सूर्याची 'वादळवाट' (आनंद घैसास)

आनंद घैसास anandghaisas@gmail.com
रविवार, 13 मे 2018

सूर्याच्या पोटाला भगदाड पडून तो प्रचंड प्रमाणात ज्वाळा ओकेल आणि पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या ज्वाळांमुळं प्रचंड हानी होईल, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली आणि सगळीकडं घबराट पसरली. प्रत्यक्षात तसं झालं नसलं, तरी नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि भविष्याच्या "पोटात' काय लिहिलं आहे, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. "सौरडाग', "सौरवादळं' या संज्ञांचे नेमके अर्थ काय, ते कशामुळं होतात, सूर्याची ही "वादळवाट' पृथ्वीवर नेमकी कोणती हानी पोचवू शकते आदी गोष्टींचा परामर्श.

सूर्याच्या पोटाला भगदाड पडून तो प्रचंड प्रमाणात ज्वाळा ओकेल आणि पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या ज्वाळांमुळं प्रचंड हानी होईल, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली आणि सगळीकडं घबराट पसरली. प्रत्यक्षात तसं झालं नसलं, तरी नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि भविष्याच्या "पोटात' काय लिहिलं आहे, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. "सौरडाग', "सौरवादळं' या संज्ञांचे नेमके अर्थ काय, ते कशामुळं होतात, सूर्याची ही "वादळवाट' पृथ्वीवर नेमकी कोणती हानी पोचवू शकते आदी गोष्टींचा परामर्श.

सूर्याच्या पोटाला भगदाड पडणार, तो प्रचंड प्रमाणात ज्वाळा ओकणार, अशा आशयाची एक बातमी नुकतीच काही माध्यमांमध्ये आली होती. पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या या ज्वाळा प्रचंड वेगानं आपल्यावर धडकणार, मोबाईल ठप्प होणार, टीव्हीवरची प्रक्षेपणं बंद पडणार, जीपीएस यंत्रणा भरकटणार असंही सांगितलं जात होतं आणि व्हॉट्‌सऍपसारख्या माध्यमांमुळं तर ही चर्चा आणखीनच "तापली' होती. या संबंधात विचारणा करणारे काही विद्यार्थांचे फोन मला लगोलग आले. खरंच असं काही होईल काय, त्याचा परिणाम नक्की किती, एवढंच नव्हे तर आत्ता आपल्या उत्तरभागात आलेल्या धुळीच्या वादळाचा याच्याशी काही संबंध तर नाही, इतर उन्हाळ्यांपेक्षा या वर्षीचा उन्हाळा या सौरवादळाचा परिणाम तर नाही ना, वगैरे ते विचारत होते. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही; पण नेमका हा सगळा प्रकार विज्ञानाच्या अंगानं आपण पाहूया.

