दुनियादारी : पेहराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुनियादारी : पेहराव

‘निळ्या रंगाची कुर्ती... कानात सोन्याचे डूल... हातात पांढऱ्या पट्ट्याचं घड्याळ आणि अजून काय होतं बरं ...??’

दुनियादारी : पेहराव

‘निळ्या रंगाची कुर्ती... कानात सोन्याचे डूल... हातात पांढऱ्या पट्ट्याचं घड्याळ आणि अजून काय होतं बरं ...??’

‘टू बी स्पेसिफिक, मोरपंखी निळ्या रंगाची कुर्ती, कानात सोन्याचे नाजूक साधे डूल, हातात जुनं झालेलं पण बहुदा तिच्या बऱ्याच आठवणी असलेलं लेडीज घड्याळ आणि टोचलेलं नाक...’

आमोदनं मोठ्ठी स्माईल देत अवनीच्या वाक्याला बरोबर केलं. ती पण हसली आणि म्हणाली, "कित्ती ओव्हर रोमँटिक फिल्मी लिहितो तू. असं खरं काही असतं का तरी कुठं?’

बाजारात कपड्यांच्या स्टॉल्सवर कोणासाठीतरी गिफ्ट घ्यायला आलेले हे दोघं ते सोडून सगळं करत होते.

‘वाचतेस ना तरी तू... इतका शब्दन् शब्द? जे लोकांना आवडतं वाचायला आणि जे मला लिहायला जमतं तेच लिहिणार ना मी!’ आमोद म्हणाला.

‘न आवडायला काय झालं? प्रत्येक गोष्टीत इतकं मुलींचं सुंदर वर्णन करतोस की कधी कधी वाटतं तू एखादी गोष्ट अशी माझ्यावर सुद्धा लिहावीस... तर कधी कधी वाटतं हा माणूस कसला स्टॉकर आहे राव!’ ती फार सिरियसली म्हणाली.

‘माझी स्तुती करत आहेस का मला वेडा म्हणतीयेस?’ आमोदनं तिच्या ह्या वाक्यावर काय बोलू ह्या विचारात विचारलं.

‘वेडा तर तू आहेसच! ते काय वेगळं सांगायचं... पण स्तुतीच करतीये मी. इतकं छान वाटतं न तुझी अशी वर्णनं वाचून. मी कितीही नावं ठेवली आणि त्या गोष्टी कितीही खोट्या असल्या तरी... भारी वाटतात वाचायला.’ ती अगदी मनापासून बोलली.

‘एक एक एक मिनिट! काय म्हणालीस? कितीही खोट्या असल्या तरी...?? बासच !’ आमोदनं लगेच आक्षेप घेतला.

‘गपे! उगाच ड्रामा. खोट्याच असतात त्या गोष्टी. कुठून अनोळखी मुली अशा तुला सारख्या भेटतात? ते सुद्धा सोईस्कर एकट्या? आणि मग तुम्ही असे अगदी वैचारिक वगैरे बोलता आणि मग ती तुझ्या प्रेमात पडते... काहीही!’

आमोद एका गालात हसला आणि म्हणाला, ‘माझ्या प्रेमात वगैरे नाही पडत हां... ते जस्ट वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी असतं, पण बाकी सिच्युएशन खऱ्या असतात. घडतं माझ्यासोबत हे सगळं बरंका!’

ते दोघं एका दुकानातून दुसऱ्या दुकानात गेले.

‘मला तर सगळ्या गोष्टी खोट्या वाटतात. मला नाही विश्वास तुझ्या आयुष्यातल्या इतक्या मुलींवर...’ तिनं सारकॅस्टिक लुक दिला आणि हातातला एक टॉप निरखून पाहताना म्हणाली.

‘काय बोलायचं आता... विश्वासच नाहीये लोकांना! श्या!’ आमोदनं खोटं खोटं नाक मुरडलं.

अवनी तिथून पुढं पाच पावलांवर गेली आणि तिथले डूल अन् डूल नीट बघत होती. आमोद क्षण अन् क्षण ती कशी बघतीये ते बघत होता.

‘हे झुमके घ्यायचे?’ तिनं अचानक विचारलं.

आमोद हलक्या तंद्रीतून बाहेर आला. ‘हं! अम्म चालेल. आवडेल तिला.’

‘हो! आणि घेतलेल्या ड्रेस सोबत मॅच होईल. अगदी तुझ्या गोष्टींमधल्या मुली घालतात ना मॅचिंग... तसं...’ ती गोड गालातल्या गालात चिडवल्यासारखं हसली.

आमोदनं गालातल्या गालात हसून तिला हलका कोपरा मारला.

‘पण एक खरं सांगू...." तीच पुढं म्हणाली, ‘तुझ्या गोष्टी वाचून कधी कधी असं वाटतं... की मी पण अशी कोणीतरी अनोळखी मुलगी असायला हवे होते आणि तुला अशी कुठंतरी भेटायला हवं होतं... मग तू माझ्यावर पण असं छान काहीतरी वर्णन करून लिहिलं असतंस... मी काय घातलंय, कशी हालचाल केलीये... सगळं!’

त्यानं सरळ २ सेकंदं तिच्या डोळ्यात बघितलं. काहीच एक्सप्रेशन नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर. तिनं सुद्धा हा असं काय बघतोय ते पाहिलं. रात्री आठच्या अंधारात, रस्त्यावरच्या झगमगाटात, त्या रंगीबेरंगी काचांचे आणि मोत्यांचे झुमके तिच्या चेहऱ्यावर प्रकाश- ठिपक्यांची एक वेगळी नक्षी करत होते. त्यात अलगद तिची नकातली चमकी लकाकत होती.

‘काय?’ तिनं शांतता तोडत विचारलं.

‘म्हणूनच म्हणतो मी नेहमी, मूर्ख आहेस तू...’

‘हां? म्हणजे?’

त्यानं तिचा हात धरला आणि तिला समोरच्या आरशाकडं वळवलं.

‘हे बघ कोण आहे आरशात. आज मोरपंखी नाहीये पण पिवळसर कुर्ती आहे, कानात रिंगवाले डूल आहेत आणि हातात... हातात तेच जुनं पांढऱ्या पट्ट्याचं घड्याळ...’

अवनी आरशात स्वतःला बघण्याऐवजी आमोदलाच बघत राहिली.

प्रत्येक गोष्टीचा कोणी लेखक नसतो, पण प्रत्येक लेखकाची एक गोष्ट असते!

Web Title: Aaditya Mahajan Writes Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
go to top