प्राण्यांच्या बुद्धीचं ‘गणित’ (आनंद घैसास)

प्राण्यांच्या बुद्धीचं ‘गणित’ (आनंद घैसास)

विज्ञानात काय काय हाती येत जाईल ते पाहणं जसं महत्त्वाचं; तसंच त्या ज्ञानाचा पुढं तंत्रज्ञानात कसकसा उपयोग होईल, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. काही प्राणी मोजू शकतात... गणिताचा वापर करू शकतात...ते ‘अवजारां’चा वापर करतात... हे आढळून आलं आहे. प्राण्यांच्या या बुद्धिमत्तेचा संबंध आता आपल्याला रोबोट तयार करताना, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या बांधणीसाठी कसा करता येईल, इकडं शास्त्रज्ञांचं लक्ष लागलं आहे.

गणित करणं, मोजणं ही कला फक्त मानवासारख्या प्रगतांना आणि अमूर्त विचार करणं ज्यांना शक्‍य असतं त्यांनाच जमते, असं काही वर्षांपूर्वीपर्यंत शास्त्रज्ञांनाही वाटत होतं. आपल्या शरीराच्या नैसर्गिक क्षमतांपेक्षा काही अधिक क्षमतेची कामं करण्यासाठी काही साधनांचा, अवजारांचा, हत्यारांचा वापर करणं हेही फक्त मानवापुरतंच मर्यादित आहे, असा एक समज फार काळ होता. किंबहुना विज्ञान आणि त्यासोबत तंत्रज्ञानाचा विकास किंवा त्याचा प्रारंभ हा आदिमानवानं जेव्हा दोन दगड एकमेकांवर आपटून त्यांपासून टोकदार, कणखर हत्यार बनवून ते वापरायला सुरवात केली तेव्हा झाला, असं म्हटलं तरी चालेल. अश्‍मयुगीन काळातले असे टोकदार दगड हे कठीण सालीची फळं फोडण्या-तोडण्यासाठी, प्रसंगी निरनिराळ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी, मेलेल्या प्राण्यांचं कातडं फाडण्यासाठी - भाले, बाण, हातोड्याप्रमाणे हत्यारं तयार करण्यासाठी आदिमानव वापरत असत, हे अनेक उत्खननांमधून आढळून आलं आहे. मात्र, ‘हे फक्त मानवांना जमतं, इतर प्राण्यांना अशा साधनांचा वापर करण्याइतपत बुद्धी नसते, तसंच अशी हत्यारं वापरण्यासाठी लागणारे मानवाच्या हातासारखे प्रगत अवयवही त्यांना नसतात,’ असा समज होता. मात्र, या समजाला अगदी पूर्णपणे नव्हे, तर काही प्रमाणात धक्के बसले आहेत ते काही सहज केल्या गेलेल्या निरीक्षणांमुळं, तर काही ठरवून केल्या गेलेल्या संशोधनांमुळं.
निसर्गाच्या निरीक्षणांमधून अनेक प्राणी-पक्षीच काय; पण कीटक आणि मासेही अनेक गुंतागुंतीच्या रचना करताना, बनवताना, वापरताना दिसतात. उदाहरणार्थ ः कोळ्याचं जाळं, सुगरणीचं घरटं, बीव्हरचं धरण बांधणं, अगदी मधमाशीचं पोळं, मुंग्यांचं वारुळातलं सहकारानं चाललेलं समाजजीवन इत्यादी. कबूतरांचं दूर अंतरांवरून बरोबर दिशा ओळखून घराकडं परतणं असो की देवमाशांचं मैलोन्‌मैल दूरवरच्या सहकाऱ्यांना महासागरातच, पाण्याखाली तुतारीसारखे आवाज काढत हाका मारणं असो...यात आता भर म्हणजे काही प्राणी गणित करणारे, आसपासचे पदार्थ, वस्तू, प्राणी मोजू शकणारे आहेत हे कळून येत आहे. एवढंच नव्हे तर, काही प्राणी काही गोष्टी  साध्य करण्यासाठी चक्क हत्यारांचा, अवजारांचा वापर करतात हेही समजून येत आहे.