ही चर्चेमागं वस्तुस्थिती होती ती खरं तर 12 मार्च रोजी सूर्यावर सुरू झालेल्या एका छोट्याशा सौरडागाची. रोजच्या रोज सूर्याचं निरीक्षण करणाऱ्या "स्पेसवेदर लाइव्ह डॉट कॉम' या वेबसाइटवरून ती देण्यात आली होती. सूर्याचं "सोहो'प्रमाणंच "स्टिरिओ' आणि "एसडीओ' अशा इतरही उपग्रहांनी सतत निरीक्षण केलं जातं. त्यात सूर्याची रोजची विविध तरंगलांबीमध्ये घेतलेली निरीक्षणं दिलेली असतात. शिवाय "द सन टुडे डॉट ऑर्ग', "नॅशनल ओशियॅनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन' (एनओएए) किंवा अशाच अनेक संस्थांच्या वेबसाइटवर या उपग्रहांमधून मिळणारी माहिती रोजच्या रोज दिली जाते. "नव्या तयार झालेल्या सौरडागातून बाहेर फेकले जाणारे विद्युत्भारित कण, "प्लाझ्मा' हा सौरवाऱ्याच्या वेगानं अंतराळात फेकला जाणार आहे, जो पृथ्वीपर्यंत येण्यास सुमारे आठ मे ही तारीख उजाडेल. हे वादळ "जी1' एवढ्या तीव्रतेचं असून त्यामुळं पृथ्वीवर ध्रुवप्रदेशात वातावरणात रंगीत पट्टे, ज्यांना "अरोरा' म्हणतात, ते या आठ मेच्या आसपासच्या दोन-चार दिवसांत दिसतील. पृथ्वीच्या वातावरणात शिरण्याआधी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या मानवनिर्मित उपग्रहांवर या सौरवाऱ्यातल्या विद्युत्भारित कणांमुळं त्यांच्या पृथ्वीशी संपर्क साधणाऱ्या दळणवळण प्रक्रियेत, पृथ्वीवरून पाठवलेले संदेश ग्रहण करणं आणि ते परत प्रसारित करणं या कामांमध्ये काही परिणाम होऊ शकतो,' आदी माहिती तिथं देण्यात आली होती. मात्र, त्या माहितीचा थोडा अर्धवट अर्थ लावला गेला आणि चर्चेचा "ताप' वाढला. मात्र, यामुळं एक गोष्ट मात्र प्रकर्षाने लक्षात आली, की आपण एकूणच विज्ञान तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली असली, तरी सर्वच बाबतीत हवा असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन काही उच्चशिक्षित संशोधक-तंत्रज्ञांपर्यंतच मर्यादित राहतो. सर्वसामान्य जनांपर्यंत हा दृष्टिकोन तितक्‍या प्रमाणात पोचलेला नाही, भिनलेला नाही, असं दिसतं. पुरेशा, नेमक्‍या माहितीचा आणि दुसरं म्हणजे त्यावरून अर्थ काढण्याचा, अनुमान काढण्याचा जो शहाणपणा अंगी बाणला पाहिजे, त्याचाही अभाव ही कारणं त्यामागं आहेत. त्यामुळंच हे सगळं प्रकरण आपण मुळापासून समजून घेतलं पाहिजे.
सूर्याला भगदाड पडतं? सौरडाग म्हणजे काय? सूर्यावर महाभयंकर वादळं का होत असतात? सूर्याकडून ही वादळं आपल्यापर्यंत कशी पोचतात? त्यांचे परिणाम काय? "प्लाझ्मा' म्हणजे काय? "अरोरा' म्हणजे काय?... असे अनेक प्रश्न मला विचारण्यात आले. त्यासाठी आधी आपण सूर्य समजून घेऊ आणि मग त्यातून वेगवेगळे अर्थ लावू.

सूर्य हा एक तारा आहे. रोजच्या रोज सूर्य आपल्याला आपल्या आकाशात उगवतो आणि मावळतो हे दिसतं ते पृथ्वी स्वत:भोवती सुमारे 24 तासांत एक फेरी मारते त्यामुळं. सूर्याचा आकाशातला आकार, बिंब मात्र तुलनेत फारच छोटं असतं. आपलं तर्जनीचं बोट जर सरळ हात लांब करून सरळ धरलं, तर त्याच्या नखानं आपण आकाशातलं सूर्यबिंब झाकू शकतो. आकाशातली अशी मापं घेण्यासाठी आपल्या डोळ्याशी त्या आकाशातल्या बिंबानं किती अंश कोन केला आहे, त्याचा मोजण्यासाठी वापर केला जातो. एक अंश कोनापेक्षा बिंबाचा लहान आकार असेल, तर एका कोनाचे साठ भाग म्हणजे "कोनीय मिनिट' आणि एका कोनीय मिनिटाचे साठ भाग केले, तर त्याला एक "कोनीय सेकंद' असं म्हणतात. सूर्याचा आकाशातला आकार फक्त 30 ते 32 कोनीय मिनिट म्हणजे सुमारे अर्धा अंश एवढा असतो. मात्र, सूर्य एवढा तप्त आहे, की आपल्याला त्याच्याकडं पाहता येत नाही. खरं तर कोणीच सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनीच नाही, तर साध्या गॉगलनीसुद्धा पाहू नये. डोळ्यात पडणाऱ्या सूर्यबिंबामुळं डोळ्यातल्या पेशी मरून ती जागा जन्मभर अधूच होते. असो. सांगायचा मुद्दा म्हणजे सूर्याचं आकाशातलं बिंब लहान असलं, तरी ते फारच प्रखर असते. ते का हे समजून घेताना त्याची एकूण रचना कशी, आकार किती, ते माहीत हवं.

