‘सखी शेजारिणी’च्या शोधात... (आनंद घैसास)

‘सखी शेजारिणी’च्या शोधात... (आनंद घैसास)

‘या पृथ्वीचं काय होणार?’, ‘ती विनाश पावणार असेल तर त्या विनाशाची प्रक्रिया कसकशी असेल?’ ‘पृथ्वीचं जर काही ‘बरं-वाईट’ झालंच, तर मग पृथ्वीसारखीच दुसरी कुठली तिची ‘सखी शेजारिणी’ (मानवाच्या वसतीसाठी सुयोग्य असा ग्रह) आहे की नाही?’ असे कुतूहलजनक प्रश्‍न अनेकांना पडत असतात. गेल्या वर्षी ‘प्रॉक्‍झिमा सेंटॉरी’ या ताऱ्याभोवती फिरणारा आणि पृथ्वीसमान वस्तुमान असणारा ग्रह सापडला होता. आता आपल्या पृथ्वीसारखीच आणखी एक जवळची ‘शेजारीण’ सापडली आहे. या शेजारी-ग्रहाचं नामकरण करण्यात आलं हे ‘रॉस १२८ बी’. हा ग्रह पृथ्वीसारखं सरासरी पृष्ठीय तापमान असणारा आहे!

गेल्या रविवारी नागपूरला झालेल्या ‘शास्त्रज्ञ तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात प्रेक्षकांसोबत प्रश्नोत्तराचा एक भाग होता. ‘पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होईल?’ अशा प्रश्‍न त्यात एका आजोबांनी केला.

त्याचं उत्तर ः ‘जेव्हा सूर्य वृद्धत्वाकडं झुकेल तेव्हा त्यातलं हायड्रोजनचं इंधन संपुष्टात यायला लागेल. त्याच्या गाभ्याशी हायड्रोजनच्या सम्मीलनातून तयार होणारा हेलियम आता अधिक प्रमाणात असेल. तो आता ताऱ्यात बाहेरच्या अंगाला जाऊ लागेल. जरी ताऱ्याचं एकंदर तापमान अशा वेळी थोडं कमी होत चाललं तरी त्याचा आकार वाढत जाईल. तो एक लाल राक्षसी तारा बनायला लागेल...असं होताना सूर्याचा आकार आधी बुध ग्रहाला, नंतर शुक्राला आणि त्यानंतर आपल्या पृथ्वीलाही त्याच्यातच सामावून घेईल. सूर्याचा त्या वेळी आकार वाढत तो मंगळाच्या कक्षेएवढा प्रचंड होईल...पण ते होण्याआधीच, जेव्हा सूर्याचं आकारमान वाढू लागेल, तसतसा त्याचा पृष्ठभाग पृथ्वीजवळ येत जाईल. अर्थातच त्याच्या गुरुत्वाकर्षणाचे परिणाम दिसण्यास सुरवात होईल. पृथ्वीवरील त्याची खेच वाढत जाईल. आकाशात आत्ता दिसणाऱ्या सूर्याच्या बिंबाहून (सध्या सूर्यबिंबाचा आकार सरासरी ३२ कोनीय मिनिट, म्हणजे सुमारे अर्धा अंश आहे) अधिक मोठं सूर्याचं बिंब आकाशात दिसू लागेल. त्याच्या बदलत्या तापमानामुळं तो सध्याच्या पिवळ्या रंगाहून विचलित होत, लालसर दिसू लागेल. जरी त्याचं पृष्ठीय तापमान आता बरंच कमी झालेलं असलं, तरी अशा जवळ आणि आकारानं मोठ्या दिसणाऱ्या सूर्यामुळं, सूर्यावरून पृथ्वीला एकूण मिळणारी उष्णता फारच वाढेल. पृथ्वीवरची एकूणच पाण्याची (सगळे महासागर, तळी, सरोवरे, नद्या, नाले, एवढेच नव्हे तर पर्वतांवरचं आणि ध्रुव प्रदेशातलं सगळं बर्फ) वाफ होऊन ती वाफ वातावरणात