आजच्या या लेखात यातल्याच काही गोष्टींविषयी...
मानवाशी खूप जवळचं साधर्म्य असणारं ‘चिम्पान्झी’ प्रकारातलं माकड हे इतर प्राण्यांपेक्षा तसं प्रगतच म्हणायला हवं. मानवाचं अनुकरण करण्यात तर ते खूपच प्रवीण; पण एका उत्खननात हे चिम्पान्झी - मानवाच्या अशा अवजारांच्या वापराच्या आधीच - अक्रोडासारखी कठीण कवचाची फळं फोडण्यासाठी दगडाचा वापर हातोड्याप्रमाणे, एखाद्या बत्त्याप्रमाणे करत असत, असं दिसून आलं आहे. या हातोड्याचा आकार काही माणसाच्या हातात मावण्याएवढा नव्हता, तर तो अशा चिम्पान्झींच्या हाताशी जुळणारा होता. शिवाय फळांची टरफलंही उत्खननात आसपास सोबत सापडली.

जर्मनीतल्या लिपझिग प्राणिसंग्रहालयात ओरांगउटांग जातीची काही माकडं आहेत. त्यातल्या पाच माकडांवर एक प्रयोग करण्यात आला. पाण्यानं भरलेल्या नळीसारख्या पाईपमध्ये पाण्यावर तरंगणाऱ्या भुईमुगाच्या शेंगा ठेवण्यात आल्या होत्या; पण त्या पाण्यावर तरंगणाऱ्या शेंगा काही सहज हाताशी लागणाऱ्या नव्हत्या. ओरांगउटांगपैकी एकानं या नळीत पाण्याच्या चुळा टाकून पाण्याची उंची वाढवली आणि शेंगा मिळवल्या! हे करण्यासाठी त्याला सुमारे नऊ मिनिटं लागली; पण गंमत म्हणजे त्यानंतरच्या ओरांगउटांगांनी अनुकरणाचं काम चोख बजावलं. एकेकानं सरासरी ३१ सेकंदांत, तेही कधी फक्त १० चुळांमध्ये आपापल्या पाईपमधल्या शेंगा मिळवल्या...यात या माकडांनी पाण्याचाच वापर ‘साहित्य’, ‘उपकरण’ म्हणून केलेला दिसतो...पण मला मात्र या प्रयोगासंदर्भात, सुरईतलं पाणी पिण्यासाठी त्यात दगड टाकणाऱ्या इसापाच्या कावळ्याची फारच आठवण झाली...आणि जरा शोध घेतल्यावर खास तसाच प्रयोगही करून पाहण्यात आला होता, त्याचीही माहिती मिळाली.
इसापाचा कावळा पाण्याची तहान भागवण्यासाठी सुरईत दगड टाकून पाण्याची पातळी चोचीपर्यंत उंच करतो; पण असा प्रयोग करून पाहताना कावळ्याला केवळ तहानेला ठेवणं काही योग्य नव्हतं; त्यामुळं अर्थात एक चांगला पर्याय म्हणून एका उंच पेल्याचा वापर करण्यात आला आणि त्या पाण्यावर तरंगणारी आणि कावळ्यांना खायला अतिशय आवडणारी एक अळी तरंगत ठेवण्यात आली होती. प्रयोगासाठी एकंदर चार कावळे निवडले गेले होते, त्यातले दोन प्रौढ, तर दोन तरुण कावळे होते. ज्या पिंजऱ्यात या कावळ्यांना ठेवण्यात आलं होतं, त्यात ठराविक आकाराचे दगडही शेजारी ठेवलेले होते. काही दगड एकसारख्या आकाराचे मोठे, तर काही एकसारखेच; पण लहान असे ठेवलेले होते. या कावळ्यांचं निरीक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात आली व ती ही की इसापाच्या कहाणीत खरंच तथ्य आहे. कारण, कावळे चोचीत दगड घेऊन पेल्यात टाकून पाण्याची पातळी वाढवतात आणि मग चोचीशी आलेली अळी लगोलग गट्ट करतात. शिवाय, असं करताना आधीच अंदाज घेऊन जे दगड आत टाकायचे ते एकापाठोपाठ एक, आकारानं मोठे असणारे दगडच पेल्यात टाकतात. छोटे दगड नाही वापरत! तसंच प्रत्येक वेळी दगड टाकल्यावर अळीची उंचीही मोजत बसत नाहीत...या संशोधनाचं काम झालं इंग्लंडमधल्या केम्ब्रिज विद्यापीठात आणि ज्या संशोधकांच्या गटानं हे संशोधन केलं, त्यांच्या प्रमुखाचं नाव होते ख्रिस्तोफर ‘बर्ड’!हत्ती हा तर सगळ्या प्राण्यांमध्ये जास्त बुद्धिमान समजला जातो. तो असं काही साहित्य, अवजारं वापरतो काय, हे पाहताना असं लक्षात आलं - तेही खासकरून भारतीय हत्तींमध्ये - की ते झाडाची फांदीच एक उपकरण म्हणून वापरतात. ठराविक लांबीची, पुढं भरपूर पानं असणारी झाडाची फांदी या हत्तींनी निवडलेली असते. फांदीच्या शेंड्याकडं पानं राखून ठेवलेली असतात; पण दुसऱ्या टोकाकडच्या मोठ्या दांड्याभोवतालच्या छोट्या फांद्या मात्र तोडून टाकलेल्या असतात. हत्ती ही फांदी जणू काही एखादा झाडू वापरावा तशी वापरतात. अंगावरचे डास-माश्‍या आणि धूळ झाडण्यासाठी ही फांदी वापरली जाते.

आफ्रिकेत सॅव्हाना म्हणून ओळखला जाणारा पर्जन्यवनाचा प्रदेश आहे, तिथले चिम्पान्झी बहुतांश मांसाहारी आहेत. ते तिथल्या रानातल्या ‘बुशबेबी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गॅलॅगो’ जातीच्या, निशाचर असणाऱ्या लहान आकाराच्या माकडांची शिकार करतात, तेही भाल्यासारख्या बनवलेल्या एका काठीनं, असं आढळून आलं आहे. गॅलॅगो ही रात्री रानात फिरणारी; पण दिवसा झुडपांच्या सावलीत, अंधारात लपून झोपणारी, मोठ्या डोळ्यांची जेमतेम छोट्या मांजराच्या आकाराची लहान माकडं असतात. झुडपात लपलेल्या; विशेषत: झोपलेल्या गॅलॅगोंची शिकार माद्या चिम्पान्झी आणि वयानं लहान असलेले चिम्पान्झी करतात असं दिसून आलं आहे. हे करण्यासाठी मादी आधी एक सरळसोट लांब फांदी निवडते. तिला फुटलेल्या छोट्या फांद्या तोडून टाकते. सगळी पानंही ओरबाडून टाकते. त्या लांब काठीची सालही चावून चावून काढून टाकते. मग काठीच्या एका बाजूला दातांनी कोरून टोक केलं जातं. आपण शिसपेन्सिलला जसं टोक काढतो तसंच! हा असतो चिम्पान्झींचा ‘भाला’! हा भाला ते अंधाऱ्या झुडपात आधी हळूच खुपसतात...-मग बाहेर काढून त्याच्या टोकाचा वास घेतात, तर कधी चाटूनही पाहतात. झुडपात भक्ष्य आहे अशी खात्री झाली की मग भराभर वार करून भक्ष्याला जेरीस आणतात आणि मग शिकार करून भक्ष्याचा चट्टामट्टा करतात. मात्र, प्रौढ चिम्पान्झी असं सहसा करताना दिसत नाहीत. ते भक्ष्याचा पाठलाग करून, त्यांना पकडून मारणंच अधिक पसंत करतात, असं दिसून आलं आहे. ‘अवजाराचा वापर करणं प्रौढ चिम्पान्झींना कदाचित कमीपणाचं वाटतं की काय,’ अशी टिपण्णी या संशोधकांपैकी एकानं केलेली आहे. ‘करंट बायॉलॉजी’च्या ता. २२ फेब्रुवारीच्या अंकात या संशोधनावरचा लेख आला होता.
