जीनिअस (आनंद घैसास)

aanand ghaisas write dr stephen hawking article in saptarang
aanand ghaisas write dr stephen hawking article in saptarang

"काळाचे भाष्यकार', "ब्रह्मांडाचे प्रवासी' अशी अनेकानेक विशेषणं फिकी पडावीत असं काम करणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ, लेखक डॉ. स्टीफन हॉकिंग यांचं बुधवारी (14 मार्च) निधन झालं. व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडातल्या अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हॉकिंग यांचं आयुष्य जगभरातल्या विज्ञानप्रेमींसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही प्रेरणास्रोत ठरलं होतं. "जीनिअस' हा शब्द खऱ्या अर्थानं भूषवणाऱ्या या अलौकिक प्रतिभावंताच्या कार्याचं हे स्मरण...

ता. 14 मार्च हा दिवस हा दिवस "आंतरराष्ट्रीय "पाय' दिवस' म्हणून गणला जातो; पण या गणिताच्या गूढांपैकीच एक गूढ वाटावं अशा घटना या दिवशी घडल्या, म्हणून सध्या विविध माध्यमांमध्ये त्याविषयीची चर्चा सुरू आहे. त्यातली एक बाब म्हणजे, या दिवशीच सकाळी डॉ. स्टीफन हॉकिंग यांच्या निधनाची बातमी आली. आइनस्टाइन या महान भौतिकशास्त्रज्ञाचाही हा 139 वा जन्मदिवस. त्याच दिवशी हॉकिंग यांनी अखेरचा श्‍वास घेतला. यातही काही गूढ आहे की काय, असा मुद्दा अनेक माध्यमांद्वारे उपस्थित केला गेला. त्यात हॉकिंग यांचं एक वचन अधोरेखित करण्यात आलं होतं. हॉकिंग यांनाही आपल्या जन्मदिवसाचं अप्रूप वाटत असे. हे वचन त्याविषयीचंच होतं. हॉकिंग यांचा जन्म आठ जानेवारी 1942 रोजी झाला होता आणि तो दिवस "आधुनिक विज्ञानाचा जनक' अशी ओळख असणारे गॅलिलिओच्या पुण्यतिथीचा होता. आता हॉकिंग यांचा मृत्यूही गणिताशी संबंधित असलेल्या "पाय' या स्थिरांकाला मान देणाऱ्या दिवसाशी आणि आइनस्टाइनच्या 139 व्या जन्मदिवसाशी जोडला गेला आहे. ज्यांनी आयुष्यभर आइनस्टाइनच्या सिद्धान्तावर, विश्वरचनेच्या गूढावर काम केलं, त्यांच्या बाबतीतल्या या संबंधाची चर्चा तर होणारच होती. कारण, हॉकिंग हा माणूसच काही विलक्षण होता. "जर विश्‍व हे त्यातल्या अंतर्गत गुणधर्मांमुळं तयार होत असेल, तर मग देवाची, निर्मात्याची गरजच काय?' अशी धाडसी विधानं वैज्ञानिक आधारावर करणारा हा माणूस. "या गोष्टी म्हणजे निव्वळ योगायोग होय,' असंच मत हॉकिंग यांनी व्यक्त केलं असतं. किंबहुना अनेक संशोधक-शास्त्रज्ञही असंच म्हणतील...