प्रचंड प्रमाणात ढग तयार करेल. त्यातून निर्माण होणाऱ्या ‘हरितगृह’ परिणामानं पृथ्वीच्या वातावरणाचं आणि पृष्ठभागाचं, जमिनीचं तापमान इतकं वाढेल की सगळी सजीवसृष्टी त्यामुळं त्या वेळीच संपुष्टात येईल. त्यानंतर सगळी पृथ्वी वैराण, कोरडे आणि तप्त वाळवंट होईल. त्यातच सूर्याकडून येणाऱ्या तप्त सौरवाऱ्यांमुळं असलेलं वातावरणही पृथ्वीला सोडून दूर अवकाशात भिरकावलं जाईल. तप्त शीलारस काय तो शिल्लक राहील. कदाचित सूर्याचा पृष्ठभाग जवळ येताना काही ठराविक अंतरावर पृथ्वीचे तुकडेही पडू शकतात आणि नंतर ती सूर्यात विलीन होईल...पण या सगळ्याची चिंता आताच नको...! हे व्हायला सुमारे अब्ज वर्षांचा अजून कालावधी आहे...!!’
-मात्र, हे उत्तर मिळताच आजोबा परत उठले आणि म्हणाले ः ‘‘पण मग मानवी संस्कृतीचाही त्याचसोबत कायमचा अंत होईल? त्यावर काहीच उपाय नाही?’’
-मी म्हटलं ः ‘‘मानवाचा दुर्दम्य आशावाद आताच त्याला पृथ्वीसारखा एखादा दुसरा ग्रह सापडतोय का, तिथं जाऊन पुढच्या पिढ्यांची तजवीज होऊ शकेल का हे शोधण्यास प्रवृत्त करत आहे. त्यातला पहिला टप्पा सूर्यापासून आपल्यापेक्षा थोडा दूर असणाऱ्या मंगळावर वस्ती शक्‍य आहे का हा आहेच; पण सूर्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत जिवंत राहणाऱ्या लाल खुजा ताऱ्यांभोवती जे ग्रह सापडत आहेत, त्यातल्या पृथ्वीसदृश ग्रहांकडं आता अधिक लक्ष देऊन, त्यांचाही विचार करायला सुरवात झाली आहे. अशी पृथ्वीसमान ‘सखी शेजारिणी’ मिळायला हवी आहे, जी ‘हसरी’ असेल, ती जवळची तर हवीच, शिवाय आपुलकीनं तिच्या घरात आपल्याला सामावून घेणारीही असायला हवी. असे पृथ्वीसदृश परग्रह शोधण्याचे प्रयत्न गेली काही दशकं सुरू आहेत. सध्या पृथ्वीवरून वेध घेणाऱ्या एकूण ४६ विविध दूरवेक्षींमधून चाललेल्या प्रकल्पांतून असो किंवा अवकाशातल्या दूरवेक्षींच्या (एकूण आठ प्रकल्प) माध्यमातून घेतलेले वेध असोत, त्यातून जे काही ग्रह मिळाले आहेत, ते आज घडीला जरी एकूण साडेतीन हजारांहून थोडे जास्त असले, तरी त्यांची त्यांच्या ‘पालक-ताऱ्या’पासूनची अंतरं, त्यांचा आकार, त्यांचं वस्तुमान या सगळ्याचा विचार करता पृथ्वीसदृश फारच कमी, म्हणजे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच परग्रह हाती लागले आहेत; पण ते काही सगळे आपल्यापासून जवळ नाहीत. शौरी आणि हंस तारकासमूहाच्या एका भागात, सुमारे हजार प्रकाशवर्षं अंतरावरचे अनेक ग्रह सापडले आहेत. आजच्या आपल्या अवकाशयानांच्या साह्यानं आपण त्यांच्या आसपासही जाणं शक्‍य नाही. त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. आता कुटं आपलं एक छोटंसं ‘न्यू होरायझन’ हे यान नऊ वर्षांचा प्रवास करून प्लूटोपर्यंत पोचलं आहे. सूर्यमालेच्या आठ ग्रहांपलीकडं असलेल्या या खुजा ग्रहापर्यंत. परग्रहापर्यंत पोचणं हा तर फारच लांबचा टप्पा आहे. असो. - मात्र, या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी आपल्याला सूर्यानंतर सगळ्यात जवळ असणाऱ्या ‘प्रॉक्‍झिमा सेंटॉरी’ या ताऱ्याभोवती फिरणारा आणि पृथ्वीसमान वस्तुमान असणारा ग्रह सापडल्यावर ज्या आशा पल्लवित झाल्या होत्या, त्यात आता भर पडली आहे. कारण, आता आपल्याला आणखी एक जवळची शेजारीण सापडली आहे. कन्या राशीत दिसणारा एक छोटा तारा आहे ‘रॉस १२८’. तो आपल्यापासून फक्त ११ प्रकाशवर्षं दूर आहे. त्याच्याभोवती परिक्रमा करणारा एक ग्रह सापडला आहे. त्याला सध्यातरी ‘रॉस १२८ बी’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याचं निरीक्षण केल्यावर असं दिसून आलं आहे की तो पृथ्वीच्या सारखं सरासरी पृष्ठीय तापमान असणारा आहे! म्हणजे जर त्यावर वातावरण असेल तर तिथं पाणी हे द्रवरूपात असू शकेल...अर्थात सजीव सृष्टीला पोषक वातावरण तिथं मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही...आजपर्यंत मिळालेल्या पृथ्वीसदृश ग्रहांपैकी सगळ्यात जवळचा ‘प्रॉक्‍झिमा सेंटॉरी बी’ हा परग्रह प्रथम क्रमांकावर, तर ‘रॉस १२८ बी’ हा आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, ‘रॉस १२८ बी’ हा परग्रह आपल्यापासून
‘प्रॉक्‍झिमा बी’पेक्षा २.६ पट अधिक दूर आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की ‘प्रॉक्‍झिमा बी’ जरी आपल्यापासून सगळ्यात जवळचा परग्रह असला, तरी तो एका लाल खुजा ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे. हा लाल तारा सध्या ‘सक्रिय’ असून मोठ्या प्रमाणात ऊष्ण ज्वाला बाहेर टाकणारा आहे. त्या ज्वालांचा परिणाम म्हणून या परग्रहावर सजीव सृष्टी निर्माण होण्याची शक्‍यता फारशी दिसत नाही, असं त्याचं निरीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांचं मत आहे. परग्रहांवर सजीव सृष्टीच्या शोधाला जणू ती एक बसलेली खीळ ठरली आहे; पण हा ‘रॉस १२८ बी’ मात्र आता आशा दाखवत आहे. कारण, त्याच्या ‘पालक-ताऱ्या’कडून अशा किरणोत्सारांची शक्‍यता नगण्य आहे. कारण, तो एक‘शांत’ तारा आहे, प्रॉक्‍झिमासारखा ‘सक्रिय’ तारा नाही. ‘प्लॅनेटॉलॉजी अँड ॲस्ट्रोफिजिक्‍स ऑफ ग्रेनोबल’ आणि ‘ग्रेनोबल युनिव्हर्सिटी ऑफ आल्प्स’ या फ्रान्समधल्या संस्थेच्या शोधपथकाच्या प्रमुखांनी ई-मेलनं ‘स्पेस डॉट कॉम’ या संकेतस्थळाला असं कळवलं आहे, की मुख्य