दुनियादारी : चांगलंच कळतंय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुनियादारी : चांगलंच कळतंय!

‘काय राव, माझे पैसे अडकलेत कधीचे. कोर्टात केस तर सुरू आहे, पण काय माहीत निकाल कधी लागणार. कटकट झाली नसती..’

दुनियादारी : चांगलंच कळतंय!

‘काय राव, माझे पैसे अडकलेत कधीचे. कोर्टात केस तर सुरू आहे, पण काय माहीत निकाल कधी लागणार. कटकट झाली नसती..’

‘अरे ठीके रे... मिळतील. ज्यानं तुझे पैसे बुडवलेत त्याची सुद्धा काहीतरी अडचण असेल ना, त्यामुळं इतका त्याचा त्रागा नको करून घेऊस. होईल सगळं नीट.’

‘अगं! तू माझी मैत्रीण आहेस... तू त्याची काय बाजू घेत आहेस, ज्यानं माझं इतकं नुकसान केलंय?’

‘तसं नाही रे! म्हणजे तू इथे शिव्याशाप देऊन किंवा डोक्यात राग घेऊन, उदास राहून काही होणार नाही. पण त्या व्यक्तीची एक बाजू असणार ना? त्यालाही काहीतरी अडचण असणार. तुझा मेहनतीनं कमावलेला पैसे महत्त्वाचा आहेच, पण त्या माणसाची अडचण सुद्धा तितकीच खरी असणार. नाहीतर कोण असं करेल सांग बरं? तू सगळी कायद्यानं बरोबर पावलं उचलली आहेस ना... मग माझा विश्वास आहे मिळतील तुला पैसे. पण त्यावर इतका मनात त्रास करून घेऊ नकोस.’’

‘कुठून येतो इतका चांगुलपणा तुझ्यात? का आहेस तू इतकी चांगली?’

‘गप रे! मी काही चांगली वांगली नाहीये. उगाच काहीतरी.’

‘आहेस!’

‘नाहीये!’

‘आहेस, आहेस, आहेस!’

‘नाहीये, नाहीये नाहीये!’

दोघंही त्यांच्या बालिशपणाची चर्चा रंगलेली पाहून एकसाथ हसतात.

‘मान्य कर आहेस! मी सांगतोय ना!’

‘अम्म... ठीके चल! आहे मी थोडीशी चांगली. बास?’

‘अहं! थोडी म्हणे! पॉसिटीव्हिटीचा अखंड स्रोत कुठली!’

‘आता बास झालं माझं खोटं कौतुक!’

‘हे बघ, माझ्यासारख्या खडूस व्यक्तीच्या तोंडून कोणाचं कौतुक सहसा होत नाही, त्यामुळं तुझं कौतुक मी करत असेन ना, म्हणजे ही जगातली खूप मोठी गोष्ट आहे हे लक्षात घे. तुझे विचार आणि ऑरा खूप छान आणि पॉझिटिव्ह आहे.’

‘अरे माझे बाबा व्हेंटिलेटरवर होते तेव्हा सुद्धा मी इतकीच पॉझिटिव्ह होते. मला वाटत होतं की त्यांना काही नाही होणार. पण... असो.’

‘अगं काय... तू किती सहज सांगतीयेस हे सगळं! कसं जमतं इतकं स्ट्रॉंग राहणं नेहमी तुला?’’ त्यानं एका डोळ्यात साठून बाहेर पडण्याची भीती असलेलं दोन थेंब पाणी कसंबसं अडवलं.

‘काय उपयोग? हे असलं जरा अतीच पॉझिटिव्ह असल्यानं मला नंतर किती मानसिक त्रास होतो! काय सांगू तुला... खूप वेळ गेला मला नॉर्मल होता होता...’

‘आणि तरीही तू परत पॉझिटिव्ह विचार करू शकती आहेस, हीच तर तुझ्या चांगुलपणाची ताकद आहे. चांगल्या माणसांनी हर्ट होणं साहजिक आहे, म्हणून तर तुम्ही चांगले आहात ना!’

‘झालं? निघू मी आता?’

‘गाडी कुठंय तुझी?’

‘नाही आणली, चालत जाणारे.’

‘इतक्या लांब? उन्हाळ्यात? बस मी सोडतो.’

‘कशाला? तुला उलटं पडेल!’

‘चालतं तेवढं.’

‘पण का करायचंय तुला हे?’

‘कारण मला पण थोडं चांगलं बनायचं आहे... तुझ्यासारखं.’

तो छान हसला. तिनं सुद्धा गालात स्माईल दिली.

‘तू चांगला आहेस माहितीये मला,’ ती गाडीवर बसता बसता म्हणाली.

‘कसं काय?’

‘कितीही कंट्रोल केलंस तरी मगाशी मी तुझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलंय रे. दुसऱ्याच्या दुःखावर सहज डोळ्यात पाणी येणं सुद्धा चांगुलपणाचंच लक्षण आहे बघ! त्यामुळं ड्रामा बंद कर आता.’

‘एकदा चांगुलपणा म्हणते, मग त्यालाच ड्रामा म्हणते आणि सगळं पाण्यात घालवतेस! कसली वाईट आहेस अगं तू!!’

‘तेच म्हणतीये मी कधीपासून, की मी नाहीये चांगली!’

ती जोरात हसते. तो फक्त मान डोलावतो.

वो देखने में कितनी सीधीसादी लगती

है बोलती कि वो तो कुछ नहीं समझती

अंदर से कितनी तेज़ है!

कभी अजीब सी कभी हसीन लगती

कभी किसी किताब का ही सीन लगती

फिलोसॉफी का क्रेज़ है!

Web Title: Aaditya Mahajan Writes Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang