आम्ही कोण म्हणुनी काय पुसता..

file photo
file photo


आम्ही एकविसाव्या शतकातली मॉडर्न पिढी आहोत, खरंय. आमचे आचार विचार आधुनिक, विज्ञाननिष्ठ असतात. आम्ही असतो सायन्स शिकलेले, बी.एस.सी एम.एस.सी. झालेले, किंवा डॉक्‍टर- इंजिनिअर, आर्किटेक्‍ट किंवा आर्टस्‌ ह्युमॅनिटीजवाले, मानवी हक्क, मूल्य व्यवस्था, समाजावर वगैरे चिंतन करणारे, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र वगैरे खोलवर अभ्यासणारे. आमच्यापुरता आमच्या ठायी असतो कणखरपणा, स्वाभिमान आणि डोळसपणा वगैरे. रात्री अपरात्री सोबतच्या कुण्या मुलीला बसस्टॉपपर्यंत सोडायला गेलोच तर बस येईपर्यंत तिच्यासाठी थांबण्याइतके आम्ही संवेदनशील असतो, कुठे आलाच पूर वगैरे तर मनापासून हळहळ व्यक्त करण्याइतके जागरूक असतो. स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात कॉलेजमध्ये पथनाट्य करण्याइतके डोळस असतो आणि समलैंगिक संबंधांचं उघडपणे समर्थन करण्याइतके, मॉडर्नही असतो. नाही असं नाही.
पण आम्ही पांघरलेल्या या विज्ञाननिष्ठतेच्या, आधुनिकतेच्या आवरणाला तडा जाईल असं काही आमच्या आजूबाजूला घडू लागलं की मात्र आमचा युधिष्ठिर होतो. मेलेला अश्वत्थामा हत्ती की माणूस हे आम्ही स्पष्टपणे सांगू धजत नाही अजूनही. आम्ही मूग गिळतो, फारसा विचार वगैरे करण्याच्या फंदात पडत नाही, नरो वा कुंजरो वा होतो.
जातीच्या उतरंडीला विरोध करणारे सिनेमे सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत, कॉलेजमध्ये त्यांची चर्चा आहे म्हणून आम्ही अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन बघतो. ते बघत असल्याचं स्टेटस्‌ अपडेट लगेच करतो, कारण त्यामुळे हुशार व्यक्ती म्हणून आमची इमेज क्रिएट व्हायला बरं पडतं ना.. पण घरचे जेव्हा सत्यनारायण करायचा ठरवतात, तेव्हा मात्र आम्ही तेही विनासायास कबूल करतो. सत्यनारायण या विधीतच मुळी चातुर्वर्ण्याचा उल्लेख आणि समर्थन आहे या वास्तवाशी आमचं तेवढ्यापुरतं काहीही घेणं-देणं नसतं. घरी सत्यनारायण झाल्याचं स्टेटसही आम्ही तितक्‍याच कौतुकाने सोशल मीडियावर पोस्ट करतो आणि सत्यनारायणाचा शिरा भक्तिभावाने मनसोक्त हादडतो.
आम्ही असतो बरं का फेमिनिस्ट. मुलींनी काय करिअर करू नये, पोळ्याच लाटाव्या काय आयुष्यभर.. अशा अर्थाच्या चर्चा आणि अशा अंगाने जाणारे वादविवाद आम्ही हिरिरीने करतो, पण आमच्याच घरातल्या बायकांच्या मासिक पाळीला जेव्हा विटाळ म्हटलं जातं तेव्हा आम्हाला त्यात काहीच गैर वाटत नाही. दहावीपर्यंत आम्ही सारेच बायोलॉजी शिकलेलो असतो, याच मासिक धर्मामुळे आपण जन्माला आलो हेही आम्हाला ठाऊक असतं. जुन्या काळात या कठीण दिवसांमध्ये बायकांना आराम मिळावा, म्हणून केलेली ती तरतूद आहे असं काही बाही सांगून आपल्याला थोपवलेलं असतं, तेच आम्ही सोयीस्करपणे कवटाळतो. पण यात पवित्र किंवा अपवित्रतेचा संबंध कुठे आला, हा प्रश्न आम्हाला पडत नाही, पडला तरी तो विचारण्याच्या आम्ही भानगडीत पडत नाही. आजची तथाकथित विज्ञाननिष्ठ, तत्त्वनिष्ठ, आधुनिक, शिक्षित तरुण मुलगी अनेक घरांमध्ये तिच्या मासिक धर्माला विटाळ किंवा कावळा शिवणे वगैरे म्हणून स्वेच्छेने बाजूला बसते, अजूनही.
दगडाच्या मूर्तीसाठी हातात नैवेद्य घेऊन जाताना आम्हाला मंदिराबाहेरची भिकाऱ्यांची रांग दिसत नाही अशातला भाग नाही. आम्ही कॉलेज कॅंटिनमध्ये social and economic balance वर चर्चाही केलेल्या असतात, पण नैवेद्य मात्र आम्ही मूर्तीलाच दाखवतो. चांद्रयानाच्या चंद्रावर पोहोचण्या न पोहोचण्याची चिंता बाळगत असतानाच, पत्रिकेतल्या मंगळावरून जेव्हा आम्हाला नाती तुटताना दिसतात, तेव्हा आजच्या so called आधुनिक पिढीचे उमेदवार म्हणून आम्हाला त्याच्या विरोधात उघड, परखड भूमिका घ्यावीशी वाटत नाही.
आम्ही ना धड अलीकडचे, ना धड पलीकडचे. ना मवाळ ना बंडखोर. ना धड सोवळं नेसलेले, ना धड उघडं नागडं वास्तव थेट पाहू शकणारे. आम्ही पूर्ण काळेही नाही, पूर्ण पांढरेही नाही, आम्ही राखाडी आहोत. आम्ही ना धड आमची मातृभाषा पूर्णपणे नीट बोलतो, ना इंग्रजी. आम्ही shall will असे ठामपणा दर्शवणारे शब्दही फारसे वापरत नाही, आम्ही may might मध्ये अडकलेले. पूर्ण जमीन आणि गुरुत्वाकर्षणापलीकडचा अंतराळ याच्यामध्ये कुठेतरी लटकलेले. आधीची पिढी आणि नंतरची पिढी यांच्यात रंगलेला असतो शिवाजी म्हणतोचा खेळ. नंतरच्या पिढीने आधीच्या पिढीला मी हे का करायचं, असं विचारलं की आधीची पिढी म्हणते शिवाजी म्हणतो म्हणून. कारण त्यांच्या आधीच्या पिढीनेही त्यांना हेच सांगितलेलं असतं. आता या खेळात डाव येण्याची पाळी आमची आहे. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला हा खेळ असाच पुढे खेळत राहायचा की डाव नाकारायचा हे आता आम्हाला ठरवायचं आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com