ताऱ्यापासून वस्तीयोग्य अंतरावर आणि पृथ्वीसमान वस्तुमान असणारा हा ‘रॉस १२८ बी’ परग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरत आहे, तो एक सक्रिय तारा नसून एक शांत तारा आहे. चिलीच्या ‘ला सिला’ या वेधशाळेतून, युरोपिअन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या (हाय ॲक्‍युरसी रेडिअल व्हेलॉसिटी सर्चर - हार्प्स) या उपकरणातून झेवियर बोनाफिल्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना हा ‘रॉस १२८ बी’ सापडला. हार्प्स या उपकरणाच्या नावातच त्याचं काम कसं चालतं ते कळून येतं. कोणत्याही ताऱ्याभोवती जर एखादा ग्रह फिरत असेल, तर त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावानं तो ज्या ताऱ्याभोवती फिरतो, त्या ताऱ्याच्या स्थानात बदल होतो. ज्या प्रमाणात त्याला खेच बसत असते, त्या प्रमाणात त्याचं स्थान काही प्रमाणात ढळतं. तो जागच्या जागी भिरभिरताना दिसतो. याला ‘वॉबलिंग’ असं म्हटलं जातं. या त्याच्या स्थानबदलातून, दोलायमान स्थितीतून त्याच्यावर पडणारी खेच किती त्याचं अनुमान करता येतं; तसंच ही खेच निर्माण करणारा, त्याच्याभोवती फिरणारा ग्रह किती दूर आहे, त्याचं वस्तुमान काय राहील आणि त्याचा परिभ्रमणकाल किती हे सगळं गणितानं काढता येतं. कारण, आपल्याला गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम माहीत आहेत. त्या ताऱ्याच्या स्थानबदलाची निरीक्षणं एकत्रित करून त्याचं संगणकीय प्रारूप तयार केल्यास हे सगळं हाती येणं सहज शक्‍य आहे.

‘केप्लर’ या ‘नासा’च्या प्रकल्पात वेगळ्या प्रकारानं परग्रह ओळखले जात. जर एखादा ग्रह ताऱ्यासमोरून जात असेल, त्याचं त्या ताऱ्यावरून अधिक्रमण होत असेल, तर त्या ताऱ्याच्या दीप्तीत फरक पडतो. हा दीप्तीत पडणारा फरक किंवा त्याचं एकूण प्रकाशमान किती बदलतं त्यावरून त्याच्यासमोरून जाणाऱ्या ग्रहाचं आकारमान, त्याचा परिक्रमा करण्याचा कालावधी किती ते ठरवण्यात येतं; पण जर एखाद्या ताऱ्यासमोरून जाण्याची कक्षाच नसणारा ग्रह असेल, तर त्याचं अस्तित्वच समजून येणार नाही. कारण, तो आपल्याला दिसणार नाही. अशा वेळी ही ‘वॉबलिंग’ -मोजण्याची पद्धत ताऱ्याभोवती न दिसणारी काही वस्तू आहे काय हे शोधण्यास उपयुक्त ठरते. आपल्या संदर्भात जर एखाद्या ताऱ्याभोवतीच्या ग्रहांच्या कक्षा आपल्याकडं तोंड करून असतील तर, तिरप्या किंवा उभ्या-आडव्या नसतील, तर ते कधीच अशा ताऱ्यांवरून अधिक्रमण करून जाताना दिसणार नाहीत. याकरता हे अचूक वर्तुळाकार गतीतलं मापन करणारं उपकरण ‘हार्प्स’ ताऱ्यांची स्थानभ्रष्टता नोंदवण्यास उपयुक्त ठरतं.

