दुनियादारी : अवघड नाहीये रे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुनियादारी : अवघड नाहीये रे!
दुनियादारी : अवघड नाहीये रे!

दुनियादारी : अवघड नाहीये रे!

‘अरे! अम्म... कोणीच नाहीये का इथं?’

घाईघाईत कॅन्टीनमध्ये आलेला श्री तिथं त्यांच्या ग्रुपमधली मंडळी इथं सापडतील ह्या आशेनं तिथं आला होता, पण तिथं अभ्यासाची पुस्तकं उघडून बसलेल्या दिव्याशिवाय कोणीच नाही हे पाहून तो जरा हतबल झाला.

‘कोण हवंय तुला नक्की?’ दिव्यानं विचारलं.

‘अजय, दीपक, श्वेता... अम्म कोणीही...’

‘कोणीही मध्ये मी ही येऊ शकते ना?’ दिव्यानं नाकावरचा चष्मा बोटानं मागं ढकलत विचारलं.

दिव्या आणि श्री ग्रॅज्युएशनच्या ह्या दीड वर्षात जेमतेम १० वाक्यं बोलले असतील एकमेकांशी. श्री गावाकडून आल्यानं त्याच्यात थोडा न्यूनगंड होता, की दिव्यासारख्या बोल्ड आणि हुशार शहरी मुलीशी मैत्री कशी करावी, बोलावं कसं. तर दिव्या आपल्याच धुंदीत ‘ह्या जगालाच माझ्याशी मैत्री करायचीच नाहीये,’ ह्या ऍटीट्युडनं जगत होती. हे दोघं एका शांत दुपारी, क्लासेस रद्द झाल्यावर असे रिकाम्या कॅन्टीनमध्ये एकमेकांसमोर येतील, असं दोघांनाही कधी अपेक्षित नसावं.

‘हो हो.. तू पण येतेच की अगं.. असं काय बोलतीयेस!’ श्री त त प प करत म्हणाला.

‘बोल, मग काय हवंय?’’

‘मला मार्केटला सगळ्यात लवकर कसं पोचता येईल इथून? बस कुठली मिळेल?’ श्रीनं विचारलं.

‘सगळ्यात लवकर तर तुला माझी गाडीच पोहचवू शकेल,’ दिव्या म्हणाली आणि तिनं तिच्या टू व्हिलरची किल्ली समोर टेबलावर ठेवली.

‘तू... मला... तुझी गाडी देतीयेस चालवायला? तुला माहितीये ना मला इतकी चांगली नाही येत गाडी चालवता, कोणी देत नाही त्यामुळं मला त्यांची गाडी आणि त्यात शहरात चालवायला देतीयेस तू मला... ठीक आहेस ना?’ श्रीनं आश्चर्यानं तिला विचारलं.

‘कधी ना कधी तर तू शिकशीलच चांगली चालवायला, इतका वाईट स्टुडंट नाहीयेस... सो आजपासूनच होऊ दे सुरुवात. त्यात काल तूच टाकलं होतंस ना स्टेटस स्टोरीला - ‘जेव्हा आजूबाजू चांगली लोकं सापडत नसतात तेव्हा स्वतःच चांगलं बनावं.’ तेच फॉलो करतीये जराशी.’ दिव्या हलकी स्माईल देण्याच्या प्रयत्नात म्हणाली.

‘वॉव! मला माहीत नव्हतं तू माझं स्टेटस वाचतोस ते...’ श्री म्हणाला.

‘इतके छान फोटो काढतोस, खाली काहीतरी छान ओळ पण लिहितोस... का नाही पाहणार तुझं स्टेटस? आता जाणारेस का नाही तू? उशीर होतोय ना तुला? माझा तुला गाडी देण्याचा विचार बदलण्याच्या आत नीघ!’’ दिव्या पुन्हा नाकावरचा चष्मा बोटानं मागे ढकलत त्याला म्हणाली.

‘माझी आई आली आहे गावावरून, आजच परत जाणारे, मला एक दीड तास लागेल... चालेल ना?’’ श्री किल्ली घेत विचारलं. दिव्यानं मान डोलावली. श्री गाडी घेऊन जातो, आईला भेटतो, तिनं दिलेले साजूक तुपातले खमंग बेसणाचे लाडू डबा भरून घेऊन तो सुखरूप परत येतो. एका छान स्माईलनं दिव्याला तिच्या गाडीची किल्ली तो परत करतो, त्याला गाडी कशी नीट आज चालवता आली, हे तिला सांगतो, तिला खूप वेळा थँक्स म्हणतो आणि निघून जातो.

दिव्या काही वेळानं कॅन्टिनमधून निघत असते, तेव्हा ती व्हॉट्सॲप उघडते. तिला श्रीची ५ मिनिटांपूर्वी टाकलेली स्टेटस स्टोरी दिसते. त्यात त्यानं तिच्या गाडीच्या किचेनचा छान फोटो टाकला असतो, बॅकग्राउंडला दिव्याची गाडी असते. खाली लिहिलं असतं, ‘‘काही माणसं, काही गोष्टी, जितक्या अवघड वाटतात तितक्या कधीच नसतात....’’

दिव्या ते वाचून गालात छान हसते आणि त्याच्या स्टेटसला एक स्माईली रिप्लाय म्हणून देते.

गाडीपाशी पोहोचून ती तिचा स्कार्फ काढायला डिक्की उघडते, तर तिथं एक छोटा डबा तिला दिसतो. उघडून बघते तर बेसणाचे चार खमंग लाडू श्रीनं तिच्यासाठी ठेवलेले असतात. सगळ्यात कमी बोलणारी माणसं एकमेकांशी कित्ती काय काय न बोलता बोलून जातात, नाही का?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
loading image
go to top