पृथ्वीच्या तुलनेत अजस्र
सूर्याचा आकार खूपच मोठा आहे. पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेत पाहिलं, तर सुमारे 109 पृथ्वी एका रांगेत सरळ रेषेत ठेवल्या, तर जेवढं अंतर होईल, तेवढा सूर्याचा व्यास आहे. हा तेरा लाख 91 हजार चारशे किलोमीटर एवढा होतो. एवढ्या व्यासाच्या आकाराचा लाडूसारखा गोलाकार म्हणजे सूर्य. तुम्ही बुंदीचा लाडू पाहिला आहे? आपली पृथ्वी म्हणजे एक बुंदी समजा. अशा एकूण दहा लाख बुंदींचा लाडू तयार केला तर? तसा हा दहा लाख पृथ्वींचा लाडू म्हणजे आपला सूर्य आहे!

सूर्य हा वायूचा एक गोळा आहे. सूर्यात हायड्रोजन आणि हेलिअम या दोन वायूंचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. या प्रचंड मोठ्या वायूनं बनलेल्या सूर्याचं वस्तुमान, पृथ्वीच्या तुलनेत तीन लाख तीस हजारपट आहे. सूर्याच्या गाभ्यातच त्याच्या स्वत:च्याच या वस्तुमानामुळं, गुरुत्वाकर्षण बलानं तापमान प्रचंड वाढतं; तसंच दाबही प्रचंड असतो. या दाबामुळं आणि तापमानामुळं तिथल्या हायड्रोजनचं आण्विक सम्मीलन प्रक्रियेनं त्याचं सतत हेलिअममध्ये रूपांतर होत असतं. या प्रक्रियेत तयार होणारी ऊर्जा सूर्याला सतत प्रकाशित करत असते.

सूर्याचा गाभा सूर्याच्या आकारमानाच्या खूप लहान असून, त्याचं वस्तुमान मात्र पूर्ण सूर्याच्या निम्मं आहे. गाभ्याच्या वर, तुलनेनं शांत असणाऱ्‌ एका मोठ्या पट्ट्याचे आवरण आहे. या आवरणाची व्याप्ती जवळजवळ 71 टक्के आहे. आतून येणारी ऊर्जा या भागातून बाहेर येताना, एका खोलीत मध्यभागी ठेवलेला विस्तव ज्याप्रमाणं सर्व खोली गरम करतो, त्याप्रमाणं पसरत असते. याला "ऊर्जेचं उत्सर्जन' असं म्हणतात.
सूर्याच्या मुख्य गाभ्यामध्ये तापमान सुमारे दीड कोटी अंश सेल्शिअसपर्यंत वाढत जातं. हे निव्वळ गुरुत्वाकर्षण बलामुळं होतं. या बलाच्या प्रभावाखाली तिथल्या वातावरणीय दाब पृथ्वीच्या समुद्रसपाटीशी असणाऱ्या वातावरणीय दाबाच्या अडीचशे अब्जपट असतो. या गाभ्यातली घनता शिसे या धातूच्या घनतेपक्षा तेरापट असते. या परिस्थितीत गाभ्यात हायड्रोजन अणूंमधली नेहमी सामान्य स्थितीत दिसून येणारी "इलेक्‍ट्रोस्टॅटिक अपसरण' (कोणत्याही दोन अणूंभोवती फिरणारे इलेक्‍ट्रॉन त्यांची जागा दुसऱ्या अणूंतल्या इलेक्‍ट्रॉनना सामान्यत: घेऊ देत नाहीत) ही परिस्थिती टिकू शकत नाही. प्रचंड बल आणि तापमानामुळं त्यांच्या अणुगर्भातले प्रोटॉन एकमेकांमध्ये चुरडले जाऊन हेलियम या मूलद्रव्याचं केंद्रक निर्माण होतं. यालाच "अणुगर्भीय सम्मीलन प्रक्रिया' असं म्हणतात.