आश्‍चर्यचकित करणारं संशोधन
हॉकिंग हे एकूणच असामान्य व्यक्तिमत्त्व. जगाशी, सभोवतालाशीच नव्हे, तर स्वत:च्या शरीराशीही, त्या शरीराला झालेल्या असाध्य व्याधींशी सतत झगडत, आयुष्य मनस्वीपणे जगणारा एक तत्त्वज्ञ. अनेक धडधाकट शास्त्रज्ञांना जमणार नाही असं संशोधन त्यांनी भयानक अशा शारीरिक अपंगत्वावर मात करत आणि अद्वितीय मनोबलाच्या जोरावर केलं. सतत 30 वर्षं इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा केंब्रिज विद्यापीठात ल्युकेशियन प्रोफेसर म्हणून मानाचं पद त्यांनी भूषवलं. विज्ञानातली अवघड प्रमेयं सर्वसामान्यांना समजवून सांगण्याची हातोटी त्यांना होती. हॉकिंग यांनी चक्‍क सहा वेळा डॉक्‍टरेट मिळवली होती. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. एडिंग्टन मेडल, ह्यूजेस मेडल, रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचं गोल्ड मेडल, फ्रॅंकलिन मेडल, मॅक्‍सवेल मेडल, वोल्फ प्राईज इन फिजिक्‍स, अल्बर्ट आइनस्टाइन पुरस्कार, प्रिन्स ऑफ अस्तुरियस पुरस्कार, कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा एलिझाबेथ राणीनं दिलेला सर्वोच्च मानाचा पुरस्कार, "अमेरिकन फिजिकल सोसायटी'तर्फे दिला जाणारा ज्युलियस एडगर लिलन फील्ड पुरस्कार, रॉयल सोसायटीचाच कोप्ले पुरस्कार, अमेरिकेचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा सर्वोच्च नागरी पुरस्कार...किती नावं घ्यावीत! हॉकिंग यांनी विज्ञानावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यात सर्वसामान्यांना विज्ञानातली क्‍लिष्ट समीकरणं समजतील अशी "अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम' आणि "द युनिव्हर्स इन अ नटशेल' अशी काही सुलभ, रसाळ पुस्तकं आहेत; त्याचप्रमाणे "गॉड क्रिएटेड दी इंटेजर्स' यासारखी अनेक गणिती सूत्रांनी भरगच्च भरलेली गुंतागुंतीची पुस्तकंही आहेत. हॉकिंग यांनी आपल्या लहान मुलीबरोबर लहान मुलांसाठी विज्ञानकथाही लिहिल्या. सैद्धान्तिक विश्वरचनाशास्त्रावरील "थेरॉटिकल कॉस्मॉलॉजी', गुरुत्वाकर्षणाचं पुंजीय गुणधर्म सांगणाऱ्या "क्‍वांटम ग्रॅव्हिटी,' स्ट्रिंग थिअरी' आणि"स्पेस अँड टाइम' (अवकाश आणि काल) यांच्यावर त्यांनी केलेलं संशोधन साऱ्या जगाला आश्‍चर्यचकित करणारं ठरलं.

न्यूनट, आइनस्टाइन यांचं संशोधन...
हॉकिंग यांच्या संशोधनाकडं वळण्याआधी गुरुत्वाकर्षणाच्या संकल्पनेच्या विकासातले टप्पे जाणून घ्यायला हवेत. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं हलकी किंवा जड कोणतीही वस्तू एकाच त्वरणानं पृथ्वीकडं खेचली जाते, हे गॅलिलिओनं दाखवून दिलं होतं. त्याच्या प्रयोगावर मग इतर अनेकांनी त्याबाबत प्रयोग करून पाहिले. गॅलिलिओच्या मृत्यूच्या वर्षीच आयझॅक न्यूटनचा जन्म झाला होता. गुरुत्वाकर्षणाच्या त्याच्या नियमांनी तर विज्ञानात क्रांतीच घडवून आणली. झाडावरून जमिनीकडं पडणाऱ्या सफरचंदाचं त्वरण आणि पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्रावर पृथ्वीभोवती फिरण्याचं आणि पृथ्वीचं सूर्याभोवती फिरण्याचं बलही गुरुत्वाकर्षणाचंच बल असतं, हे न्यूटननं दाखवून दिलं होतं. हे बल कोणत्याही दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणोत्तराच्या समप्रमाणात आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं, असा न्यूटनचा सिद्धान्त सांगतो. याच गुरुत्वाकर्षणामुळं सूर्यमालिकेतले सारे ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात; पण त्यांची कक्षा नीट मांडण्यासाठी जी गणितं मांडावी लागतात, त्यासाठी न्यूटननं गणिताची कॅल्क्‍युलस ही नवीनच पद्धत शोधून काढली. न्यूटनच्या या शोधाचा एवढा दबदबा विज्ञानाच्या जगात होता, की पुढची काही दशकं जरी कोणती वेगळी संकल्पना मनात आली, तरी ती मांडण्याचं धाडस कुणाला झालं नाही! न्यूटनच्या तोडीचा; किंबहुना त्यालाही ओलांडून पुढं जाणारा ठरला आइनस्टाइन. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताकडं पाहण्याची वेगळीच दृष्टी त्यानं आपल्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानं दिली. या सिद्धान्तानं त्यानं वस्तुमान आणि ऊर्जा यांना एकाच समीकरणात गुंफलं. ऊर्जा ही वस्तुमानाच्या आणि प्रकाशाच्या वेगाचा स्थिरांक यांच्या वर्गाच्या गुणाकाराइतकी असते, असं त्यानं "ई=एमसी वर्ग' या त्याच्या प्रसिद्ध समीकरणात मांडलं. योग्य अशा परिस्थितीत वस्तुमानाच्या लहानशा तुकड्यातूनही प्रचंड प्रमाणात ऊर्जानिर्मिती होते, असं या समीकरणातून पुढं आलं. याच सिद्धान्तानुसार, विश्वाचा उगम होताना प्रचंड ऊर्जेचं ताऱ्यांच्या आणि ग्रहांच्या वस्तुमानात रूपांतर होऊन आपलं विश्व निर्माण झालं असलं पाहिजे, असं वैज्ञानिक मानायला लागले. (अणुबॉम्बची निर्मिती याच सिद्धान्तातून पुढं आली). गुरुत्वाकर्षणाकडं पाहण्याची आइनस्टाइनची दृष्टी वेगळी होती. त्याच्या मते, कुठल्याही वस्तूमुळं त्याभोवतालचं अवकाश हे वक्र होतं. खरंतर इथं नुसतं अवकाश असं म्हणता येणार नाही, तर "अवकाश-काल' हे दोन्ही वक्र असतं असं म्हणायला हवं. वस्तू जितकी अधिक वस्तुमानाची असेल तितकी त्याभोवतालची वक्रता अधिक असं त्याचं म्हणणं होतं. एखाद्या मऊ गादीवर एखादा जड गोळा ठेवला तर तिथं जसा खळगा पडेल, तशी त्या अवकाश-कालाची वक्रता असेल. गादीच्या एका कडेवरून एखादी वस्तू त्या खळग्याकडं जशी घरंगळत जाईल, तशी परिस्थिती या वक्रतेनं गुरुत्वाकर्षणाच्या त्वरणामुळं आसपासच्या वस्तूंचीही होईल. त्या अशाच वक्रतेच्या मार्गानं घरंगळत जातील. या आइनस्टाइनच्या सिद्धान्तामुळं गुरुत्वाकर्षणाचे, वक्रप्रतलीय (नॉनयुक्‍लिडियन) भूमितीचे, गतीचे वेगळे नियम वापरात आणावे लागले. दैनंदिन आयुष्यात खाली पडणाऱ्या