चिम्पान्झी माकडं इतरही अवजारं वापरतात, असं दिसून आलं आहे; तसंच काही प्रमाणात गोरिलांचंही; पण अगदी वेगळ्या कारणासाठी. लष्करी किंवा सैनिकी मुंग्या आणि वाळवी हे त्यांचं आवडतं खाद्य. त्यासाठी ते या मुंग्यांच्या वारुळांची तोंडं मोठी करण्यासाठी एका प्रकारच्या काठ्या आणि वारुळात खोलवर आत शिरू शकतील अशा दुसऱ्या प्रकारच्या काठ्या तयार करतात असं दिसतं. यासाठी ते खास अशा ‘अलकोर्निया हिर्टेला’ या झुडपाची लांबसडक काठी शोधतात. मोठ्या जाड काठीनं वारुळाची तोंडं उखडून ती मोठी करतात, मग त्यात हलकेच लांबसडक काठी घालतात. काठीला पुरेशा मुंग्या लागल्या की ती अलगद वर काढून ती तोंडानं निपटून तीवरच्या सगळ्या मुंग्या खाऊन टाकतात. बराच वेळ हा उद्योग सुरू असतो; पण हे अगदी सावकाश मन लावून, हळुवारपणे सुरू असतं. कारण, लष्करी मुंग्या हे जरी फार चांगलं ‘प्रोटिनयुक्त’ आणि चवदार खाद्य असलं, तरी जर त्या मुंग्या चवताळल्या तर त्यांचं डसणं महाभयंकर असतं. एकूण १४६ वर्गमैल परिसरात, चिम्पान्झींसोबत नऊ वर्षं चाललेल्या एका अभ्यासप्रकल्पाद्वारे काढण्यात आलेला हा निष्कर्ष आहे. काँगोच्या नॅशनल पार्कमधल्या नोबोले-न्डोकी या विभागात केलेल्या या प्रकल्पात चिम्पान्झींनी वापरलेली एकूण १०६० अवजारे आणि या अवजारांच्या साह्यानं चिम्पान्झींनी मुंग्या गोळा करण्याच्या घटनांचे एकूण २५ व्हिडिओ आहेत.
उत्तर भारतातली आणि थायलंडमधली लांब शेपटीची माकडं - ज्यांना ‘मॅकॉक’, तसंच ‘जुन्या जगातली माकडं’ असंही म्हटलं जातं, ‘जुन्या जगातली’ असं म्हणण्याचं कारण असं की ती केवळ आशिया खंडातच आढळतात - टोळीनं फिरणारी असतात आणि एका सक्षम व दरारा असणाऱ्या मादीच्या आधिपत्याखाली ती वावरतात. ही माकडांची जात अनेक गमती करताना दिसते. एखादा मोठा लांब केस त्यांना जर मिळाला तर - किंवा कधीकधी तर ते आसपासच्या प्राण्यांच्या शेपटीतला, अंगावरचा केस मुद्दाम तोडून मिळवतात - तो चक्क दातांच्या फटीत अडकलेले कण काढण्यासाठी वापरतात! माणसांच्या प्रगत जगातल्या ‘डेंटल फ्लॉस’ प्रमाणे...!

मोठे गोरिला चिखलातून, पाण्यातून मार्ग काढताना एखादी लांब फांदी, काठी, दर पावलासोबत पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतात. ही फांदी चांगली मजबूत असते. चिखलात, पाण्यात उतरण्याआधीच चार-पाच पावलं पुढची खोली किती याचा अंदाज गोरिला या काठीनं तर घेतातच, शिवाय गरज पडली तर हीच काठी आडवी करून तिचा ‘पूल’ तयार करतात व एखादा नाला ओलांडण्यासाठी या ‘पुला’चा वापर करतात. ही सगळी निरीक्षणं जंगली, न पाळलेल्या आणि न शिकवलेल्या प्राण्यांमध्ये दिसून आलेली आहेत हे विशेष. माकडं ही बहुतांशी मानवाशी जुळणारी असतात, असं मानलं जातं; पण पाण्यात राहणारे काही जलचरही अवजारं वापरतात.