रॉस १२८ या ताऱ्याभोवती फिरणारा हा ग्रह पृथ्वीच्या वस्तुमानाच्या किमान १.३५ पट, म्हणजे पृथ्वीपेक्षा थोडा मोठा असावा असा अंदाज आहे, तर तो ताऱ्याभोवती त्याची एक प्रदक्षिणा सुमारे ९.९ दिवसांत पूर्ण करतो. खरंतर एवढी कमी कालावधीची कक्षा ही कमी अंतर असणारी असते. अशा ताऱ्याला फार जवळ असणाऱ्या या ग्रहावर सजीव सृष्टीची शक्‍यता असणं शक्‍य नाही किंवा तो ग्रह वसतीयोग्य ठरत नाही; पण रॉस १२८ तारा हा काही सूर्यासारखा तारा नाही. तो सूर्यापेक्षा बराच थंड, आकारानंही लहान तारा आहे, एक लाल खुजा तारा आहे. सूर्याच्या सुमारे एक पंचमांश आकार असणाऱ्या या ताऱ्याचं पृष्ठीय तापमान सुमारे ३१८० केल्विन आहे. यामुळंच ‘रॉस १२८ बी’ हा ग्रह याच्या वसतीयोग्य कक्षेच्या पट्ट्याच्या अंतरावर येतो. हा तारा वसतीयोग्य आहे अथवा नाही हे ठरवण्याकरता त्याला वातावरण आहे काय, असेल तर त्याचं वातावरण कसं आहे, याचं सखोल निरीक्षण होणं गरजेचं आहे, असं या संशोधकांच्या चमूचं नेतृत्व करणाऱ्या बॉनफिल या संशोधकाचं म्हणणं आहे. पृथ्वीवर सूर्याकडून जेवढं तापमान मिळतं त्याच्याशी तुलना केली तर ‘रॉस १२८ बी’ या ग्रहाला त्याच्या ‘पालक-ताऱ्या’कडून १.३८ पट अधिक उष्णता मिळते. अशा तापमानामुळं जर त्या ग्रहावर प्रवाही द्रवरूप पाणी असेल तर त्याची मोठ्या प्रमाणात वाफ होऊन त्याचे खूप अधिक उंचीवर ढग बनतील. त्या सघन आणि उंचावर तयार झालेल्या ढगांमुळं, त्यांच्या‘ हरितगृह’ परिणामामुळं, पृष्ठभागाचं तापमान तिथल्या पाण्याला कायम द्रवस्वरूप ठेवेल. कारण, अशा ग्रहाच्या वातावरणातल्या फार मोठ्या प्रमाणात असलेल्या पांढऱ्या ढगांमुळं त्याच्याकडं ताऱ्याकडून मिळणारी ऊर्जा परावर्तित होऊन मोठ्या प्रमाणात अवकाशात परत फेकली जाते. ती ग्रहाच्या पृष्ठभागापर्यंत पोचणारच नाही. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कदाचित हा ग्रह पृथ्वीसारखा नव्हे, तर शुक्रासारखा असण्याची शक्‍यताच अधिक आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. दोन्ही तारे - गेल्या वर्षी मिळालेला सगळ्यात जवळचा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरतो, तो प्रॉक्‍झिमा सेंटॉरी आणि रॉस १२८ - हे लाल खुजे तारे आहेत. आकाशगंगेत हे लाल खुजे तारे सामान्यत: सर्वाधिक संख्येनं आहेत; पण ते इतर ताऱ्यांहून फार वेगळे आहेत. त्यातही प्रॉक्‍झिमा सेंटॉरी हा जरा निराळा, सुमारे पाच अब्ज वर्षं वयाचा असून, त्यात अधूनमधून मोठ्या प्रमाणात ज्वालांचा उद्रेक होत असतो. त्यातून सौरवात तयार होत असतात. त्यामुळं त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या वातावरणावर विपरीत परिणाम होतो. ते वातावरण अशा ज्वालांनी निपटून जाऊन नाहीसं जरी होत नसलं, तरी सजीव सृष्टीस ते घातक किंवा असमर्थ बनवत असणार; पण रॉस १२८ मात्र या लाल खुजा ताऱ्यांपैकी सुमारे सात अब्ज वर्षं वय असणारा एक शांत तारा आहे. त्यामुळं त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर असे परिणाम नसतील. त्यामुळं प्रॉक्‍झिमाच्या २.