हायड्रोजनचं हेलियममध्ये रूपांतर
सूर्यामध्ये होणाऱ्या या सम्मीलन प्रक्रियेतून दर सेकंदाला 635 अब्ज किलोग्रॅम (सत्तर कोटी टन) हायड्रोजन अणूंचे 630 अब्ज किलोग्रॅम (69.5 कोटी टन) हेलियम अणूंमध्ये रूपांतर होत असतं. या रूपांतराच्या वेळी या दोन मूलद्रव्यांच्या वस्तुमानात पडणारा फरक - जो 0.5 कोटी टन असतो- त्याचं रूपांतर ऊर्जेत घडून येतं. आइनस्टाईनच्या "ऊर्जा = वस्तुमान x प्रकाशाच्या वेगाचा वर्ग' या समीकरणाच्या सिद्धांतानुसार, सूर्याच्या गाभ्यातल्या वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेत होऊन दर सेकंदाला तिथं प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊन सतत बाहेर पडत असते. अशा प्रकारे ऊर्जा तयार होणं, हे सूर्याच्या जन्मापासून सुरू आहे. सूर्याच्या जन्मापासून आजपर्यंत, म्हणजे अंदाजे 4.5 अब्ज वर्षांच्या कालावधीत, त्याच्या वस्तुमानातल्या एक टक्‍क्‍याहूनही कमी वस्तुमान जरी आजपर्यंत रूपांतरित होऊन वापरलं गेलं आहे, मुक्त होऊन आसपासच्या अवकाशात भिरकावलं गेलं आहे, तरी सूर्यामधल्या एकंदरीत असणाऱ्या हायड्रोजनच्या चाळीस टक्के हायड्रोजनचं आजपर्यंत हेलियममध्ये रूपांतर घडून गेलेलं आहे. अर्थात, या वेगानं हे रूपांतर असंच घडून येत राहिल्यास पुढील सात ते आठ अब्ज वर्षांमध्ये सूर्याच्या गाभ्यातलं हायड्रोजन संपून जाईल!

सूर्याच्या केंद्रापासून त्याच्या दृश्‍य पृष्ठभागाकडं प्रवास करत निघाल्यास, गाभ्याची व्याप्ती जरी 25 टक्के गृहीत धरली, तरी या गाभ्याच्या वर, तुलनेनं शांत असणाऱ्या एका मोठ्या पट्ट्याचं आवरण, अच्छादन आहे. या अच्छादनाची व्याप्ती जवळजवळ 71 टक्के आहे. सूर्याच्या गाभ्याचं बाहेरचं आवरण सतत घुसळलं जाणारं, अभिसरण होणारं आहे. अतिउष्ण वायूंचे ढग इथं प्रचंड वेगानं वाहत असतात. सूर्याच्या गाभ्यात तयार होणारी ऊर्जा या आवरणातून सतत बाहेर आणून सोडली जाते. या आवरणाची जाडी 48 हजार तीनशे किलोमीटर आहे. गाभ्यातून बाहेर येणारी उत्सर्जित ऊर्जा या आवरणाशी जिथं टक्कर घेते, तिथं प्रचंड प्रमाणातल्या ऊर्जेचे हे धक्के विद्युत्चुंबकीय लहरी तयार करतात. त्यांच्यामुळंच सूर्याच्या पृष्ठभागावर विद्युत्चुंबकीय प्रारणं तयार होतात आणि सूर्यावर चुंबकीय क्षेत्रही निर्माण करतात.