‘विझेल’ वर्गातली ‘समुद्री ओटर्स’ही बंद शिंपले उघडण्यासाठी, तसंच कालवे, शंख फोडण्यासाठी दगडांचा वापर करून, ते आपटून आपटून फोडण्यात पटाईत असतात. समुद्रातल्या सस्तन प्राण्यांचं हे वागणं खरंतर फार पूर्वीपासून आपल्याला माहीत होतं; पण त्यात आता डॉल्फिनसारख्या इतरांचीही भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाजवळच्या ‘शार्क बे’ या सागरी प्रदेशात बाटलीसारखा तोंडाचा आकार असणारा डॉल्फिन एका ठिकाणाहून प्रवाळाचा एक तुकडा घेऊन त्याचा वापर सागरतळाशी असणारी वाळू ढवळून काढण्यासाठी वापरताना दिसून आला आहे. तळाशी वाळूत लपलेलं भक्ष्य शोधण्याच्या कामी तो या प्रवाळाचा उकरण्यासाठी वापर करतो, असं लक्षात आलं आहे. पॅसिफिक महासागरातल्या पलाऊ बेटाशेजारी नारिंगी ठिपके अंगावर असणाऱ्या ‘टस्क’ माशाचा २००९ मध्ये काढलेला व्हिडिओ, त्याच्या बऱ्याच निरीक्षणानंतर आणि विश्‍लेषणानंतर सप्टेंबर २०११ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तो खूपच गाजला. कारण, त्यात हा ‘व्रासे’ प्रकारचा मासा सागरतळाशी एक शिंपलं तोंडात घेतो, त्यानंतर एका ठिकाणी तो एका टणक जागी ते आपटून पाहतो. ते फुटत नाही. मग बराच काळ योग्य दगड शोधण्यात त्याचा वेळ जातो. मग त्या शोधलेल्या दगडावर आपटून तो ते शिंपलं तोडतो. आतलं भक्ष्य खातो. जेव्हा तो मासा सगळं अंग आडवं सटकवत, हलवत, तोंडातलं शिंपलं दगडावर आपटतो ते पाहण्यासारखंच आहे. या एका चित्रफितीमुळं एखाद्या वस्तूचा आपल्यासाठी उपयोग करून घेण्याची सजीवांमध्ये फक्त मानवाचीच मक्तेदारी आहे, ही संकल्पनाच संपुष्टात येते (यू ट्यूबवर हा व्हिडिओ आहे). अवजार, साधन वापरणाऱ्यांमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. ऑक्‍टोपसची. पॅसिफिक महासागरात तळाशी राहणारा हा अष्टपाद लपून राहण्यासाठी चक्क दोन मोठ्या शिंपल्यांच्या शकलांची मदत घेतो, प्रसंगी ती शिंपली ढालीसारखीही वापरतो (हीसुद्धा चित्रफीत यू ट्यूबवर आहे). याखेरीज आणखी एक गोष्ट आता लक्षात येत आहे व ती म्हणजे मोजण्याची कलाही काही प्राण्यांमध्ये दिसून आली आहे. याचाही मागोवा घेणं आता अनेक संशोधनांद्वारे सुरू आहे. फार सविस्तरपणे नाही; पण इथं त्याचे उल्लेख करणं योग्य ठरेल. कारण, हे संशोधन कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता कोणत्या सजीवांकडं आहे याकडं आणि त्याच्या वैविध्याकडंही निर्देश करतं. प्रत्यक्ष आकडे, संख्या मोजणं हे काही प्राण्यांना जमतं, असे काही सर्कशीतले खेळही करून दाखवण्यात आले होते किंवा येतात. मात्र, त्यात नेहमी तथ्य असतंच असं नाही. समोर ठेवलेल्या संख्यांप्रमाणे पाय आपटणारा, संख्यांची बेरीज अचूक करणारा ‘क्‍लेव्हर हॅन्स’ हा १९९० मध्ये प्रसिद्धीस आलेला एक घोडा. तो त्या समोरच्या आकड्यांवर नव्हे, तर मालकाच्या खुणांवर प्रतिसाद देत असे, हे नंतर कळून आलं आणि त्याची प्रसिद्धी संपुष्टात आली. मात्र, एक गोष्ट त्यातूनही लक्षात आली व ती ही की  खुणा कळून त्यावरून मोजणंही त्या घोड्याला कळत होतं आणि जमत होतंच की...!