६ पट दूर असणारा हा ग्रह खगोलनिरीक्षकांना अधिक आशादायी आणि निरीक्षणासाठी एक आकर्षण ठरत आहे. म्हणून या ताऱ्याकडं जमिनीवरून वेध घेणाऱ्या मोठ्या वेधशाळा, मग ती युरोपिअन एक्‍स्ट्रीम लार्ज टेलिस्कोप असो की जायंट मेगॅलन टेलिस्कोप असो किंवा सध्या बांधकाम सुरू असणारी आंतरराष्ट्रीय कॉन्सॉर्टियमची ३० मीटर व्यासाची दूरवेक्षी असो, या सगळ्यांचा आता हा अधिक प्राधान्यतेचा निरीक्षण-कार्यक्रम राहणार आहे सन २०२० पर्यंतचा. अशा मोठ्या प्रकाशीय दूरवेक्षी या ग्रहाचं अधिक सखोल निरीक्षण करू शकतील. प्रामुख्यानं त्याचं वातावरण, त्यातलं ऑक्‍सिजनचं प्रमाण, मिथेनचं प्रमाण आणि इतर काही सजीव सृष्टीस पोषक गोष्टी दिसतात काय याची चाचपणी करणं हे त्यांचं मुख्य ध्येय असेल. सध्या अनेक लाल खुजा ताऱ्यांचा शोध लागण्याचं प्रमाण वाढत आहे. गंमत म्हणजे, अशा ताऱ्यांभोवती ग्रह असण्याची शक्‍यता पूर्वी वाटत नव्हती; पण आता निरीक्षणातून असं लक्षात येतं आहे, की दर तीन लाल खुज्या ताऱ्यांपैकी एका ताऱ्याभोवती फिरणारा एकतरी पृथ्वीसदृश ग्रह असण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी तर एका लाल ताऱ्याभोवती (ट्रॅपिस्ट) पृथ्वीसदृश सात ग्रह सापडले आहेत. गेल्या वर्षी आपण एका लेखात ते पाहिलंच आहे. ‘रॉस १२८ बी’बद्दल जो शोधनिबंध आता ‘ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्‍स’कडं पाठवण्यात आला आहे, तो या ताऱ्याच्या गुरुत्वीय स्थानबदलांच्या एकूण १२ वर्षांत केलेल्या निरीक्षणांच्या माहितीवरून केलेल्या विश्‍लेषणांबद्दल आहे. त्यामुळं हा शोध काही अचानक लागलेला नाही, की ‘युरेका’ करत ‘सापडला रे सापडला नवा पृथ्वीसारखा ग्रह’ असं करत नाचावं...असं निरीक्षकांचं नेतृत्व करणारे झेवियर बॉनफिल यांनी यासंबंधात म्हटलं आहे. अनेक वर्षांच्या माहितीच्या विश्‍लेषणातून हे निष्कर्ष आले आहेत. ‘रॉस १२८ बी’ हा ग्रह त्याच्या पालक-ताऱ्यापासून सूर्य-पृथ्वीच्या अंतराच्या संदर्भात २० पट जरी जवळ असला, तरी त्यावर वातावरण आणि पाणी असण्याची शक्‍यता आहे. यासाठी तयार केलेली संगणकीय प्रतिकृती-प्रारूपं आता अशा ग्रहावर वातावरणाचे आणि त्यावर पाणी असण्याचे तर्क मांडत आहेत. यामुळं आता विश्वात पृथ्वीसारखे ग्रह अधिक प्रमाणात सापडतील अशा आशेनं, सोळा प्रकाशवर्षं परिघातल्या सर्व लाल खुजा ताऱ्यांभोवतीच्या ग्रहांचे वेध अधिक जोमानं आणि काटेकोरपणे घेण्याचं अनेक निरीक्षकांनी मनावर घेतलं आहे.
‘सखी शेजारिणी’च्या शोधाची अशी गंमतच भारी की हो...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com