सूर्याचं "दृश्‍यावरण'
सूर्याच्या आपल्याला दिसणाऱ्या पृष्ठभागाला "दृश्‍यावरण' (फोटोस्फिअर) म्हणतात. दृश्‍यावरण (फोटोस्फिअर) हा त्यामानानं आवरणाचा अतिशय पातळ थर असतो. सूर्याच्या वातावरणाला इथूनच सुरवात होते. या दृश्‍यावरणाचं (फोटोस्फिअरचं) तापमान सुमारे साडेपाच हजार अंश सेल्शिअस असतं.

सूर्याच्या अंतर्गत असणाऱ्या गुरुत्वीय बलामुळं त्याच्या गाभ्यात सम्मीलनातून तयार होणारी तीव्रतम "गॅमा' प्रारणं त्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठी एक लाख सत्तर हजार वर्षं लागतात. या कालावधीत गॅमा प्रारणांच्या, सूर्याच्या अंतर्भागात असंख्य वेळा इतर कणांशी होणाऱ्या टकरींमुळं त्यांची ऊर्जा फार मोठ्या प्रमाणात वितरित केली जाते. त्यामुळं जेव्हा ही प्रारणं पृष्ठभागावर येतात, तेव्हा त्यांची ऊर्जा फक्त दृश्‍य प्रकाशाएवढी, "फोटॉन' स्वरूपात राहिलेली असते, हे आपलं मोठं भाग्यच म्हणायचं!
दृश्‍यावरणात (फोटोस्फिअरमध्ये) तयार होणारे "सौरडाग' हे पन्नास हजार किलोमीटर लांबी-रुंदीचेही असू शकतात. अर्थात, चार-पाच पृथ्वींच्या आकारमानाला सहज गिळून टाकतील एवढेही ते मोठे असू शकतात! सूर्यावर तयार होणाऱ्या चुंबकीय धारांच्या (बलरेषांच्या) विजातीय जोड्यांच्या जवळ येण्यानं तयार होणारी ही चुंबकीय वादळं असतात. या वादळांमध्ये अभिसरण पट्ट्यातून दृश्‍यावरणामधून वर वातावरणीय पट्ट्यात मोठ्या कमानींच्या स्वरूपात ऊर्जेबरोबरच द्रव्यही वर फेकलं जातं. या विभागाला "ऍक्‍टिव्ह झोन' म्हणजे "क्रियाशील क्षेत्र' असं म्हणतात. सौरडागांच्या तयार होण्यामध्ये एक प्रकारची वारंवारता आढळते. दर 11 वर्षांनी सौरडागांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. अभिसरण पट्ट्याशी तयार होणाऱ्या विजातीय चुंबकीय क्षेत्रांच्या धारांमुळं हे घडतं. त्याचं मूळ कारण उत्सर्जन आणि अभिसरण पट्ट्यांच्या फिरण्यात असलेल्या निराळ्या आवर्तन कालावधीत सापडतं. शिवाय, सूर्य हा अतितप्त वायूचा गोळा असल्यानं, पृथ्वीप्रमाणं त्याचा पृष्ठभाग सलग एकसंध नाही. अर्थात, सूर्याचं स्वत:भोवती फिरणं सगळ्या ठिकाणी सारखं नसतं.