सफरचंदासारख्या वस्तूंच्या बाबतीत न्यूटनचे नियम वापरले काय किंवा आइनस्टाइनचे नियम वापरले काय, फारसा फरक पडत नाही; पण अंतराळातल्या मोठ्या ग्रह-ताऱ्यांच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा मात्र बराच फरक पडायला लागतो, हे समोर येऊ लागलं. मग न्यूटनचे नियम बरोबर की आइनस्टाइनचे, याचा अभ्यास करून त्यांची पडताळणी करणं सुरू झालं. त्यात आइनस्टाइनचा सिद्धान्तच अधिक बरोबर दिसायला लागला. विसाव्या शतकाच्या सुरवातीला जेव्हा मोठ्या दुर्बिणीतून हबल आणि त्याचा सहकारी ह्युमॅसन निरीक्षणं करत होते, तेव्हा अवकाशातल्या अधिकाधिक दूरच्या दीर्घिका आपल्यापासूनच नव्हे तर एकमेकींपासूनही दूर जात आहेत, हे लक्षात आलं. काही काळानं त्यांच्यातली अंतरं वाढत जाणार. म्हणजे विश्‍वाचा दिसणारा पसारा मोठा होत चालला आहे. जर याचाच उलट विचार केला तर भूतकाळात हे सारं एकमेकींजवळ असणार. लाखो वर्षांपूर्वी हे विश्व जेवढं असेल, त्यापेक्षा कोट्यवधी वर्षांपूर्वी अधिक जवळ, अधिक लहान आकाराचं असणार! असं करत गेल्यास 1400 कोटी वर्षांपूर्वी ते एका बिंदुवत्‌ आकारात सामावलेलं असणार. हे निष्कर्ष काढल्यास 1400 कोटी वर्षांपूर्वी एका अतितप्त प्रचंड ऊर्जा असलेल्या बिंदूत सामावलेल्या या विश्वाचा स्फोट होऊन त्यातून आइनस्टाइनच्याच समीकरणानुसार त्या ऊर्जेचं वस्तुमानात रूपांतर होऊन विश्वाची निर्मिती झाली असणार, अशी "बिग बॅंग थिअरी', म्हणजेच - "महास्फोटसिद्धान्त' पुढं आला.

हॉकिंग यांच्या संशोधनातलं वेगळेपण
या बिंदुवत्‌ अवस्थेला "सिंग्युलॅरिटी' असं म्हटलं जातं. या वेळी वस्तुमानच नव्हे, तर त्यातून काळाचीही निर्मिती झाली. त्यामुळं "बिग बॅंगच्या अगोदर काय?' हा प्रश्‍नच चुकीचा ठरतो. याबाबतीत हॉकिंग अतिशय समर्पक उदाहरण देतात. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या वर जर कुणी उभा असेल तर तो तिथून कोणत्याही दिशेनं गेला तरी तो उत्तरेकडं कधीच जात नाही. त्यामुळं तिथून जसं अधिक उत्तरेकडं जाता येत नाही, उत्तर दिशाच तिथं संपते, तद्वतच बिग बॅंगच्या आधी काळच असणार नाही; पण या विश्वाच्या भवितव्याच्या संदर्भात प्रसरणाच्या बाबतीत दोन संभाव्यता आहेत, असं हॉकिंग यांचं म्हणणं आहे. एकतर विश्वाचं प्रसरण असंच अनंतकाळपर्यंत सुरू राहील किंवा हे प्रसरण कधीतरी थांबेल आणि मग ते आकुंचन पावत त्याचा शेवट एका महासंकोचात होईल. हे नक्‍की कोणत्या मार्गानं होईल ते त्याच्या सध्याच्या एकूण घनतेवर अवलंबून आहे. सध्यातरी आपलं विश्व सातत्याचं प्रसरण आणि महासंकोच यांच्या सीमारेषेवर उभं आहे. विश्वाच्या या अवस्थेविषयी हॉकिंग आणि रॉजर पेनरोज यांनी संशोधन केलं. वेळ आणि काळ यांची सुरवात कुठून आणि त्यांचा शेवट आहे काय, याविषयी हॉकिंग यांनी संशोधन केलं. हॉकिंग यांचं आणखी महत्त्वाचं संशोधन म्हणजे