चेहऱ्याचं 'ओळख'पत्र (आनंद घैसास)

आनंद घैसास anandghaisas@gmail.com
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

देशातल्या विमानतळांवर "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणेद्वारे ओळख पटवण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळंच भविष्यात चेहराच एक प्रकारे विमानतळांवर "ओळख'पत्र किंवा तिकिटाचं काम करेल. "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणा नेमकी असते कशी, ते कशा प्रकारे केलं जातं, ते विकसित कसं झालं, चेहऱ्याचं स्कॅनिंग जास्त सुरक्षित का मानलं जातं, त्याची वैशिष्ट्यं काय, जगभरात काय ट्रेंड आहे आदी गोष्टींचा वेध.

देशातल्या विमानतळांवर "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणेद्वारे ओळख पटवण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळंच भविष्यात चेहराच एक प्रकारे विमानतळांवर "ओळख'पत्र किंवा तिकिटाचं काम करेल. "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणा नेमकी असते कशी, ते कशा प्रकारे केलं जातं, ते विकसित कसं झालं, चेहऱ्याचं स्कॅनिंग जास्त सुरक्षित का मानलं जातं, त्याची वैशिष्ट्यं काय, जगभरात काय ट्रेंड आहे आदी गोष्टींचा वेध.

माणसाचा चेहरा ही त्याची पहिली आणि तसं म्हटलं, तर शेवटपर्यंत एकच ओळख असते. या चेहऱ्याच्या जोरावरच तो इतरांवर जी काही छाप पाडायची ती पाडत असतो. बाकी तो किती उंच आहे, धट्टाकट्टा आहे की सुकडा आहे, गलेलठ्ठ आहे की नाही, उजळ आहे की सावळाच याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मुलींमध्ये मात्र चेहऱ्याच्या गोरेपणाला जरा उगीचच जास्त महत्त्व मिळतं, हे खरं असलं, तरी "नाकी डोळी नीटस आहे हो...' हे सहज आलेले उद्‌गारही फार महत्त्वाचे असतात. या आपल्या चेहऱ्यालाच आजच्या काळात वेगळं महत्त्व आलं आहे, याची जाणीव झाली, ती गेल्या आठवड्यात धडकलेल्या एका बातमीमुळं. कारण तुमचा चेहरा हाच आता काही ठिकाणी "ओळख'पत्राचे तर काही ठिकाणी चक्क प्रवासाच्या तिकिटाचं काम करणार आहे... आणि हो, आता आपल्याला कुठं अशा प्रवासाला जायचे असेल, तर आपला चेहरा झाकून, लपवून तर नक्कीच चालणार नाही.

सध्याच्या "कागदरहित' कारभाराचं, "डिजिटल इंडियाचं' हे आणखी एक पुढचं पाऊल असणार आहे हे खरं असलं, तरी काही जणांच्या मनात अजून याबाबत किंतू निर्माण झालेले आहेत. शिवाय "आधार कार्ड'च्या प्रमाणेच हीसुद्धा आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आलेली गदाच असणार आहे, आपल्या चेहऱ्याचा वापर कोणी इतर दुष्कृत्यांसाठी वापर करतील, अशी भीतीही काही जणांच्या मनात डोकावत आहे. असो. आधी ही बातमी काय आहे ते पाहू.

भविष्यात देशांतर्गत विमानप्रवास करताना अत्यावश्‍यक असणारा "बोर्डिंग पास' घरी ठेवून आलात तरी चालेल- कारण विमानात चढताना नव्या "बायोमेट्रिक' तंत्राप्रमाणं करण्यात येणाऱ्या "मुखावलोकन' तंत्राने, म्हणजे तुमच्या "चेहरा-ओळख तंत्रानं' (फेशिअल रेकग्निशन) तुमची ओळख पटवली जाणार आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांत हे तंत्रज्ञान भारतातल्या काही विमानतळांवर सुरू होणार आहे, अशी सरकारी माध्यमातून घोषणाही करण्यात आली आहे. अंतर्गत विमानवाहतूक व्यवस्थेत पर्यावरण-पोषक "कागदरहित' कारभार आणि गर्दीमुळं होणाऱ्या दिरंगाईवर हा एक उपायच ठरणार आहे, असं या मंत्रालयातले सचिव राजीवनयन चौबे यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. गेल्या दशकामध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांमध्ये सुमारे सहापटीनं वाढ झाली आहे. स्वस्त प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या, छोट्या क्षमतेची विमानं वापरत त्यांच्या अनेक फेऱ्या करणाऱ्या नव्या कंपन्यांमुळं हे शक्‍य झालं असलं, तरी त्यामुळं विमानतळांवरची गर्दी वाढली आहे. त्यावर हा उपायच ठरणार आहे. या तंत्रामुळं विमानतळावर आल्यापासूनच चालता चालतानाच, पदपथाच्या मार्गात बसवलेल्या कॅमेरा आणि संगणकीय उपकरणांद्वारे तुमची ओळख पटवण्यात येईल आणि त्यामुळं तिकीट तपासणं, सामान जमा करणं, सुरक्षा तपासणी कक्षातून जाताना, एवढंच नाही तर प्रत्यक्ष विमानात चढतानाही, कुठंही तपासणीसाठी थांबायची गरज उरणार नाही. त्यामुळं दिरंगाई होणार नाही. या "मुखावलोकन' तंत्रामुळं आता सोबत ओळखपत्र आणि बोर्डिंग पासही जवळ बाळगण्याची आणि वेळोवेळी दाखवण्याची गरजच उरणार नाही.

लिस्बनमधले बायोमेट्रिक सर्व्हिस प्रोव्हायडर "व्हिजन-बॉक्‍स' यांच्या सहकार्यातून हे तंत्र बंगळूर आणि हैदराबादच्या विमानतळांवर फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. "जेट एअरवेज', "एअर आशिया' आणि "स्पाइसजेट' या तीन विमानकंपन्या यात प्रथम सहभागी होणार आहेत. "डेल्टा एअरलाईन' या विमानकंपनीनं अशी "मुखावलोकन' सेवा अटलांटामध्ये गेल्याच महिन्यात सुरू केलेली आहे आणि ब्रिटिश एअरवेजनंही लगेचच न्यूयॉर्क, ओर्लान्डो आणि मियामी इथं सुरू केली आहे. भारतात बंगळूर, हैदराबादनंतर एप्रिल 2019 मध्ये कोलकाता, वाराणसी, पुणे आणि विजयवाडा या चार विमानतळांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे. अर्थात हे सगळं असलं, तरी सर्वसामान्य लोकांसाठी या "मुखावलोकन' तंत्रज्ञानासंबंधी, ते नक्की काय असतं याबाबत पुरेशी माहिती नाही हेही तितकंच खरं.

तंत्रज्ञानाचं वेगळेपण
काही आस्थापनांमध्ये कर्मचारी कामावर येताना, एका उपकरणासमोर उभं राहिलं, की त्याच्या चेहऱ्याचं त्यात बसवलेल्या कॅमेऱ्यानं प्रतिमाग्रहण करून त्यांना ओळखलं जातं. त्या दिवशी, ते त्या वेळेला, कामावर हजर झाले... अशी लगोलग नोंदही होते. काही बॅंकांमध्येही हे तंत्र काही वर्षांपासून वापरात आहे. या तंत्राचा एक फायदा आहे, तो म्हणजे यात त्या व्यक्तीला त्या उपकरणाला स्पर्श करण्याची आवश्‍यकता नसते. आधी वापरात असणाऱ्या "बायोमेट्रिक' तंत्रात, हात, हाताचा अंगठा किंवा काही बोटं अशा उपकरणांवर ठेवून त्याचं स्कॅनिंग करावं लागे. डोळ्यांतल्या बाहुल्यांचाही वापर अशा प्रकारे करताना त्या यंत्राच्या खूप जवळ डोकं नेऊन स्कॅनिंग करावं लागतं. तसं आता या नव्या "मुखावलोकन' तंत्रात होणार नाही. यात प्रतिमा घेण्यासाठी असणारे कॅमेरे बऱ्याच दूरवर असणार आहेत.

