दुनियादारी : तिकीट टू दडपशाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Movie Ticket

‘अगं, म्हणजे ठीक आहे, इतका काही भारी नाही वाटला जितकी लोकांनी बोलून त्याची अपेक्षा वाढवून ठेवली आहे.’

दुनियादारी : तिकीट टू दडपशाही

‘तुला कसा काय नाही आवडला हा सिनेमा?’

‘अगं, म्हणजे ठीक आहे, इतका काही भारी नाही वाटला जितकी लोकांनी बोलून त्याची अपेक्षा वाढवून ठेवली आहे.’

‘अशक्य आहेस तू! जे जगाला आवडतं ते तुला नाही आवडत. तुझा हा माईंडसेट आहे आणि तो मला चांगलाच माहीत आहे!’

‘अगं असं नाहीये काही... मला थ्री इडिएट्स खूप आवडतो किंवा ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’सारखे सगळ्यांना आवडलेले सिनेमे सुद्धा आवडतात.’

‘मग हा का नाही आवडला?’

‘आता ते सिनेमे आवडले म्हणून हा आवडायलाच पाहिजे का? हा कसला नियम?’

एक नवीन हिंदीत डब केलेला, गाजावाजा झालेला साऊथ इंडियन सिनेमा बघून बाहेर पडलेले ईशान आणि रिद्धी, ईशानच्या सिनेमावरच्या टीकेनंतर खुसखुशीत भांडण्याच्या तयारीला लागेलेलं असतात.

‘तू ना, स्वतःला असा सिनेमा एक्स्पर्ट वगैरे समजतोस. उगाच सगळ्यात मतं द्यायचीच असतात तुला.’

‘बळंच! मी काय माझी मतं कोणावर थोपवत नाही. मला जे नाही आवडत ते मला स्पष्ट सांगायला आवडतं.’

‘पण ते बरोबरच आहे असं नाहीये!’

‘हो की मग. बरोबर कोणीच नाहीये, पण फक्त प्रत्येक गोष्टीकडं बघायची दृष्टी वेगळी असू शकते. जसं एखाद्या वाईट सिनेमात सुद्धा चांगलं गाणं येऊ शकतं आणि ते कोणाच्या तरी मनात घर करून बसतं, त्यामुळं त्या व्यक्तीला तो सिनेमा वाईट असूनही तितका वाईट वाटत नाही, तसं जगाला एखादा चांगला वाटलेला सिनेमा एखाद्याला तितका नाही आवडला तर लगेच त्याची अक्कल काढायची गरज नाही.’

ईशान भांडणाच्या स्वरातच पण तरी शांतपणे म्हणाला. रिद्धीनं जे कानावर पडलंय ते बरोबर आहे माहीत असतानाही भांडणात ईशानसमोर माघार घ्यायची नाही म्हणून वाद सुरू ठेवला.

‘पण हा सिनेमा खूप भारी होता, तू त्या काकांशी बोलताना जेवढे ह्याचे वाभाडे काढत होतास तेवढा तर अज्जिबात वाईट नाहीये.’

‘अरे? काय प्रॉब्लेम आहे? एखाद्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही तुझ्या आजूबाजू? का जे तुझं मत तेच सगळ्यांनी ऐकायचं?’

‘हो असंच समज. माझ्या आवडत्या सिनेमांच्या बाबतीत तर वाकड्यात जायचंच नाही, भयानक भांडणं होतील आपली.’

‘तुला आवडतो तो टी-शर्ट मी घालायचा, तुला जुनी झालीये असं वाटतंय म्हणून मी माझी चप्पल बदलायची, माझे हेडफोन जुने झाले, हे पण तूच ठरवणार आणि आता मला कुठला सिनेमा आवडला पाहिजे हे पण तुझ्याच मताप्रमाणं? ह्या कुठल्या दडपशाहीत आलोय मी हिटलर साहिबा?’

खूप वेळानं ह्या वाक्यावर रिद्धी हलकी हसली.

‘स्टुपिड! विषय बदलू नको तू!’ ती म्हणाली, ‘तू उगाच ‘मला’ सिनेमा आवडला म्हणून त्या सिनेमाला नावं ठेवतो आहेस, माहीत आहे मला. आला मोठा चित्रपट समीक्षक कुठला.’

‘अगं असं काही नाहीये बाई. आणि मला मुळात तुझं इतकं कौतुक केल्यानंतर तुला आवडणाऱ्या सिनेमांचं सुद्धा इतकं कौतुक करायचं हा रुल माहीत नव्हता!’ ईशान एका गालात हसत म्हणाला.

‘गप्प बैस. तू असलं जिलेबी बोलून विषय टाळू नको. एकतर कुठल्याही विषयात कॉन्व्हर्सेशनल मोकळीक असायला हवी. आणि मुळात तू गप्प बसून ऐकत जा माझं...’ रिद्धी बोलत असतानाच ईशान जोरजोरात हसायला लागला.

‘काय? काय झालं इतके दात काढायला?’ उचकलेल्या रिद्धीनं कन्फ्युजनमध्ये विचारलं.

‘काही नाही... तू ना ‘गप्प बैस’ आणि ‘कॉन्व्हरसेशनल मोकळीक’ असे दोन शब्द एकाच वाक्यात वापरलेस. एकाच वाक्यात किती ते कॉन्ट्राडिक्शन?’ ईशान तसंच हसत म्हणाला. रिद्धीला सुद्धा तिच्या वाक्यातली ही गंमत जाणवली आणि ती पण इच्छा नसताना हसून गेली. दोघांचही हसणं झाल्यावर ईशान शांतपणे म्हणाला, ‘मला कदाचित असे बरेच सिनेमे आवडणार नाहीयेत जे तुला आवडतील, पण मला न आवडलेल्या प्रत्येक सिनेमावर तुझ्याशी असं भांडायला मात्र नेहमी आवडेल.'

‘दडपशाहीला होकार देतोस तू थोडक्यात?’

‘नाही, नाही. दडपशाहीमध्येसुद्धा लोकशाहीचा झेंडा प्रेमानं फडकावतोय.’

(mahajanadi३३३@gmail.com)

टॅग्स :movieticketsaptarang