कृष्णविवरांबद्दलचं, म्हणजेच "ब्लॅक होल'बद्दलचं. या प्रचंड गुरुत्वाकर्षण असणाऱ्या, ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, अशा वस्तूबद्दलचं. कृष्णविवर हे खरं तर एखाद्या ताऱ्याचं कलेवर असतं; पण प्रचंड घनता असल्यानं त्याचा आकार लहान असला तरी त्याचं गुरुत्वाकर्षण फारच जास्त असतं. प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, अशी घनता येण्यासाठी आपल्या सूर्याचा आकार एखाद्या सव्वातीन किलोमीटर व्यासाच्या; पण वस्तुमान आता आहे तेवढंच असणाऱ्या वस्तूचा असू शकतो. या कृष्णविवराच्या दुरून जाणाऱ्या वस्तूवर जरी त्याचा परिणाम दिसत नसला तरी त्यापासून एका ठराविक अंतरावर एखादी वस्तू असेल तर ती फार वेगानं त्याच्याकडं खेचली जाते. या अंतराला "घटना-क्षितिज' (इव्हेंट-होरायझन) असं म्हणतात. पेनरोज आणि हॉकिंग यांनी "कृष्णविवर म्हणजे अनंत घनता असलेला आणि शून्य आकाराचा बिंदू (यालाच ते "सिंग्युलॅरिटी' म्हणत) असला पाहिजे,' असं मत मांडलं. घनता अनंत असल्यानं तिथं अवकाश-काळाची वक्रताही अनंत असली पाहिजे; यामुळं नेहमीचे भौतिक नियम यात लागू पडत नाहीत. त्यामुळं कृष्णविवराच्या आत काय चाललं आहे, याचा पत्ता लागू शकत नाही. जणू निसर्गानं त्याभोवती कडक निर्बंधच घातले आहेत. पेनरोज यालाच "वीक कॉस्मिक सेन्सॉरशिप' हायपोथिसीस, माहितीवर निर्बंधाची संकल्पना म्हणत.

"हॉकिंग रेडिएशन' आणि "स्ट्रिंग थिअरी'
अंतराळात असंख्य अतिसूक्ष्म कण आणि प्रतिकण (पार्टिकल आणि अँटिपार्टिकल) यांच्या जोड्‌या असतात. अतिसूक्ष्मअणुकेंद्रकीय कण (सबऍटॉमिक पार्टिकल्स) हे आपल्या सामान्य भौतिकशास्त्राचे नियम पाळत नाहीत. त्यांची गती आणि अस्तित्व हे कायम बदलतं असतं. हे बदल घडायला एका सेकंदाचा अब्जांश एवढा वेळ लागतो. त्यांची निर्मिती रिकाम्या अवकाशातही होऊ शकते. या अतिसूक्ष्म कणांच्या जोडीपैकी एकाचं वस्तुमान ऋण, तर दुसऱ्याचं धन असतं. हे दोन कण सतत एकामेकांशी अभिक्रिया करत एकमेकांना नष्ट करत असतात. हे अंतराळात कायमच सुरू असतं; पण हेच कण जर कृष्णविवराच्या कक्षेत आले तर त्यातला ऋण वस्तुमानाचा कण कृष्णविवराच्या आत खेचला जातो; पण धन कण मात्र त्या कणाला मिळालेल्या ऊर्जेमुळं कृष्णविवरापासून निसटतो. हे हॉकिंग यांनी प्रथम शोधून काढलं. म्हणून या उत्सर्जनाला "हॉकिंग रेडिएशन' असं म्हणतात. कृष्णविवरातून बाहेर पडणारे क्ष किरण किंवा गॅमा किरणांचं हे उत्सर्जन आपल्याला सापडलं, तर ते या न दिसणाऱ्या कृष्णविवराचं अस्तित्व दर्शवणारं ठरू शकतं, असं प्रतिपादन हॉकिंग यांनी केलं होतं. सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताशी पुंजवादाच्या जोडकामाच्या या प्रकारात कृष्णविवरात आत जाणाऱ्या ऋण कणामुळं कृष्णविवराचं वस्तुमान घटत जाईल आणि जर हे सतत घडत गेलं, तर कृष्णविवर कालांतरानं लहान होत त्याचा स्फोटही