"चेहरा-ओळख तंत्र' काम कसं करतं?
कशाचीही ओळख पटवायची, तर त्यासाठी आधी जिच्यासोबत ती ओळख पटवायची त्याची आधी आपल्याकडे पुरेशी माहिती असावी लागते. नंतरच ती ताडून पाहता येते. आपणही जेव्हा एखादी वस्तू, गोष्ट किंवा माणूस ओळखतो, ते आपल्या स्मृतीत साठवलेल्या गोष्टींमधून. नव्यानं दिसणाऱ्या वस्तूंचा, माणसांचा, घटनांचा त्या जुन्या आठवणींशी आपण मेळ घालतो, तेव्हा त्या आपल्याला समजून घेता येतात, म्हणजे त्यांचं "आकलन' होतं. असंच काहीसं तंत्र आता संगणकीय ओळख पटवणाऱ्या प्रणालीतून घडवून आणलं जातं. यालाच "मशीन लर्निंग', "कृत्रिम यांत्रिक बुद्धिमत्ता' वगैरे म्हटलं जातं. यात वापरात आणल्या जाणाऱ्या काही आज्ञावली जवळ असलेल्या अनेक प्रतिमांच्या संग्रहातून मिळणाऱ्या नवीन माहितीची जुन्या माहितीशी एकास एक जुळणी करून पाहतात; पण यासाठी आधी पुरेशा माहितीची साठवण करणं आवश्‍यक असतं, तसंच कशाकशाची जुळणी करावी लागेल त्या सगळ्याचं स्वरूपही ठरवावं लागतं. या "मुख-आकलन' आणि "मुखावलोकन' तंत्रासाठी आधी असलेल्या माहितीचे स्रोत म्हणजे अनेक चेहऱ्यांच्या स्थिर प्रतिमा- ज्या द्विमित (टू-डी: टू डायमेंन्शनल) असतात, तर काही त्रिमित (थ्री-डी) प्रतिमा असतात, तर काही चलचित्रातून मिळवलेल्या प्रतिमा- असतात. या सर्वच प्रतिमा द्विमान सांख्यिकी (बायनरी) पद्धतीत संगणकात किंवा माहितीच्या महाजालावर, मग ते संगणकांच्या मालिकांमध्ये असेल (लॅन) किंवा नव्यानं प्रचलित झालेल्या "क्‍लाऊड'वर साठवून वापरात आणल्या जातात. चेहऱ्याच्या प्रतिमेचं सर्वसाधारण: भौमितिक विश्‍लेषण करण्यात येतं. ज्यात चेहऱ्यावर असणाऱ्या अवयवांची एकमेकांशी असणारी अंतरं मुख्यत: नोंदली जातात. त्यात चेहऱ्याची समोरून दिसणारी ठेवण, भुवया, डोळे, नाक, ओठ, डोक्‍यावरच्या केसांच्या कपाळावरच्या उगमाचे ठिकाण, कानाचा आकार अशा अनेक गोष्टींची नोंद घेतली जाते. ज्यावेळी नव्यानं दाखल झालेल्या माणसाची प्रतिमा मिळते, तेव्हा त्या प्रतिमेला आधी हाती असलेल्या माहितीच्या साठ्यातल्या प्रतिमांशी, त्यांच्यातल्या या भौमितिक नोंदींशी एकास एक प्रकारे जुळवण्यात येते आणि त्याची ओळख पटवली जाते. हे करताना ज्या प्रतिमा घेतल्या जातात, त्यात एक विशेष बाब असते, ती लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे ज्या चेहऱ्याची प्रतिमा हवी, त्यावर पडणारा प्रकाश हा कोणत्यातरी बिंदूवत स्रोताकडून येणारा असू नये. कारण त्यामुळं चेहऱ्याच्या उंचसखलपणात सावल्यांच्या खेळामुळं अनपेक्षित असा फरक पडू शकतो. त्यामुळं सर्वसाधारणत: संपूर्ण चेहऱ्यावर समान प्रकाशमानता देणारा प्रकाश-प्रतिमा घेताना उपयोगात आणला जातो. त्यासाठी अधिक लांबी रुंदी असणारे, समान प्रकाशवितरण करणारे दिवे सहसा वापरले जातात.