एकापेक्षा अनेक जण आपल्या आसपास आहेत, त्यातल्या जास्त संख्येनं असलेल्या घोळक्‍याकडं एकटा असलेला गप्पी मासा जातो, त्या घोळक्‍यात सामीलही होतो, असं एका संशोधनात आढळलं आहे, तर मधमाश्‍या आपल्या पोळ्यापासून किती दूरवर आपण आलो, हे मार्गातल्या काही ठराविक (फक्त चार) खुणांवरून ओळखतात, असं दिसून आलं आहे. जर त्या खुणांच्या जागा बदलल्या किंवा समान वाटणाऱ्या खुणांची त्यात भर घातली, तर त्या मार्ग चुकतात, गोंधळतात हेही लक्षात आलं आहे.
सिंहांच्या बाबतीत एक प्रयोग करण्यात आला होता. जंगलातल्या झाडांमध्ये स्पीकर लावण्यात आले होते आणि त्यातून सिंहांच्याच ओरडण्याचे आवाज येतील अशी व्यवस्था केली गेली होती. सिंहांचा, विशेषत: सिंहिणींचा, आपलं एक ठराविक क्षेत्र सांभाळण्याचा, त्यावर मालकी हक्क प्रस्थापित करून तो राखण्याचा, त्यासाठी घुसखोरांवर हल्ला करून त्यांना पळवून लावण्याचा एक उपजतच स्वभाव असतो. मात्र, त्यातही आपल्या परिसरात येणारा हा एखाद्‌दुसरा घुसखोर आहे की दोन-चार आहेत, ते नुसत्या आवाजावरून या सिंहिणी ठरवत होत्या...त्यानुसार हल्ला करायचा की लपून राहायचं हेही त्यांच्या वागण्यातून दिसत होतं. इथंही सिंहिणी एक ते चारपर्यंत मोजतात किंवा ते मोजणं, ओळखणं त्यांना जमतं, असं दिसून आलं. शिकार करतानाही पाहा, कळपातून बाजूला पडलेल्या एकट्या आणि थोड्या कमजोर जनावराचीच निवड पाठलाग करून पकडण्यासाठी वाघ, सिंह, चित्ता असे प्राणी करतात. फक्त प्राणीच नव्हे तर ‘व्हीनस ट्रॅप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाजणाच्या जागी वाढणाऱ्या मांसाहारी वनस्पतीच्या बाबतीतही ती तिला होणारे स्पर्श ओळखते, नव्हे मोजते, असं दिसून आलं आहे. तिच्या पानांवरचे संवेदक पानावर एखादा किडा आला की त्याच्या पहिल्या स्पर्शातच काही त्याला पकडत नाहीत; पण ‘कुणीतरी आहे’ ही जाणीव मात्र पहिल्या स्पर्शात नोंदली जाते. पहिल्या दोन स्पर्शांनंतर ‘होय, कदाचित अन्न आहे’ ही संवेदना एका सूक्ष्म थरथरीनं नोंदली जाते; पण किड्याच्या लागोपाठ होणाऱ्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्पर्शानंतर किंवा नंतरच्या लागोपाठच्या तीन स्पर्शांनंतर ‘चला, पचवायचं आहे’ ही भावना ते पंजे नुसते मिटवतच नाही, तर कीटकाला पचवणारी रसायनंही स्रवतं! त्याचबरोबर कीटकातून बाहेर स्त्रवणारा रस शोषायला सुरवातही होते!

विज्ञानात काय काय हाती येत जाईल ते पाहणं जसं महत्त्वाचं असतं; तसंच त्या ज्ञानाचा पुढं तंत्रज्ञानात काय उपयोग होईल, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं. प्राण्यांच्या या मोजता येऊ शकण्याचा, गणिताचा वापर करता येऊ शकण्याचा, अवजारवापराच्या बुद्धिमत्तेचा संबंध आता आपल्याला रोबोट तयार करताना, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या बांधणीसाठी कसा करता येईल, इकडं शास्त्रज्ञांचं लक्ष लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com