असतात. आणि हा कसला आला मराठी लेखक?’

‘अरे प्रत्येकाची आपली आपली स्टाइल असते. आणि आपण तरी कुठे रोजच्या आयुष्यात शुद्ध मराठी बोलतो? तुझ्या ''आऊट ऑफ द बॉक्स'' ह्या शब्दाला काय म्हणणार मराठीत? तो आपल्यासारख्यांचीच, तुझ्यासारख्यांचीच गोष्ट लिहितो, म्हणून तशी भाषा.’

‘उगाच तू फॅन आहेस म्हणून जस्टीफाय करू नकोस त्याला. आणि प्लिझच! तो माझ्यासारख्यांची तर गोष्ट अजिबात लिहीत नाही. माझ्या आयुष्यात ना त्याच्या गोष्टीत असतात तशा मुली येतात ना इतका फिल्मी समजूतदारपणा!’’

‘एकीकडं म्हणतोस, की काही खास लिहीत नाही तो, एकीकडं म्हणतोस काहीतरी वेगळंच लिहितोय तो! अरे भाई केहना क्या चाहते हो?’

‘शब्दात पकडायला जाऊ नकोस. त्याला त्याच त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने फक्त सांगता येतात. त्याला मार्केटिंग गिमिक कळालंय - गोष्टीच्या सुरुवातीला एक मुलगा आणि एक मुलगी ह्यांच्यातल्या एखाद्या विषयावर बोलणं, बोलण्याचं वादात रूपांतर आणि मग त्यात फिल्मीपणाचा तडका लावून शेवट अगदी गोड. इतकं कुठं सोपं असतं आयुष्य आणि नाती सांभाळणं?’

‘नसतंच. पण इतक्या सोप्या प्रकारे विचार करायला काय हरकत आहे? राहिली गोष्ट तुझ्या मार्केटिंग गिमिकच्या आरोपाची, तर त्यात वाईट काय आहे? जरका एन्टरटेनिंग पद्धतीनं आणि लोकांना आवडंल त्या शैलीत कोणीतरी काही छान मुद्दे मांडतंय, तर ते किती मस्त आहे.’

‘जशा मुली एकेकाळी ‘जब वुई मेट’ पाहून आणि आत्ता काही वर्षांपूर्वी ‘कबीर सिंह’ पाहून झाल्या होत्या तशी तू ठार येडी झालीये त्याचं २००२च्या स्टाईलचं बॉलीवूडीश लिखाण वाचून!’ आदित्य कुत्सित हसत म्हणाला.

‘तुला मी त्याचं इतकं कौतुक करतीये ते अजिबात पचत नाहीये ना? अरे स्किल लागतात प्रत्येक गुरुवारी येऊन लोकांना इतकं सहज शब्दात गुंतवायला.’

‘...आणि फेकाफेकीच्या गोष्टी रंगवायला!’ आदित्य शांभावीचं वाक्य कापत म्हणाला.

‘हाड! मला त्याला पत्र लिहू दे, त्याच्या सदरचा आज शेवटचा लेख होता. तू ज्या गोष्टींना फेकाफेकी म्हणतोएस ना - ते अगदी सेम आत्ता आपल्यात घडतंय. तू ते ही मान्य नाहीच करणार पण इतकं रिलेटेबल आहे त्याचं लिखाण. सोड!’

‘म्हणजे त्या अनुषंगाने तर इथं सुद्धा एक छान हॅपी एन्डिंग झाला पाहिजे ना!’

‘हॅपी एन्डिंग आपोआप होत नाही, ते घडवून आणावे लागतात. लेख नीट वाचले असतेस तर कळालं असतं तुला हे!’ असं म्हणून शांभावी पुन्हा तिच्या पत्रात डोकं घालते.

तेवढ्यात आदित्य खिशातून त्याचा मोबाईल काढतो आणि मोबाईल स्पीकरजवळ तोंड करून म्हणतो, ‘बघ! म्हटलं होतं ना... हिला तुझं काहीही लिहिलेलं आवडतं. वेडी फॅन आहे ही तुझी...’

चकित होऊन शांभावी डोकं वर करते आणि मोठे डोळे करून विचारते, ‘कोणाशी बोलतोय?’

मोबाईलच्या स्पीकरवरून आवाज येतो, ‘हाय शांभावी, मी तुझ्या आवडत्या ‘जगातभारी’ सदराचा लेखक बोलतोय...’

शांभावी आदित्यच्या हातावर चिमटा काढते आणि दबक्या आवाजात विचारते, ‘तू कसा काय ओळखतोस ह्याला? आणि किती वेळ फोन सुरू आहे?’

‘अगदी सुरुवातीपासून!’ स्पीकरवरून पुन्हा आवाज येतो.

‘...म्हटलं काही शेवट तुला आवडतात तसेच घडवून आणावे!’ आदित्य छान स्माईल देतो आणि शांभावीकडं त्याचा फोन देत म्हणतो. शांभावी फोनवर आवडत्या लेखकाशी लाजून लाजून बोलतानाही लांब आदित्यकडे बघत राहते.

mahajanadi333@gmail.com

(समाप्त)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com