या तंत्राचा विकास कसा झाला?
संगणकाच्या आधारे चेहऱ्याचं आकलन करून घेण्याची प्रणाली बनवण्याचं श्रेय तिघांना दिलं जातं. वूडी ब्लेडसो, एलन चॅन आणि चार्लस बिस्सोन या तिघांनी 1964-65 च्या दरम्यान या कामाची सुरवात केली. ती चेहऱ्यांच्या द्विमित छायाचित्रांवर आधारित होती; पण या कामासाठी त्यांना मिळालेलं अर्थसाह्य एका निनावी हेरखात्यामार्फत आलेलं होतं. त्यात गुप्ततेचा अंतर्भाव असल्यानं त्यांनी नक्की काय काय केलं, ते सगळं बाहेर येऊ शकलं नाही. त्यांना आपणहून हे त्यांचं संशोधन म्हणून प्रसिद्धही करता आलं नाही; पण नंतर हाती आलेल्या माहितीच्या आधारे, चेहऱ्याच्या छायाचित्रांमधल्या डोळ्याच्या बाहुल्यांच्या केंद्रांची अंतरं, नाकाच्या हाडाचं त्यांच्यापासूनचं अंतर, नाकाची लांबी-रुंदी, नाकापासून ओठांचं अंतर, तिथून खाली हनुवटी, डोळ्यांपासून कानाचं अंतर ही सारी मापं एका त्रिमित भौमितिक आलेखावर रूपांतरित करून, ते बिंदू संगणकीय संख्येत अंकित करून घेतले गेले होते. हा त्रिमित बिंदूआलेख एका सामायिक डोक्‍याच्या आकारावर आरूढ करून त्याला एक उभा अक्ष देण्यात आला होता. या उभ्या अक्षाभोवती हे संगणकीय त्रिमित चित्र गोल फिरवून पाहता येण्याची यात योजना होती. यात हाती आलेल्या माहितीवरून भौमितिक आकारांची जुळणी करत त्यातून एक संगणकीय प्रतिमा मिळवण्याचं हे काम होतं; पण हाती येणारं चित्र आलेखाच्या स्वरूपातच होतं. यथातथ्य छायाचित्रासारखं ते अजिबातच नव्हतं. त्यामुळं नव्या चेहऱ्याची ओळख पटवणं यासाठी या आलेखवजा प्रतिमेतून साधर्म्य शोधणं ही थोडी दूरचीच बाब होती.
स्वत: वूडी ब्लेडसोनं 1966 मध्ये यातल्या त्याला वाटलेल्या त्रुटी नोंदवल्या होत्या. त्यात चेहऱ्याचा मानेवर सहजी होणारा तिरपेपणा, डोक्‍याचं डावी-उजवीकडं, पुढं-मागं झुकणं, प्रकाशाची दिशा, तीव्रता आणि प्रकाशस्रोताचं चेहऱ्यापासूनचं अंतर, छायाचित्र काढताना कॅमेऱ्याचा चेहऱ्याशी असणारा कोन, चेहऱ्यावरच्या भावनांमुळं रचनेत होणारा बदल आणि वयामुळं, वार्धक्‍यामुळं होणारे चेहऱ्यावरील बदल, या सर्वच बाबींचा माग घेण्यात यात त्रुटी राहिल्या असल्याची खंत त्यानं व्यक्त केली होती. मात्र, हा तर चेहऱ्याचं संगणकीय पद्धतीनं आकलन करून घेण्याचा प्रथम प्रयोग होता. शिवाय मोठ्या प्रमाणात चेहऱ्यांशी निगडित माहितीचा साठा काही त्यावेळी त्यांच्या हाती नव्हता. तसंच साधर्म्य शोधण्याच्या प्रणालीही नव्हत्या.

फक्त कॅमेऱ्याचा कोन आणि अंतर यावर मात करण्यासाठी हाती असलेल्या सगळ्या बिंदूंना एका चौकटीत समान पसरवून घेण्याचं आणि त्यातून त्यांचं सामान्यीकरण करण्याचं काम त्यानंतर केलं गेलं. त्यामुळं चेहऱ्याचा आकृतीबंध कायम राखत त्याचा आकार लहान-मोठा करण्याचंही यात जमू लागलं होतं. मात्र, यातले जे मुख्य पायाभूत आकृतीबंध म्हणून वापरलेलं डोकं होतं, ते मात्र हाती असणाऱ्या सात-आठ छायाचित्रांवरून चित्रकारानं तयार केलेलं, काल्पनिक, सगळ्या बाजूंनी समानता असणाऱ्या नमुन्याप्रमाणं होते.