होईल, असंही हॉकिंग यांचं प्रतिपादन होतं. हे फारच क्रांतिकारक ठरलं. यावर सध्या मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. हॉकिंग यांनी "स्ट्रिंग थिअरी'वरही काम केलं. सर्वच पदार्थ कणांनी बनलेले असतात. त्यात अणू हे प्रमुख कण मानण्यात आले होते; पण अणूही प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्‍ट्रॉननं बनलेले असतात. त्यातले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन "क्‍वार्क' या अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असतात, हे गेल्या शतकात ठाऊक झालं. हे क्‍वार्क सहा प्रकारचे असतात. शिवाय, विश्वात अनेक प्रकारचे अतिसूक्ष्मकण (सबऍटॉमिक पार्टिकल) असतात. त्या सगळ्यांचे लेप्टॉन्स, मेसॉन्स आणि बॅरियॉन्स असे गट पडतात. हे सारे अतिसूक्ष्मकण आणि क्‍वार्क कशाचे बनले आहेत याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून स्ट्रिंग थिअरीचा जन्म झाला. हे सारे कण आणि त्यांचे एकमेकांशी असणारं संगठन ज्या चार मूलभूत बलांनी चालतं (गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकीय बल, अणुकेंद्रकीय क्षीण आणि उच्च बल ही ती चार मूलभूत बले) तीही अतिसूक्ष्म कणांनीच बनली आहेत, अशी यात संकल्पना आहे. तसंच यांना जोडणारी स्ट्रिंग - म्हणजे जणू काही दोरीच - ही एका ठराविक तऱ्हेनं ठराविक मितीमध्ये थरथरत असेल तर ती इलेक्‍ट्रॉनसारखी गुणधर्म दाखवेल, जर वेगळ्या तऱ्हेनं थरथरत असेल तर क्‍वार्कप्रमाणे गुणधर्म दाखवेल. जर त्याहून वेगळ्या प्रकारानं थरथरत असेल तर ती एखाद्या अतिसूक्ष्मकणासारखे गुणधर्म दाखवेल. या स्ट्रिंगच्या कंपनांची गणितं मांडली तर हे विश्व कशानं बनलं आहे आणि ते कोणत्या बलाखाली कार्य करतं ते कळेल हा त्यामागचा विचार होता. या विश्वातल्या सर्व पदार्थांना लागू पडणारं आणि या चारही मूलभूत बलांना एकत्र करणारं असं एक समीकरण किंवा नियम मांडता येईल काय, असं त्यातून शास्त्रज्ञांना वाटायला लागलं. याविषयी विचार करताना अनेक वेगवेगळ्या स्ट्रिंग-संकल्पना उदयाला आल्या. त्यांचं एकत्रीकरण एडवर्ड विटेन यांनी "एम थिअरी' असं केलं. या थिअरीत अजून काही उणिवा आहेत; पण हॉकिंग यांनी आपल्या पुस्तकात ही थिअरीच उचलून धरली आहे. "यातूनच या विश्वाचं रहस्य उलगडणं सोपं होईल आणि विज्ञानानं हे कोडं सोडवणं शक्‍य आहे, त्यासाठी आपल्याला देव या संकल्पनेची गरज नाही,' असंही हॉकिंग ठामपणे म्हणतात.

काळाच्याही पलीकडचं पाहणारा द्रष्टा...
इंग्लंडमध्ये ऑक्‍सफर्ड इथं जन्मलेले (आठ जानेवारी 1942) डॉ. स्टीफन हॉकिंग यांचं बालपण सामान्य मुलाप्रमाणेच गेलं. वडील फ्रॅंक हे गरीब शेतकरी कुटुंबातले. खडतर परिस्थितीत त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. आई इझाबेलही ऑक्‍सफर्डची पदवीधर. एकाच संस्थेत ते दोघंही काम करायचे.