सूर्याचं परिवलन
सूर्याच्या विषुववृत्त प्रदेशात त्याचं परिवलन (स्वत:भोवती एक गिरकी) अधिक वेगानं होतं, तर सूर्याच्या ध्रुवीय प्रदेशात परिवलनाचा वेग त्या मानानं कमी आहे. सूर्याचा विषुववृत्तीय प्रदेश सुमारे 25.6 दिवसांत एक फेरी पूर्ण करतो, तर उत्तर-दक्षिणेकडचा साठ अंशावरचा परिसर सुमारे 30.9 दिवसांत, तर प्रत्यक्ष ध्रुवीय प्रदेश मात्र बराच सावकाश, म्हणजे 36 दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. या परिवलनातल्या वेगाच्या फरकामुळं सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणाऱ्या चुंबकीय धारा, ज्या उत्तर-दक्षिण दिशेत असतात, त्या जणू काही विषुववृत्तीय प्रदेशात आडव्या दिशेनं सतत पूर्वेकडं खेचल्या जात असतात. त्यामुळं प्रत्येक फेरीसोबत संपूर्ण सूर्याच्या पृष्ठभागावर या धारा गुंडाळल्या जातात. या गुंडाळलेल्या चुंबकीय धारांच्या विजातीय जोड्या काही काळानंतर एकमेकांजवळ येतात. त्यांचं गुंडाळीतलं अंतर कमी होत जातं. अर्थात, या विजातीय चुंबकीय धारांमध्ये त्या एकमेकींजवळ आल्यावर प्रचंड आकर्षण निर्माण होतं. या चुंबकीय खेचाखेचीमुळं या दोन धारांच्या दरम्यान वादळं निर्माण होतात. या प्रकारात चुंबकीय बलरेषांच्या दिशेनं दृश्‍यावरणामधलं द्रव्य मोठ्या उद्रेकांमधून पृष्ठभागाच्या वर कमानीसारखं फेकलं जातं. पृष्ठभागापासून वर उचलले गेलेले हे भाग इतर भागांपेक्षा कमी प्रकाशमान असतात. अर्थातच ते अधिक उजळ पार्श्वभूमीवर डागांसारखे दिसतात. या कमानींच्या पायथ्याशी असणारे हे सौरडाग नेहमीच जोड्यांमधे दिसतात.

सौरवातांची निर्मिती
दृश्‍यावरणाच्या वरच्या भागातल्या सूर्याच्या वातावरणाच्या दुसऱ्या पट्ट्याला "क्रोमोस्फिअर' म्हणजे "रंगावरण' म्हणतात, तर त्याच्याही वरच्या वातावरणाला "कोरोना' म्हणजे "सूर्यकिरीट' म्हणतात. या सूर्यकिरिटाचं तापमान वीस लाख अंश सेल्शिअसपर्यंत असतं. क्रियाशील विभागातून सतत वर फेकल्या जाणाऱ्या द्रव्याशी होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातल्या कमानी आणि त्यांच्या घडामोडीतून ही ऊर्जा सूर्याचं वातावरण सतत तप्त राखते.

अतिउच्च तापमानाच्या सौरकिरिटामधून "सौरवाताची'- सौरवाऱ्यांची निर्मिती होते. सौरवात हा विद्युत्भारित कणांनी बनलेला असून, तो सर्व दिशांना फेकला जातो. अगदी अतिदूर असणाऱ्या प्लुटोच्या कक्षेपलीकडंही सौरवात पोचतो. या सौरवाताची उगमस्थानं किरीटामध्ये दिसणाऱ्या "किरीटविवरांच्या' जागांमध्ये असते. सौरवात या जागांमधून प्रामुख्यानं बाहेर फेकला जातो. या विवरांच्या जागा सूर्याच्या वातावरणाच्या पट्ट्यातल्या इतर ठिकाणांपेक्षा कमी उर्जेच्या, कमी प्रकाशित, अर्थात, तुलनेनं "काळ्या डागांच्या' स्वरूपात दिसून येतात. या जागी सूर्याकडून निघणाऱ्या चुंबकीय रेषा कमानी होऊन पुन्हा सूर्यामध्ये लुप्त न होता, सरळ बाहेर पडून अवकाशात झेपावतात. त्यांच्यापासूनच सौरवातांची निर्मिती होते.