सुधारित प्रणाली
याच प्रमुख प्रणालीवर आधारित नंतर स्टॅनफोर्ड संस्थेतले संशोधक पीटर हार्ड यांनी नवीन सुधारित प्रणाली तयार केली. यात त्यांनी एकूण दोन हजार छायाचित्रं वापरून, त्यांचा आधार डोक्‍याचा पायाभूत आकृतीबंध बनवण्याठी वापरला होता. 1997 पर्यंत जर्मनीतली युनिव्हर्सिटी ऑफ बोशम आणि अमेरिकेतली युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया या दोन्ही संस्थांमधले संशोधक, विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकमेकांशी संवाद साधत अमेरिकेच्या लष्करी आस्थापनांकडून पुरवलेल्या आर्थिक साह्याचा फायदा घेत या "मुखावलोकन' संबंधातलं संशोधन सुरू ठेवलं. त्यांच्याकडं आता अधिक माहितीचा साठा उपलब्ध होता. या प्रणालीची "झेडएनएस' या नावानं काही प्रमाणात विक्रीही झाली. ही प्रणाली ग्राहकांची चेहरेपट्टी ओळखण्यासाठी काही बॅंकांमधून आणि काही विमानतळांवरही काही काळ वापरण्यात आली. यात तयार केलं जाणारं प्रतिमाचित्र आधीप्रमाणंच चेहऱ्याचं भौमितिक निकषांवर त्रिमित आरेखन करत असे. या त्रिमित संगणकीय आरेखनात व्यक्तीच्या दाढी-मिशा आणि डोक्‍यावरच्या केसांनाही स्थान नव्हतं. चष्मा आणि गॉगलदेखील यातून बाद केला जाई. त्यामुळं "महिला जरी दाढी-मिशा लावून आल्या, तरी आमचा संगणक त्यांना ओळखू शकतो' अशी या प्रणालीची जाहिरात केली जाई.

संगणकीय प्रणालींमुळं बळ
यानंतरच्या काळात संगणकीय प्रणालींमध्ये झपाट्यानं बदल होत गेले, त्याप्रमाणंच छायाचित्रकलेत फिल्म ते डिजिटल असा फार मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला. स्कॅनिंग तंत्र विकसित झालं. अधिक विभेदनक्षमता (हाय रेझोल्युशन) असणाऱ्या प्रतिमांचं ग्रहण करणं शक्‍य होऊ लागलं. कॅमेऱ्याच्या प्रतिमाग्रहण करण्याच्या क्षमतेत सुमारे दहा ते शंभर पटींनी (किलोबाइट ते मेगाबाइट) वाढ झाली. त्यातूनच "फेस रेकग्निशन ग्रॅंड चॅलेंज'च्या (एफआरजीएस) संशोधनामागं सारे संगणक विशारद धावू लागले. त्यातच अमेरिकेच्या लष्करातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रणालींच्या चाचण्यांमुळं या प्रयोगांमध्ये 272 पट वाढ झाली, असं नमूद करण्यात आलं आहे. याचसोबत खास स्टुडिओमध्ये जाऊन ठराविक प्रकाशात छायाचित्रं घेणं बरंच कमी होऊ लागलं, तर नैसर्गिक वातावरणात, उघड्यावर, अधिक विभेदन क्षमतेचे, अधिक स्पष्टता असणारे, डिजिटल फोटो घेणं हे लक्षणीय प्रमाणात वाढलं. शिवाय संगणकीय प्रणाली वापरून कमी स्पष्टता असणाऱ्या चित्रांची विभेदनक्षमता वाढवून स्पष्टता आणणंही शक्‍य होऊ लागलं. त्यामुळं चेहरेपट्टीची संगणकीय प्रारूपं बनवण्याची आवश्‍यकता न उरता प्रत्यक्ष डिजिटल प्रतिमांचाच वापर संगणकीय माहितीच्या साठ्यासाठी होऊ लागला.