हॉकिंग यांना मेरी आणि फिलिपा या दोन बहिणी आणि एडवर्ड नावाचा एक भाऊ. एकपाठी असणाऱ्या, संगीतात रमणाऱ्या हॉकिंग यांना भौतिकशास्त्राबरोबरच गणिताचीही आवड लहानपणीच लागली. ऑक्‍सफर्डमध्येच कॉस्मॉलॉजी या विषयानं त्यांना झपाटून टाकलं. मग पीएच. डी करण्यासाठी त्यांनी केंब्रिजला जायचा निर्णय घेतला. त्यांना प्रा. फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं होतं; पण ते काही जमलं नाही. त्यांना लाभलेले मार्गदर्शक डेनिश शियामा यांनीही त्यांना खूप प्रोत्साहन
दिलं आणि वेळोवेळी मदतही केली.

हॉकिंग यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांची जेन हिच्याशी 1963 मध्ये ओळख झाली. त्याच दरम्यान हॉकिंग यांच्या आजाराची लक्षणं दिसू लागली होती. "ऍमिनो ट्रॉपिक लॅटरल स्क्‍लेरोसिस' असं आजाराचं निदान झालं. ही एक मज्जासंस्थेची व्याधी असून तीत हळूहळू "मोटर नर्व्ह' कमकुवत होत जातात आणि शरीरातल्या हालचाल करणाऱ्या स्नायूंवरच गंडांतर येतं. हॉकिंग यांच्या वयाच्या जेमतेम एकविसाव्या वर्षीच या व्याधीची सुरवात झाली होती आणि आता पीएच. डी पूर्ण होणार की नाही, हाही प्रश्‍न समोर आला होता. मात्र, रुग्णालयातल्या एका आजारी मुलाच्या वागण्यातून हॉकिंग यांनी उभारी घेतली. ("स्टीफन पुढची जेमतेम दोन-अडीच वर्षेच जगेल,' असं डॉक्‍टरांनी सांगितलं होतं!). पुढच्या सगळ्या आयुष्यात खुर्चीला कायमस्वरूपी खिळून राहावं लागूनही तशा अवस्थेत हॉकिंग यांनी विज्ञानाक्षेत्रात प्रचंड काम केलं. हॉकिंग यांच्या आजाराची कल्पना असूनही जेन हिनं त्यांच्याशी
विवाह (1965) केला. त्यांना सांभाळलं. रॉबर्ट (1965), ल्युसी (1970) टिमोथी (1979) ही तीन अपत्यं त्यांना झाली. जेननं हॉकिंग यांना 25 वर्षं साथ दिली.
हॉकिंग यांच्या हालचाली बंद झाल्या तरी व्हीलचेअरला संगणकीय साधनं बसवून, आधी आवाजाच्या आधारे आणि नंतर गालाच्या एका स्नायूच्या आधारे संगणकीय आज्ञावलीशी संवाद साधून त्यांनी उर्वरित आयुष्य काढलं. खरंतर त्यांच्या या जगण्याच्या धडपडीसाठी आणि त्यातही सतत कार्यरत राहण्यासाठी
त्यांनी काय आणि कसं सोसलं, यावरच एक वेगळा लेख होऊ शकतो.
हॉकिंग यांच्यावर अनेक डॉक्‍युमेंटरीज्‌ निघाल्या, चित्रपट निघाले. त्यांच्या लेखनावर अनेकांनी अपरंपार प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचा गौरवही झाला. ""आपली पृथ्वी ही आता माणसाच्या वस्तीसाठी फक्‍त 100 वर्षंच आपल्या हातात राहणार आहे...लवकरात लवकर अंतराळप्रवासाची आणि नव्या वसतीयोग्य ग्रहाची निवड आपल्याला करायला हवी,'' हे पर्यावरणाविषयीचे त्यांचे गेल्या वर्षीचे उद्गार त्यांचा वादातीत द्रष्टेपणा दाखवून देणारे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com