सूर्यावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तप्त वायूच्या ढगांमधल्या उद्रेकांना "सोलर प्रॉमिनन्सेस' म्हणजे "सौरज्वाला' म्हणतात. सौरडागांशी संबंधित असणाऱ्या, तप्त वायूंच्या बाहेर फेकल्या जाणाऱ्या या ज्वाळा प्रचंड प्रमाणात तप्त कण सूर्याबाहेर अवकाशात भिरकावतात. सूर्याच्या वातावरणातून बाहेर पडणाऱ्या अशा प्रचंड ज्वाळांना "कोरोनल मास इजेक्‍शन' म्हणजे "किरिटामधून वस्तुमान भिरकवणारे उद्रेक' असं म्हटलं जातं. इथं प्रचंड प्रमाणात (कित्येक टन) वस्तुमान सतत सूर्याबाहेर वेगानं भिरकावलं जात असतं. दर सेकंदाला जवळजवळ 402 किलोमीटर वेगानं बाहेर फेकले जाणारे हे भारित कणयुक्त वस्तुमान जर पृथ्वीच्या दिशेनं भिरकावलं गेलं असेल, तर पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राला ते येऊन धडकतं. या टकरीमुळं पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आकारही चेपला जातो. पृथ्वीवरील उच्च दाबाच्या विजेच्या तारांमध्येही यांमुळं अडथळे निर्माण होतात. कधीकधी तर या सौरवातांच्या दाबाखाली एखाद्या क्षेत्रातला वीजप्रवाह पूर्णपणे खंडित होऊन अंधकार पसरतो! हे क्षेत्र नेहमीच उत्तरध्रुवाजवळचं म्हणजे ग्रीनलॅंड, अलास्का, रशियाचा उत्तर भाग असं असतं. विषुववृत्ताजवळच्या प्रदेशात सूर्याकडून येणाऱ्या या भारित कणांमुळं होणारा उपद्रव आजपर्यंत कधीही जाणवलेला नाही. असो.

सध्याचं वादळ नेमकं कसं?
सध्या सूर्यावर गेले दोन महिने दिसणारं वादळ किंवा सौरडाग हा "जी-1' प्रतीचा म्हणजे फारच छोटा आहे. या सौरडागांची किंवा किरिटातून होणाऱ्या उद्रेकांची क्षमता एक ते पाच क्रमांकानं मोजतात. हा तसा निरुपद्रवी वादळाचा प्रकार. त्यातून येणारे भारित कण जेमतेम दोन ते तीन दिवस आपल्या ध्रुवीय प्रदेशात "अरोरा' म्हणजे रात्रीच्या आकाशात रंगांचे पट्टे तयार करतात. त्याखेरीज, आपले सूक्ष्मतरंग ज्यात वापरले जातात अशा, म्हणजे मोबाइल किंवा उपग्रहांवरून होणाऱ्या दळणवळणात फारसा अडथळा आणतील एवढी त्यांच्यात क्षमता नसते. वादळ "जी-5' क्षमतेचं असेल, तर मात्र त्यातून येणाऱ्या विद्युत्भारित कणांमुळं, कधीकधी, तेही खास हिवाळ्यात ते जमिनीपर्यंत पोचू शकतात, तेव्हा वीजपुरवठा करणाऱ्या उंच खांबांवर बसवलेल्या "उच्च दाबाच्या' हाय टेन्शन तारांच्या वीजवहनात ते अडथळा आणणारे ठरतात. त्यामुळं काही काळासाठी तिथला वीजप्रवाह खंडित होऊ शकतो. असा अनुभव कॅनडाच्या आणि अलास्काच्या काही भागात काही वर्षांपूर्वी (इसवीसन 2013) आलेला होता. मात्र, त्यावेळी सूर्याचे उद्रेक मोठ्या प्रमाणात होण्याचा, तो 11 वर्षांचा आवर्तनकालच होता. तसा आवर्तनकाल सध्या नाही; पण येत्या वर्षअखेरीस सौरडागांच्या या चक्राची सुरवात मात्र होत आहे. मात्र, अजूनही सूर्याच्या सध्याच्या स्थितीला "शांततेचा कालावधी' असंच म्हटलं जातं...

Web Title: aanand ghaisas write article in saptarang