आजकाल त्रिमित प्रतिमाग्रहण करताना दोन किंवा अधिक कॅमेरे एकाच वेळी वापरतात. त्यापैकी एक समोर, दुसरा त्याच्याशी नव्वद अंशांच्या कोनात म्हणजे चेहऱ्याकडं एका बाजूनं पाहणारा, तर तिसरा दुसऱ्या बाजूस थोडा वरून किंवा खालून तिरप्या कोनात ठेवलेला असतो. तसंच व्यक्ती या कॅमेऱ्याच्या जवळून, खरं तर मधून जाताना व्यक्तीचा एकच फोटो काढला जात नाही, तर एकापाठोपाठ एक अनेक छायाचित्रं यात त्वरित आणि क्रमानं घेतली जातात. त्यात चेहऱ्यात चालताना होणारे, भावनांमुळं होणारे आणि प्रकाशामुळं होणारे बदल पकडले जातात. त्यांचं नंतर सामान्यीकरण करणं मग शक्‍य असतं.

दुसऱ्या एका प्रकारात चेहऱ्यामधल्या ठराविक पृष्ठभागाच्या एका तुकड्याचे, त्वचेच्या एका भागाचं भरपूर विभेदनक्षमतेनं छायाचित्रण केलं जातं. याला "स्किन प्रिंट' असं म्हणतात. या प्रतिमेला वर्धित करून पाहिल्यावर त्यातल्या विविध रचना, रेषा, घड्या, छिद्रं, केसांच्या जागा, कातडीच्या पेशींच्या रचना दिसू लागतात. या रचनांचा मग संगणकीय आकृतीबंध तयार केला जातो. एकसारख्या दिसणाऱ्या दोन जुळ्या भावांमधला फरक जाणण्यासाठी हे तंत्र यशस्वीपणे वापरात आणलं गेलं आहे.
आता फक्त दृश्‍यप्रकाशच नव्हे, तर औष्णिक "अवरक्त' प्रारणांचा वापर करूनही प्रतिमाग्रहण केलं जातं. हे किरण डोळ्यांना न दिसणारे असले, तरी अंधारातही यांच्या साह्यानं चित्रण करता येतं, ही मोठीच उपलब्धी आहे. शिवाय यात प्रकाशाचं समान वितरण नव्हे, तर ठिपके, रेषा अशा प्रकारे चेहऱ्यावर अवरक्त किरणांच्या शलाका पाठवल्या जातात. त्यामुळं उंचसखलपणा अधिक प्रकर्षानं जाणवतो, पकडता येतो.
या "मुख-आकलन' आणि "मुखावलोकन' प्रणालीसाठी चेहऱ्याचं प्रतिमाग्रहण हा पहिला मुख्य भाग असला, तरी त्या प्रतिमेचं संगणकीय वर्गीकरण, ही प्रतिमा नंतर कशासाठी जपून ठेवायची आहे आणि वापरायची आहे, त्यासाठी तिच्यात काय सुधारणा आवश्‍यक आहेत हा दुसरा भाग येतो. त्यानंतर या प्रतिमेचं भौमितिक विश्‍लेषण करण्याचं काम केलं जाते. यात आता चेहऱ्यातल्या प्रत्येक आकृतीबंधाचा तपशील आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध अंकित केला जातो. यात डोळे, त्यांचा उंच-सखलपणा, गोलाई, बुब्बुळाचा आकार, त्यांच्यामधलं अंतर, डोळ्याच्या लांबी-रुंदीच्या संदर्भात त्यांचं स्थान, गालाचा गोलावा, कानाचा आकार, कानाच्या पाळीचं लोंबणं, न लोंबणं, कानाचा डोक्‍याच्या पृष्ठभागाशी असणारा कोन, नाकाच्या उंचीसोबत त्याच्या नाकपुड्यांची रचना, टोकदारपणा, फुगीरपणा, नाकपुड्यांची उभारी, ओठांची लांबी-रुंदी, कमानदारपणा, त्याखालच्या हनुवटीचा आकार-लांबी, ती गोलाकार आहे, निमुळती, त्रिकोणी आहे, की चौकोनी आहे, अशा अनेक बाबी यात लगेचच अंकित करण्यात येतात. यातलं पुढचं काम दुसरी प्रणाली करते, ते म्हणजे जमा झालेल्या साऱ्या प्रतिमांचं सामान्यीकरण करून, त्यांच्यातला अनावश्‍यक "डाटा' काढून टाकून, त्यांना आकारानं कमी करून (फाइल कॉम्प्रेस करून) ती प्रतिमा आता वर्गीकरण केलेल्या "दालनात' (गॅलरीत) क्रमवार लावली जाते. म्हणजे आवश्‍यकता भासल्यावर या प्रतिमा शोधताना सोपं जातं. त्याच्या नंतरची प्रणाली नव्यानं आलेल्या प्रतिमेची एकामागोमाग एक तुलना करत, प्रतिमांमधलं सांख्यिक साधर्म्य शोधत पुढं पुढं जात राहते. मात्र, आता एकाच नव्हे, तर साठ्यामधल्या अनेक प्रतिमांमध्ये, त्यांच्या आकृतीबंधांमध्ये साधर्म्य सापडण्याची शक्‍यता असते. मग या निवडक प्रतिमांमधल्या बारकाव्यांचं विश्‍लेषण करत संगणक त्याला समान वाटणाऱ्या प्रतिमेशी नवी प्रतिमा जुळते की नाही हे ताडून पाहतो, ठरवतो. यासाठी "मुख्य आकृतीबंध ओळखणारी प्रणाली', "रेखीय प्रणाली', तर तिसरी "आकृतीबंधाला लवचिकता देऊन साधर्म्य शोधणारी प्रणाली' ही सारी कामं करतात, तर त्यासोबत इतरही काही प्रणाली एकाच वेळी काम करीत असतात.

प्रणालींची गुणवत्ता कशी ठरवतात?
"द गॉशियन फेस अल्गोरिदम' (2014) या हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीनं प्रसिद्ध केलेल्या संशोधनात या यांत्रिक "चेहरा-ओळख' तंत्राची क्षमता तपासली गेली, ती 98.52 टक्के यशस्वी ठरली, तर प्रत्यक्ष माणसाच्या ओळख पटवण्याच्या 97.53 यशस्वीतेच्या, म्हणजे तुलनेनं अधिक यशस्वी ठरली होती. फेसबुकनं "डीपफेस' ही प्रणाली 2014 मध्ये आणली, त्यात कोणतेही दोन फोटो एकाच माणसाचे आहेत की नाहीत हे ठरवण्याचं तंत्र होतं. तेही 97.25 टक्के यशस्वी ठरले. 2015 मध्ये गूगलनं "फेसनेट' प्रणाली तयार केली, जी गूगलच्या संपूर्ण महाजालाचा वापर चेहरेपट्टी ओळखण्यासाठी करते. याची यशस्वीता शंभर टक्के आढळून आली आहे.

यंदा एमआयटीनं केलेल्या एका संशोधनात, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट आणि चिनी "मेघवी' कंपनीनं तयार केलेल्या "फेस++' या नव्या प्रणालीची चाचणी घेत असता, उजळ रंगाची माणसं ओळखण्याच्या तुलनेत, सावळ्या रंगाच्या महिला ओळखण्यात बऱ्याच त्रुटी होतात, असं दिसून आलं आहे. तसंच एकासारखे एक दिसणाऱ्या अनेक चिनी तरुण चेहऱ्यांमध्येही ओळख पटवताना गोंधळ होतो, असं नमूद झालं आहे. अर्थात असं असलं, तरी अनेक देशांतल्या विविध संस्था आता "मुखावलोकनाच्या' नवनव्या प्रणाली घेऊन बाजारात उतरत आहेत.

ड्रोनवर बसवलेल्या कॅमेऱ्याचा वापर करत, शंभर मीटर उंचीवरून, आठशे मीटर दूरवर असणाऱ्या शंभर माणसांच्या गर्दीतला गुन्हेगार या "मुखावलोकन' तंत्रानं नेमका ओळखता येण्याची क्षमता आता या तंत्रज्ञानानं आज दर्शविली आहे...अर्थातच या तंत्राचा आवाका आता मोठा आहे. फक्त सुरक्षाच नव्हे, तर आरोग्य, शरीरस्वास्थ्य, जनुकीय विकृतींचा शोध- एवढंच नाही, तर कोणत्या मॉलमध्ये तुम्ही किती वेळा येता, काय खरेदी करता, त्यावरून तुमच्या गरजा काय, हेही आता व्यावसायिक लोक अशा तंत्राआधारे ठरवू शकतात...

"तुझे रूप चित्ती राहो' असंच आता माहितीचं महाजाल आपल्या चेहऱ्याबद्दल म्हणत असेल, तर त्यात नवल नाही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aanand ghaisas write facial recognition article in saptarang